नातिचरामि ?

लग्न ही नैसर्गिक घटना नाही, तर ती मानवी समाजाने निर्माण केलेली संस्था आहे.

16-lp-minal‘‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणे.’’

‘‘कोणास ठाऊक, असतीलही. पण पृथ्वीवर येऊन त्यांच्या चिंधडय़ा उडतात हे नक्की.’’

‘‘इतका वैताग? लग्न ठरवताय का कुणाचं?’’

‘‘आम्ही भले ठरवू, पण त्यांनी ठरवून तर घेतलं पाहिजे. अहो, लग्न करतायत की पॅकेज शोधताहेत हेच समजत नाही. आता यशस्वी लग्न म्हणजे दोन्ही बाजूंना उत्तम पॅकेजची प्राप्ती अशीच व्याख्या करायला पाहिजे. बघा, आता तुळशी विवाहानंतर नववर्ष, व्हॅलेंटाईन डे असे नवे मुहूर्त शोधून अमाप लग्ने होतील आणि स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर त्यातले अनेक जण ‘आझादी की खोज’ करायला सुरुवात करतील.’’

यातला विनोद बाजूला ठेवला तरी दुर्दैवाने हेच आपल्या समाजातलं वास्तव होऊ पाहतंय आणि एकमेकांवर दोषारोप करण्यामध्ये दुखण्याचं मूळ कुठे आहे, याचाही तपास करायचं लोकांना भान नाही.

‘लग्न’ हा इतका व्यापक आणि गहन विषय आहे की त्यावर ठोसपणे काही सर्वसामान्य विधान करणं धाडसाचं ठरेल.

पण आम्हाला लग्नाच्या कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक पैलूपेक्षा ‘लग्न’ या संकल्पनेत आणि तिच्या आकलनात विशेष रस आहे. लग्न ही नैसर्गिक घटना नाही, तर ती मानवी समाजाने निर्माण केलेली संस्था आहे. पशू-पक्ष्यांमध्ये लग्ने होत नाहीत, तर मानवी समाजातच होतात. आपल्या नैसर्गिक अशा कामप्रेरणेचे सामाजिक नियोजन करण्यासाठी ती अस्तित्वात आली आणि मग धर्मसंस्थेने तिला आपले वस्त्रलंकार चढवले. लग्नसंस्था व कुटुंबसंस्था या परस्परांशी निगडित आणि समाजव्यवस्थेतील पायाभूत अशा संस्था आहेत. समाजशास्त्रज्ञ याबद्दल आपल्याला सखोल माहिती देऊ शकतील. पण पूर्वीच्या लग्नपत्रिकांमध्ये ‘दोन घराण्यांतील शरीरसंबंध’ असा उल्लेख असायचा, तो लग्नाचा उद्देश स्पष्ट करणारा अगदी बोलका पुरावा आहे.

पण मग लग्न दोन व्यक्तींमधला संबंध आहे की दोन कुटुंबांमधला? लग्नामुळे केवळ दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे परस्परांशी बांधली जातात, असे अनेकदा आपण ऐकतो. पण कल्पना करा, लग्नानंतर दोन कुटुंबांमध्ये अत्यंत घनिष्ट संबंध राहिले पण पतीपत्नीमध्ये बेबनाव निर्माण झाला तर ते यशस्वी लग्न म्हणता येईल का? किंवा लग्नानंतर पती-पत्नीमध्ये मधुर संबंध निर्माण झाले पण त्यांच्या कुटुंबात शत्रुत्व उत्पन्न झाले तर ते यशस्वी लग्न म्हणता येईल का?

कूटप्रश्नच आहे, पण व्यक्तीच्या सर्वागिण विकासाशी आणि निरोगी समाजव्यवस्थेशी जोडलेला असल्यामुळे केवळ त्याचेच नाही तर लग्नाशी संबंधित प्रत्येक समस्येचेच समाधानकारक उत्तर शोधायला हवे.

आजच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात प्रत्येक लग्नेच्छू व्यक्तीने स्वत:ला हा प्रश्न विचारायला हवा, ‘‘मला लग्न कशासाठी करायचे आहे?’’ वैवाहिक नात्यातील बेबनावांच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या नात्यासाठी अत्यावश्यक असा अतूट विश्वास व भरभरून प्रेम आपण जोडीदाराला देऊ शकतो का व त्याच्याकडून मिळवू शकतो का, आपण स्वत:ला त्यासाठी तयार केले आहे का, हा प्रत्येक लग्नेच्छू व्यक्तीच्या चिंतनाचा व आत्मपरीक्षेचा विषय असला पाहिजे.

