lp39‘प्लेइंग इट माय वे’ हे सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. काय आहे या आत्मचरित्रात? मुळात सचिनने ते का लिहिले?

‘‘मला माझे आत्मचरित्र लिहायला कधीच आवडणार नाही, कारण माझे जीवन म्हणजे सार्वजनिक मालमत्ता झाले आहे आणि कोणताही खासगीपणा माझ्या आयुष्यात उरलेला नाही,’’ असे प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी म्हटले होते; परंतु तरीही चरित्र किंवा आत्मचरित्र लिहिण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. आपल्या आयुष्याच्या जगण्याचा प्रवास मांडताना घेतलेल्या निर्णयांची कारणमीमांसा आणि लोकांना माहीत नसलेले क्षण किंवा एखाद्या गोष्टीवर करायचे राहून गेलेले भाष्य हे सगळे आत्मचरित्रात असते; पण हॉकिंगच्या म्हणण्यानुसार, खरेच मोठय़ा व्यक्तींच्या आयुष्यातला खासगीपणा म्हणजेच लोकांना माहीत नाही, अशा गोष्टी असतात का? की मोठेपणाचा प्रवास सुरू झाला, की काही माणसे जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मचरित्रासाठी राखून ठेवतात. गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या क्रिकेटविषयक आत्मचरित्रांकडे किंवा पुस्तकांकडे पाहिल्यास हीच गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित होते.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…

आत्मचरित्राची निर्मिती कशासाठी?

सचिन तेंडुलकरने बोरिया मझुमदारच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘प्लेइंग इट माय वे’चे मूल्यमापन करताना मुळात सचिनने आत्मचरित्र का लिहिले, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर मिळत नाही. सचिनच्या मावळतीचा काळ सुरू झाला, तेव्हा त्यालाही याची जाणीव झाली की, आता आपल्याला येत्या काही दिवसांत क्रिकेटला अलविदा करावा लागणार आहे. २४ वर्षांची भली मोठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपुष्टात येणार आहे. हे औदासीन्य मग त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू लागले. २०११चा विश्वचषक भारताने जिंकला, तेव्हाच सचिनने स्वप्नपूर्तीच्या सुवर्णमयी आनंदासह निवृत्ती पत्करावी असे सर्वाना वाटत होते; परंतु इतरांना वाटत असलेला पूर्णविराम सचिनच्या दृष्टीने स्वल्पविराम होता. आपले क्रिकेट अजून बाकी आहे, याची त्याला शाश्वती होती. मग शंभराव्या शतकासाठी सचिनची केविलवाणी झुंज सुरू झाली. अखेर अथक प्रयत्नांनंतर २०१२मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशविरुद्ध सचिनचे शतक पूर्ण झाले. त्या वेळी सचिनने आनंदाच्या भरात उडय़ा मारल्या नाहीत किंवा हा क्षण उत्कट पद्धतीने साजरा केला नाही. आभाळाकडे पाहून त्याने प्रश्न केला, ‘‘देवा, इतकी प्रतीक्षा का करायला लावलीस? माझ्या हातून कोणती चूक घडली? अब्जावधी लोकांना या क्षणाची प्रतीक्षा होती, मग तू यासाठी इतकी प्रतीक्षा करायला लावायची मुळीच आवश्यकता नव्हती!’’ या शतकानंतर सचिन अधिक स्वार्थी झाला. त्यामुळेच शंभराव्या शतकानंतर मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत निवृत्तीच्या प्रश्नावर तो भडकला. ‘‘मी ठरवेन केव्हा निवृत्त व्हायचे ते. मी क्रिकेटचा प्रवास कोणाच्या सांगण्यावरून सुरू केला नव्हता, मग कुणाला तरी वाटतंय म्हणून तो का संपवू?’’ हा त्याचा प्रश्न म्हणजे मी माझा आणि फक्त माझाच. मी क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीचे नाटय़ सादर करतो, तुम्ही टाळ्या वाजवता इतकेच काय ते आपले नाते. आजही सचिन जगातील अनेक उत्पादनांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. १६ नोव्हेंबरला त्याच्या निवृत्तीची वर्षपूर्ती होत आहे. निवृत्तीनंतर पहिल्या वर्षांतील खपवण्यासाठीचे उत्पादन म्हणजे आत्मचरित्र आहे, याची पूर्ण जाणीव ठेवूनच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पाहता-पाहता दोन लाखांचा आकडा या खपाने सहज ओलांडला आहे. तूर्तास, सचिन आणि बोरिया द्वयींचे ईप्सित साध्य झाले आहे.

