lp10दिवाळी २०१४
कामाच्या ताणानं मूडची पार वाट लागली होती.. गाणी नकोत, सिनेमा नको की कुणाशी बोलणं नको वाटत होतं. नेटवर सहज काही वरखाली करता करता ‘मी बाबूराव बोलतोय’ आणि ‘रेडिओ सिटीचा बाबूभाई’ ऑडिओ ऐकले आणि पाहता पाहता मूड बदलला. हसून हसून मुरकुंडी वळली. प्रत्येक वेळी वेगळा आवाज काढून फोनवरच्या माणसाला ‘बकरा’ करायचे आणि ही गंमतही गुदगुल्यांसारखी, बोचकारल्यासारखी नाही! कमाल वाटली. सतत कशा नव्या कल्पना सुचू शकतात? कधी बुलेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्याला ती विकाच असा आग्रह धरून त्याला जेरीस आणायचं, कधी वधु-वर सूचक मंडळातील शिस्तबद्ध बाईंना बाळबोध प्रश्न विचारून हैराण करायचं, प्रवासासाठी गाडी भाडय़ानं देणाऱ्यांना वेगळ्याच प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवायचं, कुठल्याशा दुकानदाराला दुकानाच्या कागदोपत्री तपासणीची भीती घालायची तर कधी टिफीन सेंटरमधल्या बाईंना नव्या गावात बदलीवर आलेला म्हणून टिफीनसाठी पिळायचं! बरं, ‘गिऱ्हाईक’ झालेली व्यक्ती चिडली, वैतागली की असा ‘प्रँक कॉल’ संपल्यावर ताबडतोब ‘गुस्ताखी माफ!’ म्हणून मोकळेपणानं माफी मागायची. भारी होतं हे. शोध घेतल्यावर कळलं की प्रायव्हेट एजन्सीजनी केलेल्या सव्‍‌र्हेनुसार ‘टोमॅटो एफ एम’ किंवा ‘रेडिओ सिटी’वरून एकदा प्रसारित झालेल्या या ‘प्रँक कॉल्स’ना पुन्हा-पुन्हा ऐकण्यासाठीही लोक उत्सुक असतात. बँका, विविध कार्यालयांपासून ते लाँड्रीवाले, भंगारवाले, पानपट्टीवाले हाही यांचा ‘ऑडियन्स’ आहे. मिश्किल, हजरजबाबी, तलबुद्धीच्या या बाबूराव किंवा बाबूभाईला शोधणं आवश्यकच बनलं. शोध घेतल्यावर कळलं की बाबूराव किंवा बाबूभाई म्हणजे यशवंत कुलकर्णी! 

एफएम रेडिओवरचे निवेदक म्हणजे चेहरा लोकांसमोर नसणारे ‘स्टार’. काही निवेदकांच्या निवेदनशैलीवर, भाषेच्या गमतींवर असंख्य लोक फिदा असतात. काही वेळेला आवाजातूनच श्रोत्यांशी नातं इतकं दृढ होतं की काही श्रोते पुन्हा पुन्हा फोन करत राहतात, बोलत राहतात. कधीकधी खासगी दु:खंही आपलेपणानं सांगत राहतात. लोकांच्या करमणुकीसाठी कार्यक्रम सादर करणाऱ्या निवेदकाला म्हणजेच रेडिओ जॉकीला मात्र कधी इच्छा झाली तरी श्रोत्यांच्या दु:खात अडकून पडता येत नाही. वेगळ्या क्लृप्त्या वापरून वातावरणातला तणाव कमी करावा लागतो. श्रोता भावनावश झाला असेल तर त्याला सावरून त्याचा मूड हलकाफुलका करावा लागतो. यशवंत कुलकर्णी या सगळ्यात ‘तयार’! हा माणूस इतक्या तयारीचा कसा हे समजून घ्यायचं तर त्याच्याशीच संवाद करायला हवा होता. गेली चार वर्ष अहमदनगरमध्ये ‘रेडिओ सिटी’साठी काम करत असलेल्या यशवंतशी गप्पा रंगल्या.
