lp49डोंगरदऱ्या, किल्ले, जंगलं पालथी घालून झाली आहेत. लेण्यांमधली शांतता अनुभवून झाली आहे. प्राचीन वास्तुकलेचे नमुने धुंडाळून झाले आहेत आणि तरीही घराबाहेर पडायचंय आणि नवीन काही अनुभवाचंय..?

पूर्वीच्या आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणामध्ये असलेल्या हैदराबादपासून ४० किलोमीटरवरची रामोजी फिल्म सिटी मराठी माणसांना माहीत आहे ती ईटीव्ही मराठी या चॅनेलमुळे. पण ईटीव्ही ही रामोजी फिल्म सिटीची केवळ एक छोटीशी बाजू म्हणता येईल इतक्या प्रचंड गोष्टी तिथे सुरू असतात. या सिटीच्या जवळपास दोन हजार एकर परिसरात बॉलिवूडचे सिनेमे, टॉलिवूडचे सिनेमे, टीव्ही मालिका यांचं शूटिंग सुरू असतं. मोठमोठे इव्हेंट करण्यासाठी मोठमोठी सेंटर्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचं संग्रहालय आहे. हे सगळं कमी होतं म्हणून की काय आता तिथे एक अ‍ॅडव्हेंचर पार्क सुरू झालंय. त्याचं नाव आहे, साहस- द रामोजी अ‍ॅडव्हेंचर लॅण्ड!
पर्यटनाची आवड असणारे काहीजण निसर्गाच्या सान्निध्यात रमतात. कुणाला ऐतिसासिक ठिकाणं साद घालतात तर कुणाला डोंगरदऱ्यांमधल्या वळणवाटा खुणावतात. कुणी तीर्थक्षेत्रांची कास धरतं तर कुणी न रुळलेल्या पायवाटा धुंडाळत फिरतं. पण या सगळ्याबरोबरच याच्याही पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याची, वेगळं काहीतरी थ्रील अनुभवण्याची इच्छा असलेला वर्ग असतोच. त्याच्यासाठी आहे हे ‘साहस अ‍ॅडव्हेंचर लॅण्ड.’ दक्षिण पूर्व आशियातलं ‘साहस’ हे सगळ्यात मोठं अ‍ॅडव्हेंचर पार्क आहे, तुम्हाला तुमच्या साहसाचा कस अजमावायचा असेल तर त्यासाठी या अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये जेवढय़ा अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत, त्या भारतात इतरत्र कुठेच एकत्रित मिळणार नाहीत, असा ‘रामोजी फिल्म सिटी’चा दावा आहे.
हाय रोप कोर्स, नेट कोर्स, पेंटबॉल, झोर्बिग, एटीव्ही राईड्स, माऊंटन बायकिंग, टार्गेट शूट रेंज (आर्चरी आणि रायफल शूटिंग), इनफ्लेटेबल्स (ह्युमन फूस बॉल, बॉडी झॉर्ब फाइट इत्यादी.), बंजी इजेक्शन ही सगळी lp50इथल्या साहसी खेळांची नावं. पण नावं आणि फोटोवरून त्यातला थरार नाही कळत. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. नेट कोर्स ही अ‍ॅक्टिव्हिटी घेतली तरी साधारण २० फुटाचा एक मजला असं दोन मजली नेट. खालचा मजला लहान मुलांसाठी, वरचा मजला मोठय़ा माणसांसाठी. तिथे एका टप्प्यानंतर दुसरा अशा साधारण दहा अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या असतात. वरवर बघताना ते सगळं एकदम सोप्पं वाटतं. पण नेटमध्ये शिरल्यानंतर एक एक टप्पा पार करताना अक्षरश: घाम निघतो. उभ्या दोऱ्या, त्यांना बांधलेले लाकडाचे ओंडके, एका ओंडक्यावर तोल सावरत उभं राहायचं, ती दोरी, तो ओंडका आणि आपण हलत असतो. एका हाताने ती दोरी पकडून तसाच तोल सांभाळत दुसऱ्या हाताने पुढची दोरी ओढायची. एक पाऊल पुढच्या ओंडक्यावर टाकायचं. आता एक पाय एका ओंडक्यावर, दुसरा पाय दुसऱ्या ओंडक्यावर दोन्ही हातांनी दोन्ही दोऱ्या पकडलेल्या आणि त्या दोन्ही त्या ओंडक्यांसकट हलताहेत. मग मागचं पाऊल पुढे टाकायचं. असं करत करत तो एक टप्पा पार करायचा. की पुढचा आणखी थोडा टप्पा.. गंमत म्हणजे तोल सांभाळता आला नाही, पडलात तरी तुम्ही साधारण एक फुटावर असलेल्या नेटमध्ये पडणार आहात, तुम्हाला काहीही लागणार नाहीये, तरीही प्रत्येकजण आपण पडू नये याचीच काळजी घेत lp51प्रत्येक टप्पा पार करत राहतो. एकाग्रता आणि शरीराचा तोल सांभाळणं या दोन्ही गोष्टींचा इथे कस लागतो. नेट कोर्सचे सगळे टप्पे पार करून तुम्ही खाली उतरता तेव्हा सगळा घाम गाळून तुम्ही एकदम हलकेफुलके, ताजेतवाने झालेले असता ते पुढच्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी!
