lp10दिवाळी २०१४
घर आणि नोकरी सांभाळत आयुष्य जगणाऱ्या अनेक जणी असतात. घराप्रमाणे ऑफिसातही त्यांच्यावर जबाबदारी असते. तरी दोन्हींतला समतोल साधण्यात स्त्रीचा हात कोणीच धरू शकत नाही. हा विचार मनात येण्याचं कारण म्हणजे रेडिओ. रेडिओचा यात काय संबंध असं वाटेल, अशी शंका येणं अगदी स्वाभाविक आहे; पण आहे तसंच कारण. आकाशवाणीवरील आरजे रश्मी वारंग. गोड आवाजात श्रोत्यांशी गप्पा मारत त्यांना खिळवून ठेवण्यात रश्मीचं कौतुक करावं तितकं कमी. काही दिवस तिला ऐकत होते. भेटण्याची इच्छा होतीच. आजच्या खासगी चॅनल्सच्या आरजेंच्या जमान्यात रश्मी मात्र आकाशवाणीवर काम करतेय. याचं कारण काय असावं, तिचा यामागचा विचार काय, आकाशवाणीचा पर्याय का निवडावा, अशा अनेक प्रश्नांची झोळी घेऊन मी तिला भेटायला गेले आणि सुरू झाला गप्पांचा सिलसिला.
काही वेळा आपण ठरवून एका करिअरचा विचार करतो, तर ध्यानीमनी नसताना एखादं क्षेत्र करिअर होऊन जातं. तर आपला आवडता छंदच करिअर होणं ही अगदीच सुखावह गोष्ट. तसंच झालं रश्मी वारंगचं. निवेदन करण्याच्या आवडीमुळे ती या क्षेत्राकडे वळली; पण याची सुरुवात कशी झाली ते ती तिच्या शब्दांत अशी सांगते, ‘‘शाळेत असताना बऱ्याच कार्यक्रमांचं निवेदन करायचे. एकदा माझ्या मैत्रिणीचा अरंगेत्रमचा कार्यक्रम होता. त्यात मी निवेदन केलं होतं. त्या वेळी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी माझ्या निवेदनाचं कौतुक केलं आणि आकाशवाणीच्या आरजेसाठी असलेल्या परीक्षा देण्यास सांगितलं. त्यानंतर मी ती परीक्षा दिली. माझी आरजे म्हणून निवड झाली. हा माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.’’
कोणत्याही क्षेत्रात काम करायचं म्हणजे त्यासाठी पुरेसा अभ्यास असणं अगदीच आवश्यक. आरजे नुसती बडबड करतात असा समज असेल तर तो लगेच डोक्यातून काढून टाका. त्यांच्या या बडीबडीमागेही अभ्यास असतो, हे रश्मीने पटवून दिलं. ‘‘आरजे म्हणून काम करण्यासाठी सतत नवनवीन गोष्टींची माहिती असणं, चतुरस्र असणं गरजेचं असतं. सांस्कृतिक विषयासह अनेकदा भौगोलिक, गणितीय, पौराणिक याबाबतही माहिती द्यावी लागते. अशा वेळी ऑन एअर असताना मी ‘गुगल इट’ करू शकत नाही. त्यासाठी वाचन आवश्यकच आहे. सकाळचा सात ते नऊ हा वेळ मी पेपर वाचनासाठी राखून ठेवलेला आहे’’, रश्मी तिच्या अभ्यासाविषयी सांगत होती.
