News Flash

पितृपक्ष : सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीच्या दिशेने..

<span style="color: #ff0000;">कव्हरस्टोरी</span><br />आजचं युग आहे सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीचं. लग्नं, वाढदिवस या इंडस्ट्रीचे आवडते इव्हेन्ट. लोकांकडे वेळ नसतो आणि आयुष्यातले मौल्यवान दिवस झोकात तर साजरे करायचे

| September 20, 2013 01:03 am

कव्हरस्टोरी
आजचं युग आहे सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीचं. लग्नं, वाढदिवस या इंडस्ट्रीचे आवडते इव्हेन्ट. लोकांकडे वेळ नसतो आणि आयुष्यातले मौल्यवान दिवस झोकात तर साजरे करायचे असतात, या गरजेवर ही इंडस्ट्री उभी राहिली. पण लग्नाचं सोडून द्या, पितृपक्षातल्याच नव्हे तर एरवीही श्राद्धासारख्या विधींसाठीही तुम्हाला हवी तशी सेवा मिळायला लागली आहे. तुम्ही श्रद्धेनं श्राद्ध करणारे असा किंवा त्याला कर्मकांड मानणारे असा, सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीचा हा ट्रेंड मान्य करावाच लागतो.

‘दीडशे रुपये ताट पडेल.. हो.. हो.. त्यात आमसुलाच्या चटणीपासून सगळं असेल. तुम्ही फक्त जेवायला माणसं किती ते सांगा..’
केटरिंगवाल्याबरोबरचा हा संवाद आहे, अर्थातच श्राद्धाच्या जेवणाशी संबंधित असलेला. पितृपक्ष सुरू झाल्यावर आपल्याकडे घरोघरी पितराचं श्राद्ध घातलं जातं. त्या विधींबरोबरच महत्त्वाचं असतं ते जेवण. पितृपक्षात आपले पूर्वज जेवायला येतात, असं मानून त्यांना पोटभर जेवायला घालण्यासाठी हल्ली केटरिंगवाल्यांचीही मदत घेतली जाते. पितृपक्षातच नव्हे तर एरवीही घरी कुणाचं निधन झालं तर तेराव्याला घालायच्या गोड जेवणासाठीही सर्रास केटरिंगवाल्यांची मदत घेतली जाते. खूपदा मनुष्यबळ कमी, वेळ कमी हे त्यामागचं कारण असतं. कधीकधी तर घरातली जागा कमी, त्या तुलनेत माणसं जास्त म्हणून मग हॉल घेऊन तिथेच विधी केले जातात.
पितृपक्षात, एरवीच्या श्राद्धात करायच्या विधींचंही आज बऱ्याच प्रमाणात असंच झालं आहे.
तुम्हाला हवी असलेली सेवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने उपलब्ध असणं म्हणजेच सव्‍‌र्हिस इंडस्ट्री. आज घराच्या साफसफाईपासून  अशा अनेक गोष्टींसाठी सेवा उपलब्ध आहेत, ज्यांची अवघ्या पन्नास वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल. सण आला बोलवा साफसफाईसाठी माणसं, झुरळं झालीत बोलवा पेस्ट कंट्रोलवाल्याला, घर बदलायचंय, बोलवा मूव्हर्स आणि पॅकर्सवाल्यांना, समारंभ आहे बोलवा केटरिंगवाल्याला, लग्न आहे बोलवा मेकअपवाल्यांना, मेंदीवाल्यांना. या अशा वेगवेगळ्या सेवा विकसित झाल्या आहेत कारण काळानुसार जगणं बदललं आहे, कुटुंब व्यवस्था बदलली आहे. जगण्याच्या गरजा बदलल्या आहेत.

