विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असा संदेश आला आणि अनेकांना असे वाटले की, आता सणासुदीच्या तोंडावर, वाढलेली महागाई गृहीत धरून कोविड कहरकाळात काही नवीन घोषणा होणार आहे. मात्र त्या भाषणात घोषणा अशी काहीच नव्हती, सणांचा कालखंड लक्षात घेऊन काळजी घ्या, सुरक्षेचे सर्व उपाय म्हणजे मुखपट्टी, अंतरसोवळे, हात धुणे आदी काटेकोरपणे पाळा अशी विनंती करण्यासाठीच केवळ पंतप्रधान दूरचित्रवाणीवर आले होते. एवढय़ाचसाठी काय यायचे असेही अनेकांना वाटले. मात्र राज्यकर्ते कोणतेही असले राज्यातील किंवा केंद्रातील, तरी दोघांनाही पुन्हा एकदा कोविड कहराच्या लाटेची भीती आहेच. ही लाट आपल्याला सपाट करून तर जाणार नाही ना, याची भीती आहेच. शिवाय येणारे दसरा- दिवाळी आदी सण सुरक्षित साजरे करा असे सांगण्याला गणेशोत्सव आणि ओणमची पाश्र्वभूमी आहेच. कारण या दोन्ही सणांनंतर महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ झालेलीच होती.

रुग्णसंख्येच्या मुद्दय़ावरूनही अनेक प्रवाद आहेत. काहींना वाटते आहे की, रुग्णसंख्या वाढत जाताना दिसते आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून सांगितली जाणारी आकडेवारी आता रुग्णसंख्येच्या दरात घट झाली आहे, असे सांगणारी असते. या आठवडय़ातील बुधवारचीच आकडेवारी वानगीदाखल घ्यायची तर त्या दिवशी रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊन आता १०० दिवसांवर आला आहे, अशी बातमी राज्यात प्रसिद्ध झाली. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याच दिवशी जारी केलेल्या निवेदनानुसार ज्या पाच राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढते आहे त्यात बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर, दिल्लीसोबत महाराष्ट्राचाही समावेश आहे. जनतेला पडलेला प्रश्न असा की, यातील खरे काय मानायचे? नेमके कोण खोटे बोलत आहे? आणि खरे चित्र नेमके काय आहे? कदाचित दोघांचीही आकडेवारी खरी असू शकते, पण मग असे का व्हावे? याचे उत्तर म्हणजे एकाच वेळेस आपल्याकडे देशात पीसीआर चाचण्या, सेरो सव्‍‌र्हे आदी वेगवेगळ्या पद्धती वापरून माहिती (डेटा) गोळा केली जातेय. या डेटा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये प्रमाणित अशी बाब नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो डेटा वापरून निरीक्षणे नोंदवत आहे आणि त्याचे निष्कर्षही जाहीर करत आहे. मात्र त्या सर्वामध्ये एकच एक अशा प्रमाणीकरणाचा अभाव आहे. त्यामुळे या सर्व चाचण्यांमधून एकच एक असे सरसकट विधान कुणालाच करता येणार नाही. आपल्यासमोर उभे राहते आहे ते तुकडेचित्र आहे. विविध प्रकारे, विविध निकष लावून केलेल्या चाचण्यांच्या निकालांचे वेगवेगळे तुकडे आपल्यासमोर ठेवले जात आहेत. त्यात राज्याचा तुकडा वेगळा, केंद्राचा वेगळा. दोघांचे निकषही वेगळे. त्यामुळे समोर येणारे चित्र हे तुकडेचित्र असते, कधी ते दिलासादायक तर कधी चिंताजनक; नेमका हाच घोळ आहे!

कोविडवरची लस येणार खरे पण केव्हा, हे कुणालाच छातीठोकपणे सांगता येत नाहीए. शिवाय ती आली तरी एक अब्ज ३० कोटींच्या देशात ती लस अखेरच्या नागरिकापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल हेही कुणाला माहीत नाही. एकीकडे कोविडमुळे विम्याची रक्कम वाढते आहे तर दुसरीकडे महागाई आ वासून उभी आहे. अशा अवस्थेत काळजी घेणे आणि कोविड टाळणे हेच सामान्य माणसाला सर्वाधिक परवडेल, असे आहे. त्यामुळेच हात धुवा, मुखपट्टी वापरा आणि सुरक्षित अंतर राखा हाच रामबाण उपाय आहे. सण साजरे करतानाही याचे भान सुटू देऊ नका. फक्त हे सांगण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनाच यावे लागत असेल तर ते मात्र आपल्या सर्वासाठी काही चांगले लक्षण नाही!