आजचा जमाना हा खासगी रेडिओ चॅनल्सचा आहे, असं म्हणतात. तिथलं मनोरंजन, गाणी, वेगवेगळे प्रयोग या सगळ्यामुळे तरुण वर्ग तिथे आकर्षित होतो, हे रश्मी मान्य करते; पण त्याच वेळी आकाशवाणी ऐकणारे श्रोतेही तितकेच आहेत हेही ती आवर्जून सांगते. ‘‘रुईया कॉलेजच्या मराठी विभागाच्या प्रमुख मला म्हणाल्या की, आमचा एक विद्यार्थी तुमचा कार्यक्रम लेक्चर सुरू असतानाही ऐकतो’’, आकाशवाणीचाही श्रोतृवर्ग खूप आहे हे पटवून देणारा हा किस्सा रश्मीने सांगितला; पण काळानुसार बदललं तर पाहिजे. मग युवकांना आकर्षित करावंसं नाही का वाटत? या माझ्या प्रश्नावर तिने स्पष्ट उत्तर दिलं, ‘‘असं मला वाटत नाही. कारण मी ज्या चॅनलसाठी काम करते तो खास जुन्या गाण्यांचा चॅनल आहे आणि अशी गाणी ऐकणाराही तरुणांमध्ये मोठा वर्ग आहे. तसंच आम्ही अनेकदा तरुणांमधल्या विषयांवर चर्चा करतो. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, संगीत हे संगीत आहे. जुनं काय आणि नवीन काय? चांगलं ते टिकतंच.’’
चांगलं ते टिकतंच असं असलं तरी या क्षेत्रातल्या स्पर्धेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रश्मीला या स्पर्धेबद्दल विचारलं. खासगी रेडिओ स्टेशन्स ही आकाशवाणीला तगडी स्पर्धा वाटत नाही का? ती यावर म्हणते, ‘‘आम्हा दोघांच्या हेतूमध्येच मुळात फरक आहे. आमचा ज्ञानातून करमणूक हा मुख्य हेतू आहे. आमचे प्रेक्षकवर्ग, नियमावली, कार्यक्रम सादर करण्याची पद्धत यातच फरक असल्यामुळे आमच्या स्पर्धा होऊ शकत नाही. इतर आरजेंशी स्पर्धा आहे; पण तीही निकोप स्पर्धा आहे.’’ रेडिओ चॅनल्सच्या भाषेबद्दलही ती बोलती झाली. आकाशवाणीमध्ये प्रमाण भाषा वापरली जाते, तर खासगी रेडिओ चॅनल्समध्ये बोली भाषा. त्यामुळे लोकप्रियता खासगी चॅनल्सना जास्त मिळते, असं म्हटलं जातं. रश्मी मात्र हे नाकारते. ती म्हणते, ‘‘भाषेपेक्षा आरजेच्या कार्यक्रम सादर करण्यावर त्या कार्यक्रमाची लोकप्रियता अवलंबून असते. आकाशवाणी प्रसिद्धीसाठी कधी काही करत नाही. बोलण्याच्या ओघात जेव्हा आमच्याकडून इंग्रजी शब्द उच्चारले गेले तर ‘आमचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकतो. त्याच्यावर मराठीचे संस्कार व्हावे यासाठी आम्ही त्याला तुमचे कार्यक्रम ऐकवतो. त्यामुळे शक्यतो इंग्रजी शब्दप्रयोग टाळा,’ अशाही प्रतिक्रिया येतात. त्यामुळे भाषा हा अडथळा वाटत नाही.’’ खासगी रेडिओ चॅनल्समध्ये रश्मीने ऑडिशनही दिली होती; पण तिथले कार्यक्रम रेकॉर्डेड असतात हे कळल्यावर ती त्यांना नाही म्हणाली.