अशीही पितृस्मृती
पितृपक्षातील कार्याचा मूळ उद्देश पितरांची स्मृती जपणे, त्यांना अन्नपाणी देणे हाच आहे. त्यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांना उजाळा देणे, त्यांच्यापासून स्फूर्ती घेणे हा त्यामागील  महत्त्वाचा मुद्दा. आपापल्या घरातील पूर्वजांची स्मृती जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाने संपूर्ण समाज हेच कुटुंब मानून समाजातील थोर पूर्वजांच्या स्मृती जपण्याची परंपरा गेली २२ वष्रे जोपासली आहे. ज्या व्यक्ती, संस्था यांनी समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे अशांची र्सवकष ओळख समाजाला व्हावी आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने सेवा संघ पितृ पंधरवडय़ात पितृस्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करत असते. सेवा संघाच्या कला विभागाच्या माध्यमातून या काळातील तीन दिवस या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
या संदर्भात अधिक माहिती देताना कला विभागप्रमुख रवींद्र लाड सांगतात, ‘‘यासाठी विषयाचे बंधन आम्ही ठेवलेले नाही. १९९१ साली व्याख्यानमालेची सुरुवात विद्याधर गोखले यांच्या महाभारत, रामायण, ऋषी मुनी यांच्यावरील व्याख्यानाने झाली होती. संतमंडळी, शिवाजी महाराज, सावरकर, आचार्य अत्रे, होनाजी बाळा, ओंकारनाथ ठाकूर, रामकृष्ण बुवा वझे अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींवर सुरुवातीच्या काळातील व्याख्याने होती.’’ त्यानंतर विषयांचे आणखीन वैविध्य वाढवून मराठीतील अग्रणी विनोदकार, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज, पोलीस खात्यातील हुतात्मे, मराठी संगीत दिग्दर्शक, अहिल्या रांगणेकर, निळू फुले, १९ व्या शतकातील मुंबईचे शिल्पकार अशा व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती सेवा संघाने जागवल्या आहेत. केवळ व्यक्तीच नाही तर समाजाच्या एकूणच जडणघडणीत ज्यांचे महत्त्वाचे स्थान आहे अशा पितृस्थानी असणाऱ्या अनेक संस्थांची ओळखदेखील या व्याख्यानमालेद्वारे करून देण्यात आली आहे. त्यामध्ये किर्लोस्कर उद्योग समूह, टाटा उद्योग समूह, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, मुंबई विद्यापीठ यांचा समावेश होता. यशवंत पाठक, बाबासाहेब पुरंदरे, अरिवद इनामदार, राम शेवाळकर, अशोक रानडे, अरुण टिकेकर अशा अनेक वक्त्यांनी व्याख्याते म्हणून यासाठी योगदान दिले आहे. या अशा अनोख्या व्याख्यानमालेमुळे केवळ पूर्वजांचे स्मरणच नाही तर त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन सर्वसामान्यांना दिशा दर्शविण्याचे कार्य होत आहे.

पितृपक्षात केलं जाणारं श्राद्ध ही भावनिक तसंच श्रद्धेची बाब. ती साजरी करण्याची गोष्ट नसल्यामुळे तिचा इव्हेन्ट झाला नसला तरी तिचीही वेगाने सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे मान्य करावंच लागतं. याबाबतची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या पुरोहितांशी चर्चा केली तेव्हा त्या चर्चेतूनही अप्रत्यक्षपणे हीच बाब पुढे आली. ती कशी समजून घेण्याआधी थोडं पितृपक्षाचं वास्तव सगळ्या अंगांनी समजून घ्यायला हवं.
पूर्वजांचं स्मरण
श्रावणातला दहीहंडीचा जल्लोष, भाद्रपदात गणपती उत्सव यातून एक उत्सवी वातावरण तयार झालेलं असतं. पण या उत्साही वातावरणाला भाद्रपदातील कृष्ण पक्षात अचानक ब्रेक लागतो. हा काळ म्हणजे जणू काही अशुभ पर्व अशीच त्याची संभावना केली जाते. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या काळात म्हणजेच पितृपक्षात/ पंधरवडय़ात अनेक व्यवहार थंडावू लागतात. नव्या कामाची सुरुवात नको, वाहन, सोने अशी मौल्यवान खरेदी नको, इतकेच काय त्या काळात निवडणुका आल्या तर निवडणुकीचे अर्जदेखील भरायला नको अशी धारणा असते. वास्तविक पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा, त्यांच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा कालावधी. सध्या जरी पितृपक्ष सर्वपित्री अमावास्येला संपतो अशी संकल्पना असली तरी कन्यागत पर्वात सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हापासून तो वृश्चिक राशीत जाईपर्यंतचा कालावधी हा पितृपक्ष असल्याचे पुरोहित वर्ग सांगतो. या काळात पितर मृत्युलोकात येतात, असे मानले जाते. त्यांना श्रद्धापूर्वक अन्नपाणी देणे ही मूळ संकल्पना. पण ऋण व्यक्त करण्याच्या भावनेऐवजी काहीतरी करून पक्षश्राद्ध केलेच पाहिजे आणि आपल्यामागची पीडा सोडवली पाहिजे, अशी एक सार्वत्रिक भावना दिसून येतो.

