मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ३१ जानेवारी व रविवार दि. १ फेब्रुवारी असे दोन दिवस ‘रामायण महोत्सव’ आयोजित केला आहे.

रामायण आणि महाभारत हा आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. हा आपला श्रेष्ठ वारसा आनुवंशिक गुणदोषांसारखा आपल्या जडणघडणीचाच भाग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
रामायण हे तर आदिकाव्य! आपल्या संस्कृतीतला पहिलावहिला काव्यमय उद्गार! म्हणून तर वाल्मीकींना आदिकवी म्हणून गौरविले जाते. रामायणाच्या जन्माची कथासुद्धा मोठी विलक्षण आहे. तमसा नदीवरून स्नान करून आश्रमाकडे येत असताना अचानक क्रौंच पक्ष्याचे आर्त आक्रंदन वाल्मीकींच्या कानावर पडले. त्या दिशेला पाहतात, तर त्यांना एक अतिकरुण दृश्य नजरेस पडले. कुणी पारध्याने मारलेल्या बाणाने प्रेमात रममाण झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीपकी एकाचा वेध घेतला होता. तो पक्षी खाली पडून तडफडून मरण पावला होता आणि त्याचा जोडीदार त्याच्या वियोगामुळे कमालीच्या दु:खाने आक्रोश करीत होता. दु:खाने वाल्मीकींचे ‘मऊ मेणाहून’ असे हृदय व्याकूळ झाले, त्याचबरोबर पारध्याबद्दल संताप दाटून आला. दु:ख आणि राग यांनी उचंबळून आलेल्या हृदयाला प्रतिभेचा साक्षात्कार झाला आणि त्या आवेगात त्यांनी पारध्याला शाप दिला. तो शाप नेहमीच्या गद्य वाक्यात नव्हता; तर अनुष्टुभ छंदात साकारलेले ते पद्य होते! त्या काळापर्यंत छंदोबद्ध पद्यरचना फक्त वेदातच होती आणि वेद तर ईश्वराची निर्मिती मानली गेली होती. त्यामुळे वाल्मीकींची छंदोबद्ध वाणी ही लौकिक जीवनातली पहिलीच काव्यरचना ठरली. प्रतिभेचे हे अलौकिक वरदान मानवी समाजाच्या कारणी लावण्याची त्यांना प्रेरणा झाली. त्यांनी रामचरित्र काव्यबद्ध करण्याचे ठरवले. काव्य माणसाला अपूर्व आनंद देते आणि त्याच्याही नकळत त्याला सदाचाराचा उपदेशही करते. खरोखर वाल्मीकींचे रामायण युगानुयुगे आपल्यासाठी या दोन्ही गोष्टी करीत आले आहे. ‘रामायणासारखे श्रेष्ठ काव्य विश्वामध्ये दुसरे झाले नाही’ असे योगी अरिवद यांनी म्हटले आहे.
वाल्मीकींच्या रामायणाला ‘उपजीव्य काव्य’ म्हटले जाते. म्हणजे वाल्मीकींच्या रामायणाच्या आधारे इतर अनेक कवींनी साहित्यरचना केल्या. संस्कृत भाषेतले अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ हे ग्रंथ तर सुपरिचित आहेतच; त्याशिवाय रामायण तत्त्वदर्पण, रामायण तात्पर्यदीपिका अशा रामायणाचे सार सांगणाऱ्या कितीतरी रचना झाल्या. काव्ये आणि नाटके किती लिहिली गेली याची गणतीच अवघड आहे. भासकवीने प्रतिमा या नाटकात रामकथेचा वेगळा आणि स्वतंत्र विचार केला. दशरथाकडे वर मागून रामाला ऐन राज्याभिषेकाच्या वेळी वनात पाठवण्यामागे कैकेयीचा काय मानस होता याचा धांडोळा घेऊन कैकेयीकडे माणूस या नात्याने पाहण्याचा आणि तिच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न भासाने केला. भवभूतीने तर उत्तररामचरित या नाटकात रामकथेचा सुखान्त घडवून आणला आणि रामायणात सीतेवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला. कालिदासाने तर संपूर्ण रघुवंशाचेच गुणगान करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम केले.
