13 August 2020

News Flash

आवाज की दुनिया : आरजेंनी भडकपणा टाळायला हवा – डॉ. लव्हगुरू

दिवाळी २०१४ ‘‘दोस्तों, आज हम बातें करेंगे जिंदगी की उलझनों की, दावपेचों की । फिर आपके साथ आपके रातों का हमसफर..लव्हगुरू..’’, हे शब्दच तमाम बेचैन हृदयावर

| November 26, 2014 01:17 am

lp10दिवाळी २०१४
‘‘दोस्तों, आज हम बातें करेंगे जिंदगी की उलझनों की, दावपेचों की । फिर आपके साथ आपके रातों का हमसफर..लव्हगुरू..’’, हे शब्दच तमाम बेचैन हृदयावर एक हळुवार फुंकर होतात.
‘‘करो दिल की बात, लव्हगुरू के साथ’’ अशी घोषणा होताच क्षणी श्रोते इअरफोन घालून सज्ज व्हायचे. ज्याचं बोलणं, आवाज आपण सगळ्यांनीच कधी ना कधी रात्री कान देऊन ऐकलंय, त्या लव्हगुरू जुनेद आलम यांच्याशी झालेल्या या गप्पा.
रेडिओ जॉकी म्हणून करिअरला कधी सुरुवात झाली आणि हा सिलिसला कधीपर्यंत सुरू राहिला, या प्रश्नाने गप्पांना सुरुवात झाली. जुनेद सांगतात, ‘‘मी १९९५ पासून रेडिओवर काम करतोय. ‘रेडिओ जॉकी’ हा शब्दच तेव्हा नव्हता. हा शब्द गेल्या काही वर्षांमध्ये रूढ झालाय. खरं तर मी मेडिकलचा विद्यार्थी. मी पेडिआट्रीशिअन; पण मला पहिल्यापासूनच मीडियामध्ये काम करायचं होतं. कॉलेजला असताना सहजच रेडिओवर ऑडिशन दिली आणि उत्तम आवाजामुळे निवड झाली. तेव्हापासून रेडिओ हे माझं पॅशन झालं. शिवाय मेडिकल प्रॅक्टिसदेखील सुरू होती. २०१२ पर्यंत रेडिओवर काम केलं. सुरुवातीला दोनच खाजगी एफएम चॅनल्स होते.’’
विषय अर्थातच ‘लव्हगुरू’ शोने सुरू झाला. त्या कार्यक्रमाबद्दल जुनेद सांगतात. ‘‘ २००३ साली जेव्हा हा शो करायचा ठरलं तेव्हा सुरुवातीला आम्ही तो स्वीकारला जाईल की नाही याबाबत साशंक होतो. कारण त्या अगोदर रेडिओवर प्रेम, रिलेशनशिपमधले ताणतणाव, सेक्स हे विषय मोकळेपणानं मांडणारा कुठलाच शो नव्हता. आज निदान २०१४ मध्ये आपण याबाबत बऱ्यापैकी मोकळेपणाने बोलतोय. पण २००३ मध्ये अशा प्रकारचा शो रेडिओवर करणं हीच मुळात भन्नाट कल्पना होती. तो विवादास्पद होईल अशी भीतीही होती. त्यामुळे सुरुवातीला या शोची वेळही रात्री १२ ते २ असायची आणि मुंबई, लखनऊ या दोनच शहरांत त्याचं प्रक्षेपण व्हायचं. नंतर या शोला मिळणारा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहून अनेक ठिकाणी त्याचं प्रक्षेपण सुरू झालं आणि आपण योग्य दिशेने जातोय याची खात्री पटली.’’
‘लव्हगुरू’ हा शो दीर्घकाळ ‘नंबर वन’ राहिला होता. कोणताही शो अशा पद्धतीने यशस्वी होण्यामागे काही कारणं असतात. थेट तो शो करणारा आरजे भेटल्यावर हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. जुनेद यांनी पण त्याचं उत्तर विस्ताराने दिलं. ते म्हणाले, एकतर या शोची संकल्पना मुळात हटके होती. श्रोत्यांना ‘दिल की बात’ करण्याची, त्यांच्या आयुष्यातील नाजूक समस्या शेअर करण्याची संधी होती. ते या शोच्या निमित्ताने साध्य झालं. दुसरं म्हणजे या शोचं संपूर्ण सादरीकरण. गाणी तर सगळ्याच रेडिओ स्टेशन्सवर समान असतात. नटनटय़ांची गॉसिप्सही सगळीकडे चघळली जातात; पण हा शो या सगळ्याला अपवाद होता. त्यात श्रोत्याच्या प्रश्नाला आणि माझ्या उत्तराला जास्त महत्त्व होतं. लोकांनाही ते आवडत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शोबद्दल, ‘लव्हगुरू’बद्दल एकप्रकारचा विश्वास आणि आपुलकी वाटू लागली. श्रोते आपली नाजूक समस्या, जी आतापर्यंत कदाचित अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींशीही बोलली गेली नसेल, ती एका ‘फेसलेस’ व्यक्तीसोबत शेअर करत होते. त्यांच्यासाठी माझा चेहरा कधीच महत्त्वाचा नव्हता. फक्त आवाजाच्या माध्यमातून जो विश्वास तयार झाला होता, त्यामुळेच श्रोत्यांच्या मनात हा शो आपलं अढळ स्थान निर्माण करू शकला.