या संदर्भात मुंबईतील दादर येथील पुरोहित संजय मुणगेकर सांगतात, ‘‘दैवकर्म आणि पतृकर्म ही दोन्ही मानवाची समान कम्रे आहेत. शुभ कार्यातदेखील पितरांची आठवण केली जाते. नांदीश्राद्ध हा त्याचाच प्रकार आहे. किंबहुना दैवताच्या आशीर्वादाबरोबरच कोणत्याही कार्याला पितरांचेही आशीर्वाद हवेतच.’’
तर मुंबईतील दादर येथील पुरोहित गुरू वाटवे यांच्या मते ‘‘पितृपक्ष हा अशुभ काळ हा समाजाने केलेला भेद आहे. खरे तर तसे काहीच नाही. उलट आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे यासारखे श्रेष्ठ काम कोणतेच नाही.’’
लोक श्राद्ध या प्रकाराकडे बघताना फक्त आपली सोय बघतात, असाही सूर पुरोहित वर्गाकडून निघतो. राजेश दीक्षित सांगतात की, ‘‘वर्षश्राद्धाच्या संकल्पनेत केवळ तीन पिढय़ांचे (वडील, आजोबा, पणजोबा) स्मरण असते. त्यांचे िपड असतात. या वेळी इतर नातेवाइकांसाठी स्मरणाची सोय नाही, तर पितृपक्षात आपल्या सर्वच दिवंगत नातेवाइकांचे िपड असतात. त्यामुळे आपल्या सर्वच पूर्वजांना स्मरण्याची सोय आहे.’’ पितृपक्षात वडिलांच्या तिथीला हे विधी केले जातात. तसेच हे विधी पहिल्या वर्षश्राद्धानंतर करावेत, असेदेखील सांगितले आहे. तिथी माहीत नसेल तर सर्वपित्री अमावस्येला विधी करावेत, असे सांगितले जाते. म्हणजेच वर्षश्राद्ध व पितृपक्षातील विधी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मात्र सध्या वर्षश्राद्ध घातले नाही तर पितृपक्षात विधी करावेत, असा सोयीस्कर अर्थ काढला जात आहे. त्यातही पंधरवडय़ात शक्य झाले नाही तर सर्वपित्रीचा पर्याय आहेच. त्यामुळेच बहुतांश लोक सर्वपित्रीचा पर्याय स्वीकारत आहेत. परिणामी, सर्वपित्रीच्या वेळेस सर्वत्र एकच गर्दी, गोंधळ दिसून येतो. हाच प्रकार भरणी श्राद्धासंदर्भात जाणवत असल्याचे गुरू वाटवे नमूद करतात. ते सांगतात, ‘‘भरणी श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या पहिल्या वर्षश्राद्धानंतर येणाऱ्या पितृपक्षातील चतुर्थीला केले जाते. मात्र आज पहिले वर्षश्राद्ध होण्याआधीच अनेक जण भरणीश्राद्ध करण्याचा आग्रह धरतात.’’ लोकांना समजावून सांगूनदेखील बऱ्याच वेळा पटत नसल्याचे मत ते व्यक्त करतात.
वास्तविक पूर्वजांच्या स्मृतीचे स्मरण करणे यामध्ये खरेतर अशुभ असे काहीच नाही. पण गेल्या काही वर्षांत येनकेनप्रकारेण पितृपक्षातील विधी करून टाकू, अशी भावना बळावत जाताना दिसत आहे. त्यातूनच मग मूळ विधीतील शास्त्राला शॉर्टकट निर्माण करणारे एक नवेच तंत्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे कर्मकांड नको या भावनेने अन्य काही समाजोपयोगी कार्यातून पितरांची स्मृती जागवणारेदेखील अनेक जण आहेत. त्याच वेळेला हा साराच भोंदूपणा आहे, थोतांड आहे असे म्हणणारा वर्गदेखील समाजात आहे.
आपण पितृपक्षात श्राद्ध करतो म्हणजे आपण धर्माने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट करतो असा अनेकांचा समज असतो. वास्तविक ती कर्मकांडंही ते नीट करत नसतात. तर त्यामागे आपली सोय बघत असतात. पुण्यातील पुरोहित श्रीराम फडके याबद्दल सांगतात, ‘‘पितृपक्षातील सर्व विधी हे यजमानांच्या घरीच करायचे असतात. कार्यादरम्यानचे तीळ-तांदूळ हे घरातच िशपडायचे असतात. पण गेल्या काही वर्षांत अशी काय्रे तीर्थक्षेत्री करण्याची प्रथा पडली आहे. त्यामागे देवस्थानाचे पावित्र्य आणि देवांचे अस्तित्व व आशीवार्द अशी भूमिका असू शकते,’’ पण त्यापेक्षाही हा सोयीच्या दृष्टीने रुळलेला प्रकार आहे, असंही सांगतात.

