16-lp-minalमानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा. याचा अर्थ, अन्न हा एकूणच मानवाच्या अस्तित्वाचा व एक प्रकारे व्यक्त्वाचाही अनिवार्य घटक आहे आणि त्याबद्दल आपण किती निष्काळजीपणे, पण त्याच वेळी दुराग्रहीपणे भाष्य करत असतो.

कोणी म्हणेल, ‘‘त्यात अगदी विचारपूर्वक बोलण्यासारखं काय आहे? जसं हवा, पाणी तसं अन्न.’’ पण हे तितकंसं खरं नाही. हवा, पाणी हे निसर्गात जसं उपलब्ध असतं तसंच आपल्यापर्यंत येतं आणि शुद्धीकरण प्रक्रिया वगळता त्यांच्या स्वरूपात फारसा बदल होत नाही. अन्नाचं मात्र (फळं व सॅलड्स व्यतिरिक्त) आपण त्यावर प्रक्रिया करूनच सेवन करतो. या सर्व टप्प्यांमधून मानवाची खाद्यसंस्कृती उदयाला येते. त्यामध्ये नसर्गिक उपलब्धता व व्यक्तिगत निर्णय हे दोन्ही घटक कार्यरत असतात.

आपला अन्नाविषयीचा निष्काळजीपणा व दुराग्रह हा मूलत: या खाद्यसंस्कृतीविषयीचा असतो.

‘‘आमच्याकडे पालेभाज्या अजिबात आवडत नाहीत.’’

‘‘उसळी तर घोडय़ांचं खाणं.’’

‘‘जेवण कसं साग्रसंगीत हवं, डावी-उजवी बाजू सजलेली हवी.’’

‘‘कामाच्या रगाडय़ात चारी ठाव जेवायला कोणाला वेळ असतो? उभ्या उभ्या पोळीभाजी तोंडात कोंबायची की झालं जेवण.’’

‘‘नारळाच्या स्वादाशिवाय भाजी, आमटी घशाखाली उतरत नाही.’’

‘‘काय ज्यात त्यात नारळ घालून ठेवतात! झणझणीत चवच जाते.’’

‘‘दाण्याच्या कुटाशिवाय स्वैपाक कसा होतो बुवा?’’

या अगदी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. याव्यतिरिक्त तिखट-गोड, विशिष्ट आवडीनिवडी, प्रांतिक वैशिष्टय़े यांच्याबद्दलच्या शेरेबाजीवर प्रबंधच तयार होईल. आणखी महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्व प्रकारच्या नतिक मुद्दय़ांना कटाक्षाने बाजूला ठेवलं आहे. अन्यथा शाकाहार-मांसाहार, सात्त्विक -तामस, कांदा-लसूण, जैन-जैनेतर, उपवासाला चालणारे- न चालणारे पदार्थ यांवर झडणारे आणि विकोपाला पोहोचणारे वाद अगणित असतात.

का बरं आपण आपल्या अन्नाविषयी एवढे संवेदनशील असतो? आपल्या सवयी आणि आवडीनिवडींच्या बाबतीत एवढा आग्रहीपणा कशासाठी?

‘‘का असू नये? आपल्या आवडीचं खाणं हा गुन्हा आहे का?’’

‘‘तो गुन्हा नसला तरी आवडीचं खाणं आणि त्याबद्दल आग्रही असणं यांत मूलभूत फरक आहे.’’

‘‘आपली सगळी धडपड पोटासाठी असते. मग त्या पोटाला आनंदी ठेवण्यासाठी थोडा जिद्दीपणा केला तर बिघडलं कुठे?’’

या वादांना अंत नसतो. तो प्रत्येकाच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचा आविष्कार असतो आणि त्यातून इतर नवनवीन वादांचे धुमारे फुटतात, इतर मुद्दे उपस्थित होतात.

