12 July 2020

News Flash

आवाज की दुनिया : फक्त ग्लॅमर नाही, अभ्यासही महत्त्वाचा – श्रुती

दिवाळी २०१४ रेड एफएमच्या स्टुडिओमध्ये पोहोचले तेव्हा आर.जे. श्रुतीची ‘मधली सुट्टी’ सुरू होती. त्या अर्थाची मधली सुट्टी नाही, तर तिच्या शोचं नाव ‘मधली सुट्टी’ आहे.

| November 26, 2014 01:15 am

lp10दिवाळी २०१४
रेड एफएमच्या स्टुडिओमध्ये पोहोचले तेव्हा आर.जे. श्रुतीची ‘मधली सुट्टी’ सुरू होती. त्या अर्थाची मधली सुट्टी नाही, तर तिच्या शोचं नाव ‘मधली सुट्टी’ आहे. ती स्टुडिओमध्ये होती. तोच ओळखीचा आवाज कानावर पडत होता.
‘‘गायीज, बाहेर कसलं रोमँटिक वातावरण तयार झालंय. असा मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि खरं सांगा, एवढय़ा छान वातावरणात आपण ऑफिसमध्ये काय अडकून पडलोय असं वाटतंय ना? सो ही मरगळ काढून टाका. थोडासा मन को समझा दो.. बारीश में न सही लेकिन उसके गाने में आप भीग सकते हो. और ये चान्स मै आपको दे सकती हू. तर नाराज होऊ नका. हे गाणं ऐका. आपोआप तुम्ही बाहेर पडणाऱ्या पावसाला फील कराल. सो गायीज, हे तुमच्यासाठी..’’ असं म्हणत ‘रिमझिम गिरे सावन..’ हे गाणं सुरू करून शोमध्ये ऐकवावे लागतात ते शोच्या दरम्यान येणारे कॉल एडिट करत होती. श्रुतीची एकाच वेळेला मोठय़ा शिताफीने अनेक कामं सुरू होती. मी स्टुडिओच्या बाहेर बसून तिचा शो ऐकत तिची वाट बघत होते. रोज दुपारी दोन ते पाच या वेळेत ‘मधली सुट्टी’ हा आर.जे. श्रुतीचा शो रेड एफएम असतो; पण या वेळेत मी ऑफिसमध्ये असते आणि तिथे मी एकीकडे काम सुरू असताना रेडिओ ऐकू शकत नाही. त्यामुळे तिचा हा शो माझ्यासाठी नवीन होता. यापूर्वीचा तिचा एक शो जो रात्री असायचा तो मात्र अधूनमधून ऐकायचे.
क्युबिकल स्टाइल केबिन्समध्ये प्रत्येक जण कामात बिझी असताना आपल्याच रेडिओ स्टेशनवरचा शोदेखील ऐकत होते. श्रुतीचा शो शेवटच्या टप्प्यात होता. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांची एक वेगळी भाषा आहे. तशीच या खासगी रेडिओ स्टेशन्सची प्रत्येकाची वेगळी भाषा आहे. प्रत्येक आर.जे.ने आपली एक स्टाइल डेव्हलप केली आहे. इथे ऐकणाऱ्याला ‘प्रेक्षक – रसिक’ म्हणलं जात नाही, तर ‘लिसनर’ असं व्यावहारिक नाव प्रचलित आहे.
मी आजूबाजूच्या निरीक्षणात गुंतून गेले असतानाच एकदम समोर ‘हाय! आय एम श्रुती..’ असं म्हणत तिशीच्या आतली एक मुलगी येऊन उभी राहिली. तोच उत्साह जो इतका वेळ ‘मधली सुट्टी’ ऐकताना अनुभवत होते. आवाजही तोच होता, कोणताही नाटकीपणा नव्हता. तिच्या ऑफिसमधली कॉन्फरन्स रूम गाठून आम्ही बोलायला सुरुवात केली. ती रेड एफएममध्ये येण्यापूर्वी पुण्यातल्याच आणखी एका खासगी रेडिओ स्टेशनवर शो करायची आणि त्याही आधी ती औरंगाबादमध्ये खासगी रेडिओ स्टेशनवर होती. मूळची औरंगाबादची असल्यामुळे तिचं शालेय-महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद इथेच झालं.