असाही दानधर्म
पितृपक्षातील श्राद्ध कार्यात २४ प्रकारची दानं सांगितली आहेत. पण सध्या असे दान न करता दक्षिणेवरच सारा भर दिसून येतो. तर विधी करण्याऐवजी श्राद्ध वगरे कर्मकांडावर खर्च करण्यापेक्षा तेच पसे एखाद्या सेवाभावी संस्थेस, गरजू व्यक्तीस द्यावे अशी एक वेगळी दान परंपरा गेल्या काही वर्षांत अनेकांमध्ये रुजली आहे. त्यामागे धार्मिक बंधन झुगारणे अशी भावना नसते, तर सामाजिक भावना दडलेली असते. त्यामुळे आपल्या पितरांच्या नावे, त्यांच्या स्मरणार्थ अनेक जण असे उपक्रम अनेक वष्रे नियमितपणे करत आहेत. पुण्यातील काही निवृत्त शिक्षिकांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.

गरजू व्यक्तींना मदत- माणिक दीक्षित
दहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असले तरी मी जेव्हा नोकरीवर होते तेव्हा पितृस्मरण म्हणून प्रत्येक वर्षी दोन विद्यार्थिनीची दहावी परीक्षा फी भरत असे. सुमारे २५ वष्रे तरी हा परिपाठ सुरू होता. सध्या तर पुरोहित खूप थोडे आणि काम भरपूर अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेस गरजू व्यक्तीस मदत करणे महत्त्वाचे हाच दृष्टिकोन माझा आहे. आजवर कधीच पितृपक्षातील विधी मी केले नाहीत. त्याऐवजी कलशात पाणी ठेवून त्यासमोर गीतेतील सातव्या अध्यायाचे पठण करते आणि मग ते पाणी तुळशीला घालते. ते पितरांपर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होतात असे सांगितले आहे. त्यानंतर जसे जमेल त्या पद्धतीने गरजू व्यक्तींना मदत करत असते.

