रशीद अत्रे हे पाकिस्तानातले मातब्बर संगीतकार! गाण्यांच्या चाली बांधण्यातलं कसब आणि कर्तृत्व दाखवायला त्यांना पाकिस्तानात जेमतेम पंधराच वष्रे मिळाली. या अल्पकाळात त्यांनी घेतलेली गगनभरारी पाहून विस्मय वाटतो. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना त्यांना मृत्यूनं हिरावून नेलं. आपल्या वैशिष्टय़पूर्ण सुरावटींमुळे रशीद अत्रे हे नाव सिनेसंगीतशौकिनांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे.

भारतातल्या सिनेसंगीतशौकिनांना पस्तीस वर्षांचा विरह सहन करायला लावून मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँने प्रदीर्घ काळानंतर भारताला भेट दिली तेव्हा अवघा माहोल तिच्या उपस्थितीने भारावलेला होता. ‘मॉर्टल मेन इमॉर्टल मेलडीज’ या कार्यक्रमात ती कुठली गाणी सादर करणार याची उपस्थितांना उत्कंठा लागून राहिली होती. अभिनयसम्राट दिलीपकुमारने अस्खलित उर्दूत तिचा फ़ारुफ (परिचय) करून दिला. त्याला उत्तर देताना सद्गदित होत भारावल्या अंदाजात नूरजहाँ म्हणाली. ‘‘यहाँ आकर अपने पुराने, देरीना दोस्तोंसे जो प्यार और शफक़त मुझे मिली है, वो मेरे लिए एक अनमोल ख़ज़ाना है जो मेरी िज़्ादगी के आँखरी घडीयोंतक मेरे पास रहेगा. अल्लाह करें, दोनो मुल्कों के तआल्लुक़ात और बढे; और इतने संवर जाएं की हम लोग हमेशा न सही अक्सर मिल बठा करें.’’ कार्यक्रमात स्वत: संगीतकार नौशाद ऑर्केस्ट्रा कंडक्ट करीत होते. नूरजहाँने सर्वप्रथम नौशाद साहेबांचं ‘आवाज़्ा दे कहाँ है.’ हे गाणं सादर केलं आणि नंतर टाळ्यांच्या गजरात फ़ैज़्ा अहमद फ़ैजची ‘क़ैदी’ (१९६२) या चित्रपटातली ‘नज़्म’ सादर केली..
मुझ से पहली सी मुहब्बत
मेरे महबूब न मांग.
मने समझा था के
तू है तो दरख़्शाँ है हयात
तेरा ग़म है तो
ग़म-ए-दहर का झगडा क्या है?
तेरी सूरत से है
आलम में बहारों को सबात
तेरी आँख़ो के सिवा
दुनिया में रख़्ख़ा क्या है?