रामायण इतके लोकप्रिय झाले, की भारतातातील सर्वच भाषांमध्ये रामायणे लिहिली गेली. िहदीतले तुलसीदासाचे रामचरितमानस, गुजरातीतले रामायणसार, तमिळमधले कंबरामायण, तेलगुमधले द्विपद रामायण, बंगालीतले कृत्तिवास रामायण, कन्नडमधले पम्प रामायण ही वानगीदाखल काही उदाहरणे! मराठीतले रामायण म्हटले की पहिले आठवते ते एकनाथांचे भावार्थ रामायण! दुसरे म्हणजे पांडित्य आणि लालित्य अशा दोन्ही गुणांचा समन्वय असलेले श्रीधरकवींचे ‘श्रीरामविजय.’ कविवर्य मोरोपंतांनी आपल्या प्रौढ आणि प्रगल्भ शैलीत रचली एकशे आठ रामायणे. ‘आधुनिक वाल्मीकी’ या पदवीचे धनी ग. दि. माडगूळकर यांचे गीतरामायण हा तर मराठी भाषेचा झळाळता अलंकारच आहे!
रामायण ही काही फक्त िहदूंची मिरासदारी नाही. जैन धर्माच्या परंपरेमध्ये विमलसुरीचे पउमचरित, रविषेणाचे पद्मपुराण, हेमचंद्राचे त्रिषष्टिशलाकापुरुषचरित हे ग्रंथ रामकथा सांगणारे आहेत. बौद्धांचे दशरथजातक हेही रामकथाच सांगते. अन्यही काही जातकग्रंथांमध्ये रामकथेचे वेगवेगळे संदर्भ येतात.
रामायण भारतापुरते मर्यादित कधीच नव्हते. बौद्ध धर्माच्या द्वारा ते अफगाणिस्थानपासून जपानपर्यंत सर्वत्र प्रचलित झाले आणि थायलंडसारख्या देशात अद्यापही प्रचलित आहे. ‘अयुथिया’ म्हणजे अयोध्या ही थायलंडची प्राचीन राजधानी. तिथले राममंदिरांचे संकुल प्रसिद्धच आहे. लोककलांच्या माध्यमातून आजही तिथे रामायण जिवंत आहे. कंबोडियामधील अंकोरवट या ठिकाणी रामायणावर आधारित अनेक शिल्पे दृष्टीस पडतात.
रामायणाच्या संदर्भात एक वेधक लोककथा वाचनात आली. रामाच्या उत्तरायुष्यातली ही कथा आहे. राम सिंहासनावर बसलेला होता. हनुमान पायाशी सेवेला सिद्ध होता. अचानक रामाच्या बोटातून त्याची अंगठी गळून पडली, ती घरंगळत गेली आणि जमिनीला असलेल्या छोटय़ा छिद्रातून आत गडप झाली. हनुमान अंगठीच्या शोधासाठी सूक्ष्मरूप घेऊन त्या छिद्रातून आत शिरला, तो थेट पाताळात पोहोचला. तिथे नागराज होता. हनुमानाने अंगठीची मागणी केल्यावर नागराजाने सेवकाला अंगठी घेऊन यायला सांगितले. सेवकाने एक तबक आणले. त्याच्यात पुष्कळ एकसारख्या दिसणाऱ्या अंगठय़ा होत्या आणि त्यांच्यामध्ये फारच सूक्ष्म फरक होता. हनुमान गोंधळला. तेव्हा नागराज म्हणाला, ‘‘अरे, प्रत्येक युगात राम जन्माला येतो आणि रामायण घडते. रामाची अंगठी पाताळात येणे ही रामाचा अवतार संपत आल्याची खूण असते.’’ कथेचा भावार्थ असा, की रामकथा वेगवेगळ्या स्वरूपात भारतात आणि भारताबाहेर युगानुयुगे चालत आलेली आहे. या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या काळातल्या रामकथांमध्ये बरेच बदलही झालेले आहेत. बौद्ध रामायणात सीता दशरथाचीच मुलगी मानलेली आहे, तर ‘सीताविजयम्’ या रामायणात सीतेने रावणाचा पराभव केल्याचा वृत्तांत आहे. पद्मविजयगणी या कवीच्या रामचरित्रात वेगळीच कथा येते. रामाच्या मृत्यूची खोटी वार्ता ऐकून लक्ष्मणाचा मृत्यू होतो. ते ऐकून दु:खामुळे राम संन्यास घेतो. आणि या सगळ्या प्रकारामुळे वैराग्य येऊन लव-कुश जैन धर्म स्वीकारतात!