वृद्धाश्रमास अर्थसहाय्य- सुनंदा कुलकर्णी
आजकाल अनेक संस्थांना खूप मोठमोठी अनुदाने मिळत असतात. मात्र अशा अनेक संस्था आहेत की ज्या केवळ सामान्यांच्या देणगीवरच तरल्या आहेत. मी अशा संस्थांना अर्थसहाय्य करणे योग्य समजते. आज अनेक वृद्धाश्रम पैसे घेऊन सेवा देतात. पण काही वृद्धाश्रम निराधारांना मोफत सुविधा देत असतात. बापदेव घाटातील भिवरे येथील ‘अपना घर’ हे यापकीच एक. तिकडेच गेली दहा वष्रे मी यथाशक्ती मदत करत असते. तसेच एकाच ब्राह्मणास दक्षिणा दिल्याने त्याची एकटय़ाची सोय होईल. पण ज्या वेद पाठशाळेत भावी पुरोहित तयार होत आहेत त्या ठिकाणी म्हणजेच आळंदी येथील वेद पाठशाळेस देणगी देणे जास्ती योग्य आहे असे मी समजते. कारण तेथे मोफत शिक्षण दिले जाते आणि तिला कोणतेही अनुदान नाही.

गरिबांना अन्नदान – वैशाली बापट
माझ्या पतींची मृत्यू तारीख २३ आहे, म्हणून मी प्रत्येक महिन्याच्या २३ तारखेस स्टेशनवरील गरिबांना अन्नदान करते. पिठलं भात, खिचडी, असे साधेच मात्र गरमागरम अन्न त्यांना दिल्यावर त्यांना वाटणारे समाधान खूप मोठे असते. पती जाण्यापूर्वी आम्ही दोघे मिळून पितृपक्षात कीर्तन-प्रवचनाचे उपक्रम करत असू. कीर्तनामध्ये नेहमीची आख्याने न सांगता धर्मकार्य राष्ट्रकार्यासाठी जे झटले अशा लोकांचे, कार्य त्या माध्यमातून आम्ही मांडत असू. बाजीराव पेशवा, वीर सावरकर, जगन्नाथ पंडित यांच्या आयुष्यातील वेगळे संदर्भ यातून उलगडण्याचा माझा प्रयत्न असे.

हाच मुद्दा अधिक स्पष्ट करायचा तर आपल्याकडे नाशिक, त्र्यंबक, नृसिंहवाडी अशा अनेक ठिकाणी पितृपक्षात मोठय़ा प्रमाणात विधिकार्ये होताना दिसून येतात; तर गया येथे तर हेच विधी लाखोंच्या संख्येने होतात. (त्र्यंबक येथील व्यवस्थेत पक्षश्राद्धाबरोबरच नारायण नागबळीसारखे विधीदेखील केले जातात.) येथे संपूर्ण भारतातून विविध जाती-धर्माचे लोक येत असतात. अशा ठिकाणी हे व्यवहार वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असणे हे आहे. पुरोहित, श्राद्धाचे भोजन, साहित्य अशा सर्व सुविधा एकत्रित असल्यामुळे आपण फक्त तिथं जायचं (आणि धोतर नेसून बसायचं) इतकंच काय ते यजमानाला काम असतं. तसेच त्यानिमित्ताने धार्मिक पर्यटनदेखील घडते. त्यातूनच ही व्यवस्था सध्या विकसित झाली आहे, असं त्र्यंबक येथील पुरोहित राजेश दीक्षित मांडतात. म्हणजे या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लोकांना त्यांच्या गरजेनुसार सगळ्या सेवा एकत्र मिळतात आणि त्यातून तीर्थक्षेत्रात पितृपक्षाचे विधी करायचे ही पद्धत विकसित झाली असावी. ही एक प्रकारची सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीच झाली.