सेलिब्रेटींप्रमाणे आरजेंची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतेय. कलाकारांप्रमाणेच आरजेंनाही खासगी आणि व्यावसायिक आयुष्य यांमधला समतोल राखावा लागतो. खासगी आयुष्यात आरजे कितीही दु:खी असला तरी श्रोत्यांशी संवाद साधताना मात्र ते लपवावंच लागतं, हे रश्मीने सांगितलेल्या एका घटनेवरून म्हणावं लागेल. ती म्हणते, ‘‘मी आकाशवाणीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझा मुलगा लहान होता. आकाशवाणी केंद्रावर आले, की माझ्या मुलाला शाळेच्या बसपर्यंत सोडण्याची जबाबदारी आमच्या बाजूच्या काकू पार पाडायच्या. तेव्हा त्याला घडय़ाळ कळत नव्हतं म्हणून मी त्याची बस येण्याची वेळ झाली की, फोन करून ‘तुझी वेळ झाली, खाली जा’ असा फोन करायचे. तसाच मी एकदा केला तेव्हा कोणीच उचलला नाही. त्या काकूंना फोन केला. त्या म्हणाल्या, मी आज विसरले; पण आता जाऊन त्याला घेऊन येते. तोपर्यंत मी आजूबाजूच्यांना फोन केले. त्यांनी घरात तर कुणीच नाही, असं सांगितलं. नंतर त्या काकूंचाही घरात कुणीच नाही, असा फोन आला. मी ऑन एअर होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली. दुसरा आरजे येईपर्यंत मी माझा शो सोडू शकत नव्हते. इथे माझ्या मुलाचा पत्ता नाही. मी अक्षरश: रडायला लागले. अध्र्या तासाने मला कळलं की, तो स्वत:च स्वत:ची कशीबशी तयारी करून लवकर खाली जाऊन बसची वाट बघत बसला होता; पण तो अर्धा तास म्हणजे माझ्यासाठी मोठी परीक्षा होती. पण, श्रोत्यांना माझ्या आवाजातून मी काळजीत आहे किंवा रडतेय हे जाणवू दिलं नाही. ‘शो मस्ट गो ऑन’चा प्रत्यय मला तेव्हा आला.’’ हा अनुभव सांगताना, व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं ठेवावंच लागतं. कुटुंबासाठी वेळ काढावा लागतो, असंही ती नमूद करते.
‘‘व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य यांचा एकमेकांवर परिणाम होतच असतो. ऑन एअर एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर त्याला सूचक अशा अनुभवांचा उदाहरण म्हणून वापर करता येतो. आरजेला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागावं लागतं,’’ असंही ती सांगते.
सरकारी नोकरीमध्ये एकदा तुम्ही चिकटलात, की मग आयुष्यभर नोकरीची चिंता मिटते. अशा लोकांमध्ये एक प्रकारचं स्थैर्य येतं. स्वत:ला अपडेट करण्याची, नवनवीन गोष्टी शिकत विकसित होत जाण्याची इच्छा संपून जाते. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या आसपास बघत असतो. त्या पाश्र्वभूमीवर रश्मीला विचारलं, की तुम्ही तुमच्या कौशल्यात भर पडेल यासाठी काय करता? त्यावर तिचं उत्तर होतं, ‘‘तुम्ही एखादा कार्यक्रम कसा सादर करता यावर तुमची लोकप्रियता अवलंबून आहे. होळी, दिवाळी, दसरा हे सण दरवर्षी येतात; पण प्रत्येक वर्षी वेगवेगळं वाचन करणं आणि श्रोत्यांना वेगवेगळं ऐकवत राहाणं महत्त्वाचं आहे. तर मी सतत ‘काल’च्यापेक्षा ‘आज’ कसा वेगळा असेल याचा विचार करून माझं कौशल्य आणखी सुधारण्याचा प्रयत्न करते.
प्रत्येक क्षेत्रात तसा धोका आणि आव्हानं असतात. रेडिओ हे क्षेत्र ग्लॅमरस वाटत असलं तरी त्यातही आव्हानं आहेतच. या आव्हानांविषयी रश्मी सांगते, ‘‘तुम्हाला सतत तुमचं बेस्ट द्यावंच लागतं. मी अजूनही शिकतेच आहे. ‘बेस्ट इज यट टू कम’. पण, इथे लोकांना आपला कंटाळा यायला लागला तर आपण धोक्यात आहोत.’’ जिथे स्पर्धा, आव्हानं आहेत तिथे कार्यक्रमांची क्रमवारीही ठरत असते. मालिकांप्रमाणे रेडिओच्या कार्यक्रमांच्या टीआरपी तत्सम मोजपट्टी असते का, यावर रश्मीने त्वरित हो असं उत्तर दिलं. ‘‘दर आठवडय़ाला कुठला कार्यक्रम कुठे जास्त ऐकला गेला हे सांगणारा एक रिपोर्ट आमच्याकडे येतो. त्यानुसार आपला १० ते ११ चा कार्यक्रम सध्या टॉपवर आहे.’’ लोकप्रियतेवरून मुद्दा सोशल नेटवर्किंग साइट्सवर गेला. ‘‘माझे श्रोते सोशल नेटवर्किंग साइट्सवर मला प्रतिसाद आणि सूचना करत असतात. मीही तसा प्रतिसाद देते. सामाजिक प्रबोधन ही मला आरजेंची मुख्य जबाबदारी वाटते. आरजे म्हणून स्त्रियांना गृहीत धरणं आणि त्यांच्यावर विनोद करणं ही गोष्ट खटकते. याकरिता अप्रत्यक्षपणे मी सतत भाष्य करत असते आणि बदलण्याचा प्रयत्न करत असते.’’ रश्मी पुढे सांगते.
