News Flash

रमणीय पॉइंट प्लेझंट बीच

त्यांची आणि आपली जीवनशैली पूर्णपणे वेगळी असली तरी स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, देखभाल, मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा अशा कितीतरी गोष्टी आपण त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत.

| July 17, 2015 01:06 am

lp65त्यांची आणि आपली जीवनशैली पूर्णपणे वेगळी असली तरी स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, देखभाल, मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा अशा कितीतरी गोष्टी आपण त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत.
अटलांटिक महासागराला लागून अमेरिकेचा पूर्वकिनारा येतो. त्यामध्ये विशेषत: न्यूयॉर्क, नेवार्क, न्यूजर्सी ते केप मेपर्यंतचा परिसर उत्तर-दक्षिण भागांत पसरलेला आहे. त्यामध्ये समुद्रकिनारे, जंगले आहेत. बस, रेल्वे मार्गाने हा भाग जोडलेला आहे. न्यू जर्सी राज्याच्या बऱ्यापैकी दक्षिणेकडे अटलांटिक महासागराला लागून ‘पॉइंट प्लेझेंट बीच’ समुद्रकिनारा विकसित केला असून पर्यटकांचे ते मोठे आकर्षण आहे. न्यूयॉर्कहून राहवे मार्गे बीहेडपर्यंत रेल्वे मार्ग असून शेवटचे रेल्वे स्टेशन म्हणजे बी हेड उत्तर-पूर्व किनाऱ्याच्या बऱ्यापैकी दक्षिणेकडे असलेला हा बीच खासगी स्वरूपातील आहे. सुमारे दोन ते अडीच मैल लांब असलेला व पांढऱ्याशुभ्र वाळूने पसरलेला म्हणजे सर्वाचेच मनोरंजनाचे ठिकाण आहे. साहजिकच सुट्टीच्या दिवशी हा परिसर पर्यटकांनी फुललेला असतो. पॉइंट प्लेझंट बीच रेल्वे स्थानकापासून जेमतेम दीड मैलांवर आहे. वाहनांसाठी तेथे भव्य पार्किंग व्यवस्था असून तेथे सशुल्क प्रवेश मिळतो.
लांबच लांब पांढऱ्या वाळूने संपन्न असलेला हा बीच म्हणजे चैन्नईजवळील अन्ना स्क्वेअर बीच वा महाबळीपुरम बीचची आठवण करून देतो. फक्त ती पिवळसर वाळू असल्याने त्याला ‘गोल्डन बीच’ म्हणतात एवढेच. नजर पोहोचेपर्यंत वाळूचा रमणीय पट्टा दिसतो. हा लांबच्या लांब असलेला श्वेत समुद्रकिनारा पाहण्यासाठी किनाऱ्यावर लाकडाचा पादचारी मार्ग आहे, त्याला ‘बोर्डवॉक’ असे म्हणतात. त्यावरून पदभ्रमण करून पांढराशुभ्र वाळूचा किनारा व अथांग महासागर पाहण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. वाटेत आबालवृद्धांसाठी अनेक क्रीडाकेंद्रे आहेत. किनाऱ्यालगत लांबच्या लांब पसरलेला व क्षितिजाला टेकलेला शांत महासागर आहे. त्यावरून भटकंती करण्यासाठी पर्यटकांना स्पीड बोटी भाडय़ाने उपलब्ध असतात. पुढे लांबवर मोठय़ा बोटीदेखील दिसतात. हे पाहताना मरिन ड्राइव्ह, शिवाजी पार्क, जुहू, गोराई बीचची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पांढऱ्याशुभ्र वाळूवर समुद्रपक्ष्यांचा जथ्थाच्या जथ्था नजरेत भरतो. मोठाले काळय़ा व पांढऱ्या रंगाचे, मोठय़ा आकाराचे आकर्षक सी गल्स आपल्या पंखांची सतत फडफड करून आपले अस्तित्व दाखवीत राहतात. हा