यशवंत मूळचा सांगलीचा. लहानपणापासूनच हरहुन्नरी. बंद खोलीत बसून अभ्यासाची पुस्तकं चाळण्यापेक्षा बाहेर पडून माणसं पाहणं, त्यांच्यात मिसळणं, त्यांच्या लकबी आत्मसात करणं, कथाकथन वगरे स्पर्धामध्ये सहभाग घेणं, हे त्याला आवडायचं. याच काळात त्याचं रेडिओशी नातं जुळलं. शाळेत शिकत असताना आकाशवाणीवर ‘बालोद्यान’, ‘बालसभा’ असे लहान मुलांसाठी जे कार्यक्रम व्हायचे त्यात तो असायचा. मग पुढं चिंतामणराव कॉलेजला गेल्यावर यूथ फेस्टिव्हल, राज्य नाटय़स्पर्धा, ‘सांस्कृतिक कला मंच’साठी पथनाटय़ं आणि नाटकं यामुळं क्षितिज विस्तारलं. यशवंत सांगतो, ‘महाविद्यालयीन जीवन सुरू झाल्यावर मी कॉमर्स शाखा अशासाठी निवडली की हे आवडीचे उपद्व्याप करायला वेळ मिळावा. आमचा घरचा व्यवसाय शेती. घरी तशी काही कलेची पाश्र्वभूमी नाही. मोठी बहीण त्या काळात नाटकांमध्ये वगरे भाग घ्यायची. त्यामुळं घरात तसं उगीच विरोध करणारं कोणी नव्हतं. प्रेमानंद गज्वी, अतुल पेठे, गंगाधर गाडगीळ, पु.ल. देशपांडे, सुधाकर मुंगी, संजय पवार यांसारख्या लेखकांच्या एकांकिका निवडून त्या सादर केल्या. ‘तीन पशांचा तमाशा’, ‘अखेर पडदा पडला’, ‘आपलं बुवा असं आहे’, ‘पगला घोडा’ सारखी नाटकं आमच्या गटानं राज्य नाटय़स्पध्रेत उतरवली. हौशी तरुण म्हटल्यावर नाटकात केवळ अभिनय करून थोडंच चालतं? सगळी तंत्र शिकावी लागतात. ती शिकलो. अभिनयासाठी, लेखनासाठी बक्षिसंही मिळवली.’
महाविद्यालयीन काळातही यशवंत सांगली आकाशवाणीमध्ये किरकोळ कामांसाठी जायचा. त्यावेळी पूर्णवेळ निवेदक बनणं वगरे कल्पना डोक्यात नव्हती. पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा म्हणून स्वत:ची प्रिंटींग प्रेस सुरू केली पण, मन सतत नाटकं, निवेदन याकडं ओढलं जायचं. १९९७ ला हंगामी निवेदक म्हणून आकाशवाणीत काम मिळालं. शाळा आणि कॉलेजात हौस म्हणून केलेल्या नाटकांचा-कार्यक्रमांचा पाया असल्यामुळं यशवंतला रेडिओवरचं काम मुळीच कठीण गेलं नाही. तिथले अधिकारी प्रभाकर सोनावणे खूप स्वातंत्र्य देणारे होते त्यामुळं रेडिओ स्टेशनवरची यंत्रं हाताळून पाहणं, शिकणं, प्रत्यक्ष काम करणं ही धडपड करता आली. पुढे २००३ मध्ये आकाशवाणीत संगणकाद्वारे सगळ्या गोष्टी होऊ लागल्या तेव्हा त्याचाही यशवंतला सराव झाला. साऊंड मििक्सगचं कौशल्य अवगत झालं. एकीकडं निवेदन आणि त्याचवेळी नवनव्या कार्यक्रमांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संहितालेखन आणि कार्यक्रम सादर करण्यासाठीच्या तांत्रिक बाजूही अवगत करून घेणं .. यशवंतला सगळंच आवडत होतं. केवळ आरजे म्हणून काम करण्यापेक्षा स्वत:तील सर्जकतेचा शोध घेण्याचा ध्यास यशवंतमध्ये होता. ‘हॅलो तरंग’, ‘युववाणी’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सांगली आकाशवाणीत असताना योगदान देणाऱ्या यशवंतने त्या काळात ‘चारचौघी’, ‘चिकन ६५’, ‘हेल्मेटचे भारनियमन’, ‘पिकनिक’, ‘एकता चाळीत ऐश्वर्या’, ‘तमसोमा’ यांसारखी नभोनाटय़ं लिहिली आणि सादर केली. माणसांच्या लकबी, स्वभावातल्या विसंगती, प्रत्यक्ष जीवनातील विसंगती यावर चपखल बोट ठेवत लेखन हे यशवंतचं वैशिष्टय़.