लग्न म्हणजे कामजीवन व सहजीवन यांचा परिपोष, हे बहुधा सर्वमान्य होईल; पण त्या दोन्ही बाबतीत पती-पत्नीना लग्नापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळत नाही, याबाबतीतही दुमत होऊ नये. त्यातही कामजीवन ही वैद्यकाच्या अखत्यारीमध्ये सामावली गेलेली बाब आहे, त्यामध्ये मार्गदर्शन व मदत उपलब्ध होऊ शकते. पण सहजीवनाचे काय? त्याबाबतीत आपण केवळ कुटुंबातील संस्कार व अनौपचारिक मार्गदर्शनावरच भिस्त ठेवून असतो. आणि तेही केवळ मुलींनाच दिले जाते. मुलांच्या बाबतीत लग्नबंधनासाठी मानसिक तयारी करणारे काही शिक्षण द्यावे लागते, हे सुद्धा माहीत नसते. गंमत म्हणजे दोन्हीकडे समोरच्याला ‘शत्रुपक्ष’ म्हणून गणले जाते.

इथेच खरी गोम आहे. पती आणि पत्नी या जर दोन शत्रुपक्षांमधल्या व्यक्ती किंवा प्यादी असतील तर त्यांच्यात कायम कुरघोडीचे राजकारण चालेल, सहजीवन निर्माण होणार नाही. पती विरुद्ध पत्नी असा सामना नसून पती आणि पत्नी असा सहप्रवास आहे, या भावनेने नात्यात प्रवेश केला, तर पुढची वाटचाल सहज होते. पण त्यासाठी नात्यात प्रवेश करावा लागतो व स्वत:लाही त्यासाठी घडवावे लागते.

आपल्या वयाने लहान, अशिक्षित पत्नीचे सर्वार्थाने उन्नयन करून तिला असामान्य स्त्री बनवणारे न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे लोकोत्तर पुरुष विरळाच! बाकी सर्वाची तीन पायांची शर्यतच असते. पण ती जिंकण्याला, यशस्वीपणे पूर्ण करण्याला कौशल्य लागते. त्यासाठी मनाची पूर्ण तयारी व जोडीदाराबरोबरचा सुसंवाद याची गरज असते. आपण कुठलेही नवीन काम स्वीकारतो तेव्हा त्याचे स्वरूप समजावून घेतो व गरज असल्यास प्रशिक्षणही घेतो.  मग लग्नाबाबतच इतका निष्काळजीपणा का?

लग्नामध्ये पती-पत्नी शारीरिक, कौटुंबिक नात्याने तर जोडले जातातच, पण त्याचबरोबर त्यांच्यात एक अलौकिक आत्मिक नाते तयार होते. किंबहुना ते नाते म्हणजेच खरे लग्न. लग्नानंतर पती-पत्नीतील द्वैत संपते व अद्वैत निर्माण होते. ‘तू’ व ‘मी’ हे ‘आम्ही’ मध्ये विलीन होतात. ‘‘दो जिस्म एक जान’’ हे केवळ काव्य नव्हे, ते लग्नाचे आदर्श रूप आहे. त्यासाठीच ‘नातिचरामि’ हे वचन आहे ना? मग आपल्या शिक्षणाचा उपयोग सुशिक्षित व हक्कांसाठी सजग असलेल्या तरुण पिढीने आपल्याच सुरेल सहजीवनासाठी करायला नको का?

आजच्या बदलत्या काळात लग्नसंस्था एका नाजूक वळणावर येऊन ठेपली आहे. तिची मोडतोड करणे सहज शक्य आहे. पण ती जर टिकवायची असेल, तर त्यासाठी आपणा सर्वाना डोळस प्रयत्न करावे लागतील. आपण सर्वानीच सभोवतालच्या तरुण मुला-मुलींना या नात्याच्या अलौकिक स्वरूपाबद्दल सजग करणे हा जागृत प्रेमाचा सार्वजनिक प्रयोगच ठरेल, नाही का?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marriage article by dr minal katarnikar

ताज्या बातम्या