‘व्यासोच्छिष्ठम् जगत्सर्वम्’ असं एक संस्कृत वचन आहे. व्यासांनी रचलेल्या महाभारतात जे जे म्हणून आहे, त्यापलीकडे जगात काहीही नाही, असा त्याचा अर्थ. कोणत्याही भारतीय माणसाला तो पूर्ण उलगडून सांगण्याची अजिबातच गरज नसते कारण महाभारत-रामायण ही महाकाव्यं म्हणजे त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. ती आपल्यामध्ये इतकी भिनलेली असतात की आपण त्याच्याकडे तटस्थपणे बघूच शकत नाही. त्यामुळे हजारो वर्षांनंतरही नरो वा कुंजरो वा, हा सूर्य हा जयद्रथ, महाभारत घडणं, कृष्णशिष्टाई, द्रौपदीची थाळी, भीष्मप्रतिज्ञा, अशा म्हणी, वाक्प्रचार वापरले जातात. कृष्णार्जुन, द्रोण, भीष्म, द्रौपदी, भीम, युधिष्ठिर, धृतराष्ट्र ही सगळी पात्रं आपल्या मनोव्यापारांचा भाग असतात. त्या अर्थाने महाभारत आपल्या रक्तात भिनलेलं आहे.

लहानपणापासून आपण ते ऐकलेलं असतं. वाढत्या वयाबरोबर त्यातून नवनवे अर्थ आपल्याला गवसत गेलेले असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महाभारताने  आपल्याला साथ दिलेली असते. कौरव-पांडवांच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ नातेसंबंधांपासून ते त्यांच्या शेवटच्या प्रवासापर्यंत आपण मनाने त्यांच्यासोबत असतो. हे  हजारो वष्रे असंच चालत आलेलं आहे.  देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या संस्कृती-परंपरा, समजुतींप्रमाणे महाभारताच्या कथानकात वेगवेगळ्या गोष्टींची भर पडत गेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये महाभारताची विविध रूपेही बघायला मिळतात. महाभारत असं आपल्या समाजाचा डीएनए आहे. त्यामुळे महाभारतावर कुणीही पुस्तक लिहिलं असेल तर आता महाभारतावर नवीन काय लिहिणार, त्यात नवीन काय मांडणार हा प्रश्न कुणालाही पडेल. पण तरीही महाभारतावर सतत नव्याने लिहिलं जातं. ते वाचलं जातं. त्याचे नवनवे अर्थ लावले जातात. कारण गेली हजारो वष्रे  महाभारताने भारतीय पिढय़ान्पिढय़ावर मोहिनी घातली आहे.

महाभारत चित्रमय पुनर्कथन हे देवदत्त पट्टनायक यांचं पुस्तक महाभारतावर आधारित अनेक पुस्तकांमध्ये भर घालणारं असलं तरी ते इतर पुस्तकांहून वेगळंही आहे. महाभारताच्या कथानकाबद्दलची जास्तीतजास्त माहिती, त्याबद्दलचे कालातीत असे भरपूर संदर्भ, भारतीय समाजातील निरनिराळ्या लोककथांचा आधार, त्या त्या पानावर असलेल्या कथानकाला अनुरूप चित्रं, साधी सोपी भाषा, सुटसुटीत मांडणी यामुळे पट्टनायक यांचे पुस्तक म्हणजे भरगच्च असं पॅकेज झालं आहे.

लेखक देवदत्त पट्टनायक म्हणतात, माझा ग्रंथ म्हणजे आपणाला हे महाकाव्य पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न आहे. अभिजात संस्कृत भाषेतील महाभारत तसेच या कथानकाची विविध स्थानिक भाषांमध्ये आणि लोकसाहित्यामध्ये दडलेली बहुविध प्रतििबबे या साऱ्यांनी मला ही कथा मांडण्याची प्रेरणा दिली आहे. महाभारतासंदर्भात सामान्य वाचकाला जी चौकट माहीत असते त्यापलीकडे जाणारी प्रचंड माहिती हे पुस्तक देतं. मुख्य म्हणजे महाभारत ऐकताना, वाचताना अनेक प्रश्न पडलेले असतात, अनेक गोष्टींचे अर्थ समजलेले नसतात अशा गोष्टींवर या पुस्तकातून प्रकाश पडतो. देशाच्या विविध भागांमधल्या विविध समाजांमधल्या महाभारतातील मुख्य कथानकाशी निगडित अनेक उपकथानकं हे पुस्तक मांडतं. त्याचबरोबर मुख्य कथानकाशी संबंधित वेगळ्या रचनाही ठिकठिकाणी काव्य किंवा नाटय़रूपात प्रचलित आहेत. त्यांचेही संदर्भानुसार उल्लेख येतात. यातून महाभारताच्या विस्ताराचा एक पट तर लक्षात येतोच शिवाय त्याचा भारतीय समाजमानसावरचा पगडाही अधोरेखित होतो. महाभारताचा काळ, त्याआधी कुरूंच्या वंशात काय काय घडत गेलं, वेगवेगळ्या शाप, उ:शापांची मालिका, कोणत्याही घटनांमागे जोडलेला कार्यकारणभाव, त्याच्यातून अपरिहार्यपणे सिद्ध होत जाणारा कर्मसिद्धांत अशा सगळया गोष्टी पट्टनायक यांच्या महाभारतावरील पुस्तकातून सामोऱ्या येतात.