तू जो मिल जाए तो
तक़दीर निगूँ हो जाए
यूँ न था मने फ़कत
चाहा था यूँ हो जाए
‘आवाज दे कहाँ है.’ हे गाणं तिची भारतातली ओळख आहे हे विचारात घेऊन तिने जाणीवपूर्वक ‘आवाज दे कहाँ है’ं हे गाणं प्रथम निवडलं. एरवी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ती फ़ैज़्ासाहेबांच्या ‘मुझसे पहलीसी मुहब्बत.’ या भावस्पर्शी कवितेचीच निवड करताना दिसते. हे हळुवार गाणं तिच्या मर्मबंधातली ठेव आहे. संगीतकाराने तिन्ही सप्तकांत लीलया फिरणाऱ्या तिच्या आरस्पानी आवाजाचा कल्पकतेने उपयोग करताना या काव्याला जो मृदुमुलायम मोरपंखी ‘टच्’ दिला आहे तो केवळ लाजवाब आहे. फ़ैज़्ासाहेबांचं काव्य चालीत बसविणं सोपं काम नव्हतं. या काव्यात अस्ताई नाही आणि अंतराही नाही. मुळातच ते गीत किंवा गज़्ालसारख्या पारंपरिक फॉर्ममध्ये नाही. मनातल्या भावना आत्यंतिक पोटतिडकेनं मांडीत फ़ैज़्ासाहेबांनी आपल्या प्रियतमेशी साधलेला तो एकतर्फी संवाद आहे. काव्याच्या आशयात प्रखर सामाजिक जाणिवांचे भान तसेच आपल्या जबाबदारीची जाण आहे. चित्रपटात मात्र ही नज़्म प्रेयसी आपल्या प्रियकराला उद्देशून गातेय असं दाखविण्यात आले आहे.. संगीतकाराने आपल्या विलक्षण प्रतिभेने या गाण्याला अशा उंचीवर नेऊन ठेवलं आहे की हे गाणं मुळात ‘मेल व्हर्जन’ आहे हे सांगून त्यावर विश्वास बसत नाही. अत्यंत तरल चालीत बांधलेली व सुरेल आवाजात गायलेली ही काव्यरचना म्हणूनच अजरामर बनली आहे.. फ़ैज़्ासाहेबांच्या या संवेदनशील शब्दकळांना ज्या महान संगीतकाराने कमालीच्या मधाळ चालीत गुंफले आहे त्याचे नाव संगीतकार रशीद अत्रे..!

एकापेक्षा एक सरस कर्णमधुर गीतांची बरसात करणारे रशीद अत्रे पाकिस्तानातील प्रथितयश संगीतकार. ‘फिल्मफेअर’ पुरस्काराच्या धर्तीवर पाकिस्तानात दिल्या जाणाऱ्या ‘निगार’ पुरस्कारावर तब्बल तीन वेळा त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.
रशीद अत्रेंनी पाकिस्तानात मसूद परवेज़्ाच्या ‘बेली’ (१९५०) या उर्दू चित्रपटासाठी संगीतकार म्हणून सर्वप्रथम आपलं खातं उघडलं. अभिनेता संतोष कुमार ऊर्फ सईद मुसा रज़ा, अभिनेत्री सबिहा, मसूद परवेज़्ा (निर्माता-दिग्दर्शक) या सर्वाचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने ‘बॉक्स ऑफिस’वर सपाटून मार खाल्ल्यामुळे रशीद अत्रेंनी मुनव्वर सुलताना, पप्पू पुखराज, ज़ाहिदा परवीन यांच्याकडून गाऊन घेतलेली गाणी अक्षरश: वाया गेली.
यानंतर १९५३ साली रशीद अत्रेंना ‘शहरी बाबू’ हा नजीर-स्वर्णलता यांची निर्मिती असलेला पंजाबी चित्रपट मिळाला. रशीद अत्रेंनी या वेळी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात कसलीही कुचराई केली नाही. या चित्रपटात त्यांनी ज़ुबेदा ख़ानम या पाश्र्वगायिकेला सर्वप्रथम ब्रेक देताना ‘गल्लाँ सून के माही वे नाल मेरियाँ, दुपट्टा बेऽईमान हो गया’ हे भन्नाट गाणं तिच्या आवाजात सादर करून लोकप्रियतेचं शिखर काबीज केलं. या चित्रपटात जवळपास दहा गाणी होती. ही सर्वच गाणी कमालीची गाजली, मात्र ‘दुपट्टा बेऽईमान.’ची बातच वेगळी होती. पन्नासच्या दशकात ज़ुबेदा ख़ानमने असंख्य ‘यादगार’ गाणी गायली असली तरी ‘दुपट्टा बेऽईमान.’ या गाण्याची आठवण रसिकांच्या मनात अद्यापही ताजी आहे. भारतातल्या ‘बॉबी’ (१९७३) चित्रपटात ‘झूठ बोले कव्वा काटे’ या गाण्यात शैलेंद्रने गायलेल्या ‘तू मके चली जायेगी म डंडा लेकर आऊंगा’ ही ओळ ‘दुपट्टा बेऽईमान.’ या गाण्याच्या शेवटच्या अंतऱ्यावर बेतलेली आढळून येते. अर्थात याला प्रेरणा म्हणायचे की काय, हे सुज्ञ वाचकांनीच ठरवावे. इथे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना संशयाचा फायदा मिळू शकतो.
