lp57‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘थ्री इडियट्स’ असे धमाल सिनेमे देणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्या येऊ घातलेल्या ‘पीके’ या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. त्याबद्दल हिरानी यांच्याशी मारलेल्या गप्पा-

‘थ्री इडियट्स’मधल्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची भूमिका आणि आता परत ‘पीके’मधील आगळीवेगळी भूमिका करण्यासाठी तुम्ही आमिर खानला राजी कसं केलं?

‘थ्री इडियट्स’मध्ये आमिर खानचा समावेश अपघातानेच झाला. तो एकदा अचानचच विधू विनोद चोप्रांकडे आला असताना त्याने तुम्हाला हवे तसे कलाकार मिळाले का असं विचारलं. तिथेच त्याने सिनेमाचं कथानक ऐकलं. ते ऐकल्यावर त्याला रँचोची भूमिका करायची इच्छा होती. रँचो हा आयआयटीमधला विद्यार्थी असतो. आपण त्याच्या वयाचे म्हणजेच तरूण दिसू याची आमीरला खात्री होती, तर ‘पीके’साठी अगदी सुरुवातीपासूनच आमच्या डोक्यात आमिर होता. त्याची उंची, सुपासारखे बाहेर आलेले कान, लहान मुलाची निरागसता हे सगळं ‘पीके’मधल्या लहान मुलासारख्याच असलेल्या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारं होतं.

ल्ल तुम्हाला सिनेमा निर्मिती करताना कथानकातले कोणते घटक महत्त्वाचे वाटतात?

मला ह्य़ूमन इंटरेस्ट स्टोरीज बघायला आणि सुखांतिका करायला आवडतात. जिच्यामध्ये वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे अशीच गोष्ट मला सांगायची असते. उदाहरणच द्यायचं तर एखादा गँगस्टर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेला किंवा मुन्नाभाईसारखा गँगस्टर महात्मा गांधीना भेटला तर काय होईल, या कल्पनेतून मुन्नाभाई एमबीबीएस तसंच ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे सिनेमे आले. ‘पीके’मध्येही आम्ही अशीच गंमत केली आहे.

ल्ल तुम्ही अनेकदा बडय़ा कलाकारांसोबतच काम केलंय. हे ठरवून केलंत का?

कलाकारांबाबत मी नशीबवान ठरलोय. आम्ही कथानकाच्या अनुषंगाने कलाकारांची निवड करतो. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठी आम्हाला मध्यमवयीन अभिनेता हवा होता. मला तर त्यासाठी अनिल कपूरच हवा होता. पण, काही कारणानं ते जमून आलं नाही. आणि संजय दत्त मुन्नाभाई झाला. ‘थ्री इडियट्स’साठी नवोदित कलाकारांच्या शोधात होतो पण त्यात फारसं आम्हाला यश आलं नाही. इम्रान खान आणि रणवीर सिंग यांचं अभिनयाचं नाणं तेव्हा अजून तेवढं वाजलेलं नव्हतं. आम्ही जेव्हा तीन तरुण व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्यांची नावं नक्की केली तेव्हा खरं तर ते तिघंही मित्र म्हणून ऑडच वाटत होते.

ल्ल तुमच्या सिनेमांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांना पुरेसा वाव नसतो. ‘पीके’ याबाबत वेगळा ठरेल का?

आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे. ती ‘पीके’मध्ये ते सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ किंवा ‘थ्री इडियट्स’ हे सिनेमे जर लव्ह स्टोरी असले असते तर त्यात स्त्री व्यक्तिरेखा एकदम ठसठशीत असल्या असत्या. उदाहरणार्थ ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमाच्या वेळी विद्या बालनचे सीन जास्त होते, पण सिनेमासाठी ते पूरक ठरत नाहीत हे आमच्या लक्षात आलं. चार्ली चॅपलिनचं यासाठी उदाहरण देता येईल. त्यांच्या सिनेमांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा फारशा उठावदार नसायच्या. त्या तशा असत्या तर ते सिनेमे आहेत त्यापेक्षा वेगळे झाले असते.

ल्ल आजही तुमची आई तुमच्या स्क्रिप्ट्स वाचते का?

माझ्या लहानपणापासून मला आई गोष्टी सांगत आली आहे. त्या गोष्टींची शिदोरी आजही माझ्याबरोबर आहेत. प्रेक्षकांना नेमकं काय भावेल हे कदाचित माझी आई शब्दांत मांडू शकत नसली तरी तिला त्याचा बरोबर अंदाज असतो. एखाद्या गाण्यात किंवा कथेत काय चुकीचं आहे हे ती आजही सहजपणे सांगते. अर्थात तीच कशाला आम्ही आमचं कथानक अनेक लोकांना ऐकवतो. त्यांच्या प्रतिक्रियांनुसार दुरुस्त्याही करतो.

ल्ल तुम्ही सिनेमाचं एडिटिंग करताना खरंच स्वत:ला खोलीत बंद करून घेता?