प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात अशी वैशिष्टय़ं असतातच. ती त्याला जाणवायला लागतात. आपल्यातलं हे विनोदाचं अंग यशवंतला कधी जाणवलं त्याचा यशवंत सांगतो तो किस्सा मस्तच आहे. ‘‘कॉलेजात शिकत होतो.. सुट्टी असली की मित्र मित्र भटकायला निघायचो. असाच एकदा आम्हा तीन-चार जणांचा औदुंबरला जायचा प्लॅन ठरला. सांगलीतून भिलवडीला आलो आणि तिथून सायकली भाडय़ानं घेऊन औदुंबरच्या रस्त्याला लागलो. पाऊस झाला होता खूप त्यामुळं निसरडं झालं होतं. रस्ता चिखलानं भरून गेला होता आणि चारचाकींच्या रहदारीमुळं आपोआपच त्या एका रस्त्याचे दोन भाग होऊन दोन रस्ते तयार झाले होते. मी तंद्रीत डाव्या भागातून जाण्याऐवजी उजव्या भागातून सायकल दामटली. समोरून एक एमएटीवाला सांभाळून येत होता व अचानक सायकलवाला समोर आल्यामुळं तो ब्रेक दाबून थांबला. भडकला! घुश्श्यात म्हणाला, ‘‘काय रे, साइड कुठली तुझी?’’ – माझ्या तोंडून सहजपणानं निघालं, ‘‘बी.कॉम.’’ – आणि चिडलेला एमएटीवाला अनपेक्षित उत्तरामुळं हसायला लागला. मलाही हायसं वाटलं. शब्दांमध्ये वातावरण बदलून टाकायची केवढी मोठी ताकद आहे आणि विनोदानं माणसाचं आयुष्य किती बदलतं याची चुणूकच मला मिळाली. माझ्यात हजरजबाबीपणा इनबिल्ट आहे.. तो अधिक खुलवता कसा येईल याचं मोठं दालन माझ्यासमोर खुलं आहे याची जाणीव मला झाली.
२००७ साली कोल्हापुरात ‘टोमॅटो एफ एम’ केंद्र सुरू करण्यात आलं. या केंद्रात नवं काही करण्याची संधी शोधणाऱ्या यशवंतनं ‘साऊंड रेकॉíडस्ट’ म्हणून अर्ज केला, पण घडलं उलटंच. यशवंतच्या कल्पनेतला ‘मी बाबूराव बोलतोय’ हा कार्यक्रम टोमॅटो एफएम लोकप्रिय करण्यासाठी उपयोगी पडला. प्रोमो प्रोडय़ूसर, व्यवस्थापकीय व दिग्दर्शनात्मक कामं, स्क्रििप्टगची कामं, कॉपी रायटर, प्रोग्रािमग हेड वगरे जबाबदाऱ्या यशवंत लीलया पेलत होता. अस्सल ग्रामीण बाजात लोकांशी संवाद साधत आपल्या एखाद्या परिचिताची यशवंतनं गमतीत केलेली छळवणुक लोकांसाठी धमाल ठरायची आणि आपण बकरा बनलो हे कळलं की बकरा झालेला माणूसही झालेला सगळा संवाद आठवून खुदखुदत राहायचा.
एकदा गाडय़ा भाडय़ानं देण्याचा व्यवसाय असणाऱ्या गावरान माणसाची यशवंतनी बाबूराव बनून फिरकी घेतली. फिरकी घेणं इतकं ताणत गेलं की त्या व्यावसायिकानं आपली गावरान डिक्शनरी उघडली. अद्वातद्वा बोलणं सुरू झालं. यशवंत मात्र तितक्याच शांतपणानं आणखी आणखी निरागस वाटावेत असे प्रश्न विचारत होता. या सगळ्या प्रकाराचा शेवट झाला आणि त्या व्यावसायिकाला कळलं की ‘रेडिओसिटीच्या बाबूराव’नं आपल्याला फोन केला होता. तो व्यावसायिक या कार्यक्रमाचा फॅन. आपल्या आवडत्या कार्यक्रमातून आपल्याला फोन आला आणि आपण अद्वातद्वा बोललो म्हणून बिचाऱ्याच्या मनाला इतकं लागलं की तोच यशवंतला फोनवर पुन्हा पुन्हा ‘क्षमा करा’ म्हणायला लागला. एकदा प्रसाद ओकसारख्या अभिनेता-दिग्दर्शकालाही यशवंतनं निर्माता म्हणून फोन करून एप्रिल फूल केलं. या खेचाखेचीत सुरूवातीला प्रसाद वैतागला खरा, पण नंतर यशवंतशी त्याची मत्रीच जमून गेली.
मराठी भाषेतल्या शब्दांमधली दुहेरी अर्थाची गंमत, शाब्दिक कसरती करून बोलणाऱ्याला त्याच्याच शब्दात अडकवण्याचं कौशल्य याबाबतची यशवंतची भाषिक सफाई अनेक राजकारण्यांच्या जशी लक्षात आली तशीच दूरदर्शन वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांच्याही. यशवंतनं ‘दामिनी’, ‘रफूचक्कर’ या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या होत्या, मात्र विशेष दाद मिळाली ती ‘साम टी.व्ही.’च्या ‘पुणेरी मिसळ’ सारख्या मालिकेच्या लेखनाला. दरम्यान झी मराठीवर ‘फू बाई फू’ सुरू होतं. विशाखा सुभेदार आणि वैभव मांगले यांनी यशवंतच्या लिखाणातला ‘फन फॅक्टर’ ओळखला आणि त्यानं ‘फू बाई फू’ साठी स्कीटस् लिहावेत असा आग्रह धरला. यशवंतनं जवळपास पन्नासभर स्किटस् ‘फू बाई फू’ साठी लिहून दिले.
