सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या नवपंचमयोगामुळे समाजात मानसन्मान मिळेल.  नोकरी-व्यवसायात नव्या योजना आखाल. नव्या वर्षांचे नवे संकल्प तडीस न्याल. सातत्य राखणे आवश्यक! सहकारीवर्ग कामाची आखणी करण्यात हातभार लावतील. मित्रमंडळींच्या भेटीगाठींचे योग येतील. जोडीदारासमोर नव्या अडचणी उभ्या राहतील. आपल्या साहाय्याची त्याला गरज भासेल. कुटुंबाला शिस्तीसह प्रेमाच्या शब्दांचीही जरुरी आहे याचे भान असू द्या. बद्धकोष्ठतेचा त्रास वाढेल.

वृषभ चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तमयोगामुळे आपल्या भावना आणि प्रेम योग्य प्रकारे व्यक्त कराल. नवी स्फूर्ती, नव्या उत्साहाच्या भरात नव्या वर्षांसाठी नव्या योजना आखण्याची तयारी कराल. नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक पावले उचलाल. सहकारीवर्गाकडून लाभ होईल. जुने मित्रमंडळी भेटतील. जोडीदाराच्या परिश्रमाला हवे तसे यश मिळणे कठीण! त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंब सदस्य कामानिमित्त प्रवास करतील. कफ, खोकला सतावेल.

मिथुन चंद्र-बुधाच्या नवपंचमयोगामुळे भावना आणि विचार यांच्यात समतोल साधाल. व्यावहारिक ज्ञानामुळे आपला आणि इतरांचा लाभ करून द्याल. नोकरी-व्यवसायात अडीअडचणींची मालिका पार करत पुढे जाल. वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागावे लागेल. सहकारीवर्ग तंत्रज्ञानाची जोड घेऊन मदत करेल. नव्या वर्षांचे नवे संकल्प जिकिरीने पार पाडावे लागतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची चांगली छाप पडेल. उत्सर्जन संस्था, जननेंद्रियांचे आरोग्य जपा.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे कामाची आखणी, मांडणी आकर्षक पद्धतीने कराल. नव्या जोमाने कामाला लागाल. नोकरी-व्यवसायात नवे अधिकार प्राप्त होतील. नवे संकल्प सिद्धीस न्याल. सहकारीवर्गाकडून मोलाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवणे आपल्या हातात असेल. पाठ, मणका आणि मांडय़ा भरून येतील. अशक्तपणा आणि शीण जाणवेल. विश्रांती घ्यावी.

सिंह चंद्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे चंद्राच्या कुतूहलाला मंगळाच्या ऊर्जेची, उत्साहाची जोड मिळेल. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकारांचा योग्य वापर कराल. चुकीच्या गोष्टी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. सहकारीवर्गाला मार्गदर्शन कराल. मुलाबाळांची प्रगती समाधानकारक असेल. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील. गुडघ्याजवळील स्नायुबंध दुखावतील, फाटतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. काळजी घ्यावी.

कन्या यश, कीर्ती यांचा कारक रवी आणि कृतिशीलतेचा कारक चंद्र यांच्या केंद्रयोगामुळे संवेदनशील विषयांवर चर्चा कराल. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या बळावर नोकरी-व्यवसायात मानाचे स्थान मिळवाल. सहकारीवर्गाला साहाय्य कराल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या मदतीने नव्या कामाचा श्रीगणेशा कराल. जोडीदाराची साथ लाभेल.  कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना आनंद द्याल. मांडय़ा, गुडघे, पोटऱ्या भरून येतील. हलका व्यायाम आणि विश्रांती घेणे आवश्यक ठरेल.

तूळ मनाचा कारक चंद्र आणि ऊर्जेचा कारक मंगळ यांच्या समसप्तम योगामुळे नव्या वर्षांची सुरुवात नव्या जोमाने कराल. तंत्रज्ञानात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासयोग संभवतो. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारीवर्गावर निर्धास्तपणे जबाबदारी सोपवता येईल. जोडीदाराच्या मदतीने नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. कौटुंबिक वातावरणात ताणतणाव जाणवेल. आतडी आणि यकृताचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला तंतोतंत पाळावा लागेल.

वृश्चिक चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या लाभयोगामुळे नव्या वर्षांच्या नव्या खरेदीचे बेत आखाल. मनातील योजना अमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाची पोचपावती मिळेल. हितशत्रूंना योग्य शब्दात समज द्याल. सहकारीवर्गाच्या समयसूचकतेचा आस्थापनेला आर्थिक लाभ होईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करेल. कामाच्या व्यापामुळे पित्तप्रकोप होण्याची शक्यता आहे. आहार आणि विश्रांती यांकडे लक्ष द्यावे.

धनू बुद्धीचा कारक बुध आणि स्फूर्तीचा कारक नेपच्यून यांच्या लाभयोगामुळे आपल्या वाक्चातुर्याची झलक दाखवाल. जनसमुदायाची वाहवा मिळवाल. नोकरी-व्यवसायात सहकारीवर्गाच्या अनुभवाचे बोल कामी येतील. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकमेकांना सांभाळून घ्याल. मुलांच्या समस्या सामंजस्याने सोडवाल. कुटुंबातील ताण कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. डोळ्यांची जळजळ होईल. कोरडय़ा हवेचा त्रास होईल. काळजी घ्यावी.

मकर ग्रहणक्षमतेचा कारक चंद्र आणि ज्ञानाचा कारक गुरू यांच्या केंद्रयोगामुळे ज्येष्ठ व्यक्तींकडून चार गोष्टी नव्याने शिकायला मिळतील. परिस्थितीचा बाऊ न करता मार्ग काढत पुढे जाल.  सहकारीवर्गावर सर्वस्वी विसंबून न राहता आपले निर्णय घेऊन मोकळे व्हाल. जोडीदाराला अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कौटुंबिक कलह चर्चेने मिटवावे. गुडघा आणि त्याच्याजवळील शिरा , स्नायुबंध दुखावतील.

कुंभ वाचेचा कारक बुध आणि समुदायाचा कारक प्लुटो यांच्या युतीयोगामुळे सर्वाच्या हिताचा निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते पटतीलच असे नाही. सहकारीवर्ग उत्स्फूर्तपणे साहाय्य करेल. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नवे प्रकल्प, योजना मांडेल. नव्या वर्षांत नवे उपक्रम राबवाल. कुटुंब सदस्य जिकिरीने आपली भूमिका बजावतील. सर्दी, खोकला आणि पोटदुखी त्रासदायक ठरेल. वेळेवर काळजी घ्यावी.

मीन बुध-चंद्राच्या केंद्रयोगामुळे बौद्धिक वादसंवाद, चर्चा रंगातील. सभेवर आपला प्रभाव पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारीवर्गाशी जुळवून घ्याल. जोडीदाराच्या अडचणी संपुष्टात येतील. त्याला नव्याने सुरुवात करता येईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. पित्ताशयाचे आरोग्य जपावे. आहारावर नियंत्रण ठेवावे.