पुढची अ‍ॅक्टिव्हिटी अर्थात हाय रोप. म्हणजे नेट कोर्समध्ये केलेल्या असतात तशाच बऱ्याचशा अ‍ॅक्टिव्हिटीज, पण आता इथे नेट नाही. साधारण २० फूट उंचावरचा दोरावर रॉक क्लायिबगसाठी वगैरे ट्रेकर्स वापरतात तसा बेल्ट बांधून आणि हूक अडकवून इथेही दहा टप्पे पार करायचे. नेट कोर्स केल्यावर आत्मविश्वास आलेला असतो आणि आणखी पुढचं नवं साहस करण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही एकदम आतूर झालेलं असतं. बेल्ट लावून, हूक अडकवून आपण अक्षरश: दोरावरून चालत जातो, तेव्हा तारेवरची कसरत या वाक् प्रयोगाचा खराखुरा अर्थ तर समजतोच आणि बेल्ट, हूक असलं काहीही न घेता हीच कसरत करणारी डोंबाऱ्याची पोरं कौतुकाने आठवायला लागतात. (हायरोप कोर्स करणाऱ्या सिनेमाप्रेमी माणसाला इश्क सिनेमात काजोलला भेटण्यासाठी बेल्ट न लावता आणि हूक न अडकवता एका दहा बारा मजली इमारतीवरून दोरावरून चालत नव्हे फिरत फिरत दुसऱ्या दहाबारा मजली इमारतीच्या दिशेने निघालेला अजय देवगण आणि आमीर खानही आठवायला हरकत नाही. हायरोप कोर्समधली जाणकार मंडळी खदाखदा हसली असतील तो सीन बघून) या अ‍ॅक्टिव्हिटीचा शेवट एकदम मस्त. बेल्टमध्ये स्वतला अडकवून आपण हवेत स्विंग करत जातो तेव्हा एकदम भन्नाटच वाटतं. असं काहीतरी पहिल्यांदाच lp52करणाऱ्या लोकांसाठी हायरोप अ‍ॅक्टिव्हिटी पहिल्या वेळी तरी इथेच संपते. तिचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला त्यातल्या त्यात सोपा, दुसरा थोडा अवघड आणि तिसरा आणखी अवघड. प्रत्येक टप्प्याबरोबर अर्थात हाय रोप आणखी हाय होत जातो. लेकिन मजा आता है..
पेंटबॉल अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे एकदम हॉलिवूडस्टाइल नौटंकी. तसा सेटच उभारलेला आहे तिथे. आता इथे तुम्हाला चक्क युद्ध खेळायचं आहे. त्यासाठी तुमच्या फटाफट दोन टीम केल्या जातात. (साहस अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये पेंटबॉलसाठी १२ हजार स्क्वेअर फुटाचा सेट उभारलेला आहे आणि एका वेळी १५ जणांची एक अशा दोन टीम हा गेम खेळू शकतात.) सुरक्षेसाठी त्यांना विशिष्ट पेहराव, मास्क, गॉगल वगैरे दिलं जातं. येस्स आणि तुम्हाला रंगांच्या गोळ्या भरलेल्या गन दिलेल्या असतात. दोन टीम्सचे अर्थात दोन रंग. भरपूर आडोसेबिडोसे तयार केलेले असतात आणि त्यांचा आधार घेत, लपतछपत गोळीबारी करायची. गोळी तुमच्या टार्गेटला लागली की फुटते, रंग पसरतो. की ती व्यक्ती बाद. जी टीम समोरच्या टीमचे जास्तीत जास्त लोक बाद करेल ती जिंकली. या गोळ्यांमधले रंग हानीकारक नाहीत, आणि सुरक्षेचे सगळे नियम त्यात पाळले गेले आहेत असं इथले प्रशिक्षक सांगतात.
