46-lp-minalवैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया ही भारतभर अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी तो एक शुभ मुहूर्त आहे. सामान्यत: या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी केलेले सोने पुढच्या वर्षभरात तिपटीने वाढते, अशी लोकांमध्ये, म्हणजे हिंदू धर्मीयांमध्ये श्रद्धा आहे. अनेक लग्नांचे मुहूर्त या दिवशी गाठले जातात. एकूणच, वसंताच्या ऐन भरातील हा शुभ दिवस लोक आपापल्या परीने सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करतात.

पण ज्यांना ‘अक्ष’ नाही, त्यांच्यासाठी कुठला सण आणि कुठला आनंद? अक्षहीन म्हणजेच नेत्रहीन किंवा दृष्टिहीनांसाठी सारे आयुष्यच अंधकारमय असते. रोजच्या जगण्यासाठीदेखील त्यांना अनेक संघर्ष, तडजोडी, अवहेलना, परावलंबित्व यांचा मुकाबला करावा लागतो. त्यांच्या जीवनात उल्हासाचे क्षण कधी, कसे येणार आणि कोण आणणार?

अर्थातच आपण, तुम्ही आम्ही सर्वजण. आमच्या समविचारी मित्रांनी असाच विचार केला आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नेत्रहीन बंधू-भगिनींसाठी काही कार्यक्रम करायचे ठरवले. सुमारे दहा वर्षांपूर्वीच या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली गेली आणि पुढच्या काही वर्षांत दापोली, श्रीनगर, महाबळेश्वर अशा बाहेरील शहरांमध्येसुद्धा उत्तम प्रतिसादात आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रम होत आहेत. ‘दृष्टिहीनांना आपला तृतीय नेत्र उघडून अक्षय आनंद देणारा’ म्हणून हा कार्यक्रम ओळखला जातो.

तृतीय नेत्र?

शंकराचा तृतीय नेत्र आम्हाला माहीत आहे, पण तो विश्वाचा संहार करणारा तिसरा डोळा. आपल्यात तेवढी शक्तीही नाही व ती इच्छाही नाही. आपल्या सर्वाचा तिसरा डोळा आपल्या हृदयात असतो, उघडल्यावर सर्वावर प्रेमाचे सिंचन करणारा. आम्ही तोच डोळा उघडून दृष्टिहीन बांधवांवर प्रेमाची पखरण करीत आहोत.

‘‘काय हो, त्यांना पांढरी काठी देणे आणि ब्रेलमध्ये पुस्तके तयार करणे, यापेक्षा तुमच्या कार्यक्रमात आणखी काही अजेंडा असतो का?’’

‘‘अहो, आमचा कार्यक्रम समाजसेवेचा नाही, त्यांना निर्मळ आनंद देण्याचा आहे. आपल्या कल्पनेपेक्षा दृष्टिहीन माणसांचे जीवन खूप वेगळे व समृद्ध असते.’’

‘‘कसे? आमच्या समजुतीनुसार अंध व्यक्ती म्हणजे परावलंबी व सतत कुठेतरी धडपडणाऱ्या..’’

आपल्या समाजात एकूणच विकलांगांबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण दृष्टिहीनांच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करू लागल्यावर आम्हाला अनेक गोष्टी समजल्या, शिकायला मिळाल्या. बिरबलाची ‘शकल के अंधे और अकल के अंधे’ ही गोष्ट तंतोतंत खरी आहे याची प्रचीती आली. आपण डोळस असूनसुद्धा बहुतांश वेळा बुद्धीने आंधळे असल्यासारखे वागतो व डोळ्यांना झापडे लावलेल्या बैलाप्रमाणे एकाच चाकोरीत अडकून पडतो. पण ती झापडे दूर केली व दृष्टिहीनांच्या दुनियेकडे पाहिले, तर असे लक्षात येते की त्यांना डोळे नसले तरी त्यांची इतर ज्ञानेंद्रिये अधिक तीव्र असतात. आपल्यापेक्षा इतरांचे बोलणे ते अधिक एकाग्रतेने ऐकतात, आवाज लक्षात ठेवून ओळखू शकतात. वस्तूचा वास व स्पर्श यांचे आकलन त्यांना अधिक सूक्ष्मतेने होते. संगणकाचा, मोबाइल फोनचा वापर हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ असतो. आपल्याला खोटे वाटेल, पण सुमारे ६० प्रकारचे व्यवसाय करण्यास ही माणसे सक्षम असतात. नागपुरात कार्यरत असलेल्या शिरीष दारव्हेकरांच्या ‘सक्षम’ या संस्थेने दृष्टिहीनांच्या सबलीकरणासाठी अनेक विधायक उपक्रम सुरू केले आहेत. ‘अब्रार’ या बोलक्या उपकरणाची निर्मिती हा त्यापैकी एक.