चॅपेल.. एक था व्हिलन!

ग्रेग चॅपेल यांनी सचिनपुढे ठेवलेला कर्णधारपदाचा आणि भारतीय क्रिकेटवर आपण दोघे राज्य करू हा प्रस्ताव, हे या आत्मचरित्रातील सर्वात संवेदनशील प्रकरण आहे. दोन्ही चॅपेल बंधू भारतीय क्रिकेटसाठी कशा प्रकारे खलनायक होते, हे यातून स्पष्ट होते; परंतु चॅपेल यांना भारतीय क्रिकेटने खलनायक ठरवून आता खूप वष्रे लोटली आहेत. जेव्हा हे प्रकरण ज्वलंत होते, तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठे वादळ आले होते. बंगालची अस्मिता असणारा सौरव गांगुली आणि चॅपेल यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला. गांगुलीसाठी संसदेतसुद्धा आवाज उठवण्यात आला. अखेर चॅपेल यांचा भारतीय क्रिकेटमधून अस्त झाला. चॅपेल यांचा प्रस्ताव, हाच आत्मचरित्राच्या पुस्तकासाठी सर्वोत्तम मुद्दा ठरू शकतो. सचिनने काय केले आहे, तर खलनायकालाच पुन्हा खलनायक ठरवले आहे. तो हे कधीच बोलला नव्हता आणि आता तो हे बोलतो आहे आणि तेच त्याने आत्मचरित्रात मांडले आहे, ही गोष्ट नवी आहे. सचिनच्या गौप्यस्फोटानंतर चॅपेल यांच्या जाचाचा अनुभव घेणारे अनेक क्रिकेटपटू बोलते झाले आणि सचिनची त्यांनी पाठराखण केली. त्यानंतर चॅपेल यांनी मी अशा प्रकारचा प्रस्ताव सचिनपुढे ठेवलाच नव्हता, असे स्पष्टीकरणसुद्धा दिले; पण आता साक्षात दैवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीनेच तुमच्या वाईटपणाचा पाढा वाचला आहे, तिथे तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार?

कपिलवर तोंडसुख

भारतीय क्रिकेटला प्रथमच जगज्जेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणजे कपिलदेव. मॅच-फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर टीव्हीवर ढसाढसा रडून मी देशासाठी सदैव प्रामाणिक राहिलो आहे, अशी ग्वाही देणारासुद्धा कपिलच. २००७च्या विश्वचषकानंतर आयसीएल (इंडियन क्रिकेट लीग) अशी एक बंडखोर चळवळ क्रिकेटमध्ये राबवण्यात आली. या जथ्थात तो सामील झाला आणि भारतीय क्रिकेटपासून दुरावला. ही अल्पकालीन चळवळ संपुष्टात आल्यानंतर कपिल पुन्हा भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामील झाला; परंतु दरम्यानच्या काळात तो आपले स्थान गमावून बसला होता. सचिनच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आधीच्या पिढीचे सचिनचे मार्गदर्शक खेळाडू आले, त्या पंक्तीत सुनील गावस्कर, वासू परांजपे, दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री होते; परंतु कपिलसारखा हरहुन्नरी माजी कर्णधार यात नव्हता, कारण आत्मचरित्राच्या प्रकाशनाआधीच्या मार्केटिंगमध्ये कपिलवर हल्लाबोल करायला सचिन अजिबात विसरला नाही.

