नुकतेच पुण्यात बालेवाडीत झालेल्या भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेच्या ‘भारत-श्री’ या राष्ट्रीय स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धाना अलीकडे रणजी स्पर्धापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळतो आहे, पण या क्षेत्रातल्या संघटनांच्या राजकारणापुढे शरीरसौष्ठवपटूंचे मात्र हाल होत आहेत.

अगदी गल्लीतली शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटली तरी तिला चार-पाच हजारांची गर्दी सहज होते. सध्या एवढी गर्दी रणजी क्रिकेट स्पर्धेलाही पाहायला मिळत नाही. त्यामुळे बालेवाडीत रंगलेल्या भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेच्या ‘भारत-श्री’ या राष्ट्रीय स्पर्धेलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. नौदलाचा मुरली कुमार ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरला, तर दुसरीकडे घाटकोपरच्या स्वप्निल नरवडकरने ‘भारत-श्री’सह सर्वोत्तम प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटूचा पुरस्कार पटकावत डबल धमाका उडवला. एकीकडे स्पर्धाना प्रतिसाद वाढत असला तरी दुसरीकडे या खेळाशी संबंधित वेगवेगळ्या संघटनांमुळे मात्र अस्थिरता आहे. त्यामुळेच उद्याच्या घडीला नेमके काय होईल, याचा अंदाज कोणालाही नाही.
यंदाची ‘भारत-श्री’ स्पर्धा हैदराबादला होणार होती, पण त्यांनी स्पर्धेच्या दहा दिवसांपूर्वी हात वर केले आणि महाराष्ट्राने हे आव्हान स्वीकारत लीलया पेलले. याबाबत महाराष्ट्राच्या संघटनेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. शरीरसौष्ठवपटूंना यावेळी तब्बल साडेचार हजार किलो चिकन आणि चाळीस हजार अंडय़ांचा खुराक देण्यात आला होता. त्यामुळे शरीरसौष्ठवपटूंची गैरसोय झाली नाही.

यावेळी जवळपास ४०० शरीरसौष्ठवपटू स्पर्धेत सहभागी झाले होते आणि प्रत्येक जणांची शरीरसंपदा उत्तम असल्याने स्पर्धा चांगलीच रंगली. गेल्या वेळी मुरलीची जादू चालली असली तरी यावेळी मात्र त्याला कडवी झुंज मिळणार, हे स्पष्ट होते आणि तसे झालेही. कारण अखेरच्या क्षणापर्यंत नेमका कोणता शरीरसौष्ठवपटू जेतेपदावर शिक्कामोर्तब करणार, याचा अंदाज कुणालाही नव्हता. अखेर अनुभवाच्या जोरावर मुरलीने जेतेपदाला गवसणी घातली आणि एकच जल्लोष झाला. मुरलीच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रूंच्या धारा लागल्या, तेव्हाच ही स्पर्धा केवढी अटीतटीची होती, याचा अंदाज येईल.
महाराष्ट्राकडून सर्वात यशस्वी ठरला तो घाटकोपरचा स्वप्निल नरवडकर. स्वप्निल सुरुवातीला फक्त जिममध्ये ट्रेनिंग द्यायचे काम करायचा, पण २०११ साली त्याने शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये उतरण्याचे ठरवले आणि एकच धमाल उडवली. यंदाच्या वर्षी त्याने ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेमध्ये प्रगतिकारक शरीरसौष्ठपटूचा पुरस्कारही पटकावला होता. पहिल्यांदाच स्पर्धेत उतरत स्वप्निलने ‘भारत-श्री’ हा किताब पटकावला, पण त्याचबरोबर सर्वोत्तम प्रगतिकारक शरीरसौष्ठपटूचाही मान पटकावला. अवघ्या २२ वर्षांमध्ये त्याने मारलेली ही मजल नक्कीच कौतुकास्पद आहे. स्वप्निलबरोबरच नाशिकच्या बी. महेश्वरनने ‘महाराष्ट्र-श्री’ सुनीत जाधवला मागे टाकत ‘भारत-श्री’चा किताब पटकावला. ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेमध्ये सुनीत आणि महेश्वरन यांच्यामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली होती. त्यावेळीही महेश्वरन थोडासा सरस वाटत होता, पण थकव्यामुळे त्याला पोझ व्यवस्थित घेता येत नव्हती आणि तिथेच त्याचे विजेतेपद दुरावले आणि सुनीतने ही स्पर्धा एकतर्फी जिंकली होती. सुनीत पहिल्यांदाच ‘भारत-श्री’ स्पर्धेत उतरत होता, त्यामुळे त्याच्याकडे अनुभव नव्हता. पण त्याची तयारीही जोरदार दिसली नाही. ‘महाराष्ट्र-श्री’मध्ये त्याची शरीरसंपदा आणि आत्मविश्वास तगडा होता, पण ‘भारत-श्री’ स्पर्धेत मात्र तसे नक्कीच जाणवले नाही. महाराष्ट्राकडून सागर माळी, रेणसू चंद्रन, सागर कातुर्डे, सुनील सकपाळ आणि अक्षय मोगरकर यांनीही पदके पटकावली, पण त्यांना ‘भारत-श्री’ हा मान पटकावण्यात अपयश आले. या वर्षी पहिल्यांदाच स्पोर्ट्स फिजिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये सर्वाची मने जिंकत महाराष्ट्राच्या मिहीर सिंगने बाजी मारली.
यंदाची ‘भारत-श्री’ स्पर्धा दिमाखदारपणे पार पडली. स्पर्धेला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शरीरसौष्ठवपटूंनाही बरेच काही या स्पर्धेने नक्कीच शिकवले असेल. पण भविष्याची भीती मात्र साऱ्यांच्या मनात आहे आणि ती संपता संपत नाही. सध्याच्या घडीला भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेला भारतीय क्रीडा खात्याची मान्यता आहे. माजी क्रीडा मंत्री अजय माकन यांनी या संघटनेला मान्यता दिली. पण या विरोधात भारतीय शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने याचिका दाखल केली असून अजूनही याबाबत निर्णय लागू शकलेला नाही. दोन्ही संघटना आम्ही खऱ्या असल्याचे सांगत असल्या तरी शरीरसौष्ठवपटू आणि चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे.