पेंटबॉलमध्ये गोळीबारीचा सराव झाला की नेमबाजी आपल्याला खुणावायला लागते. आपल्याकडचा पारंपरिक धनुष्यबाण आणि नेमबाजी स्पर्धेत वापरतात तो ००० दोन्हीच्या साहाय्याने नेमबाजी करता येते. शिवाय रायफल शूटिंगही आहेच. धनुष्य किंवा रायफल काहीही हातात घेतलं तरी ते पेलणं आणि नेम साधण्यासाठीची एकाग्रता या दोन्ही गोष्टी आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
झोर्बिग आपण खूपदा टीव्हीवर बघितलेलं असतं. पण ते दिसायला जितकं मस्त तितकंच करायला पोटात गोळा आणणारं आणि केल्यावर अरे, वा आपण हे केलं, कमाल आहे, असं वाटायला लावणारं. एका विशिष्ट प्रकारच्या प्रचंड बलूनमध्ये हवा भरून त्यात दोघांना समोरासमोर पॅक केलं जातं आणि तो बलून खास तयार केलेल्या उंचवटय़ावरून हिरवळीवरून घरंगळत जातो. त्या घरंगळण्याचा कालावधी जेमतेम साताठ सेकंदाचाच असतो. म्हणजे तेवढाच वेळ तुम्ही घरंगळत जाता, पण ब्रह्मांड आठवणं म्हणजे काय ते त्या तेवढय़ा साताठ सेकंदात कळतं. पण हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. इनफ्लॅटेबल्स या अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही ह्युमन फूसबॉल, बॉडी झोर्ब फाइट या बलून्सशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी आहेत.
आपण एखादा बॉल जमिनीवर जोरात टाकला की तो उसळी मारून दुप्पट वेगाने वर जातो. ते उसळी मारून दुप्पट वेगात वर जायचं फिलिंग काय असेल याचा अनुभव घ्यायचा असेल तर बंजी इजेक्शन ही अ‍ॅक्टिव्हिटी मस्ट.
lp53
या सगळ्याचा कळस ठरते ती एटीव्ही राइड. थोडक्यात सांगायचं तर सुरक्षा जॅकेट, हेल्मेट वगैरे घालून रेसमध्ये असतात तशा टू व्हीलर, फोर व्हीलर चालवायच्या. त्यासाठी इथे जवळपास दीड किलोमीटरचा खास ट्रॅक तयार केलेला आहे. हा ट्रॅक ‘साहस’च्या संपूर्ण परिसराला फेरी मारून येतो. रस्त्यात वेगवेगळे अडथळे असतात. कधी मोठमोठे चढ तर कधी जोरदार उतार. कधी अचानक येणारी वळणं तर कधी चक्क पायऱ्या. तुमची गाडी त्या पायऱ्या चढत जाते तेव्हा हॉलिवूड- बॉलिवूड सिनेमांमधले पायऱ्या चढणाऱ्या- उतरणाऱ्या गाडय़ांचे सीन आठवल्याशिवाय राहत नाहीत. याच ट्रॅकवरून तुम्हाला सायकल चालवायची असेल तर त्यासाठी सायकलीही उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी छोटय़ा गाडय़ा आणि छोटे ट्रॅकही आहेत.
या अ‍ॅक्टिव्हिटीज करताना भूक-तहान लागली तर मधे मधे रिफ्रेशमेंट सेंटर्सही आहेत. प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीसाठी प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्याबरोबर असतात.
रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव सांगतात की साहसी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रामोजी फिल्म सिटीने ‘साहस- लॅण्ड ऑफ अ‍ॅडव्हेंचर’ ही नवीन अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली आहे. जागतिक दर्जाच्या सुरक्षा सुविधा या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज सशुल्क आहेत. वेगवेगळ्या कापरेरेट कंपन्यांचे ग्रुप ‘साहस’साठी यायला लागले आहेत. या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा थरार अनुभवतानाच एकाग्रता, स्वत:चा फिटनेस, स्वत:च्या शरीराचा तोल सांभाळणं, टीमवर्क हे सगळं अनुभवून ते परत जातात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आलेला असतो. एक नवीच सहजाणीव तयार झालेली असते. हे सगळं तुम्ही- आम्ही- सगळ्यांनी- मित्रमैत्रिणी, कुटुंबासहित अनुभवावं यासाठी ‘साहस’ची भूमी सज्ज झाली आहे.
वैशाली चिटणीस