11 December 2019

News Flash

पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असताना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा ‘राजमार्ग’ तयार करते.

| April 3, 2015 01:17 am

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असताना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा ‘राजमार्ग’ तयार करते. कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती व संधी विचार यात साम्यस्थळं निश्चितपणे दिसतात.

रायरेश्वरासमोर सहकाऱ्यांसह शपथ घेऊन शिवरायांनी ईश्वरीय कार्याला प्रारंभ केला होता. हे कार्य अत्यंत दुर्घट आहे याची खूणगाठ त्यांनी बांधलेली असली तरी राजांच्या आयुष्यात सत्त्व परीक्षेचा क्षण फार लवकर आला. शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव आदिलशाहाने घेतलेला होताच. आता शिवाजी महाराजही आदिलशाहाचा भूप्रदेश घेऊ लागला होता. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा सुरू झाली. आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचा तर प्रथम शहाजीला अटक केली पाहिजे असा कट शिजला. २५ जुलै १९४८, शहाजीराजांना जिंजीला अटक झाली. हे कार्य पूर्ण केले ते मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे यांनी! यानंतर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशाहाने फत्तेखानाला पाठवले. राजे दुहेरी संकटात सापडले. त्यातच आत्तापर्यंत मार्गदर्शन करणारे दादोजी स्वर्गवासी झालेले. अशा परिस्थितीत एकाच वेळी वडिलांवर आणि राज्यावरही संकट. राजांपुढे दोन पर्याय होते – लढाई किंवा शरणागती. शरणागती स्वीकारल्यास घेतलेला भूप्रदेश देऊन आदिलशाहाची चाकरी स्वीकारावी लागली असती. म्हणजे स्वराज्य सोडून गुलामी. एवढे करून वडिलांवरचे संकट दूर होईल याची कोणतीही शाश्वती नव्हती. अर्थात राजांनी पहिला पर्याय स्वीकारला.
राजांनी लढण्याचा निर्णय घेतला. कौटिल्याने युद्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत –
विक्रमस्य प्रकाशयुद्धं,
कूटयुद्धं तूष्णीयुद्धम् (७.६.१७)। तीन युद्धांपैकी राजांनी, भीतीने गाळण करणे, अचानक हल्ला करणे, गैरसावध अथवा संकटात असता झोडपणे, एका ठिकाणी माघार व उलट परतून हल्ला या डावपेचांनी युक्त अशा कूटयुद्धाची निवड केली.
कूटयुद्ध केव्हा खेळावे ते सांगताना कौटिल्य म्हणतो,
बलविशिष्ट: कृतोपजाप:
प्रतिविहितर्तु: स्वभूम्यां
प्रकाशयुद्धमुपायात्
विपर्यये कूटयुद्धम्।
(१०.३.१-२)
भरपूर सैन्य असताना, शत्रूच्या सैन्यात फितुरी केली असताना, ऋतुमानाचा विचार केला असताना व अनुकूल भूमी असताना प्रकाशयुद्ध खेळावे याच्या विपरीत परिस्थिती असताना कूटयुद्ध.
राजांसाठी प्रकाशयुद्धाचा पर्याय नव्हताच, कारण सैन्य तुटपुंजे होते. फतेखानची मोहीम नक्की झाल्यावर आदिलशाहाने उत्रावळीच्या केदारजी खोपडेला फर्मान पाठवले होते. त्यात स्पष्टच लिहिले होते, ‘‘फतहखान खुदावंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्माविली आहे. तरी हे फर्मान पोहोचताच त्याने स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन त्याच्या आज्ञेत राहून दिवाणाची मसलत करावी..’’ थोडक्यात त्या तुटपुंज्या सैन्यालासुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला. केदारजीचे फर्मान हे केवळ वानगीदाखल. ऋतुमानाचा विचार करायला वेळच नव्हता, कारण युद्ध शिवाजी महाराजांनी आरंभिले नव्हते त्यामुळे शत्रूचा सामना करणं एवढी एकच गोष्ट राजांच्या हातात होती. आता प्रश्न उरला तो फक्त अनुकूल भूमीचा आणि राजांनी ती अनुकूल भूमी हेरली. या वेळी राजांचे राज्य होते ते पुणे, इंदापूर, सुपे व काही मावळ भाग. कोंढाणा, तोरणा आणि राजगड हे किल्ले. सर्व मिळून आठशे गावं आणि थोडीफार शहरं (शिवाजी हिज लाइफ अँड टाइम्स, ग. भा. मेहेंदळे, पृ १४१). राजांनी निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या तळहाताएवढय़ा स्वराज्यात शत्रूला प्रवेश करू द्यायचा नाही. या युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा उपयोग करायचा आणि राजांनी निवड केली पुरंदर गडाची.
पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेयेला अंदाजे वीस मैलांवर. सासवडपासून सहा मैल पश्चिमेला डोंगराळ मुलूख तर पूर्वेला सपाट मैदान, वायव्येला तेरा-चौदा मैलांवर सिंहगड, पश्चिमेला एकोणीस-वीस मैलांवर राजगड, असा पुरंदर होता. या तीन किल्ल्यांच्या मधला प्रदेश डोंगराळ असल्याने शत्रूला आत शिरायला कठीण, किल्ला मोठा आणि मजबूत. त्यामुळे गडावर मोठी शिबंदी राहू शकते. गडाची पश्चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू दुर्गम. सर्वार्थाने किल्ला योग्य होता, पण अडचण अशी की तो शत्रूच्या ताब्यात होता. तरीसुद्धा जमेची बाजू म्हणजे पुरंदरचे किल्लेदार महादजी नीळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजांचा जुना स्नेह होता. त्यातच सरनाईक आता वृद्ध झाले होते आणि त्यांच्या चार पुत्रांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. या परिस्थितीचा फायदा घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला. पण ताब्यात घेतला नाही. म्हणजे किल्ला अजूनही शत्रूच्याच ताब्यात होता. याचा अर्थ शत्रूची भूमी शत्रूशीच लढण्यासाठी राजांनी वापरली. केदारजीच्या पत्रावरून स्पष्ट होते की खानाला आदिलशाहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले होते. पण राजे असे अचानक पुढे आल्यामुळे फतेखानाला आपला विचार बदलावा लागला. कोंढाण्याकडे जाण्याऐवजी त्याने बेलसरजवळ मुक्काम केला. साधारणपणे ऑक्टोबर १६४८ ला खान तेथे पोचला असे मानले जाते. खान असेच करेल ही अटकळ राजांनी बांधली होती. आता राजांच्या कूटयुद्धाला सुरुवात झाली.
दूष्यबलेन वा स्वयं भङ्गं दत्वा ‘जितम्’ इति विश्वस्तमविश्वस्त: सत्त्रापाश्रयोरभिहन्यात्। (१०.३.१५) म्हणजे दूष्य (दुर्बल-कमकुवत) बलाच्या उपयोगाने म्हणजे स्वत:चे सैन्य कमकुवत आहे असे दाखवून स्वत:ची फळी फुटल्याचे भासवून, जिंकलो या कल्पनेने निर्धास्त राहिलेल्या शत्रूवर स्वत: सावध राहून दबा धरून मारा करावा.
छावणी पडल्याबरोबर खानाने राजांच्या ताकदीचा अंदाज घ्यावा व आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा म्हणून बाळाजी हैबतरावाला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले. खान स्वराजाच्या दिशेने निघाला असताना राजांनी हा छोटा किल्ला घेतला होता. खानाच्या या योजनेमुळे त्याचे सैन्य विभागले गेले. शिवभारतानुसार
पुरं शिरोबलं प्राप
शिवसैन्यैरवारित:। (१३.१४)
म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ला लढवलाच नाही. कौटिल्याच्या सूत्रानुसार त्यांनी आपले बल किंवा सैन्य दूष्य असल्याचे भासवले आणि त्याच वेळी ‘जितम्’ असा विश्वास खानाच्या मनात निर्माण केला. बाळाजीने हा किल्ला सहज जिंकला. खानाला विजयाचा आनंद देऊन बेसावध करण्यासाठी हा किल्ला सोडून दिला गेला. किल्ला सहजपणे हाती आल्यामुळे बाळाजी व त्याचे सैन्य या पहिल्या यशाने आनंदित झाले होते. शिवाजी महाराजांच्या नीतीचा त्यांना अंदाजच आला नव्हता. ‘एकत्र त्यागघातौ’ म्हणजे एकाच वेळी माघार व परतून हल्ला या कूटयुद्धातल्या दुसऱ्या खेळीला राजांची सुरुवात झाली. खान बेसावध झाला पण ‘अविश्वस्त’ किंवा सावध राजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी व भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी ‘सत्र’ म्हणजे दबा धरून बसली. पहाटे शत्रू गाफील असताना या सैन्याने हल्ला केला. अशा हल्ल्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. बाळाजीने दरवाजा लावून घेतला. पण आदिलशाहाच्या कारकीर्दीत कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता. मावळ्यांनी कोट खणायला सुरुवात केली. काहीजणांनी शिडय़ा चढायला प्रारंभ केला. बाळाजीच्या सैन्याने दगड, गोटे, पलिते मिळेल त्याने प्रतिकार करायला सुरुवात केली पण मराठे इरेला पेडले होते. कौटिल्याच्या शब्दात सांगायचे झाल्यास,
पुनरावर्तमानस्य निराशस्य च जीविते।
अधायो जायते वेगस्तस्माद्भग्नं न पीडयेत्।। (१०.३.५७)
ज्याने जिवाची आशा सोडलेली आहे व जो रणांगणावर परतला आहे त्याची धडक थोपवता येत नाही.
बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने वेस फोडली. मराठय़ांचा आवेश पाहून हैबतरावाचा व सैन्याचा धीर सुटू लागला. शेवटी कावजीने हैबतरावाला ठार केले, हैबतरावाचे सैन्य शरण आले. शिरवळवरील लूट पुरंदरावर आली.
राजांनी एक तुकडी शिरवळवर पाठवली त्याच वेळी दुसरी तुकडी फतेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. याचे नेतृत्व बाजी पासलकर करत होते. थोडय़ा वेळात फतेखानच्या सैन्याने कडवा प्रतिकार आरंभला. खानाच्या सैन्यापुढे राजांचे सैन्य अगदीच तुटपुंजे होते. बाजीच्या सैन्याचे नुकसान होऊ लागले. या झटापटीत निशाणाची तुकडी फतेखानाच्या सैन्याच्या तावडीत सापडली. ते पाहून बाजी जेधे पुढे सरसावला. निशाणाचा भाला व जखमी स्वाराला आपल्या घोडय़ावर घेऊन तो परत फिरला. त्याच्या मागोमाग सारे सैन्य परतले. कोणकोणत्या परिस्थितीत सैन्याने माघार घ्यावी याची एक मोठी यादीच कौटिल्याने १०.२.१७ मधे दिली आहे. त्यानुसार सैन्य अनुकूल भूमीवर नसेल किंवा सैन्यावरील संकटाच्या प्रसंगी आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी माघारी येण्याची सूचना कौटिल्याने केली आहे. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे व सैन्य परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी या पोराने आपला पराभव केला या कल्पनेने संतापलेल्या फतेखानाने पुरंदरावर हल्ला केला. राजांचे सैन्य किल्ल्यात वरच्या बाजूला होते. त्याचा फायदा घेऊन फतेखानाचे सैन्य माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर वरच्या दिशेने दगड, बाण यांचा मारा सुरू झाला. सैन्य या माऱ्याने व वर चढण्याने दमलेले असताना राजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला व ताज्या फौजेला बाहेर काढले. फार मोठी हातघाई झाली. गोदाजीने मुसेखानाच्या छातीत आपला भाला घुसवला. खानही अतिशय पराक्रमी होता. त्याने तो बाहेर काढला व त्याही परिस्थितीत तलवारीने लढू लागला (शिवभारत १४.५५-५७). पण गोदाजीच्या वाराने मुसेखान खांद्यापासून मध्यभागपर्यंत चिरला जाऊन गतप्राण झाला (उपरोक्त १४.९२). मुसेखानाची अवस्था पाहून फतेखानाचे सैन्य घाबरले व पळत सुटले. अत्यंत उत्साहात असणाऱ्या मराठय़ांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. यात बाजी पासलकर ठार झाले, पण स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी झाली.
एकीकडे फतेखानला तोंड देताना शहाजीराजांच्या सुटकेसाठी राजांनी संधीचा विचार केला. कौटिल्य म्हणतो,
समज्यायोभ्यां संधीयेत हीनेन विगृह्णीयात्।(७.३.२)
तुल्यबल व बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी विग्रह. राजे हीच खेळी खेळले. तुलनेने कमी शक्तिशाली आदिलशाहाशी राजांनी लढाई केली आणि सामथ्र्यशाली दिल्लीशी संधी. त्यांनी गुजराथचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशाहाला एक विनंतीअर्ज पाठवला. त्यात त्यांनी मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली व त्याच वेळी आदिलशाहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी अशी विनंती केली. राजांचा हा अर्ज मान्य झाला. शहाजीराजांच्या अटक प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा सरदार मुस्तफाखान त्याच वेळी वारला त्यामुळे आदिलशाहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.
कोणताही विजिगिषु राजा सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून वेगवेगळ्या योजना आखत असतो. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असताना एकाकी राजांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा ‘राजमार्ग’ तयार करते. यात राजांसमोर कौटिलीय अर्थशास्त्र होतं की नव्हतं हे कळायला मार्ग नसला तरी कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती व संधी विचार यात साम्यस्थळं मात्र निश्चितपणे दिसतात.
आसावरी बापट

First Published on April 3, 2015 1:17 am

Web Title: purandar war
टॅग Kautilya
Just Now!
X