आरजेंचं सगळं काम आवाजावरच. त्यामुळे तो जपणं, सांभाळणं अत्यंत आवश्यक. तो सांभाळणं हे प्रत्येक आरजेंच्याच हातात असतं. रश्मी सांगत होती. ती तिच्या आवाजाची काळजी कशी घेते किंवा एखाद्या आरजेने काय करायला हवं हे सांगण्यात ती मग्न झाली होती. ‘‘वय वाढत जातं तसे आवाजात बरेच बदल होत जातात; पण ते कौशल्याने वापरणं आपल्या हातात असतं’’.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट. तेलकट, तुपकट पदार्थ टाळणं, काही प्राणायामाचे प्रकार आणि काही वॉइस मॉडय़ुलेशनच्या टेक्निक्स. ‘‘आम्ही आवाजामार्फत लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यावरच आमची भिस्त आहे. माणसाने मनाने सुंदर असावं, मग आवाज काय आणि चेहरा काय दोन्हीही सुंदरच वाटतं’’. आवाजाचं महत्त्व पटवून देत रश्मी तिच्या आयुष्यातल्या एका विस्मरणीय अनुभवाकडे वळली. एक लोकप्रिय आरजे स्वत:हून तिच्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. ‘‘मी मराठी कार्यक्रम ऐकतो आणि सगळ्यांनी ते ऐकावेत’’ असं म्हणून त्यांनी रश्मीचं कौतुक केलं होतं.
तिला विचारलं, ‘‘तू आरजे झाली नसतीस तर काय झाली असतीस?’’, एक क्षणही न दवडता रश्मी म्हणाली, ‘‘मला शिकवायला खूप आवडतं. एक वर्ष महाविद्यालयात शिकवतही होते. लिहायलाही आवडतं. मी आरजे नसते तर मला शिक्षिका आणि लेखिका व्हायला फार आवडलं असतं. याव्यतिरिक्त माझी स्वत:ची अ‍ॅड एजन्सी आणि स्टुडिओही आहे.’’ थोडक्यात, वेगवेगळ्या भूमिका पार पाडत रश्मी आकाशवाणीवर श्रोत्यांशी गप्पा मारायला सदैव तयार असते. खासगी वाहिन्यांवरच्या आरजेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचा श्रोताही वेगळा आहे. टीव्हीच्या बाबतीत सरकारी वाहिनी आणि खासगी वाहिन्या यांच्यामध्ये जो फरक आहे, तोच रेडिओबाबतीत आकाशवाणी आणि एफएमच्या बाबतीत आहे. दुसऱ्या पारडय़ात ग्लॅमर, वेग, कमालीचा चटपटीतपणा असताना आपण आपलं काम शांतपणे करत आपला असा श्रोतृवर्ग तयार करण्याचं आव्हान रश्मीने लीलया पेललं आहे.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Why the frequent change of candidates from the Vanchit Bahujan Alliance
‘वंचित’कडून वारंवार उमेदवार बदल का?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Spiritual guru and founder of the Isha Foundation, Sadhguru Jaggi Vasudev, has undergone emergency brain surgery
मोठी बातमी! अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया