आ गए? आ गए मेरी बेबसी का तमाशा देखने? या, या. मला नीट पाहून घ्या, हा बर्फ आणि दगडांचा छोटा गोळा. काय तर म्हणे नवी क्षितिजं शोधतायत. फोटो काढतायत जवळून. कोणी त्या फोटोवर बदाम चिकटवतंय, कोणी चेहरा काढतंय, कोणी माझंच नाव दिलेला कुत्रा चिकटवतंय, काय वाट्टेल ते. छोटा वाटत असलो तरी ग्रह आहे यार मी, उगाच फिरत नाही स्वत:भोवती. रेबीज झालेल्या कुत्र्यासारखी वागणूक काय देता मला!! मस्त छान रमत होतो मी त्या क्यूपर पट्टय़ात, तिथल्या मित्रांसोबत गगनगोटे खेळायचो. माझं कलेक्शनसुद्धा भारी आहे. कॅरन, स्टाइक्स, निक्स, केरबेरॉस, हायड्रा. अजूनही ठेवलेत ते मी माझ्याजवळ. कॅरन तर जवळजवळ माझ्याएवढाच आहे. तुम्ही बसा तुमचा चंद्र कुरवाळत. असो.

तर मी म्हणत होतो, की मी क्यूपर पट्टय़ात सुखी होतो. पण माणसाची नजर लई बेक्कार बाबा, लई बेक्कार. ज्याच्यावर पडली त्याचं जगणं मुश्कील होऊन बसतं. आणलं मला फरफटत तुमच्या ग्रहमालेत. बरं आणायचंच होतं तर निदान घरातल्या सगळ्यांना कल्पना तरी द्यायची, शहानिशा करायची. ते नाही. आधी आणलं, आणि मग सरळ दवंडी पिटून मोकळे. नवा ग्रह.. नवा ग्रह.
त्या क्लाइड टाँबोची माझ्यावर १९३० मध्ये नजर पडली. मला बघून भूक भागली नाही त्याची. माझ्या क्यूपर पट्टय़ातल्या अजून बऱ्याच बारीकसारीक सवंगडय़ांकडे डोळे लावून बसला होता तो. त्यापेक्षा तो पर्सिव्हल लॉव्हेल बरा, १९१५ साली माझे दोन फोटो काढले, आणि मला टॅगच केलं नाही. त्याला वाटायचं, की युरेनस घिरटय़ा मारत असताना नेपच्यूनखेरीज आणखी कोणी तरी शिट्टय़ा मारत असणार.
तो नेपच्यून तसा मवालीच आहे म्हणा. त्याला सारखी माझ्यावर दादागिरी करायची असते. रॅगिंग! मी फ्रेशर आहे ना तुमच्या ग्रहमालेत. त्यात अ‍ॅडमिशनचेही झोल आहेत. आणि माझा रस्ता त्याच्या रस्त्यांतून जातो. येता-जाता रस्ता अडवून धक्का मारायला जातो. उगाच, मस्ती. नुसती हवा भरलीये त्याच्यात. डोक्यात सगळ्यांत जास्त हवा भरलेला ग्रह आहे तो. पण मी त्याला भीक नाही घालत. बाकी सगळे ग्रह कसे, सूर्याभोवती कमी जास्त फरकाने का होईना, पण एक्लिप्टिकला बिलगून फिरतात. एक्लिप्टिक म्हणजे तुमच्या पृथ्वीची कक्षा ज्या प्रतलात आहे ना, त्या प्रतलावरचा सूर्याचा आभासी मार्ग. मी जरा हटके ग्रह आहे. रोलरकोस्टर राइडसारखा मी आधी एक्लिप्टिकच्या खूप वरून जातो, आणि मग खूप खालून जातो. त्यामुळे माझ्या नुसतं जवळ यायचं म्हटलं, तरी त्या नेपच्यूनला इतकी धावपळ करावी लागते, की मी आरामात सूर्याभोवती दोन चकरा पूर्ण करेपर्यंत त्याला भराभरा तीन फेऱ्या माराव्या लागतात. आणि हा तीन फेऱ्यांचा द्राविडी प्राणायाम करायला पाचशे र्वष लागतात. बरं एवढं करूनही पठ्ठा मला टच करणं सोडाच, पण जवळही येऊ शकत नाही. या पाचशे वर्षांत मी जेव्हा सूर्याच्या अगदी जवळ असतो ना, तेव्हा हा माझ्या पन्नास अंश पाठी धापा टाकत येत असतो. त्यानंतर हा पूर्ण जोर लावून धावतो, आणि इतका उतावळा होतो, की मी पुन्हा सूर्याजवळ येतो तेव्हा हा साधारण तेवढंच अंतर पुढे गेलेला असतो. जरा म्हणून अक्कल नाही. असो.
मी त्या पर्सिव्हल लॉव्हेलबद्दल सांगत होतो. त्याला वाटलं की नेपच्यूनसोबत कोणी तरी क्ष ग्रह आहे, ज्यामुळे युरेनसला कक्षेतून फिरताना त्रास होतोय. तो बिचारा क्ष ग्रह शोधायच्या आधीच वारला. मग बऱ्याच वर्षांनी हा ‘क्ष’ ग्रह शोधायचं काम त्या क्लाइड टाँबोला दिलं. तेवीस वर्षांचा होता तो फक्त. तरुण रक्त. वर्षभरात काढलं हुडकून मला. पण मी म्हणजे तो क्ष ग्रह नव्हे. लॉव्हेलने माझी कक्षा वगैरे सगळं बरोबर दिलं होतं. पण मी खूप लहान निघालो. माझं तेजही फारसं नाही. तेज म्हणजे, माझी परावर्तकता म्हणा, किंवा माझं प्रकाश गुणोत्तर म्हणा. तुमच्या ग्रहावर फेअरनेस क्रीमांचा खच पडला असेल ना? पुढच्या वेळी कधी ती न्यू होरायझनसारखी माशी पाठवाल तर तिला नुसतं माझ्या कानाभोवती घोंघावत ठेवू नका. जरा ती क्रीमंसुद्धा पाठवून द्या तिच्यासोबत, बघतो चोळून काही होतं का. मग त्यासाठी ती बसली जरा माझ्या अंगावर तरी चालेल. तसंही खूप लोनली लोनली वाटतं अलीकडे.
ग्रहमालेतले ग्रह हिणवतात मला. म्हणतात, तू बटल्या आहेस. आणि क्यूपर पट्टय़ातले माझे जुने दोस्त आता नीट वागत नाहीत. आधी म्हणायचे, ‘आता काय भाई तू ग्रहमालेत गेलास. साहेब झालास. आता तू फर्स्टक्लासचा पास काढणार! आम्हा क्यूपर पट्टय़ात राहणाऱ्यांना का विचारणार आता तू.’ मी म्हणतो नाही यार मी ग्रह असलो तरी तुमच्यातला आहे. तर म्हणायचे ‘नको, आमच्यात राहून इमेज खराब होईल तुझी. इथल्या कचऱ्यात हरवून जाशील. राहा तू ग्रहमालेतच.’ आणि आता परत तिथे गेलो तर सारखे ‘काय रे? कंटाळलास इतक्यात सासरला?’ असे टोमणे. काय करावं काय सुचेनासं झालंय. लवकर ठरवा मी कोण कुठचा ते. आणि जमल्यास थोडा आदर ठेवा. काय!
– तुमचा (होऊ पाहणारा)
प्लुटो
कौस्तुभ पेंढारकर – response.lokprabha@expressindia.com