या शोमधून जुनेद म्हणजेच लव्हगुरू हे कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांचे मित्र, मार्गदर्शक, समुपदेशक होते. त्या भूमिकेतून वावरताना त्यांना कोणती आव्हानं जाणवली याबद्दल जुनेद मोकळेपणाने बोलले. ‘मी श्रोत्यांचा ‘फेसलेस फ्रेंड’ होतो. ते माझ्याशी त्यांची गुपितं, त्यांचा भावनिक गोंधळ सगळं काही शेअर करणार होते. त्यामुळे ते जे काही सांगतील, त्याची खिल्ली कधीच उडवली नाही. समजा एखादा १६-१७ वर्षांचा मुलगा सांगतोय की त्याला आवडणारी मुलगी त्याचे गिफ्ट्स, चॉकलेट्स स्वीकारत नाही. हे पचवणं त्याच्यासाठी कठीण असू शकतं. अशा वेळी मी त्याला त्याच्या भावना समजून घेऊन त्याला पटेल असं उत्तर देणं अपेक्षित असतं. एवढंच नाही तर ‘त्या’ मुलीचीही काही बाजू असू शकते हेदेखील त्या मुलाला समजून सांगावं लागतं. याचाच अर्थ मला स्वत:ला दोन्ही बाजू समजून घेऊन समतोल साधणं अपेक्षित होतं. कारण विचारणारा एकटाच असायचा. त्याची समस्याही व्यक्तिगत असायची. पण, मला माहीत होतं की, मी उत्तर देताना अनेक श्रोते ऐकणार आहेत. कदाचित त्यांचीही तीच समस्या असेल. त्यामुळे उत्तर कोणा एकाची बाजू घेणारं नसणं आणि खरं असणं अपेक्षित होतं.’
आरजेचं बोलणं आपल्याला खूप सहज आणि स्वाभाविक वाटत असतं. पण त्याच्यामागे किती मेहनत, विचार असतो हेच यातून लक्षात येतं. जुनेद पुढे सांगतात, श्रोत्यांचा वयोगट ओळखून त्यांच्याशी त्यांचा जवळचा मित्र म्हणून त्यांच्या पातळीवर बोलणं हेही एक आव्हानच होतं. श्रोते माझ्याशी अगदी मोकळेपणाने, आपुलकीने बोलायचे. त्यांना ज्या वेळी कम्फर्टेबल वाटेल, ते जेव्हा एकांतात असतील तेव्हा त्यांच्या सोयीस्कर वेळेनुसार मी त्यांना फोन करायचो, त्यांच्याशी बोलायचो. या सगळ्या कारणांमुळे शो अधिकाधिक हिट झाला.
प्रत्येक रेडिओ जॉकीची स्वत:ची स्टाइल असते. लव्हगुरूच्या बाबतीत त्याचा आवाज आणि त्याची भाषा या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे त्याची वेगळी स्टाइल श्रोत्यांना आकर्षित करायची. जुनेद आलम यांच्याशी प्रत्यक्ष बोलताना त्यांच्या आवाजात आणि भाषेत असलेली अदब जाणवत होती. त्याविषयी जुनेद सांगतात, ‘मी मूळचा लखनऊचा. लखनवी लोकांच्या रक्तातच भाषेची अदब, गोडवा आणि घरंदाजपणा असतो. मग तो सामान्य असेल नाहीतर उच्चकुलीन. घरी हिंदीच नाही तर उर्दूसुद्घा उत्तम, प्रवाही हवी याकडे कटाक्ष होता. शाळा-कॉलेजमध्ये इंग्लिशवर भर होता. म्हणूनच सुरुवातीला हिंदी-इंग्लिश शो करण्यात काहीच अडचण नव्हती. गेल्या २५ वर्षांपासून मुंबईत राहिल्याने मराठीदेखील येतंय. अगदी न लाजता, घाबरता मोडकंतोडकं गुजराथीही बोलतो. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. लोकांशी कनेक्ट होण्याचं माध्यम आहे. फक्त शब्दच नाहीत तर टोन, भावना याही गोष्टी तितक्याच परिणामकारक ठरतात. माझ्या प्रत्येक श्रोत्याशी बोलताना मी ‘आप’ म्हणूनच सुरुवात करायचो, मग तो श्रोता कॉलेज जाणारा तरुण असला तरी. श्रोत्यांचा आदर करणं सगळ्यात महत्त्वाचं. ‘‘वो है तो आप हो.’’ जुनेदशी बोलताना त्यांच्या स्टाइलविषयी तर कळलंच त्याशिवाय त्यांच्या काउंन्सिलिंग या कौशल्याच्या रहस्याविषयीही कळलं. काउंन्सिलिंगसाठी मात्र कधीच त्याने प्रोफेशनल काउंन्सिलिंगची मदत घेतली नाही, मी जे बोललो ते अगदी मनापासून, आतून असं ते सांगतात. हे ते आवर्जून नमूद करतात.
सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रसिद्धीसाठी प्रभावी वापर करता येतो, मात्र शोच्या लोकप्रियतेत त्यांचा वाटा नगण्य होता. याविषयी जुनेद सांगतात की, ‘‘शो २००३ पासूनच दणक्यात सुरू आहे. त्या वेळी सोशल नेटवर्किंग साइट्सचा बोलबाला झाला नव्हता. शोच्या फॉरमॅटमध्ये आम्ही त्यांना एक फोन नंबर, ईमेल आयडी द्यायचो. त्यावर मेसेज किंवा मेल करायला सांगायचो. त्या आधारावरच शो लोकप्रिय झालाय. आज सोशल नेटवर्किंग साइट्सचा खूप फायदा होतो; पण माझा शो सोशल नेटवर्किंग साइट्सच्या मदतीशिवाय दीर्घकाळ लोकप्रिय झाल्याचा आनंद आणि सार्थ अभिमान आहे.’’
लव्हगुरू जुनेद आलम आणि त्यांचा शो ट्रेंडसेटर्स होते. त्याविषयी ते अभिमानाने सांगतात की, ‘माझा शो कधीच स्क्रिप्टेड नसायचा. रेडिओ जॉकी म्हणून अमुक सेकंद बोलायचं बंधन असतं. त्यामागे जाहिरातींचं अर्थकारणदेखील असतं. मात्र हा शो याला अपवाद होता.’ शोच्या दरम्यान लावण्यात येणाऱ्या गाण्यांच्या निवडीवरही बंधन नसायचं. सगळा शो उत्स्फूर्त असायचा, ऐकणाऱ्याला लाइव्ह वाटायचा मात्र तसं नव्हतं. शो रेकॉर्डेड असायचा. यावर अधिक स्पष्टीकरण देताना जुनेद सांगतात की, ‘‘एखाद्या मित्राशी बोलावं तितक्या सहज लोक मोकळ्या भाषेत बोलायचे; पण रेडिओवर बोलताना भान बाळगणं गरजेचं असतं. श्रोत्यांच्या प्रश्नामुळे, त्यांनी वापरलेल्या शब्दांमुळे कोणाला ऑकवर्ड वाटू नये, सर्वाना हा शो ऐकता यावा. म्हणून शो रेकॉर्डेड असायचा.’’
सलमान-गोविंदाचा ‘पार्टनर’ हा सिनेमा आठवतोय? त्यात सलमानने केलेली लव्हगुरूची भूमिका, रेडिओच्या रिअल लव्हगुरूवर अर्थात जुनेद आलमवर बेतलेली आहे. हा या शोच्या लोकप्रियतेचा आणखी एक दाखला. नंतर तर ‘लव्हगुरू’ या नावाचा एक चित्रपटही आला होता. रेडिओ जॉकी म्हणून स्वत:च्या सामाजिक जबाबदारीविषयी काय सांगाल, या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘‘आज प्रत्येक रेडिओ स्टेशन आणि जॉकी आपापली सामाजिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत. मग त्या शहरी नागरी समस्या असोत किंवा भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या सामाजिक समस्या असोत. प्रत्येक रेडिओ स्टेशनवरून जनजागृती होत आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. रेडिओ हे ‘इन्फोटमेंट’चं माध्यम आहे. त्यामुळे रेडिओवर बोलताना कोणीही आणि विशेषत: रेडिओ जॉकींनी भान राखणं महत्त्वाचं आहे. आपलं बोलणं, कमेंट्स भडक नसाव्यात, हीदेखील एक जबाबदारीच आहे.’’
रेडिओ जॉकी आणि बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या जुनेद आलमनी ‘संजीवनी’, ‘इंडिया कॉलिंग’, ‘दिल मिल गए’ यांसारखे डेली सोप्स लिहिले आहेत. भविष्यात एक चित्रपट लिहिण्याचाही त्यांचा विचार आहे. जाता जाता त्यांना विचारलं की तुमच्या कमालीच्या आपुलकीच्या वाटणाऱ्या आवाजावर मिळालेली आणि आजपर्यंत लक्षात राहिलेली प्रतिक्रिया कोणती, त्यावर ते तात्काळ उत्तरले, व्हॉइस कल्चर आणि रेकॉर्डिगच्या क्षेत्रातील खूप मोठी व्यक्ती मला म्हणाली होती, ‘‘युवर व्हॉइस हग्स पीपल.’’
किती खरं होतं ते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:17 am

Web Title: radio jockey 4
टॅग Diwali
Next Stories
1 आवाज की दुनिया : भागता घोडा, बहता पानी और.. – नसर खान
2 आवाज की दुनिया : फक्त ग्लॅमर नाही, अभ्यासही महत्त्वाचा – श्रुती
3 आवाज की दुनिया : स्त्रियांवर केले जाणारे विनोद खटकतात – रश्मी वारंग
Just Now!
X