मात्र १९७४ साली प्रदíशत लक्ष्मी-प्यारेंनी संगीत दिलेल्या ‘दोस्त’ चित्रपटातल्या लता-रफीने गायलेल्या ‘आ बता दे के तुझे कैसे जिया जाता है’ गाण्याबाबत तसे म्हणता येणार नाही. कारण हे गाणं पाकिस्तानात १९६९ साली प्रदíशत ‘ज़्ार्क़ा’ या चित्रपटातल्या मेहदी हसन यांनी भावस्पर्शी अंदाजात गायलेल्या ‘ऱक्स ज़्ांजीर पहनकर भी किया जाता है’ या अरेबियन टेंपरामेंटवर आधारित नितांतसुंदर गाण्याची भ्रष्ट नक्कल आहे. गाण्यातली साम्यस्थळं लपविण्याची तोशीससुद्धा आपल्या संगीतकारद्वयीने घेतलेली दिसत नाही. ‘पहनकर पाँव में ज़्ांजीर भी, ऱक्स किया जाता है’ या ओळीतून गाण्याचं उगमस्थान लगेच समजतं.
‘ज़्ार्का’ या चित्रपटाची पाश्र्वभूमी मोठी रंजक आहे. १९६५ साली इराणचे शहा मोहंमद रज़ा पहेलवी अधिकृत दौऱ्यावर पाकिस्तानात आले असता त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी चित्रपटातील अभिनेत्री ‘नीलो’ला (आबिदा रियाज़्ा) नृत्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या वेळी हुकूमशहा जनरल अय्युबखानचे सरकार सत्तेत होते. तिने हा प्रस्ताव धुडकावला म्हणून अय्युबखान यांचा समर्थक असलेल्या कुख्यात नबाब कालाबागच्या हस्तकांनी तिचा अनन्वित छळ केला. तो अपमान सहन होऊन तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करून तिला वाचविले. नीलो मूलत: ख्रिश्चन होती. तिचं जन्मनाव सिंथिया अलेक्झांडर फर्नाडिस. तिचा पती रियाज़्ा शाहिद हा उत्तम पटकथाकार, गीतकार व लेखक होता. रियाज़्ाशी लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. १९५६ साली हॉलीवूडच्या ‘भवानी जंक्शन’मध्ये तिने छोटीशी भूमिका केली होती. नंतर तिने ‘साबिरा’ (१९५६) व ‘चंग़ेज़्ाख़ान’ (१९५८) या चित्रपटात खलनायिकेचे काम केले. ‘सात लाख’मध्ये विशेष भूमिका साकार करणाऱ्या या अभिनेत्रीला १९५९ साली ‘नागीन’ हा चित्रपट मिळाला व ती रातोरात स्टार बनली. १९६५ पर्यंत ती ‘टॉप’ची अभिनेत्री बनली होती. अशा प्रतिष्ठाप्राप्त अभिनेत्रीला भर मफलीत जाहीर नृत्य करण्याचे आमंत्रण देणे हे तिच्या मानसन्मानावर आघात करणारे आहे हे सत्ताधाऱ्यांच्या गावीही नव्हतं. रयतेला व कलाकारांना सतावण्याचा व त्यांना हवे तेव्हा आपल्या चाकरीत पाचारण करण्याचा जन्मसिद्ध अधिकार केवळ आपल्यालाच प्राप्त आहे, अशा मुजोर विचारधारेतून त्यांनी तिला आमंत्रित करून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला. रियाज़्ाने आपला जवळचा मित्र शायरे-अवाम (जनकवी) हबीब जालिबला नीलोवर झालेल्या अन्यायाची करुण कहाणी कथन केली. आपल्या बेधडक व निधडय़ा स्वभावाला अनुसरून जालिबने ‘नीलो’ नावाच्या कवितेतून तिची व्यथा आणि राज्यकर्त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. जालिबच्या काव्यामुळे सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले. या जनमताचा फायदा घेत रियाज़्ा शाहिदने १९६९ साली नीलोला मुख्य भूमिकेत घेऊन ‘ज़्ार्क़ा’ नावाचा चित्रपट काढला. वरकरणी चित्रपटाच्या कथेला ‘अरब-इस्रायल’ संघर्षांचं अस्तर लावलं होतं. मात्र कथानकाचा रोख मुख्यत: पाकिस्तानातल्या दडपशाहीवरच होता. संगीताची धुरा रशीद अत्रे यांच्या खांद्यावर होती. त्यांनी जालिबच्या ‘नीलो’ या मूळ कवितेत मामुली फेरफार करीत मेहदी हसन यांच्या आवाजात जे गाणं कंपोज केलं त्याचे बोल होते.