त्र्यंबक येथे मात्र पक्षश्राद्धाबरोबरच इतरही विधी केले जातात. त्यामागे बरीच जुनी परंपरादेखील असल्याचे राजेश दीक्षित सांगतात. िशदे घराण्यातील बायजाबाई िशदे यांनी येथे विधी केल्याचे सांगताना त्र्यंबक समाचार नावाच्या वृत्तपत्रातील २०० वर्षांपूर्वीचा संदर्भ देणाऱ्या बातमीचा ते यासाठी हवाला देतात. त्र्यंबक क्षेत्री त्यांच्यासारख्या पुरोहितांकडे पाचशे वर्षे जुनी वंशावळ आहे. येथे सध्या सुमारे ५०० पुरोहित असून या काळात दिवसाला येथे सुमारे दहा-पंधरा हजार तरी विधी होतात. तर अमावस्येच्या काळात हाच आकडा सुमारे एक लाखापर्यंत जातो. अशा वेळेस बाहेरून काही काळासाठी पुरोहित येथे येतात. नृसिंहवाडी येथे सुमारे १२५ वर्षांपूर्वी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी दत्त महाराजांना साकडे घालून वाडीक्षेत्री हे विधी करण्याची अनुमती घेतल्याची दंतकथा आहे. त्यामुळे तेथे श्राद्धविधी होतात. नृसिंहवाडीचे पुरोहित रुपेश पुजारी याच अनुषंगाने सांगतात की, दिवसेंदिवस ही गर्दी दरवर्षी वाढतच आहे. मध्यंतरी काही काळ लोक यापासून काही प्रमाणात लांब गेले होते, पण पुन्हा लोक याकडे वळू लागले आहेत. लोकांचा धार्मिक कल वाढल्याचे यातून दिसून येत आहे. वाडीक्षेत्री पितृपक्षात दिवसाला किमान दोन-तीनशे तरी काय्रे होतात. अमावस्येला हाच आकडा हजारापर्यंत जातो. गावातील सर्वच पुजाऱ्यांच्या घरात सर्व व्यवस्था असल्यामुळे येथे येण्याचे लोकांचे प्रमाणदेखील बरेच वाढत आहे.

अशुभाचा सार्वत्रिक समज
लोक या धार्मिक कार्याबाबत संवेदनशील असले तरी त्यात कच्चे दुवे खूप आहेत. खूपदा केवळ एक उपचार म्हणून विधी केले जातात असादेखील सूर आहे. राजेश दीक्षित सांगतात,  ‘‘एखाद्याची ताकद नसेल, त्याच्याकडे अन्नाचीच वानवा असेल तर केवळ सूर्याकडे तोंड करून पितरांच्या नावे गवताची काडी व पाणी सोडले तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचते. मात्र अनेक लोक ऐपत नसली तरी मोठय़ा प्रमाणात खर्च करून कार्य करताना दिसतात.’’ तर काही पुरोहितांच्या मते अनेक जण जाहीररीत्या पक्षकार्याबाबत विरोधी भूमिका घेतात आणि व्यक्तिगतरीत्या त्यांच्याकडे येऊन कार्य करायचं असा दुटप्पीपणाही करतात. अर्थात या काळात गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदत करून आपल्या पितरांची स्मृती जपणारेही आहेत. पण पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ हा समज मात्र सार्वत्रिक आहे. 

