‘भाषिक विविधता ही मानवी विविधतेच्या समकक्ष आहे.’ हे मत आहे जगातील एक विख्यात भाषातज्ज्ञ डेव्हिड क्रिस्टल यांचे. भाषिक विविधतेचे विश्वसंस्कृतीमधील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मायबोली दिन साजरा करण्याचा ठराव केला व त्यानुसार सन २००० पासून २१ फेब्रुवारी हा दिवस जगात सर्वत्र आंतरराष्ट्रीय मायबोली दिन म्हणून साजरा केला जातो.

ही माहिती समजल्यावर कुतूहल वाटले आणि आम्ही ह्य ‘मायबोली’ प्रकरणाच्या आणखी खोलात जायचे ठरवले. त्यातून जे उद्बोधन झाले ते असे- जगात जवळपास आठ हजार भाषा बोलल्या जातात. त्यांपैकी सहा हजार या ज्ञात भाषा आहेत. त्यातील सुमारे तीन हजार भाषा या मरणपंथाला लागलेल्या आहेत. ह्य परिस्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे या भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे. अंदमान बेटावर एक ठरावीक आदिवासी भाषा बोलणारी एकमेव वृद्ध स्त्री उरली होती. तिच्या मृत्यूबरोबर ती भाषाही लोप पावली आणि मानवी संस्कृतीचे एक दालन कायमचे बंद झाले. या वास्तवाचे भान यावे आणि भाषांच्या ह्या ऱ्हासाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय मायबोली दिनाची संकल्पना फार महत्त्वाची आहे.

आम्ही काही भाषातज्ज्ञ नव्हे, पण आपल्या बोलीभाषांबद्दल मिळालेल्या ह्य माहितीने आम्ही अस्वस्थ झालो. ‘भाषेचा मृत्यू’ ही घटना भयानकच आहे. बघता बघता एक दिवस एखादी भाषा जगातून नाहीशी होते. आपल्या जवळचं एखादं माणूस असं अचानक नाहीसं झालं तर आपण असे निर्लेप राहू का? मग भाषांच्या बाबतीत आपल्याला काही असोशी वाटत नाही का? भाषा जर लोप पावायची नसेल तर ती वापरात राहिली पाहिजे. आज इंग्रजीच्या लोंढय़ापुढे सर्वच भारतीय भाषा धोक्याच्या परिस्थितीत आहेत. खरं म्हणजे आपल्या भारतात विपुल भाषावैविध्य आहे. ‘दर चार मैलांवर बोलीभाषा बदलते’ असं लहानपणापासून ऐकल्याचं आठवतं. या हिशोबाने भारतातील प्रत्येक राज्यात किती बोलीभाषा असतील, याची कल्पना यावी.

पण आज त्यांतल्या किती भाषा सुरक्षित आणि जिवंत आहेत? बोलीभाषांना त्यांची स्वतंत्र लिपी नसते. साहजिकच या भाषा बोलल्या गेल्या तरच त्या जीवित राहणार, अन्यथा त्यांचा अंत ठरलेलाच! त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात; त्यांचे दस्तावेजीकरण करावे लागते. आपले अशा पद्धतशीर ऐतिहासिक दृष्टिकोनाविषयीचे औदासीन्य पाहता जे काही प्रयत्न झाले आहेत, ते स्तुत्य असले तरीही तुटपुंजे आहेत. आज प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी व त्यांचा चमू या दृष्टीने जोमाने प्रयत्न करीत आहेत. इतरही प्रयत्न सुरू असतीलच.

पण तरीही आम्हाला मनापासून असे वाटले की भाषासंवर्धन व जतनाच्या दृष्टीने हे सर्व आवश्यक असले तरी भाषा टिकवण्याचा एक प्राथमिक मार्ग म्हणजे ती भाषा बोलणाऱ्या लोकांना ती बोलावी असे वाटावे, अशी परिस्थिती निर्माण करणे.

भारताच्या अंतरंगात एक रपेट मारली, तर शहरी औपचारिकता व ग्रामीण सहजपणा यातील मोठी दरी लगेच लक्षात येते. शहरी भागात भाषा मुख्यत्वे विचार व्यक्त करण्यापेक्षा विचार लपवण्यासाठी विविध रूपे लेवून येते. पण ग्रामीण भागात लोकांची मनेच भाषांतून व्यक्त होतात. या दोहोंमधील ही दरी मिटवण्याचा राजमार्ग म्हणजे भाषेच्या प्रेमाचा सेतू. ग्रामीण भारतात आजही पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर, शेतकरी, कामकरी आहेत आणि ते आपल्या बोलीभाषांमध्येच परस्परांशी संवाद साधतात. त्यांच्या या अकृत्रिम भाषांच्या माध्यमांतून त्यांच्याशी संवाद साधणे, आपल्या प्रेमाची खात्री त्यांना पटवून देणे शक्य आहे व आवश्यकही.

हे करायचे ठरवून आम्ही त्या लहानशा गावात गेलो आणि गावकऱ्यांशी बोलून आमच्या येण्याचा उद्देश सांगितला. तेव्हा त्यांना नवलच वाटले. आपल्या बोलीभाषेला कोणी नाके मुरडत नाहीत, आपल्याला गावंढळ समजत नाहीत, हेच त्यांच्यासाठी अनोखे होते. आजपर्यंतच्या अनुभवांशी विसंगत. पण आमची आपुलकी त्यांना जाणवली व ते खुलत गेले.

गावकरी मंडळी त्यांच्या भाषेत आम्हाला म्हणाली, ‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. तेव्हा तुमची सरबराई आम्ही करणार. आजपर्यंतच्या कमाईतून आमची काही पुंजी साठली आहे, ती पुरेशी आहे.’

‘मग उद्याचे काय?’

‘उद्याचे काय? आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितले आहे की विहिरीतले पाणी उपसले तर विहीर रिकामी होत नाही. सर्व बाजूंनी भूमिगत झरे तिच्यात पाणी भरायला लागतात.’

ही प्रेमाची भाषा ऐकून आम्ही भारावून गेलो. आणि मग जो आनंदोत्सव तेथे झाला त्याला तोड नाही. आपल्या भाषेतील ठेवणीतले शब्दप्रयोग, म्हणी, लोककथा, गाणी, पारंपरिक नृत्ये.. सगळे अगदी बेभानच झाले होते. प्रेमरसात चिंब भिजले होते. त्यातून बाहेर यावे असे कोणाला वाटत नव्हते. बाहेर आलो ते अन्नाच्या सुग्रास दरवळाने! त्यांनी आमच्यासाठी त्यांचे पारंपरिक पदार्थ बनवले होते. कुठल्याही पंचतारांकित अन्नाला लाजवतील असे लज्जतदार जेवण!

त्याचा स्वाद घेता घेता एकदम लक्षात आले की आपण मायबोलीचा उत्सव करायला आलो खरे, पण आता जो संवाद चालू आहे तो शब्देविण- केवळ हृदयाच्या आदानप्रदानातून. आपल्या खऱ्या विचारांना लपवणाऱ्या शब्दांची गरजच नाही. उलट हृदय उलगडणाऱ्या अनादि भाषेचे, त्या जगन्नियंत्याच्या भाषेचे साम्राज्य पसरले आहे.

खरंच- प्रेमविरहित भाषा ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मायबोलीच्या उत्सवाने ही जाणीव सर्वाना करून दिली, तर भाषाविश्वाची समृद्धी अबाधित राहील, नाही का?
डॉ. मीनल कातरणीकर