तू कि नावा़िक़से-आदाबे-ग़ुलामी है अभी
ऱक्स ज़्ांजीर पहनकर भी किया जाता है
याचा अर्थ, अद्याप तू गुलामगिरीच्या शिष्टाचारांपासून अनभिज्ञ आहेस वाटतं. अगं, वेडे तुला काय ठाऊक की पायात शृंखला घालूनसुद्धा नृत्य करता येतं म्हणून.. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता की, ‘ज़्ार्क़ा’ने हीरक महोत्सव साजरा केला. नीलो यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली. गाण्याला यातनातळाची पाश्र्वभूमी असल्याने रशीद अत्रे यांनी बंदिवानांना फटके मारल्यानंतर उमटणाऱ्या वेदनेचे ‘चीत्कार’ या गाण्यात अधेमधे पेरले होते. कॉपी करताना एल.पी.सारख्या प्रतिभावंताने गाण्यात शत्रुघ्न सिन्हाचे बेगडी आवाजातले सवंग संवाद घुसडून चांगल्या सुरावटीचा बट्टय़ाबोळ करून टाकला.
१९५६ साली दिग्दर्शक कमाल पाशाने पंजाबी चित्रपट ‘चन्न माही’चं संगीत रशीद अत्रेंवर सोपविलं. अत्रेंनी केलेली सर्वच गाणी हिट झाली. तरीही ‘बुंदे चांदी दे सोणे दी नथ लऽके आऽ जा हो बेलियाऽऽ’ या ज़ुबेदा बेग़मने गायलेल्या गाण्याची बातच और होती. अस्सल पंजाबी मातीचा गंध असलेल्या या अजरामर गाण्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला.
याच वर्षांत ‘सरफ़रोश’ पडद्यावर आला. यातल्या ‘ऐ चाँद उनसे जाकर मेरा सलाम कहना’ (ज़ुबेदा बेग़म), ‘ना ये दुनिया इसकी ना ये दुनिया उसकी है’ (मुनव्वर सुलताना-कोरस) ही गाणी लोकप्रिय झाली असली तरी ‘तेरी उल्फ़त में सनम दिलने बहोत दर्द सहे और हम चुप ही रहे’ हे ज़ुबेदा ख़ानमने गायलेलं सदाबहार गाणं कमालीचं लोकप्रिय झालं.
अभिनेत्री नीलोवर चित्रित केलेलं रशीद अत्रेंचं ‘सात लाख’ (१९५७) या चित्रपटातलं ‘आये मौसम रंगीले सुहाने, जिया नही माने, तू छुट्टी लेके आऽजा बालमाऽऽ’ हे ज़ुबेदा बेग़मने गायलेलं गाणं ‘हमेशाजवां’ गीतात गणलं जातं. यात नीलो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. गाणं जितकं लाजवाब तितकं या गाण्याचं पडद्यावरचं सादरीकरण ‘बाळबोध’ होतं. विशेषत: आशिक हुसन या नृत्यदिग्दर्शकाने तिच्याकडून ज्या स्टेप्स् चित्रपटात करून घेतल्या आहेत. त्या जर नीलोने १९६५ साली इराणच्या शहांसमोर सादर केल्या असत्या; तर ते आपल्या कुटुंबकबिल्यानिशी पळून गेले असते आणि फिरून त्यांनी पाकिस्तानात पाऊलही ठेवलं नसतं. थोडक्यात, पाकिस्तानातल्या चित्रपटात अभिनय आणि नृत्य यांच्याबाबत साराच आनंदीआनंद दिसून येतो.
फिल्ममेकिंगच्या तांत्रिक बाजू भारतीय सिनेमाच्या पासंगालाही पुरणार नाहीत इतक्या सुमार दर्जाच्या असत. ‘सात लाख’ या चित्रपटात ‘सितमगर मुझे बेवफ़ा जानता है, मेरे दिलकी हालत ख़ुदा जानता है’ हे कौसर परवीनचं अत्यंत श्रवणीय व हळुवार गाणं जबरदस्त हिट ठरलं. चित्रपटातली बहुतेक सर्व गाणी सफ़ुद्दीन सफ़ यांनी लिहिली होती. ‘सात लाख’च्या संगीतासाठी रशीद अत्रेंना पहिला ‘निगार पुरस्कार’ मिळाला.
भारत आणि पाकिस्तानचा विषय निघताच तुलना परिहार्यपणे होतेच. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचा जीव आणि ‘कुवत’ समृद्ध भारतीय िहदी सिनेमाची बरोबरी करण्याइतपत दर्जेदार नक्कीच नाही. त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तरीही भारताच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करण्याची परंपरा पाकिस्तानातल्या सिनेसृष्टीने इमाने-इतबारे निभावलीय. १९५३ साली भारतात फिल्मिस्तानचा ‘अनारकली’ रिलीज झाला. यात जवळपास १३ गाणी होती. ‘अनारकली’चे संगीतकार होते सी. रामचंद्र व बसंत प्रकाश. बसंत प्रकाश यांनी या चित्रपटात दोन गाणी कंपोझ केली होती. त्यातलं ‘आ जाने-वफ़ा आ’ हे गाणं तसंच ठेवून ‘ऐ रात ठहर जाना, यूं ही न गुज़्ार जाना’ हे गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. ‘अनारकली’तील सर्वच गाणी सहा दशकांनंतरसुद्धा आजही सदाबहार आहेत. पाकिस्तानात नूरजहाँला घेऊन दिग्दर्शक अन्वर कमाल पाशाने ‘अनारकली’ बनविला. या ‘अनारकली’ला ही दोन महान संगीतकार लाभले होते. सुरुवातीला मास्टर इनायत हुसन यांच्यावर संगीताची जबाबदारी होती. अचानक दिग्दर्शकाचे आणि मास्टर इनायत हुसन यांचे बिनसल्याने रशीद अत्रे यांनी संगीतकार म्हणून सूत्रे हाती घेतली. हा योगायोग म्हणावा की भारतातल्या ‘अनारकली’च्या ‘ऩक्शे-कदम’वर चालण्याचा प्रयास होता, ख़ुदा जाने!
पाकनिर्मित ‘अनारकली’त एकूण आठ गाणी होती. तीन इनायत हुसन यांची व उर्वरित पाच गाणी रशीद अत्रेंनी स्वरबद्ध केली होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व आठही गाणी नूरजहाँनेच गायली होती. यात एकही ‘पुरुष-गीत’ नव्हते हे विशेष. भारतातल्या ‘अनारकली’त हेमंत कुमार यांच्या ‘सोलो’ आणि ‘डय़ूएट’ दोन्हीं प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. परंतु मॅडम ‘नूरजहाँ’च्या प्रभावाखाली दिपून आणि दबून गेलेल्या दिग्दर्शकाला हे कसं सुचणार? हा चित्रपट पाकिस्तानात बऱ्यापकी चालला इतकंच.