शरीरसौष्ठव विश्वात सध्या अस्थिरता, अशांतता आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते शरीरसौष्ठवपटूंचे. नेमकी मान्यताप्राप्त संघटना कोणती आणि कोणत्या संघटनेमधून आपण खेळायला हवे, हा त्यांच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न असतो.

भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेच्या चेतन पाठारे यांनी सर्वानी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन काही वर्षांपूर्वी केले होते. त्यानुसार मुंबईमध्ये बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना त्यांच्यामध्ये सामील झाली होती. पण मुंबईसह महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर मात्र अजूनही एक संघटना नाही आणि त्यासाठी प्रयत्नही झालेले नाहीत आणि समजा या सर्व संघटनांनी एकत्र व्हायचे ठरवले, तरी हे आनंदाने नांदतील याबाबत साशंकता बऱ्याच जणांच्या मनात आहे. कारण काही जण खेळाच्या विकासासाठी काम करतात, त्यांना पदे नकोशी असतात. पडद्यामागे राहून खेळ आणि खेळाडूंचा विकास करणे हे त्यांचे ध्येय असते, तर काही जणांना पदे मिळवून मिरवण्यात धन्यता वाटत असते. त्यामुळे त्यांना जर पदे मिळाली नाहीत तर ते पुन्हा बंडखोरी करू शकतात. बंडखोरी झाली की, पुन्हा नवीन संघटना, पुन्हा वाद आणि पुन्हा जैसे थे. काही जाणत्या कार्यकर्त्यांना या साऱ्याचा वीट आला असला तरी शरीरसौष्ठवाचे वेड त्यांना यापासून दूर सारू शकत नाही.
सध्याच्या घडीला फोडाफोडीचे राजकारण शरीरसौष्ठव संघटनांमध्येही सुरू आहे. संघटकांपासून शरीरसौष्ठवपटूंपर्यंत काही जण नाराज झाल्याने, तर काही जणांचा विश्वास नसल्याने एक संघटना सोडून दुसऱ्या संघटनेमध्ये शिरकाव होताना दिसतो. पण प्रतिस्पर्धी संघटना सोडून आपल्या संघटनेमध्ये आलेल्यांना तेवढाच मान, सन्मान मिळेल, याची शाश्वती नाही. काही वेळेला तो मिळतोही, तर काही वेळेला त्यांना सोयीस्कररीत्या डावललेही जाते. त्यामुळे शरीरसौष्ठव विश्वात सध्या अस्थिरता, अशांतता आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते शरीरसौष्ठवपटूंचे. नेमकी मान्यताप्राप्त संघटना कोणती आणि कोणत्या संघटनेमधून आपण खेळायला हवे, हा त्यांच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न असतो. राजकारणांमुळे कधी कधी त्यांनाही डावलले जाते. दिवसाला सहा-आठ तास व्यायाम करून, प्रत्येक महिन्याला ३०-४० हजार रुपये खर्च करून जर हाती निराशाच येणार असेल, तर नेमके काय करायचे, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. कारण स्पर्धा जिंकल्यावरच मोठी रक्कम हाती पडते, त्यामुळे आपल्या शरीरसौष्ठव या वेडापायी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंब कसे चालवायचे, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांच्या संघटनांनी विचार करायला हवा.
कोणताही खेळ हा खेळाडू आणि चाहत्यांवर अवलंबून असतो. शरीरसौष्ठव या खेळाकडे या दोन्ही गोष्टी आहेत, तरीही हा खेळ वृद्धिंगत होताना दिसत नाही. याचे कारण आहे ते संघटनात्मक वाद आणि राजकारण. क्रिकेट हा खेळ मोठा झाला कारण त्यामध्ये राजकारण असले संघटनात्मक वाद नव्हते. एका देशात एकच संघटना कार्यरत आहे. त्यामुळे वादविवाद बाजूला सारत जर शरीरसौष्ठव संघटनांनी विचार केला तर त्यांचा खेळही मोठा होऊ शकेल, शरीरसौष्ठवपटूलाही सुरक्षित वाटू शकेल. फक्त गरज आहे ती, खेळासाठी हेवेदावे बाजूला सारून एकत्र येण्याचे.