03 June 2020

News Flash

कुस्तीगीर मालामाल होतील, पण..!

क्रिकेटनंतर हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी या खेळांपाठोपाठ आता कुस्तीचेही लीग सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचा या क्रीडाप्रकाराला फायदा होईल का?

| August 7, 2015 01:28 am

क्रिकेटनंतर हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी या खेळांपाठोपाठ आता कुस्तीचेही लीग सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचा या क्रीडाप्रकाराला फायदा होईल का?

आपल्या देशात आयपीएल क्रिकेट स्पर्धेद्वारे क्रिकेटपटूंना लाभलेले प्रसिद्धीचे वलय तसेच खेळाडूंना मिळू लागलेल्या अफाट पैशामुळे अन्य खेळांमध्येही तशा स्पर्धा आयोजित करण्याचा फंडा सुरू झाला नाही तरच नवल! क्रिकेटनंतर हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी आदी अनेक खेळांमध्ये अशा लीग सुरू झाल्या आहेत. आता कुस्तीमध्येही प्रो लीग आयोजित करण्याची घोषणा झाली आहे. या लीगमुळे कुस्तीगीर मालामाल होतील हे निश्चित आहे. मात्र आपल्या देशातील खेळाचा दर्जा कसा उंचावला जाईल याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
आयपीएलद्वारे क्रिकेट खेळामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. या स्पर्धेद्वारे क्रिकेट हा प्रेक्षकाभिमुख तसेच दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांमध्ये कसा लोकप्रिय होईल यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे लोकांबरोबरच खेळाडूंमध्येही झटपट क्रिकेट अधिक लोकप्रिय होऊ लागले. या स्पर्धेस मिळालेली प्रसिद्धी पाहून हॉकी इंडिया लीग, इंडियन फुटबॉल, महाराष्ट्र बुद्धिबळ लीग, इंडियन बॅडमिंटन लीग, प्रो कबड्डी लीग आदी विविध स्पर्धाद्वारे हे खेळ लोकांच्या मनापर्यंत पोहोचविण्यात संयोजक यशस्वी झाले आहेत. या स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंना घरबसल्या परदेशी खेळांडूंबरोबर दोन हात करण्याचीही संधी सहज उपलब्ध होऊ लागली आहे. परदेशी खेळाडू कोणते तंत्र वापरतात, पूरक व्यायाम कसा करतात. त्यांचा आहार काय असतो, शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी ते काय प्रयत्न करतात आदी विविध गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळू लागली आहे. हॉकी व फुटबॉलमध्ये भारतीय खेळाडूंचा अपेक्षेइतका दर्जा उंचावला नसला तरी काही अंशी आपल्या खेळाडूंच्या कामगिरीत थोडीशी सुधारणा दिसू लागली आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे.
बॅडमिंटन, बुद्धिबळ यासारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या खेळाडूंना या लीगचा खूपच फायदा होत आहे. अनेक युवा खेळाडूंना अनुभव समृद्धता वाढीसाठी या स्पर्धा उपयुक्त होऊ लागल्या आहेत. प्रो लीगद्वारे भारतीय कबड्डीने कात टाकली आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. पूर्वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम लढतींसाठी दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यासाठी संयोजकांना खूपच खटाटोप करावे लागत असत व त्याकरिता भरपूर पैसा खर्च करावा लागत असे. प्रो लीगचे थेट प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर त्यामधील खेळाडूदेखील सेलिब्रिटी होऊ लागले आहेत. या लीगद्वारे कबड्डी हा खेळ लहानथोरांनाही हवाहवासा वाटू लागला आहे.
विविध लीग स्पर्धाना मिळू लागलेल्या प्रसिद्धीमुळे भारतीय कुस्ती संघटकांनाही अशी लीग आयोजित करण्याची इच्छा झाली. सुदैवाने भारतीय कुस्ती महासंघ, ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार, योगेश्वर दत्त तसेच राष्ट्रकुल विजेती गीता फोगाट यांच्यासह अनेक नामवंत मल्लांनी कुस्ती लीगमध्ये भाग घेण्यास मान्यता दिल्यामुळे कुस्ती संघटकांचे काम सोपे झाले आहे.
खरं तर कुस्तीमध्ये पैसा मिळविणे ही जुनी गोष्ट आहे. देशात कितीतरी कुस्तीची मैदाने आयोजित केली जातात. गावची जत्रा, वेगवेगळे उत्सव, राजकीय नेत्यांचे वाढदिवस आदींचे औचित्य साधून कुस्तीचे सामने आयोजित करण्याची परंपरा आपल्या देशात अनेक वर्षे चालत आलेली आहे. लढतीमधील दोन्ही मल्लांचे मानधन लढतीपूर्वीच निश्चित केले जात असते. विजेत्या मल्लास थोडेसे जास्त मानधन मिळते.