खोलात शिरल्यावर असे लक्षात आले की, आपले अंधत्वाबद्दलचे गाढ अज्ञान अगदी लाजिरवाणे आहे. सर्व दृष्टिहीनांना आपण एकाच तागडीत तोलतो. पण त्यांपैकी फार कमी लोक पूर्ण दृष्टिहीन असतात, त्यांच्यापैकी अनेकांना थोडी तांत्रिक मदत मिळाल्यास लेखन-वाचन करणे शक्य होते. ही वस्तुस्थिती व गरज लक्षात घेऊन पुण्यातील रमेश साठे व त्यांच्या बंधूंंनी अनेक उपकरणांची निर्मिती केली आहे. अंशत: दृष्टिहीन असणाऱ्यांसाठी ही वापरायला सुलभ उपकरणे म्हणजे मोठे वरदान आहे.

आमच्या कार्यक्रमांमध्ये या सर्व ज्ञानाचा उपयोग करायला आम्ही सुरुवात केली. भारतभरातून दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून तेथील मुला-मुलींना कार्यक्रमासाठी बोलावून त्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांची परीक्षा पाहणाऱ्या स्पर्धा, जसे नादवेध, लक्ष्यवेध, स्पर्शाने, वासाने वस्तू ओळखणे, गायनस्पर्धा इत्यादींचे आयोजन करून त्यातील विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. तज्ज्ञांकडून त्यांच्या अंधत्वाच्या प्रमाणाची संस्थावार चाचणी करून घेऊन त्यांना उपकरणे वापरण्याबद्दल सूचना दिल्या जातात. त्यांना गाणी ऐकणे प्रिय असल्यामुळे गाण्यांच्या कार्यक्रमाचे खास आयोजन केले जाते, जेथे कार्यक्रम असेल तेथील प्रेक्षणीय स्थळे बघायला नेले जाते. यांतील एक उल्लेखनीय कार्यक्रम, म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून कार्यक्रमासाठी भारतातील विविध भागांतून आलेल्या दृष्टिहीन बांधवांना आम्ही वस्तुसंग्रहालय ‘बघायला’ घेऊन जातो. प्रारंभी संचालकही कोडय़ात पडले. पण त्यामागची कल्पना समजावून सांगितल्यावर ते फारच प्रभावित झाले व त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.

न्यूनगंड बाळगला, तर दृष्टिहीनांना परावलंबी व दु:खी जीवन जगावे लागते. पण आहे त्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द बाळगली तर ते उंच भरारी घेऊ शकतात. अशी भरारी घेतलेल्या व्यक्तींना आम्ही कार्यक्रमात आमंत्रित करतो, ‘नॅब’चे पाटील सर, पुणे विद्यापीठातील डॉ्र. महेश देवकर, महाबळेश्वरचे उद्योजक भावेश भाटिया ही त्यातील काही ठळक नावे. ज्यांनी उल्लेखनीय कामे केली आहेत, त्यांचा सत्कार करतो, यावर्षी त्यात अजून एका कार्यक्रमाची भर पडली, दृष्टिहीनांचे क्रिकेट सामने!

करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. गरज आहे, ती आपला प्रेमाचा तृतीय नेत्र उघडून दृष्टिहीनांच्या त्यांच्या तृतीय नेत्राचे, म्हणजे स्वसामर्थ्यांचे भान देण्याची! तीच आमची अक्षय्य तृतीया.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com