तीन हजार वर्षांपूर्वी व्यासांनी १८ पर्वामधून जे काही सांगितलं आहे ते विविध पाठभेद गृहीत धरूनसुद्धा आपल्यापर्यंत जे पोहोचलं आहे ते थक्क करायला लावणारं आहे. कारण त्यातून तत्कालीन कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, रीतीभाती, समजुती या सगळ्यांचं दर्शन घडतं. लेखकाने त्यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ लावून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारताचा बाकी कथाक्रम आपल्याला माहीत असतोच. या पुस्तकातून तो कसा आला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण त्या कथाक्रमाबरोबर आलेली इतर माहिती अत्यंत वाचनीय आहे. त्यासोबत लेखकाने काढलेली रेखाचित्रही समर्पक आणि पूरक ठरली आहेत.

पुस्तकातून पट्टनायक यांनी महाभारताचे पारंपरिक कथन केले आहे. त्यांनी महाभारताचे फारसे  विश्लेषण केलेले नाही, असा आक्षेप या पुस्तकावर येऊ शकतो, पण तो या पुस्तकाचा हेतूच नाही. महाभारत समजून घेऊ इच्छिणाऱ्याला त्याच्या मुख्य कथानकाची सचित्र माहिती देणं आणि त्यासोबत महाभारताचा भारतीय सांस्कृतिक विश्वावर असलेला पगडा दाखवणं, त्याचा आवाका मांडणं हा या पुस्तकाचा हेतू आहे आणि लेखक त्यात पुरेपूर सफल झाला आहे. सोबतच्या छोटय़ा छोटय़ा चौकटींमध्ये महाभारतातीत त्या त्या प्रसंगांशी संबंधित लोककथा आणि इतर माहिती येते. संबंधित घटनांचा आजच्या संदर्भात अर्थ लावून दाखवण्याचा प्रयत्नही लेखक करतो. तो महाभारताच्या कथानकाला उठाव देणारा ठरला आहे. पुस्तकातील काही रेखाचित्रे अतिशय सुंदर इमॅजिनेशनसह काढलेली आहेत. अर्थात लेखकाकडे बरंच काही सांगण्यासारखं आहे, महाभारताचं वेगळ्या अंगाने विश्लेषण करण्याची क्षमता आहे, पण त्याने ते केलेले नाही. थोडक्यातच आटोपलं आहे असाही  फील काहीजणांना येऊ शकतो.

उदाहरणच द्यायचे तर महायुद्ध हा महाभारताचा गाभा. त्यातला अर्जुन कृष्ण यांचा रणांगणावरचा संवाद आणि भगवतगीतेवरचे सार लेखकाने नेमके, आटोपते मांडले असले तरी युद्धासाठी फक्त एक प्रकरणच दिलेले आहे. व्यासांनी जे तपशीलवार मांडलं ते लेखकाने थोडक्यात का आटोपलं असेल असा प्रश्न पडतो. अर्थात अशा काही गोष्टी वगळता पूर्ण महाभारत वाचले नसेल, वाचणे शक्य नसेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय चांगले आहे. एरवी काय होतं की महाभारत म्हणून जे वाचायला उपलब्ध असतं ते एकतर लहान मुलांसाठी गोष्टीरूपात असतं किंवा अभ्यासकांसाठी अकॅडमिक स्वरूपात असतं. त्यात संस्कृतवर जास्त भर असतो. सामान्य वाचकाला मग ते कंटाळवाणं वाटू शकतं. हे महाभारत मात्र साधंसोपे, मस्त, कळणाऱ्या भाषेत, कळणाऱ्या पद्धतीनं मांडलं आहे.

