32-lp-manali‘‘काय हो, वहिनींची भाऊबीजेची मनीऑर्डर आली की नाही वेळेवर?’’ या प्रश्नावर स्नेह्य़ांनी आमच्याकडे ज्या नजरेने पाहिलं, त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही.

‘‘कुठल्या काळात वावरता तुम्ही? आता ऑनलाइनचा जमाना आहे आणि तुम्ही अजून ‘डाकिया डाक लाया’च्या काळासारखा विचार करताय? अशी गाणी ऐकून तुम्हाला अगदी भावनांचे कढ येत असतील ना?’’ आज स्नेह्यंना आमची फिरकी घ्यायची संधी सोडायची नव्हती. आम्ही त्यांना तो आनंद मिळू दिला.

‘‘पण आज अचानक तुम्हाला मनीऑर्डर, पोस्टमन यांची आठवण कशी झाली? ’’

‘‘होय! आपल्या सगळ्या सणांच्या गडबडीत आपलं बोलायचं राहूनच गेलं. ९ ऑक्टोबरला जागतिक पोस्ट दिन असतो. त्याच दिवशी भारतीय पोस्ट दिनही साजरा होतो.’’

‘‘एक मिनीट, तुम्हाला असं वाटत नाही का की हे सगळं आता आऊटडेटेड होत चाललंय? इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कक्रांती झाली आहे. सगळं जग या सायबर विश्वात सामावलं गेलं आहे. मागच्याच वर्षी तारसेवा अधिकृतपणे बंद केली गेली. म्हणजे भारतीय डाक विभागही जमिनीवर पाय ठेवून व्यवहारकठोर निर्णय घेतंय आणि तुम्हाला अशा असंबद्ध गोष्टींमधून बाहेरच यायचं नाहीये.’’ त्यांचा आवाज तापला.

त्यांच्या अशाच प्रतिक्रियेची आम्हाला अपेक्षा होती. पण आंतरराष्ट्रीय व भारतीय पोस्ट दिनाचा उल्लेख करण्याचा आमचा उद्देश पूर्णपणे निराळा होता.

१८७४ मध्ये स्वित्र्झलडची राजधानी बर्न येथे जागतिक पोस्ट संघाची स्थापना झाली. ही घटना जागतिक दळणवळणाच्या दृष्टीने अगदी अभूतपूर्व होती. कारण त्यामुळे जगातील विविध देश पोस्टाच्या माध्यमातून परस्परांशी जोडले गेले. या घटनेचे स्मरण म्हणून आणि लोकांच्या व उद्योगविश्वाच्या दैनंदिन जीवनातील पोस्ट सेवेच्या भूमिकेविषयी तसेच देशाच्या आर्थिक सामाजिक विकासातील तिच्या स्थानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी ९ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय डाक सेवाही हाच दिवस भारतीय डाक दिन म्हणून साजरा करते.

आम्हाला या पोस्ट सेवेविषयी जागरूकता निर्माण करण्यात फारसा रस नाही. जे त्या सेवेवर अवलंबून असतात व तिचे लाभार्थी असतात त्यांना तिचे महत्त्व ठाऊकच असते.  आम्हाला विशेष रस आहे तो त्या गणवेशातील संपर्कदूतामध्ये, त्या हाडामांसाच्या माणसामध्ये. ऊनपावसाची, इमारतींच्या उंचीची, खराब रस्त्यांची पर्वा न करता घरोघरी वेळेवर पत्रे पोहोचवणाऱ्या आपल्या पोस्टमन मित्रांना आपल्या प्रेमाची ओळख करून घ्यावी, असे आम्हाला वाटते व त्यासाठी आम्हाला हा पोस्ट दिन औचित्यपूर्ण वाटतो.

जरा विचार करा, पोस्टमन साध्या वेशात आपल्याबरोबर आला तर आपण त्याला ओळखू का? शक्यता फारच कमी आहे. पण याचा अर्थ, त्यांचा गणवेश हीच त्यांची ओळख का? त्यांच्या चेहऱ्यांना, त्यांच्या नावांना आपल्या दृष्टीने काहीच ओळख नाही का? असे असेल तर आपल्यासाठी हे लाजिरवाणे आहे.

