वळवाच्या पावसाची वाट पाही उन्हाळ्यात
मळभाच्या तुकडय़ाने झेप घ्यावी उमाळ्यात
धगधगत्या अरुणाची भगभगती आग लोळे
डगमगत्या चरणांचे लवलवती खोल डोळे
पापण्यांना पूर येई, नीर शोधी कोहळ्यात
डबडबल्या डबक्यांचे लथपथले ओघ ओले
उन्मळल्या झाडांची उघडली मुळे-पाळे
आटल्या आडातून जळ, कसे यावे पोहऱ्यात?
काळजाच्या फत्तरांना कडकडती वीज भेटे
काजळाच्या नभांगणी गडगडती ढग मोठे
चाहुलीचा सूर लागे तरूंच्या डहाळ्यांत
चिरलेल्या अंतरांत भरभरुनी नभ ओते
भिजलेल्या कोंबांनी तरारुनी तन येते
हर्षभरे ममतेचा स्वर्ग पाहू सोहळ्यात
वळवाच्या पावसाची वाट पाही उन्हाळ्यात
मळभाच्या तुकडय़ाने झेप घ्यावी उमाळ्यात
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे

खिडकीतलं आभाळ

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या

खिडकीएवढय़ा आभाळात
फारसा मावतच नाही; पाऊस
चार शिंतोडे नि नितळ काचेवरचे ओघळ
एवढाच माझ्या वाटणीचा पाऊस?

तोही गेला रुसून, माझ्याच छतावरून!
म्हणतात मातीलाही गंध असतो.
काचेआडून मात्र दिसतात फक्त रंग
निळंजांभळं आभाळ, रंग बदलणारं
फांदीवरचं एकाकी पाखरू..

पंख सुकवणारं
हिरव्यापिवळ्या रंगात बुडून गेलेलं
माझ्यासारखंच, स्वमग्न!
की व्रतस्थ?
कुणाच्या तरी वांझोटय़ा प्रतीक्षेत!

त्याला काय ठाऊक.
काचेआड चाफा कधी फुललाच नाही
कारण झडपा कायम
बंदच होत्या.
आभाळालाच अडवण्यासाठी.
माझ्या वाटय़ाचा पाऊस मग
कायम पुढेच जात राह्य़ला —
माझ्याच छतावरून!

तो थांबलाच नाही कधी.
माझ्या खिडकीतल्या आभाळात ! !
विजय खाडिलकर

जलधारा

नभातुनी कोसळती हिमगारा,
बळीराजाच्या डोळ्यांतुनी जलधारा.
फाटल्या काळजावरचे खोल वार,
रक्ताच्या थारोळी झेलायचे कसे,
आभाळच कोसळता डोईवर,
रुतल्या गाळात पेलायचे कसे.
मनगट मोडलेल्या हातांमध्ये,
फडफडू लागलाय सात-बारा,

पाहून कसाब तो टाळ्या पिटतो
तडफडू लागलाय जीव दारा.
आश्वसनांची ती कोरडी गारपीट,
ओल्या-ओल्या पापण्यांत तुम्ही करा,
त्यापरी उपकार करा वाटून,
बळीराजाला नायलॉनचा दोरा.
नभातुनी कोसळती हिमगारा,
बळीराजाच्या डोळ्यांतुनी जलधारा.
किसन बनकर, ओझर, नाशिक

आमची भाकरी

बैसली खुर्चीत येथे थोर रत्ने
का तरीही भूक पोटी दाटलेली?
रोजची स्वस्ताईची आश्वासने
महागाईनेच उंची गाठलेली!
वाहिन्यांवर विकासाचे रोज दावे
मंत्रालयी तर धूळ मोठी साठलेली!
देऊ म्हणती संधी ते सर्वास आता
का तरी सत्ता घरातच वाटलेली?
नाही म्हणती बिल्डरांशी देव-घेवी
झोपडय़ांची पट्टी का ती पेटलेली?
मध्यस्थ ना, नाही दलाली तेच म्हणती
नोट देता मंडळी जी भेटलेली
काढता का पळ आता लोकांपुढूनी
उत्तरे नसल्यामुळे मग ‘फाटलेली’
महात्म्याचे नाव तर दिन रात ओठी
का तरी मग तत्त्वे सारी बाटलेली?
घोषणा ऐकुनी का हे पोट भरते?
भाकरी आमची तुम्ही तर लाटलेली!
आव आणता स्वाभिमानी दावण्याचा
पायताणे दिल्लीची का चाटलेली?
मुरारीभाऊ

‘वृ.. द्ध’

कोण तुम्ही..?
त्याने नाव सांगितले
नाव, जात, धर्म
जन्मदात्याने दिलेली ओळख
आता पुरत नाही
अधिकृत ओळख लागते
जुन्या ओळखीमुळे मिळालेला
मान सन्मान
अवमान, अवहेलना सुद्धा
पचवून कोडग्यासारखा तो उभा
वर्षांनुर्वष..
तरीही त्याला ओळख विचारतात
त्याची आता एकच ओळख
‘वृ.. द्ध’
बिनकामाचा, समाजाला नकोसा
मुलांना अडचणीचा
पण अडचणीत उपयोगी पडणारा
‘नि..मू.. ट.. प.. णे ’
तरीही एकाकी..

‘अकेला आया, अकेला जायेगा’

हे खरं असलं तरी
सोबतीची गरज असलेला
म्हणतील तेव्हा वृद्धाश्रमाची
वाट धरणारा..
वारस असून बेवारशी ठरलेला
अगदी ‘एकटा वृद्ध’
या सगळ्या ओळखी
कामाच्या नाहीत
कार्डावर यातली ओळख
लिहित नाहीत
कोरडेपणानं लिहितात
नाव, पत्ता, वय, एवढेच
भावनांना स्थान नाही
जणू सभोवतालच्या अचेतन सृष्टीचा
‘एक घटक’..
ही तर त्याची ओळख नाही?
यम ओळखपत्र मागत नाही
तो ओळखतो
फक्त अशरीरी आत्म्याला
कारण यमही अशरीरीच..
-अरुण कोर्डे