चहा वज्र्य असणारी व्यक्ती दुसऱ्यांकडे गेल्यावर जेव्हा तिचे चहा देऊन आदरातिथ्य केले जाते, तेव्हा तिने ते स्वीकारावे की ‘चहा घेत नाही’ असे सांगून नाकारावे? दुसऱ्यांकडे आपल्या नावडीचा पदार्थ पानात आल्यावर तो मुकाटय़ाने संपवावा की आवडीशी प्रामाणिक राहून पानात टाकून द्यावा? अशा अनेक प्रश्नांना एकमताने उत्तरे देता येणार नाहीत.

आपण भारतीय माणसे सार्वजनिक जीवनात दुसऱ्यांना काय वाटेल याचा विचार करत नाही, असे साने गुरुजींचे निरीक्षण आहे; आपल्या खाण्याच्या सवयींबाबत ते बहुतांश खरे आहे. आपल्या खाण्याच्या सवयी प्रामुख्याने भौगोलिक, कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असतात हे साधे सत्य डोळ्याआड करून आपण आपले आग्रह, चोखंदळपणा व नतिक मुद्दे काढून इतरांना दुखवायला मागेपुढे पाहत नाही, आणि असे करण्यात आपल्याला काही गर वाटत नाही. हेच आपले सामाजिक वास्तव आहे. ‘‘अन्नदाता सुखी भव’’ हा केवळ एक उपचारच राहतो.

‘समोर आलेले प्रेमाने खाल्ले’ हे आपण केवळ साधुसंतांचे लक्षण समजतो. पण ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असेल तर समोर आलेले प्रत्येकानेच आनंदाने खायला हवे. याच्याशी सर्वजण सहमत होणार नाहीत हे निश्चित. पण केवळ आवडीनिवडींनाच प्राधान्य देऊन ‘उदराचे स्मशान’ करणे योग्य नाही, हेही सर्वाना मान्य व्हावे.

आपली खाद्यसंस्कृती आपल्या भौगोलिक वैशिष्टय़ांतून स्थिरावणाऱ्या सवयी व अन्नाच्या बाबतीतली सुसंस्कृतता अशी दोन्ही मिळून तयार होते. भारतासारख्या बहुविधतेने नटलेल्या देशात ही खाद्यसंस्कृतीही एकसुरी नसून विविधरंगी आहे. वेगवेगळे भौगोलिक प्रांत व अनेक धर्म यांच्या समन्वयातून ही बहुविधता अधिक श्रीमंत झाली आहे. पण आपण त्याबाबतीत किती अनभिज्ञ आहोत! दुसऱ्या प्रांतांतल्या पदार्थाबद्दल, जसे ईशान्य भारतीय, सिंधी किंवा सागरी प्रदेशांतील सर्वसामान्य व खास पदार्थाबद्दल आपल्याला किती माहिती आणि आत्मीयता असते?  खाण्याच्या बाबतीत आपल्यावर कसोटीचा प्रसंग आला तर आपल्यापकी अनेक जण पिझ्झा, बर्गर किंवा चायनीज पदार्थ यांना पसंती देतील आणि समोरच्या देशी पदार्थाला नाके मुरडतील. याचा अर्थ, परदेशी पदार्थ वाईट आहेत, असे अजिबात नाही. पण देशी पदार्थाची चवही न घेता त्यांना टाकाऊ ठरवणे, हे पूर्ण चुकीचे आहे; तेच आपल्या अनभिज्ञतेचे लक्षण आहे.

ग्लोबल सिटिझन होणे, ही आज काळाची गरज आहे. पण त्यासाठी लोकल सिटिझन होणे ही पूर्वअट आहे. आपल्या जवळच्या व लांबच्या देशवासीयांशी  सौहार्दाचे संबंध जोडायचे असतील, तर ‘प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयापर्यंत जातो’ हे प्राचीन शहाणपण धारण करणे आवश्यक आहे. अन्न हे दुधारी अस्त्र आहे. समोरच्याचा अपमान करण्याचे हत्यार म्हणून वापरता येते, तसेच समोरच्याला वश करण्याचे साधन म्हणूनही उपयोगी पडते. पण त्यापलीकडे जाऊन त्यातील बहुविधतेचा प्रेमाने सन्मान केला तर आपल्याकडे एक परिपक्व खाद्यसंस्कृती साकार होईल.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com