किनारा खासगी असल्याने त्यांचे ठरलेले शुल्क प्रत्येक वेळी भरावे लागते. त्या परिसराची नेहमी देखभाल केली गेल्याने सारा परिसर स्वच्छ असतो. गर्दीच्या वेळी तेथे लाकडाचे उंच निरीक्षण मनोरे आहेत. ते घडीचे असतात. पर्यटकांवर नजर त्याद्वारे ठेवली जाते व पाण्यात कुणी बुडण्यापासून वा गैरप्रकारापासून हा किनारा सुरक्षित ठेवला जातो. (आपल्या इथे परिस्थिती मात्र वेगळी असते. अक्सा बीच, श्रीवर्धन, हरिहरेश्वर बीचवर पोलिसांनी पोहण्यास अटकाव करूनही चाहते पाण्यात डुंबतात व बुडतातदेखील. कित्येक दुर्घटना तेथे घडत असतात.)
किनाऱ्यालगत लहानसे मत्स्यालय असून मासे व समुद्र जलचर, विविध प्राण्यांचे दर्शन घडते. समुद्रातील जलसंपत्ती व जलविश्व पाहण्यासाठी तेथे विशेष सोय आहे. समुद्रकिनाऱ्यावर निसर्गाचा निखळ आनंद लुटण्यासाठी पर्यटक रंगीत छत्र्या, खुच्र्या, आसने इ. पसरवून तयारच असतात.
बीचच्या दुसऱ्या बाजूस खासगीरीत्या राहण्यासाठी अनेक सुरेख घरे आहेत. तेथे वास्तव्य करून बीचचा आनंद उपभोगू शकता. जुलै २०११ मध्ये तेथे आलेल्या विनाशक आयर्विन वादळामुळे संभाव्य मनुष्य व वित्तहानीपासून संरक्षणासाठी ती सारी घरे रिकामी करण्यात आली होती. आजही ती तशीच आहेत. त्यांचा भकासपणा जाणवल्याखेरीज राहत नाही. तत्कालीन नैसर्गिक आपत्तीत ती काळाची गरज होती.
जेनकिन्सन मत्स्यालय वर्षभर पर्यटकांसाठी खुले असून त्यात असलेल्या जलचर प्राण्यांच्या जेवणाच्या वेळा हंगामाप्रमाणे वेगवेगळय़ा असतात. त्यात सील, अटलांटिक शार्क्स, पेंग्विन्स, पॅसिफिक शार्क्स आदी जलचर प्राणी आहेत. त्यांचे खाणे-पिणे व अन्य निगराणी शास्त्रोक्तदृष्टय़ा सांभाळली जाते. हे मत्स्यालय उन्हाळय़ात रोज सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत, तर हिवाळय़ात सकाळी दहा ते पाच पर्यंत उघडे असते.
बीचवरील आनंद पर्यटकास वेगळेच आत्मिक सुख देणारा असतो. नागरिकांना वयोपयत्वे वा प्रकारानुसार प्रवेश फीमध्ये सवलत असते. अमेरिकेत वीकेंड असला की प्रत्येक जण गाडी काढून कुठे न कुठेतरी फिरून ताजातवाना होणारच.
त्यांची व आपली जीवनशैली वेगवेगळी असली तरी त्यांच्यापासून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. त्याच्यातील चांगल्या गोष्टी नक्कीच आत्मसात करायला हव्यात. भारत व अमेरिकन पर्यटन स्थळे पाहत असताना स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, देखभाल, मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा यांमधील दरी फारच रुंदावलेली आहे त्याचे आत्मपरीक्षण प्रत्येक भारतीयाने करून निसर्गाचा खराखुरा निखळ आनंद मिळवायला हवा. तरच पर्यटनातील खरी संकल्पना समृद्ध होईल असे वाटते.
रामकृष्ण अभ्यंकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2015 1:06 am

Web Title: point pleasant beach
Next Stories
1 निसर्गाचा वरदहस्त लाभलेला देश
2 पाचूच्या बेटावर..
3 सूर्योदय ते सूर्यास्त
Just Now!
X