कुणी म्हणेल, यात एवढं भावविवश होण्यासारखं काय आहे? आता ईमेल्स आणि मोबाइल फोन्सच्या वापरामुळे आपल्याला वैयक्तिक पत्रे फारशी येतच नाहीत. येतात ती केवळ बिले किंवा इतर व्यावसायिक पत्रे. ती आणून देणाऱ्यांसाठी अशी भावनिक जवळीक कशाला निर्माण होईल?

पण मुद्दा भावनिक जवळिकीचा नसून कृतज्ञतेचा आणि विशेषत: माणुसकीचा आहे. ‘दिन रात आपकी सेवामें’ हे ब्रीद मिरवणाऱ्या, त्याला जागणाऱ्या या भारतीय पोस्ट सेवेच्या आधारस्तंभांना प्रेमपूर्वक कृतज्ञता अर्पण करणे, ही समाजाचे घटक म्हणून आपली जबाबदारी आहे. आज त्यांची आपल्याकडे येण्याची शक्यता कमी झाली असेल, पण तीसुद्धा कुटुंबवत्सल माणसे आहेत, ती आपल्या समाजाचाच भाग आहेत, याचे आपणच स्मरण ठेवायला हवे आणि आपल्या भावनाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात.

त्यासाठी आम्ही त्यांच्याच विशेष दिवसाची निवड केली. ९ ऑक्टोबर या दिवशी वेगवेगळ्या शहरांमधील आमची मित्रमंडळी शहराच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये तसेच इतरही शाखांमध्ये जातात. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छापत्रे, फुले व मिठाई देऊन पोस्ट दिनाच्या शुभेच्छा देतात. पोस्ट ऑफिसची रचना पाहिली तर एरवी आपण त्या कर्मचाऱ्यांशी जाळीच्या आडून संवाद साधू शकतो. पण या दिवशी मात्र आम्ही आत जातो आणि प्रत्येकाशी हस्तांदोलन करून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारतो. या जिव्हाळ्याने झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आणि आम्हालाही त्यांचा गणवेशाने नाही तर चेहऱ्याने परिचय होतो. ज्या शहरांत जाऊ शकत नाही तेथे आम्ही शुभेच्छा पत्रे व कापडी फुले ९ ऑटोबरला पोहोचतील अशा बेताने पोस्टमास्तरांच्या नावे पाठवतो.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. विविध देशांच्या मुख्य पोस्ट ऑफिसेसना आम्ही शुभेच्छापत्रे व फुले आंतरराष्ट्रीय पोस्ट सेवेमार्फत पाठवतो. त्यांच्यातील काही ऑफिसेसकडून आम्हाला धन्यवादाची पत्रेसुद्धा येतात.

भारतीय पोस्ट सेवेत आज आमूलाग्र बदल होत आहेत. त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे स्वरूपही बदलत आहे. गंमत म्हणजे महकवी कालिदासाने त्याच्या मेघदूत या अजरामर काव्यात एका ढगाला यक्षाच्या संदेशवाहकाची भूमिका दिली होती. म्हणजे ढग हा आद्य भारतीय पोस्टमन होय आणि तिथपासून आपण आजपर्यंत बदल पाहिले आहेत. पण बदल कुठे होत नाही? ग्रीक तत्त्वज्ञ हिराक्लिटस म्हणतो त्याप्रमाणे ‘‘या जगात केवळ एकच शाश्वत गोष्ट आहे, ती म्हणजे बदल.’’ पण पोस्ट सेवेत होणाऱ्या बदलांमध्येही पोस्टमनच त्यांच्या सेवेचा कणा आहे. वरवर पाहता, पोस्टमन केवळ मजकूर वाहून आणणारा दूत वाटतो. पण त्यांनी संदेश वाहून आणल्यावरच आपल्याला तो मिळतो. त्यांच्या या कामाची प्रेममय परतभेट म्हणून आम्ही अलोट प्रेम घेऊन त्यांच्याकडे जातो व त्यांच्यावर मुक्तहस्ते उधळतो. ही आमची संदेशवहनाची प्रेमळ रीत!
डॉ. मीनल कातरणीकर