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जरी असे चित्र असले तरी अनेक मोठय़ा शहरातदेखील लोकांच्या सोयीनुसार अनेक ठिकाणी सुविधा तयार होत आहेत. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीतदेखील पितृपक्षातील विधींसाठी मोठी गर्दी होत आहे. इथले शंभर पुरोहित या काळात प्रचंड व्यस्त असतात. हाच प्रकार बाणगंगा तलावाजवळदेखील दिसून येतो. तर पुण्यामध्ये राघवेंद्र स्वामी मठात श्राद्धादी सुविधा उपलब्ध आहेत. थोडक्यात, लोकांच्या सोयीनुसार शास्त्रोक्त विधिकार्यात बदल होताना दिसून येत आहेत. लोकांचे या विधिकार्याकडे वळण्याचे प्रमाण वाढले असले तरी सोयीसुविधांनी युक्त ठिकाणांकडे / कार्यप्रणालीकडे त्यांचा कल झुकत आहे.
पूर्वी विधी-काय्रे केली जात असताना त्या संदर्भातील सर्व साहित्याची व भोजनादी व्यवस्था यजमानाच्या घरीच केली जात असे. पण सध्याच्या धावत्या जगात हे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वानाच एक पॅकेज हवे असते. तशी पॅकेजेस तीर्थक्षेत्री उपलब्ध असल्यामुळे तिकडे कल वाढल्याचे दिसून येते. तर शहरातून पितृपक्षातील जेवणासाठीसुद्धा केटिरग सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे. मुंबईमध्ये पक्ष पंधरवडय़ासाठी भोजन सुविधा पुरविणाऱ्या केटर्सची संख्या २००च्या आसपास आहे. केवळ घरपोच भोजन देण्यासाठी १०० ते १५० रुपये प्रतिमाणसी आकारले जातात, तर हॉलवर जेवण करणे, वाढणे या सुविधेसाठी २०० रुपये प्रतिमाणसीपर्यंत खर्च असतो. दादर येथील गौरव साळवी यासंदर्भात सांगतात  ‘‘आमच्याकडे सर्व प्रकारचे यजमान येत असतात. त्यामुळे गुजराती, ब्राह्मण, मराठा, भंडारी अशा त्या त्या लोकांनुसार जेवणात, पद्धतीत बदल होतो. अर्थात यामागे यजमानाची भावना महत्त्वाची असल्यामुळे त्यानुसार आम्ही सव्‍‌र्हिस देत असतो.’’
याच काळात विशिष्ट भाज्यांनादेखील मोठी मागणी असते. विशेषत: भोपळा आणि गवार यांची मागणी वाढते. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अविनाश पाटील सांगतात की,  ‘‘भोपळ्याची मागणी पुरी करण्याची क्षमता आपल्याकडे कायम आहे. त्यामुळे त्यांच्या दरावर फारसा परिणाम होत नाही. मात्र गवारीचे गणित हे त्या वेळच्या पुरवठय़ावर ठरते.’’ गवारीची किंमत या काळात वाढते का याबद्दल मात्र समितीकडे सध्या तरी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र स्थानिक बाजारातील भाजीपाल्यांच्या दरावर काही प्रमाणात का होईना परिणाम हा होत असल्याची उदाहरणे आहेत. याचाच अर्थ पितृपक्षाच्या काळात  अर्थव्यवहारांमध्येदेखील बऱ्यापैकी उलाढाल होत असते.

इतर धर्मातही पितरांचं स्मरण
पूर्वजांचं स्मरण करणं, त्यासाठी काही विधी करणं, त्याची पुढे जाऊन कर्मकांडं बनणं हा काही फक्त हिंदू धर्मातलाच प्रकार नाही. पितृपक्षासारखे धर्मविधी सर्वच समाजात वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहेत. या संदर्भात त्र्यंबक येथील पुरोहित राजेश दीक्षित सांगतात की, ‘‘पूर्वजांच्या स्मृती जागवणं ही प्रथा वेगवेगळ्या समाजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसते. मुस्लीम धर्मात शब्ब ए बारात, फकिरांना खिल्लत वाटणे या प्रथा आहेत, तर ख्रिश्चन समाजातली हॅलोवीन ही प्रथा आहे. ही पूर्वजांचे स्मरण करण्याचीच उदाहरणे आहेत. म्हणजे समाजांनुसार प्रथा बदलते, पण मूळ उद्देश तोच राहतो.’’

आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे विधीतील अचूकपणा. नीट विधी करायचे झाल्यास दिवसाला फार फार तर दोन ठिकाणी कार्य करता येऊ शकेल. मात्र आज एकच पुरोहित दहा-बारा ठिकाणी कार्य करताना दिसून येतो. कार्याची संख्या जास्त आणि तुलनेने पुरोहित कमी असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. मोठय़ा शहरांतून तसेच तीर्थक्षेत्रीदेखील या काळात पुरोहितांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ज्याच्या घरी कार्य असेल त्याकडे जेवणेदेखील श्राद्ध चालविणाऱ्या ब्राम्हणास शक्य होत नाही. श्राद्धातील एक उपचार म्हणून जेवणासाठी आवश्यक असणाऱ्या इतर ब्राम्हणांचीदेखील उपलब्धता तुलनेने कमी आहे. त्यामुळे पूर्णवेळ पौराहित्य न करणारे ब्राम्हणदेखील या काळात जेवणासाठी जाताना दिसून येतात. अशी ब्राम्हण व्यक्ती उपस्थित असली तरी, विधींची माहिती नसल्यामुळे प्रतिवचन (विधीतील मंत्रानुसार श्राद्ध चालविणाऱ्या ब्राम्हणास दिलेला प्रतिसाद) देता येत नाही. त्यामुळे असा एक वेगळा वर्गच सध्या अस्तित्वात आला आहे. खेडोपाडी तर पुरोहितांची कमतरताच आहे. अर्थात सर्व शास्त्रोक्त पद्धतीने करायचे ठरवल्यास उपलब्ध मागणीला पुरे पडणे सध्या शक्य होणार नाही.
शास्त्रोक्त पद्धतीचा आग्रह यजमानाने धरला, तर पुरोहितांची तशी तयारी असतेच असे नाही किंवा पुरोहितांनी तसा आग्रह धरला त्याला यजमानाचा आर्थिक पाठिंबा मिळतोच असे नाही. त्यामुळे एका तासाचे काम दहा मिनिटांत उरकण्याकडे बहुतेकांचा कल दिसून येतो.
थोडक्यात सांगायचं तर पितृपक्षातल्या विधी करण्याच्या पद्धती काळानुसार बदलत आहेत. हे बदल अगदी हळूहळू होत असल्यामुळे आज कदाचित लक्षात येणार नाहीत, पण पन्नास वर्षांनी ते ठळकपणे दिसतील अशीही शक्यता नाकारता येत नाही. पुरोहितांची उपलब्धता, जेवण या सगळ्या बाबतीत आज हा सगळा धार्मिक कार्यक्रम सव्‍‌र्हिस इंडस्ट्रीच्या दिशेने जातो आहे. तशी सुरुवात झाली आहे.
कुणी सांगावं हेही दिवस बदलतील. आपल्याला हव्या त्या गणपतीचं ऑनलाइन दर्शन घ्यायचं ही पद्धत आज रूढ झालेलीच आहे. लोक अभिषेकासाठी ऑनलाइन पैसे पाठवतात. त्यांना घरपोच प्रसाद मिळतो. आणखी पन्नास वर्षांनी कदाचित त्या काळातले पुरोहित पितृपक्षात त्यांच्या घरीच बसलेले असतील. पितृपक्षात करायच्या श्राद्धासाठीची तयारी, त्यासाठीचं साहित्य हे सगळं त्यांनी ऑनलाइन कळवलेलं असेल. तशी संबंधितांच्या घरोघरी तयारी केलेली असेल आणि ठरावीक वेळेला सगळ्यांकडचं स्काइप किंवा त्या वेळी जे असेल ते ऑन केलं जाईल. एकच पुरोहित एकाच वेळी पन्नास घरचं ऑनलाइन श्राद्ध करतील..
कुणी सांगावं लोकांची मागणी असेल तर पन्नास वर्षांनी असंही घडू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:03 am

Web Title: pitru paksha becoming service industry
Next Stories
1 श्राद्ध : एक संकल्पना
2 समर्थ माणसांचं गाव
3 उन्मादाचा इशारा..
Just Now!
X