एखाद्या समाजाचा इतिहास म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची यशोगाथा. हे जर असेल, तर पारशी समाजाचा इतिहास हा केवळ सुवर्णाक्षरांनीच लिहावा लागेल. प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्ती या समाजाने भारताला दिल्या. आधुनिक भारताच्या जडणघडणीत भरीव योगदान त्यांनी दिले, आजही देत आहेत. लोकसंख्येच्या हिशोबाने त्यांची संख्या नगण्य असली तरी त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आमचे समविचारी स्नेही त्यांना पटेटी व नवरोजच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देतात.

प्रेषित झरत्रुष्टाच्या शिकवणीचे अनुकरण करणारा पारशी धर्म हा मूळ भारतीय धर्म नव्हे, तो बाहेरून भारतात आला. काही राजकीय घडामोडींमुळे सुमारे ७०० वर्षांपूर्वी पारशी लोक इराणमधून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाखल झाले व दुधात साखर विरघळून एकजीव व्हावे तसे भारतीय समाजात एकरूप झाले. ‘येथे कुठल्याही प्रकारे धर्मप्रसाराचा प्रयत्न चालणार नाही’ हे सुरुवातीला दिलेले वचन त्यांनी आजतागायत पाळलेले आहे. कुठल्याही प्रकारची धार्मिक, राजकीय वा इतर महत्त्वाकांक्षा त्यांनी उराशी बाळगली नाही. ‘सद्विचार, सद्भाषण व सद्वर्तन’ या त्रिसूत्रीचे बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबात मिळते व त्याचे ते कसोशीने पालन करतात. दानाचा संस्कारही त्यांच्यावर बालवयापासूनच होत असतो. अत्यंत पापभीरू व धार्मिक मनोवृत्तीचे पारशी लोक सहसा कुणाच्या अध्यातमध्यात न करता ‘आपले काम बरे की आपण बरे’ अशा प्रकारे समाजात वावरतात.

या मुशीतून तयार झालेले पारशी अत्यंत परोपकारी आहेत आणि देशाच्या, समाजाच्या व शहराच्या प्रगतीसाठी आपले तन, मन, धन त्यांनी अर्पण केले आहे. राजकारणाच्या क्षेत्रात दादाभाई नौरोजी व फिरोजशहा मेहता, कायद्याच्या क्षेत्रात नानी पालखीवाला, उद्योगधंद्यच्या क्षेत्रात टाटा, विज्ञान व संशोधन क्षेत्रात होमी भाभा इत्यादी उत्तुंग नावे सहजच त्या त्या क्षेत्रातील मानदंड म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतात, पण याव्यतिरिक्तही कला, क्रीडा, संस्कृती अशा विविधांगांनी देशाचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न पारशी लोकांनी केला आहे. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, पांजरपोळ, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, पाणपोया, धर्मादाय संस्था अशा किती तरी संस्था त्यांनी उभारल्या आहेत. केवळ स्वत:ची भौतिक प्रगती नव्हे तर सर्वाचीच सर्वागीण प्रगती करण्याकडे व ती सुद्धा कुठल्याही नावलौकिकाच्या हव्यासाशिवाय करण्याकडे पारशी समाजाचा कल असतो.

अर्थात, पारशी लोकांबद्दल ही माहिती आपल्याला कुठूनही मिळेल. आमचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. कुठल्याही इतिहासात आपल्याला नामवंत व्यक्तींबद्दल सर्व माहिती उपलब्ध होते, परंतु अनेक सर्वसामान्य लोकांबद्दल इतिहास मुग्ध असतो; वर्तमानही फार काही बोलत नाही. सर्वसामान्य लोकांनी भले उत्तुंग कामगिरी केली नसेल, पण समाजात एक चांगले वातावरण कायम राखण्यात मोठा हातभार लावलेला असतो. त्यांच्याप्रती आपली काहीच जबाबदारी नाही का?

विशेषत: पारशी समाजाच्या बाबतीत ही जबाबदारी गंभीर बनते. त्यांची लोकसंख्या अत्यल्प आहे आणि त्यांच्यात काही कारणांमुळे लग्नांचे प्रमाणही कमी असल्यामुळे ती अजूनच घटत चालली आहे. या कारणांमुळे वृद्ध पारशी लोकांची देखभाल ही त्यांची बिकट सामाजिक समस्या आहे. त्यांच्या सुदैवाने वृद्धाश्रम बांधणीतही पारशी समाज अग्रेसर असल्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न तितकासा गंभीर नसतो. पण एकटेपणा, आजारपण, प्रेमाच्या माणसांची वानवा अशा अनेक भावनिक समस्यांनी वृद्ध पारशी घेरलेले असतात. त्यांच्या दु:खात सहभागी व्हायला व आनंदात त्यांच्याबरोबर हसायला त्यांच्या अवतीभवती माणसेच नसतात.

‘‘पण हा काय इतरांचा दोष आहे का? त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यांनाच माणसांचा गलबला आणि इतरधर्मियांचा संपर्क नको असतो. मग भोगा फळं!’’ आमचे स्नेही त्यांच्या पारशी सहकाऱ्याच्या तुटक वागण्यामुळे कायम व्यथित असतात व ती व्यथा त्यांनी बोलून दाखवली.

पण आमची प्रेमाची नजर आम्हाला असा विचार करू देत नाही. पारशी लोकांना काही दु:ख असेल तर आपण ते वाटून घ्यायला हवे. मग ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या न्यायाने आमच्या समविचारी मित्रांनी ठरवले की, आपण पारशी नववर्ष दिन पारशी वृद्धाश्रमात जाऊन साजरा करायचा. त्यासाठी तेथील रीतसर परवानगी घेतली. तेथील वेळापत्रक जाणून घेतले व संध्याकाळी ४ वाजताची वेळ निश्चित केली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पटेटीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता मिठाई, फुले घेऊन पारशी वृद्धाश्रमात जातो व त्यांना नववर्षांच्या शुभेच्छा देतो. आम्ही सुट्टीच्या दिवशी त्यांच्यासाठी वेळ काढतो व त्यांच्या सणाची आठवण ठेवतो म्हणून त्यांनाही आनंद होतो. आमच्यापैकी काही जण त्यांच्या जन्मतारखा लिहून घेतात व त्यांना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छापत्रे पाठवतात. काही जण स्वत:चे वाढदिवस तेथे जाऊन साजरे करतात. त्या सर्व वृद्ध स्त्री-पुरुषांशी आता अकृत्रिम स्नेह निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही गेलो की ते आपले मन मोकळे करतात. आम्ही शांतपणे सर्व ऐकून घेतो व मग त्यांच्या मनाला प्रसन्नता यावी अशा दृष्टीने विषयांतर करतो; गप्पा मारतो, गाणी-गोष्टी करतो. तो एक-दीड तास त्या एकाकी वृद्ध स्त्री-पुरुषांना आनंद मिळावा यासाठी जे जमेल ते सर्व करतो.

हे सर्व कशासाठी? होय, पारशी समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात झाली, हे खरे, पण मग लक्षात आले की, वार्धक्य हे सर्व धर्मपंथभेदांच्या पलिकडे आहे. त्या अवस्थेत केवळ प्रेमाची भूक असते. आमच्या तरुण पिढीला हे समजावे, वृद्ध लोकांचा तिरस्कार न करता त्यांना निखळ प्रेम देण्याची प्रेरणा त्यांना मिळावी यासाठी हा प्रेमसिंचनाचा कार्यRम आम्हाला खूप मह<वाचा वाटतो.

सर्व पारशी बंधुभगिनींना नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com