इतरांसारखं, मी सिनेमाचं शूटिंग सुरू असताना सिनेमा एडिट करत नाही. सिनेमाचं संपूर्ण शूटिंग झाल्यावरच त्याच्या एडिटिंगला सुरुवात करतो. मी एकटाच एडिटिंगला बसतो आणि तेव्हा इतर कोणीही एडिटिंग रुममध्ये येत नाही. ‘पीके’च्या एडिटिंगसाठी मला जवळपास चार महिने लागले. एडिटिंगची एक फेरी पूर्ण झाल्यावर मी काही लोकांना ते दाखवलं. वेगवेगळ्या लोकांनी जर त्यांना खटकणारी एखादी विशिष्ट गोष्ट लक्षात आणून दिली तर आम्ही ते सुधारायचा प्रयत्न करतो किंवा चक्क पुन्हा शूट करतो.

ल्ल ‘पीके’ या सिनेमाची निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं?

एक एक पायरी चढत जाणं हा प्रगतीचा नैसर्गिक टप्पा आहे. याचा अर्थ असा नाही की, मी माझ्या मित्रांपासून लांब पळतोय. माझ्या आधीच्या चित्रपटांचे निर्माते, विधू विनोद चोप्रा ‘पीके’चाही भाग आहेत. ते वेळप्रसंगी हात वर करून बाजूला होत नाहीत तर आर्थिक गरजेच्यावेळीही ते सदैव तत्पर असतात. त्यांनी बँकेत ठरावीक रक्कम भरत ठेवली होती आणि मला चेकबुक दिलं होतं. माझ्या आधीच्या सिनेमांच्या श्रेयनामावलीमध्ये माझं नाव नसलं तरी त्यांची निर्मिती मीच केली आहे.

ल्ल पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधून तुम्ही एडिटिंगचं शिक्षण घेतलंत. तुम्हाला दिग्दर्शनाची गोडी तिथेच लागली का?

एफटीआयआयमध्ये मी दिग्दर्शनाच्या कोर्ससाठी अर्ज केला होता. पण, माझी त्यासाठी निवड झाली नव्हती. एकाने मला एडिटिंगचा कोर्स करावं असं सुचवलं. त्या कोर्ससाठी फार कमी जण या विषयाची निवड करतात. एडिटिंग म्हणजे काय हे मला अजिबात माहित नव्हतं. एडिटिंग शिकणं हे माझ्यासाठी एका वेगळ्या अर्थाने वरदानच ठरलं असं वाटतं. त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. एखादा सिनेमा हा लेखनाच्या आणि एडिटिंगच्या टेबलवरच तयार होतो. एखादा एडिटर एकच सिनेमा दहा वेगवेगळ्या पद्धतीने एडिट करू शकतो. एडिटर म्हणून मी अनेक कथाबाह्य़ (नॉन फिक्शन) चित्रिकरणांचं (डॉक्युमेंट्रीज वगैरे) एडिटिंग केलं आहे. त्या कामांचा मला खूप उपयोग झाला. जेव्हा मी सिनेमा पाहतो तेव्हा त्यातील ध्वनीचं अस्तित्व चित्रप्रतिमेव्यतिरिक्त स्वतंत्रपणे अनुभवतो. कलाकारांच्या अभिनयाचाही स्वतंत्रपणे अनुभव घेतो. आणि मग त्या अभिनयानुसार काही वेगळी ध्वनियोजना गरजेची असेल तर ती करतो.

ल्ल मग एखाद्या सिनेमाचं एडिटिंग तुम्ही वेगळ्या प्रकारे केलं आहे का?

एकदा सिनेमाचं एडिटिंग झाल्यानंतर तो सिनेमा योग्यप्रकारे शूट अथवा एडिट झाला नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. सिनेमाचा भाग असूनही सिनेमॅटोग्राफी आणि संगीताचा दर्जा जसा ते वेगळं काढून ठरवता येतो तसं एडिटिंगच्याबाबतीत होत नाही. सिनेमाचं मूळ शूटिंग तुम्ही पाहिलं असेल तरच तुम्ही सिनेमाच्या एडिटिंगचं मूल्यमापन करू शकता. आम्ही ‘लगे रहो मुन्नाभाई’ दाखवला, तेव्हा कोणालाच क्लायमॅक्स आवडला नव्हता. त्यावर आमच्यात बरीच चर्चा झाली मग मी क्लायमॅक्समधली १८ सेकंद कमी केली आणि तोच क्लायमॅक्स त्याच लोकांना तो आवडला. प्रेक्षकांना किती आणि काय दाखवायचं हे एक चांगला एडिटर बरोबर ठरवतो.

ल्ल तुम्हाला लहान मुलांचा सिनेमा करायला आवडेल असं तुम्ही एकदा म्हणाला होतात. त्याशिवाय आणखी कुठल्या प्रकारचा सिनेमा करायला तुम्हाला आवडेल?

मला लहान मुलांचा सिनेमा करायला आवडेल. माझ्या चित्रपटाचं लेखन मी स्वत:च करत असतो त्यामुळे आतून स्फुरणाऱ्या मी कथानकांवर काम करतो. सध्या मी आकर्षक स्क्रिप्ट्सच्या शोधात आहे. उद्या जर एखादी कथा माझ्या मनाला भिडली, तर नक्कीच मला दिग्दर्शन करायला आवडेल.

(इंडियन एक्स्प्रेस ‘आय’मधून)