रामायणाने केवळ कवी-लेखकांनाच प्रेरणा दिली. रामायणाने शिल्पकारांच्या प्रतिभेला आवाहन केले. त्यातून वेरूळच्या कैलास मंदिराच्या िभतीवर रामायण शिल्पातून साकारले. रविवम्र्यासारख्या श्रेष्ठ कलावंताने रंगरेषांच्या माध्यमातून रामायणातले कित्येक प्रसंग जिवंत केले आणि रामायण घराघरांत नेले. शास्त्रीय नृत्य आणि संगीत या कलांच्या द्वारे रामायणाचे अनेक आविष्कार झाले आहेत.
रामायण आपल्या समाजाच्या नसानसात इतके भिनले, की भारतीय लोकसाहित्य आणि लोककला दोन्हीही रामायणाच्या आधाराने फुलले, बहरले. ‘राम गं वेचितो कळ्या, सीता गं गुंफिते माळा’ अशा स्त्री गीतांनी राम-सीतेला पूर्णपणे आपलेसे केले. रामाचा मोठेपणा गाता गाताच सीतेवर झालेल्या अन्यायाने लोकमन गहिवरले. रामजन्मासारख्या उत्सवांमधून, रामलीलेसारख्या लोककलांमधून रामायण लोकांच्या जगण्याचा भागच बनले. रामायणाची मोहिनी आजही कायम आहे. दूरदर्शनवरील मालिका असोत किंवा ‘हनुमान’सारखे अ‍ॅनिमेशनपट असोत, त्यांच्या माध्यमातून रामायण बालमनाची पकड घेतेच आहे.
दुष्टसंहार करणाऱ्या रामाने तसेच शक्ती-बुद्धीचे प्रतीक असलेल्या हनुमानाने नेहमीच समाजाला प्रेरित केलेले आहे. आक्रमकांच्या अन्यायाविरुद्ध समाजाला दंड थोपटून उभे करण्यासाठी समर्थ रामदासांनी रामाचा जागर केला आणि मारुतीची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळात योगी अरिवद, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजधुरीणांनी रामाचाच आदर्श देशापुढे ठेवला.
रामायण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा किंवा केवळ राजकारणाचा विषय नाही. तो विविध अंगांनी समजावून घेण्याचा विषय आहे. ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक असे रामायणाचे वेगवेगळे पलू आहेत. त्यांची ओळख आपण करून घेणे अगत्याचे आहे. कारण त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल, नव्या जणिवा जागृत होऊन प्रबोधन होईल आणि मनोरंजन तर होईलच होईल! याच उद्देशाने मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ३१ जानेवारी व रविवार दि. १ फेब्रुवारी असे दोन दिवस ‘रामायण महोत्सव’ आयोजित केला आहे. डॉ. अरुणा ढेरे, प्रा. डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, प्रा. डॉ. अशोक मोडक, श्री. दाजीशास्त्री पणशीकर, प्रा. प्रकाश खांडगे अशा मान्यवर विचारवंतांची व्याख्याने, तसेच धनश्री लेले, डॉ. वरदा गोडबोले, सोनिया परचुरे अशा कलावंतांचे नृत्य-नाटय़-संगीतात्मक कार्यक्रम प्रस्तुत महोत्सवात सादर होणार आहेत. ‘ज्ञान-प्रबोधन-मनोरंजन’ करणारा रामायणाचा हा उत्सव सर्व रसिकांसाठी खुला आहे.
प्रा. डॉ. मंजूषा गोखले