हे लक्षात घेता आपल्या देशात कुस्तीत पैसा पूर्वीपासूनच खेळत आहे. मात्र हा पैसा खेळाडूंच्या खुराकासाठीही पुरेसा पडणारा नसतो. अत्यानुधिक सुविधा, रोजगाराची हमी, वेगवेगळ्या सवलतींबाबत अनेक वेळा कुस्तीगीर उपेक्षितच असतात. पूर्वी राजे व संस्थानिक आपल्या दरबारी कुस्तिगीरांना राजाश्रय देत असत. आता संस्थाने खालसा झाली व राजेरजवाडेही उरले नाहीत. त्यातच बहुतेक मल्लांच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच असते. घरात माणसे भरपूर पण कमावणारी व्यक्ती एकच अशी स्थिती अनेक मल्लांच्या घरी पाहावयास मिळते. प्रो कुस्ती लीगद्वारे भारतीय खेळाडूंना चांगला पैसा मिळेल व त्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी लागणाऱ्या खर्चासाठी होईल असा विचार कुस्ती संघटकांनी केला.
प्रो लीगची संकल्पना खूपच चांगली आहे. आपल्या मल्लांना या पैशाद्वारे परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण, अव्वल दर्जाचे फिजिओ व मसाजिस्ट, चांगला खुराक आदी गोष्टींचा लाभ घेता येईल. या लीगमध्ये परदेशी खेळाडू भाग घेणार आहेत. त्यामुळे आपल्या खेळाडूंना त्यांच्याबरोबर लढती करण्याची संधी मिळेल. अशा लढतींद्वारे परदेशी खेळाडूंचे तंत्र, त्यांची शैली, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती याचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी भारतीय मल्लांना मिळणार आहे. भारतीय खेळाडू व खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. भारतीय संघटकांनादेखील आर्थिक फायदा मिळेल.
अर्थात पैसा व प्रसिद्धी मिळू लागली की त्याची नशा खूप वाईट असते असा अनुभव अनेक खेळाडूंबाबत दिसून येतो. येनकेनप्रकारे आपली कामगिरी सर्वोच्च व्हावी यासाठी संबंधित खेळाडू व त्यांच्या फ्रँचाईजी गैरमार्गाचाही उपयोग करण्यात मागे-पुढे पाहात नाहीत. हे आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजी व मॅचफिक्सिंग प्रकरणाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचले आहे. सुदैवाने सबळ पुराव्याअभावी श्रीशांत यांच्यासारखे क्रिकेटपटू त्यामधून निदरेष सुटले. मात्र त्या प्रकरणांमुळे आयपीएलकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना जाणीवपूर्वक जखमी करणे, बेशिस्त वर्तन करणे हे प्रकार हॉकी, फुटबॉल व कबड्डीच्या लीगमध्ये दिसून येऊ लागले आहेत.
कुस्तीची मैदाने भरविली जातात, तेथील लढती बहुतांश वेळा फिक्सिंग केलेल्या असतात. प्रो लीगमध्ये अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही यासाठी कडक नियम करण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा अशा मानाच्या लढतींमध्ये खेळाडूंकडून खडाखडीस प्राधान्य दिले जाते. हे टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कुस्ती चीतपट करणाऱ्या खेळाडूचे संघास बोनस गुण व अधिक पारितोषिक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वरिष्ठ गटातील मल्लांप्रमाणेच या लीगमध्ये कुमार मुलांच्या गटातील खेळाडू तसेच महिला खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल याचा विचार केला पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीगीर पदक मिळविण्याच्या दर्जापासून खूपच लांब आहेत हे लक्षात घेऊन लीगमधील महिला व कुमार मुलांसाठी प्रत्येकी दोन लढतींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.
या लीगबरोबरच प्रत्येक फ्रँचाईजीच्या ठिकाणी ज्या वेळी लढती आयोजित केल्या जातील, त्या वेळी तेथील स्थानिक मल्लांकरिता नैपुण्य शोध व विकास शिबीर आयोजित करण्याची आवश्यकता आहे. तसेच भारतीय प्रशिक्षकांकरिताही उद्बोधक शिबीर घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशिक्षकांनाही जागतिक स्तरावर होणाऱ्या नियम व तंत्रामधील बदलांबाबत ज्ञान मिळू शकेल. त्यामुळे कुस्तीची प्रो लीग आयोजित करण्यामागचा हेतूही सफल होईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 1:28 am

Web Title: pro wrestling league in india
टॅग Krida,Sports,Wrestling
Next Stories
1 नोंद : झाडय़ा जमात
2 चायनीज कॉइन्स
3 चिमके वडे
Just Now!
X