आरजे म्हणून यशवंत लोकप्रिय आहे, यशस्वी आहे, पण तो आयुष्यभर हेच काम करणार की त्याला भविष्यात आणखी काही वेगळं करायचंय.. यशवंत सांगतो, येत्या काळात श्राव्य माध्यम म्हणजेच रेडिओ हे सगळ्यात स्ट्राँग माध्यम ठरणार याची चुणूक दिसते आहेच, नवी ८०० ते ८५० एफएम चॅनल्स सुरू होण्याची घोषणा झालीय.. आणि मुळात मी केवळ निवेदक नाही. लेखन, दिग्दर्शन, संकल्पना निर्मिती, प्रोमोज बनवणं वगरे असंख्य कामात मला रुची आणि गती आहे.. रेडिओत खूप फॅकल्टीज आहेत ज्यात काम करू तितकं कमी! इथं आजूबाजूच्या ऐकणाऱ्या सर्व वयाच्या श्रोत्यांशी जोडून घेताना सर्जनशक्तीचा कस लागतो आणि हीच तर मजा आहे. टी.व्ही प्रमाणे लोक इथं एका जागी अडकून न पडता आपली कामं करत, ड्रायिव्हग करत, वेटिंग लाऊंजमध्ये बसल्या बसल्या रेडिओ ऐकतात.. पुढच्या काळात मोठय़ा मोठय़ा कादंबऱ्या नि कथाही रेडिओद्वारे ध्वनिमुद्रित झाल्यामुळं लोकांपर्यंत अधिक पोहोचणार आहेत, विशेषत: युवा वर्गापर्यंत! श्राव्य माध्यम आपल्याला कल्पनाशक्तीचं अमर्याद जग खुलं करतं. माझा आवाज ऐकणाऱ्याला मी अमिताभसारखा वाटावा किंवा जॉनी लिव्हरसारखा की आणखी कुणी हे त्याच्या मनातून तो ठरवेल. ही एनर्जीच वेगळी आहे. शिवाय मी सिनेमासाठी कथा-पटकथा लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिलाय, तोही मला अधिक पॉलिश करायचाय. – आणखी एक, रेडिओसाठी आवाज कितीतरी महत्त्वाचा, पण केवळ आवाज वापरणं म्हणजे दुसऱ्यानं बनवलेल्या व सुंदर सजवलेल्या पदार्थाची थाळी ग्राहकाला देण्यासारखं आहे असं मला वाटतं, मी कूक आहे, स्वयंपाकी! पदार्थ निवडणं, त्यासाठीची तयारी करणं, तो रांधणं आणि सुंदर रचना करून सगळ्यांना आवडेल असा पेश करणं असं माझ्या एकूण कामाचं स्वरूप! त्यातल्या क्रिएटिविटीवर मी खूश आहे .. यशवंतनं असं खाजगी वाहिन्यांवरील कार्यक्रमांसाठी लेखन केलं असलं तरी त्याचं पहिलं प्रेम रेडिओच याचं आणखी एक गुपित आहे .. त्याचा दीपालीशी प्रेमविवाह जुळला तो रेडिओमुळंच! – पूर्वी दीपालीदेखील सांगली आकाशवाणीवर काम करत होती. यशवंत म्हणतो, ‘माझ्या चाहत्यांनी खळखळून हसणं, पुन्हा पुन्हा माझे शोज ऐकणं, ‘बाबूभाई’ आमच्या अमुक माणसाशी बोला म्हणून सांगणारी ३००-३०० पत्रं येणं हेच माझ्यासाठी पुरस्कार आहेत. मला प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मोकळीकीमुळे नवंनवं काही शोधत राहण्याची माझी ऊर्मी तरोताजा राहते आहे.’
सावध रहा .. कधीतरी अचानक तुमचाही फोन वाजेल .. पलीकडून यशवंत काही वेगळ्याच आवाजात किंवा वेगळीच भूमिका घेऊन बोलत असेल .. तुमचं ‘केचअप्’ करण्याचा तो प्रयत्न करेल .. त्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तुम्ही सज्जही असाल, पण…

mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
anant ambani radhika merchant
“राधिका माझ्या स्वप्नातील राणी,” अनंत अंबानींचे होणाऱ्या पत्नीबाबत विधान; वाढलेल्या वजनाबद्दलही केलं भाष्य