सोनल चितळे -response.lokprabha@expressindia.com
मेष : बुध-हर्षलचा नवपंचम योग बुद्धिवर्धक योग आहे. बुधाची बुद्धी आणि हर्षलचे अद्ययावत तंत्रज्ञान संशोधनासाठी  प्रेरक ठरेल. नोकरी-व्यवसायात परिश्रमाचे चीज होईल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना लहानमोठय़ा गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक! सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. मुलांच्या मागण्या पूर्ण कराल. जोडीदाराच्या कामकाजात अडचणी येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मूत्रविकार बळावल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

वृषभ : चंद्र-गुरूचा युतियोग हा दिशादर्शक ठरेल. वडीलधाऱ्या मंडळींचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या कामातील खाचाखोचा समजून घ्याल. सहकारी वर्गावर वेळेचे बंधन लावाल. लहान गोष्टींचा डोक्यात राग घालून न घेता त्याबाबत शांतपणे विचार कराल. भावंडांसह खेळीमेळीचे संबंध टिकवाल. जोडीदाराच्या त्रासाचा अंदाज घेऊन त्याला आपला आधार द्याल. अपचन आणि वाताच्या समस्या उद्भवतील. हलका आहार घ्यावा.

मिथुन : चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा नातेसंबंध आणि व्यवहार यांच्यात समतोल राखणारा योग ठरेल. भावभावनांचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्यातील सुसूत्रता लाभदायक आहे. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय घेऊन महत्त्वाच्या बाबी मार्गी लावाल. वरिष्ठांना आपले मत समजावून द्याल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदाराचा कामातील उत्साह वाखाणण्याजोगा असेल. भावंडांबद्दलच्या तक्रारी विसरून जाल. मूळव्याध इ. आजार बळावतील.

कर्क : शुक्र-शनीचा नवपंचम योग हा प्रतीक्षेचे चांगले फळ देणारा योग आहे. धीर सोडू नका. शुक्राचे कौशल्य आणि शनीची दूरदृष्टी यामुळे महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल. वरिष्ठांची साथ मिळाल्याने कामाला गती येईल. सहकारी वर्गावर पूर्णपणे विसंबून राहू नका. पर्यायी योजना तयार ठेवावी लागेल. मुलांच्या बाबतीत अनपेक्षित खर्च वाढतील. भावंडांच्या आठवणीत मन रमेल. जोडीदाराचे कष्ट वाया जाऊ देऊ नका. पित्त आणि वातविकार उद्भवल्यास विशेष काळजी घ्यावी.

सिंह : मंगळ-हर्षलचा नवपंचम योग हा उत्साहवर्धक योग आहे. परिस्थितीचा स्वीकार करून मार्गक्रमण आखाल. नोकरी-व्यवसायात अधिकारपदाचा मान राखाल. सहकारी वर्गाला योग्य ते संरक्षण मिळवून द्याल. वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल. महत्त्वाच्या बातमीची अजून वाट बघावी लागेल. मानसिक ताण न घेता मार्ग शोधाल. मुलांच्या बाबतीत हळवेपणा वाढेल. जोडीदार यश मिळवेल. भावंडांना साहाय्य कराल. रक्ताभिसरण संस्थेच्या कार्यात अडथळे येतील. वैद्यकीय तपासणी करावी.

कन्या : चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा योग आहे. नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना विलंब होईल;  पर्यायी व्यवस्था तयार असेल तर काम मार्गी लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाला योग्य असे मार्गदर्शन कराल. जोडीदाराचे कामकाज थंडावेल. मुलांच्या मेहनतीला शिस्तीची जोड द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. औषधोपचार आवश्यक!

तूळ : शनी-चंद्राचा युतियोग चिकाटी आणि मेहनत दर्शवणारा योग आहे. चंद्राच्या कृतिशीलतेला शनीची जिद्द पूरक ठरेल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित चढ-उताराला सामोरे जावे लागेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांना आपल्या कर्तव्याची जाण करून द्याल. पोटऱ्या व तळपाय दुखतील.

वृश्चिक : चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक योग आहे. आपल्या आचरणातून इतरांना प्रोत्साहन द्याल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्गाकडून विशेष साहाय्य मिळेल. सरकारी कामे धिम्या गतीने मार्गी लागतील. जोडीदाराच्या कामात यश मिळेल. मुलांच्या बाबतीत सुटकेचा नि:श्वास टाकाल. भावंडांसह नाते दृढ होईल. मन जुन्या आठवणीत रमेल. डोकेदुखी, पित्त आणि अपचनाचे त्रास संभवतात. काळजी घ्यावी.

धनू : चंद्र-नेपच्यूनचा युतियोग नव्या जोमाने रिंगणात उतरवणारा योग आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना इतरांपुढे मांडाल. नोकरी-व्यवसायात वाचन, लेखन, सादरीकरण यात बाजी माराल. वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता स्वत:ला कामात झोकून द्याल. कौटुंबिक पातळीवर हळवेपणा वाढेल. भावंडांना मदतीचा हात द्याल. जोडीदार यशाकडे वाटचाल करेल. मुलांचे हट्ट पुरवाल. अपचन आणि श्वासाचे विकार उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर : गुरू-चंद्राचा लाभ योग हा मार्गदर्शक योग आहे. आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयोगी ठरेल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे काही कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाच्या तक्रारींकडे बारकाईने लक्ष द्याल. जोडीदाराच्या कामकाजात अपेक्षित प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. नवे करार काळजीपूर्वक कराल. श्वसनाला त्रास आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता भासते.

कुंभ : रवी-चंद्राचा समसप्तम योग हा यशकारक योग आहे. अधिकार देणारा रवी आणि भावनांचा कारक चंद्र यांच्यात समतोल राहील. कर्तव्य आणि नातेसंबंध दोन्ही जपाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळवाल. सहकारी वर्गाला प्रशिक्षण द्याल. त्यांच्या समस्या सोडवाल. जोडीदार त्याच्या कामातील काही बाबींमुळे त्रस्त असेल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. मान आणि खांदे भरून येतील. योग्य व्यायामाची गरज भासेल.

मीन : चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा आनंददायी योग आहे. मेहनतीतील सातत्य टिकवा. धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामाला गती येईल. वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरावेत. गैरसमज होण्याची शक्यता! सहकारी वर्गाच्या कामातील अडथळे दूर कराल. जोडीदाराच्या कलाकौशल्याचे कौतुक होईल. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा निर्णय जाहीर कराल. भावंडांमधील दुरावा मिटेल. पाठ, मणका आणि छातीचे दुखणे बळावल्यास दुर्लक्ष करू नका.