विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

बिहार निवडणुकांमध्ये हाती आलेले सपशेल अपयश आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या आत्मचरित्रामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष व प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वासंदर्भात एक जोरदार चर्चा देशभरात सुरू झाली आहे. सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी त्याबाबत ओबामांना या देशातले आणि येथील राजकारणातले काय कळते? असे म्हणत टीका केली खरी किंवा काँग्रेस समर्थकांनी ‘माफीमाँगओबामा’ हा हॅशटॅग ट्रेण्डही केला. पण खरे तर या अशा चर्चा- टीका याने बिथरून जाण्याचे काही कारण नाही, कारण ती काँग्रेस आहे. आजही देशातील २० टक्के मते याही दुर्बल अवस्थेत काँग्रेसच्या पारडय़ात पडतात हेही राजकारण समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आला दिवस, गेला दिवस भाजपा किंवा विशेषत: पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस किंवा त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, कारण ती काँग्रेस आहे.. त्यामुळे चर्चा तर होणारच! कुणालाही आवडो अथवा न आवडो!

ओबामांनी केलेल्या टीकेतील एक महत्त्वाचा भाग तर एव्हाना समस्त भारतीयांनाही अगदी ठळकपणे सहजच लक्षात आलेला असेल तो म्हणजे नेतृत्वाची गोंधळलेली स्थिती. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरसंदर्भात दिलेल्या निवाडय़ानंतर निवाडय़ाचे स्वागत करणे आणि उलटपक्षी अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये राम मंदिर होते आहे कारण त्याची पायाभरणी (शिलान्यास) राजीव गांधी यांनी केली होती, याची भित्तिचित्रे जारी करणे हे गोंधळलेपणाचेच लक्षण होते. नेतृत्वच असे गोंधळलेले असेल तर पक्ष कार्यकर्त्यांचे काय याचाही प्रत्यय मोदींच्या राम मंदिर भूमिपूजन समारंभप्रसंगी आला. कारण त्या वेळेस काँग्रेसचे नेतेही गोंधळलेले होते. कोणी स्वागत केले तर काहींनी भूमिकाच घेतली नाही. केवळ पक्षाची असेल तीच आपली भूमिका एवढेच मत व्यक्त केले. ते कशाला, तर अगदी दोन दिवसांपूर्वीही हीच गोंधळलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘गुपकर टोळी’वरून काँग्रेसला थेट लक्ष्य केले. काश्मीरमध्ये एकत्र आलेले विरोधी आणि स्थानिक पक्ष यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० नुसार पुन्हा विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी गुपकर ठराव केला. तो समोर ठेवून काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्यात काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडीही केली आहे. मात्र अमित शहांच्या टीकेनंतर गुपकरशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगत काँग्रेसने हात झटकले. ३७० हवे की नको याबाबत ठाम भूमिका घेणे काँग्रेस टाळते आहे.

एकुणात जे गुण-अवगुण नेतृत्वात तेच पक्षात, त्यांच्या ध्येयधोरणात प्रतिबिंबित होते आहे. ओबामांनी केलेल्या टीकेचा रोख अपरिपक्व नेतृत्व यावर होता. राहुल गांधींनी पक्षांतर्गत लोकशाहीसाठी निवडणुकांचे वारे आणले आणि ते वारे मधल्यामध्येच विरून गेले. त्यांनी एकच विषय सलग लावून धरला आणि भूमिका घेत ठामपणे उभे राहिले असे मुद्दे तुलनेने कमी आहेत. आता फरकच पाहायचा तर राजीव गांधी यांनी तत्कालीन तरुण नेतृत्वाला संधी दिली त्यात पी. चिदम्बरम, अशोक गेहलोत आदी नेते होते. त्यांनी पक्षातच कर्तृत्व सिद्ध केले. मात्र ज्या रिटा बहुगुणा यांची निवड खुद्द राहुल गांधी यांनी केली त्या आता भाजपासोबत आहे. इतरही निवडलेले नेते एक तर आता दुसऱ्या पक्षांसोबत आहेत किंवा स्वपक्षातच खिजगणीतही नाहीत, अशी अवस्था आहे. मग चर्चा का नाही होणार?