‘‘आपण आर.जे. बनायचं असं ठरवून मी या फिल्डमध्ये अजिबात आले नाही.’’ श्रुती सांगायला लागली. खूप अचानकपणे मी या वाटेकडे वळले. बारावी झाल्यावर मी एकाच वेळेस वेगवेगळ्या गोष्टी शिकत होते. बीसीएसला प्रवेश घेतला होता, त्यामुळे एकीकडे सकाळी कॉलेज, शाळेत असल्यापासून नाटक – गाणी – सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुढे असायचे. नाटकावर जरा जास्त प्रेम, त्यामुळे बीसीएस असतानाच नाटय़शास्त्राच्या डिप्लोमालादेखील अ‍ॅडमिशन घेतली. दुपारचा वेळ थोडा मोकळा होता. घरात बहीण इंटेरीअर डिझायनर होती. तिचं बघून मलाही वाटू लागलं होतं की, आपणही करू शकतो आणि मी तेही करू लागले. सकाळी कॉलेज, दुपारी इंटेरीअरच्या शीट्स कम्प्लीट करायच्या आणि संध्याकाळी नाटय़शास्त्र असं खूप भरगच्च शेडय़ूल होतं त्या वेळेला. आपण आर.जे. बनायचं असं अजिबात मनात नव्हतं.’’
माझा प्रश्न अर्थातच होता की, मग तो टर्निग पॉइंट कसा आला.. श्रुती सांगायला लागली. ‘‘खरं तर मी इंटेरीअर डिझायनरचं काम जोमानं सुरू केलं होतं. औरंगाबादला ‘वेरुळ फेस्टिव्हल’ हा एक खूप मोठा फेस्टिव्हल होत असतो. एक वर्ष मी या फेस्टिव्हलचं इंटेरीअर डिझाईनचं काम मिळवलं. वयाने आणि अनुभवाने खूप लहान होते, पण अमाप उत्साह होता, आत्मविश्वास होता आणि हेच गुण बघून मला फेस्टिव्हलचं इंटेरीअर डिझाईनचं काम मिळालं. माझ्या कामाचं खूप कौतुक झालं. बातम्यांमध्ये माझ्याविषयी खूप काही लिहून आलं. वेरुळ फेस्टिव्हलमधील चांगल्या कामगिरीमुळेच मला पुण्यात भरणाऱ्या ‘किसान’ प्रदर्शनातही डिझाईनचं काम मिळालं.
माझ्या बाबांना वाटलं की, मी जरा जास्तच धावपळ करतेय. मी पुण्याला जाऊ नये, असं त्यांचं मत होतं; पण मी ही संधी म्हणून बघत होते. मी हट्टाने या प्रदर्शनाच्या तयारीसाठी पुण्याला आले आणि बाबा म्हणाले तशी मी अति धावपळीमुळे आजारी पडले. शेवटी बाबांनाच पुण्यात यावं लागलं. औरंगाबादला परत जाण्याआधी बाबांच्या एका मित्रांना भेटायला म्हणून मी आणि बाबा गेलो होतो, तर तिथे जवळच एका खासगी रेडिओ स्टेशनसाठी ऑडिशन्स सुरू होत्या. बाबांच्या मित्राने मी त्या ऑडिशनला जावं याचा आग्रह धरला. मी फार उत्सुक नव्हते. काका म्हणतायत म्हणून अगदी जाता- जाता त्या ऑडिशनला गेले आणि सिलेक्ट झाले. माझाच विश्वास बसत नव्हता. पुण्यात प्रदर्शनासाठी जाणं हा खरंच माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरला.’’
श्रुती अगदी मराठमोळ्या वातावरणात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे तिचं मराठीदेखील चांगलं आहे हे तिच्याशी बोलताना लक्षात येतं; पण नुसतं मराठी चांगलं येतं एवढंच बाकी नसतं, तर बहुभाषक असावं लागतं आणि श्रुती तशी आहे हे जाणवत होतं. या क्षेत्रामध्ये येताना स्वत:मध्ये काही बदल करावे लागलेत का, आर.जे. बनण्यासाठी तुला तुझ्या व्यक्तिमत्त्वातील कोणत्या गोष्टींचा उपयोग झाला, या प्रश्नांवर श्रुती सांगते, खरं सांगू, तसा मला खूप मोठा बदल करावा लागला नाही. आता या फिल्डसाठी म्हणून काही गोष्टी आवश्यक आहेत त्या कराव्या लागतात आणि त्या प्रत्येक फिल्डमध्ये कराव्या लागतात. काही गुण माझ्यात उपजत होते, फक्त मी हेदेखील करू शकते याची मला स्वत:ला जाणीव नव्हती. माझे बाबा लिहितात. लिहून झालं की, एखाद्या सादरीकरणाच्या पद्धतीने ते त्याचं वाचन करतात. मी लहानपणापासून त्यांना असं वाचताना निरीक्षण करत आले आहे. ते वाचत असताना त्यांच्या आवाजात होणारे चढउतार मी बघायचे. या सगळ्याचा नकळतपणे माझ्यावरही संस्कार झालाय असं मला वाटतं. शिवाय नाटय़शास्त्राचा अभ्यासही इथे उपयोगी पडला. बोलताना एखादी गोष्ट रंगवून सांगणं मला खूप चांगलं जमतं, त्यात नाटय़मयता आणता येते. मी जशी शोमध्ये व्यक्त होते तसंच माझं व्यक्तिमत्त्व आहे.
हे सगळं खरं असलं तरी रोजच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येतात, त्यांचा आपल्या मूडवर परिणाम होत असतो. तसाच परिणाम शोवर होतो का, यावर श्रुतीनं अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, खूपदा होतो. कधी अचानक, तर कधी सकाळपासूनच काही कारणाने मूड खराब असतो आणि किती म्हटलं तरी काही वेळेला लक्ष लागतच नाही; पण मी शोमध्ये माझ्या श्रोत्यांना सुरुवातीलाच सांगून टाकते आणि गंमत अशी आहे की, मी असं काही सांगितलं की, श्रोतेसुद्धा माझा मूड ठीक व्हावा म्हणून कॉल करतात. शो संपेपर्यंत मूड एकदम बदलून जातो. हे फिल्ड म्हणजे मला एनर्जी- ‘टॉनिक’ आहे असं मला कधी कधी वाटतं. पर्सनल आयुष्यात काहीही सुरू असलं तरी इथे आल्यावर तुम्ही नॉर्मल मूडमध्ये येऊ शकता.
आरजे एकदम उत्स्फूर्तपणे बोलत असतात. त्यांना ते सगळं सुचतं कसं, असा प्रश्न अनेकांना पडतो. हे बोलणं खरोखरच उत्स्फूर्त असतं, की त्यामागे होमवर्क असतो, या प्रश्नावर श्रुती म्हणाली, आमचे शो खूप लाइव्ह असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, लोकांचे जिव्हाळ्याचे विषय यांना शोमध्ये सामावून घ्यावं लागतं. स्थानिक पातळीवरच्या घटनांची दाखल घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही बोलणार आहोत त्याचा काही उपयोग होतोय की नाही याचाही विचार करून तशी स्क्रिप्ट तयार करावी लागते. माझ्या शोची स्क्रिप्ट मीच लिहिते. ‘मधली सुट्टी’मध्ये मला रोज काही तरी नवनवीन आयडिया वापरून कॉन्टेस्ट घ्यावी लागते. मग कधी ती वाजवल्या जाणाऱ्या गाण्याशी संबंधित असते, तर कधी एखाद्या घटनेशी. यासाठी खूप क्रिएटिव्ह राहावं लागतं. श्रोत्यांना उपदेश नाही वाटला पाहिजे असं बोलणं असावं लागतं. रोजच शो असतो, त्यामुळे रोजच्या बोलण्यात नावीन्य ठेवावं लागतं. तोचतोचपणा वाटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. आलो आणि माइकसमोर बसलो आणि केली बडबड असं कधी होत नाही. इथे प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असतं.
टीव्ही चॅनेल्समध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे त्यांचं सगळं लक्ष टीआरपीकडे असतं. रेडिओचंही तसंच आहे का, यावर श्रुती म्हणाली, प्रायव्हेट रेडिओ स्टेशनसाठीदेखील टीआरपी आहे. राष्ट्रीय पातळीवर एक टीम या रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असते. इथल्या प्रत्येक शोला रेटिंग आहे. इथे शोदेखील कॉम्पीटिशनला पाठवले जातात. ‘रापा’चे पुरस्कार मिळवलेले अनेक खासगी रेडिओ स्टेशन्स आहेत.
श्रुतीचा फेसबुक- ट्विटरवर जोरदार वावर आहे. अनेक सेलिब्रिटी तिची दखल घेत असतात. अनेक सेलिब्रिटीच्या वॉलवर तिच्याबरोबरचे फोटो लोड केलेले आहेत. तिचं फेसबुक पेज लाइक करणाऱ्यांची संख्या दहा हजारांच्या आसपास आहे. फेसबुकवर मेसेज टाकणाऱ्या प्रत्येकाच्या मेसेजला ती उत्तर देते. त्यातील काही मेसेज, तो मेसेज पाठवणाऱ्या श्रोत्याचा उल्लेख शोमध्ये करते. तिची वॉल कायम अपडेट असते. रोज स्टेटस बदलते.
त्यामुळे आर.जें.नासुद्धा एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे स्टेट्स मिळू लागलंय. त्याचा खासगी आयुष्यावर काही परिणाम होतो का, यावर श्रुती म्हणाली, तुम्ही हे सगळं कशा पद्धतीने हाताळता यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. तुम्हाला तुमच्या या प्रोफेशनमुळे खासगी आयुष्य वेगळं ठेवावं लागतं. आम्ही आमची वैयक्तिक ओळख लोकांपासून लपवून ठेवतो. लोकांना तुमचा चेहरा माहीत नसतो. ते तुमच्या आवाजाच्या प्रेमात असतात. त्यातील काही जण आधी शोमध्ये कॉल करून मग फेसबुकवर फॉलो करून तुमचा जणू पाठलागच करू लागतात. याचा कधी कधी त्रासपण होऊ लागतो; पण डोकं शांत ठेवून त्यांना ट्रीट करावं लागतं.
अशा श्रोत्यांचा काही त्रास होतो का, यावर ती म्हणाली, बऱ्याचदा होतो. माझा रात्रीचा शो १२ वाजता संपायचा. एक श्रोता रात्री १२ वाजता शो सुटायच्या वेळेस स्टुडिओमध्ये येऊन थांबला. त्याला त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम माझ्याबरोबर शेअर करायचे होते; पण ती वेळ योग्य नव्हती याची जाणीव मी त्याला माझ्या बोलण्यातून करून दिली आणि त्याला दिवशी कॉलवर सांगितलं. खूपदा समोर येणाऱ्या प्रसंगाला नीट विचारपूर्वक सामोरं जावं लागतं. मला वाटतं महिलांसमोर असे प्रॉब्लेम येत असतात.
श्रुती स्वत: खूप क्रिएटिव्ह आहे. कलाकार मन जपणारी आहे. प्रचंड ‘शॉपोहोलिक’ आहे. शॉपिंग हा तिचा वीक पॉइंट आहे. खूप डायट कॉन्शस आहे. थोडी वेंधळी आहे. या सगळ्याचा प्रत्यय तुम्ही तिच्या शोमध्येदेखील घेऊ शकता. कधी कधी शोमध्ये तिच्या वेंधळेपणाची उदाहरणंही ती शेअर करत असते. चांगलं प्रेझेंटेबल राहणं तिला आवडतं. नाटकाची आवड जोपासता येत नाही याची तिला खंत वाटते. कपडे आणि ज्वेलरी असे कॉम्बिनेशन असलेलं ‘ब्रॅन्डेड स्टोअर’ तिला सुरू करायचं. सध्या ती याच थीमवर एक्झिबिशन करत असते. स्वत:मधील क्रिएटिव्हपणा जागा ठेवायला मदत होते, असं तिचं म्हणणं आहे. तोचतोचपणा होऊ नये म्हणून मध्यंतरी तिने काही काळासाठी काम थांबवलं होतं. या काळात ती पुण्यातील सुदर्शन रंगमंचमध्ये कार्यरत झाली. करिअरमधील समतोल कसा पाहिजे हे तिला उमगलंय. त्यामुळे ती जमिनीवर आहे. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना ती फक्त ग्लॅमर- प्रसिद्धी याकडे बघू नका. भरपूर अभ्यास आणि कष्टाची तयारी ठेवा, असा सल्ला देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:15 am

Web Title: radio jockey 6
टॅग Diwali
Next Stories
1 आवाज की दुनिया : स्त्रियांवर केले जाणारे विनोद खटकतात – रश्मी वारंग
2 आवाज की दुनिया : सकारात्मक दृष्टिकोन देणं हीच जबाबदारी – अनुराग पांडे
3 श्री लक्ष्मी : मातृदेवता लक्ष्मी
Just Now!
X