एरवी महाभारताचे ढोबळमानाने मुख्य तीन भाग पडतात. पहिला भाग सगळ्या घटना अपरिहार्यपणे कुरुक्षेत्रावरील युद्धापर्यंत नेऊन सोडतो. दुसरा भाग प्रत्यक्ष युद्धाबद्दल सांगतो आणि तिसरा भाग युद्धानंतर काय घडलं ते सांगतो. हा सगळा आवाका मांडणारं हे पुस्तक १८ भागांत विभागले आहे. त्यात मिळून १०८ प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरण चार ते पाच पानांचं आहे. प्रत्येक भागाचे उपविभाग आणि त्याच्याशी संबंधित कथा-उपकथा. अनेकानेक व्यक्तिरेखा, त्यांची एकमेकांशी गुंतागुंतीची नाती, चौकटींमध्ये लेखकाचं विश्लेषण आणि या कथांचा आजच्या संदर्भात कसा अर्थ लावता येईल याचे विवेचन केलेले आहे. यात असंख्य अशी कथानकं येतात जी आपल्याला माहीतच नसतात, अनेक गोष्टींची आपल्याला माहिती नसते. उदाहरणार्थ पांडवांमध्ये शहाण्णव असलेला सहदेव तसा का असतो तर त्याचे लौकिक वडील म्हणजेच पंडूचा मृत्यू होत असताना पंडूने सांगितल्यानुसार तो पंडूचे मांस खाऊन त्याचा शहाणपणा ग्रहण करतो, द्रौपदी कुत्र्यांना शाप का देते, कौरवांचा मामा असूनही शकुनीचे सगळे प्रयत्न कौरवांचा नाश व्हावा या दृष्टीनेच का सुरू असतात, अशा प्रत्यक्ष महाभारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. महाभारतातले वेगवेगळे शाप, उ:शाप, त्यांचे परिणाम या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचं मॅजिकल रिअ‍ॅलिझमच आहे.

पांडव, भीष्म यांना देवत्त्व न देता माणसाच्या पातळीवर आणून त्यांनी केलेले अधर्मही लेखकाने नीट मांडले आहेत. उदाहरणार्थ अर्जुनाच्या मनातली आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहोत की नाही याबाबतची असुरक्षितता, द्रौपदीशी लग्न होईपर्यंतची पांडवांच्या मनातली असुरक्षितता, अंबा, अंबिका, अंबालिका यांना पळवून आणून भीष्मांनी केलेला अधर्म याची नोंद घेतली आहे. कुरुक्षेत्रावर तर दहा वेळा अधर्माचरण झालं असेल तर त्यात आठ वेळा पांडवांनी केलं आहे आणि दोन वेळा कौरवांनी. हे लेखक स्पष्टपणे मांडतो. कोणतीही गोष्ट काळ्या-पांढऱ्या रंगात नसते, आपल्याला आपल्या कर्माची फळं कशी भोगावी लागतात, हे मांडताना महाभारताचं कथानक सांगणं किंवा व्यक्तिरेखा मांडणं हे दुय्यम ठरून जीवनाचा अव्याहत वाहणारा प्रवाह कसा अपरिहार्य आहे हे त्यातून सांगितलं जातं.

महाभारत नक्की कधी घडलं असावं या भारतीयांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देताना लेखकाने अमेरिकेतल्या मेम्फिस विद्यापीठातल्या भौतिकशास्त्र विभागाच्या बी. एन. नरहरी आचार्य यांचा हवाला दिला आहे. त्यांनी खगोलशास्त्राच्या एका साफ्टवेअरच्या मदतीने महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धाची तारीख निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माहितीनुसार महाभारत युद्धाच्या काळात तेरा दिवसांमध्ये एक चंद्र ग्रहण तसंच एक सूर्यग्रहण अशी दोन ग्रहणं झाली होती. त्याबाबतच्या वर्णनावरून त्यावेळच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून महाभारत युद्ध ख्रिस्तपूर्व २२ नोव्हेंबर ३,०६७ रोजी सुरू झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. लेखकाने हेही सांगितले आहे की महाभारत वेदिक काळात लिहिले जायला सुरुवात झाली आणि नंतर हजारो वष्रे ते लिहिले गेले. त्याचा पुरावा म्हणजे कुंती आणि माद्री मुलं होण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, शिव या देवांची नाही तर यम, पवन, इंद्र या देवांची आराधना करतात. यम, पवन, इंद्र हे वेदिक काळात पुजले जात. ब्रह्मा, विष्णू, शिव या देवांच्या संकल्पना त्यानंतरच्या काळात िहदू धर्मात समाविष्ट झाल्या. त्या वेदिक धर्मात नव्हत्या. महाभारतात काळानुरूप त्यात अनेक गोष्टींची भर पडत गेली. भगवतगीता त्यात नंतर समाविष्ट करण्यात आली असावी असाही अंदाज व्यक्त केला जातो. ही सगळी माहिती देणारं हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.

जय, महाभारत सचित्र रसास्वाद, लेखक – देवदत्त पट्टनायक, प्रकाशक – पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठसंख्या झ्र् ४३८, मूल्य – रु. ४९९/-
वैशाली चिटणीस –