कपिलला भारतीय क्रिकेट प्रशासनात जास्त महत्त्व दिले जात नाही, ही गोष्ट हेरून सचिनने कपिलच्या प्रशिक्षकपदाचा काळ हा निराशाजनक होता. त्याच्यासारख्या मोठय़ा क्रिकेटपटूकडून सांघिक व्यूहरचना करताना माझ्या मोठय़ा अपेक्षा असायच्या, परंतु यात तो कधीच रस घ्यायचा नाही, अशा शब्दांत कपिलवर तोंडसुख घेतले आहे.

भावनिकता आणि कौटुंबिकता

भाऊ अजित आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आयुष्यातील योगदान, हे जसे सचिनने या पुस्तकात मांडले आहे, तसेच पत्नी अंजलीशी जुळलेले प्रेम आणि आतापर्यंतची साथसोबत याबद्दल त्यात वाचायला मिळते. याचप्रमाणे ‘द टू लिटिल डायमंड्स ऑफ माय लाइफ’ या प्रकरणात सचिन आपली मुले सारा आणि अर्जुन यांच्यासोबतचा भावनिक कोपरा मोकळा करतो. अर्जुनने आपल्याच पावलावर पाऊल टाकून मोठे क्रिकेटपटू व्हावे, असे स्वप्न सचिननेसुद्धा पाहिले आहे; परंतु वडिलांच्या मोठेपणाचे काटे त्याची वाट बिकट करतात, हे सचिनला चांगलेच ठाऊक आहे.

आत्मचरित्रानंतर पुढे काय?

सर्वसामान्यपणे क्रिकेटपटू निवृत्त झाला तरी त्याची आर्थिक घडी बसवून देणारे अनेक उद्योग आता त्याच्या वाटेवर डोळे लावून बसले आहेत. मार्गदर्शन, समालोचन, ब्रँडिंग आदी अनेक गोष्टी तो करू शकतो. मुंबई इंडियन्सकडून निवृत्तीनंतर सचिन गेल्या वर्षीसुद्धा उद्योगपती अंबानींचा आदेश शिरसावंद्य मानून संघाचा ‘आयकॉन’ म्हणून संघासोबत होता. गेली अनेक वष्रे सचिन आणि त्याच्या अनुषंगाने आर्थिक गणिते याचा त्याच्या अर्थतज्ज्ञांनी चांगलाच अभ्यास केला आहे. त्यामुळे आता पुढे सचिनच्या निमित्ताने काय खपवता येईल, याचे ठोकताळेसुद्धा त्यांनी बांधले असतील.

देशासाठी काय?

सचिनला गेली २४ वष्रे भारतीय क्रिकेटने निस्सीम प्रेम दिले. सचिन रुबाबात सांगतो की, मी क्रिकेटमधील देव नाही. माझ्याकडून चुका होतात, देवाकडून नाही; परंतु आपल्यामधील याच दैवत्वाचे लाभ घ्यायला तो अजिबात विसरत नाही. सध्या तो खासदारकी सांभाळत आहे, याचप्रमाणे ‘भारतरत्न’सारखा सर्वोच्च नागरी पुरस्कारसुद्धा त्याला मिळाला आहे. देशाला त्याच्याकडून खूप मोठय़ा अपेक्षा आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानात सामील होण्यासाठी झाडू घेणे किंवा त्यांना खेळातील सुधारणेसाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर करणे असे सोपस्कार सचिनने केले आहेत, परंतु सचिन भारतीय क्रिकेटमधील वाळवी झाडण्यासाठी स्वच्छतेची कास धरेल का? आपल्या क्रीडा मसुद्यात क्रिकेट या खेळाला माहिती अधिकाराच्या आणि क्रीडा मंत्रालयाच्या कक्षेत आणेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बहुतांशी नाही अशीच मिळतात. त्यामुळे आत्मचरित्र तर प्रकाशित झाले, हा फंडा यशस्वीही झाला. येत्या काही दिवसांत सर्वोच्च खपाचे विक्रमसुद्धा सचिनच्या नावे जमा होईल; परंतु यानंतरची सचिनची पुढची खेळी काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.