रशीद अत्रेंच्या गाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची दोन गाणी सर्वाधिक श्रवणीय व सुमधुर झाली होती.. ‘बांवरी चकोरी करे, दुनियासे चोरी चोरी, चंदासे प्यार.’ आणि ‘कहाँ तक सुनोगे कहाँ तक सुनाऊं हज़ारों ही शिकवे हैं क्या क्या बताऊं.’ या दोन गाण्यांनी भारतातल्या कानसेनांनासुद्धा भुरळ घातली होती. यातलं ‘कहाँ तक सुनोगे कहाँ तक सुनाऊं’ या गाण्याची सुरावट आणि ऑर्केस्ट्रेशन इतकं प्रभावी आहे की वारंवार ऐकण्याचा मोह आवरत नाही.
डब्ल्यू. झेड अहमदचा ‘वादा’ (१९५७) हा रशीद अत्रेंनी संगीतबद्ध केलेला व कौसर परवीनच्या गाण्याने नटलेला सुपरहिट सिनेमा होता. यात कौसर परवीनने शराफ़तअलीबरोबर गायलेलं ‘बार बार बरसे मोरे नन मोहे कैसे मिले चन. कांसे कहूं आहें भरुं’ हे सर्वाधिक कर्णमधुर गाणं होतं.
दिग्दर्शक ज़्ाफ़र मलिकचा ‘मुखडा’ हा पंजाबी चित्रपट १९५८ साली रिलीज झाला आणि रशीद अत्रे यांनी आपल्या बहारदार संगीताची ‘सौग़ात’ रसिकांना पुन्हा एकदा अर्पण केली. या संगीतप्रधान चित्रपटात एकूण बारा गाणी होती. ‘दिला ठहर जा यार दा नज़ारा लण दे’ हे गाणं मुनीर हुसेन व ज़ुबेदा ख़ानम यांच्या आवाजात दोन स्वतंत्र गाण्यांच्या स्वरूपात होतं. ज़ुबेदा ख़ानम ने गायलेलं ‘मेरा दिल चन्ना कांच दा खदोणा ए दे नाल जे तू दिल पर जाणां के वेखियनूं तोडणा देणीं.’ या लाजवाब गाण्याने आबालवृद्धांवर गारूड केलं होतं.
‘नींद’ (१९५९) या चित्रपटाने रशीद अत्रेंना दुसऱ्यांदा ‘निगार पुरस्कारा’चा मान मिळवून दिला. ‘नींद’मध्ये नूरजहाँने गायलेले ‘तेरे दरपर सनम हम चले आये’ हे सदाबहार गाणं आजही आवर्जून ऐकलं जातं. याशिवाय नूरजहाँने नसीम बेग़मबरोबर कोरससह गायलेलं गीत ‘अकेली कहीं मत जाना ज़्ामाना नाजुक है’, ‘छन छन छन छन बाजे पायल बाजे’ व ‘जिया धडके सखी रे ज़्ाोर से’ (नूरजहाँ) आणि ज़ुबेदा बेग़मने गायलेलं ‘मुझ को जवानी बडी महंगी पडी रे’ ही सर्वच गाणी श्रवणीय ठरली.
अभिनेता संतोषकुमार याने १९६० साली ‘शाम ढले’ नावाचा चित्रपट दिग्दíशत केला. नायकाच्या भूमिकेत तो स्वत:च होता. गाणी तन्वीर नक़वी यांनी लिहिली होती व संगीत रशीद अत्रेंचं होतं. हा एक सर्वसाधारण चित्रपट होता. नसीमबेग़मने गायलेलं ‘सौ बार चमन महका सौ बार बहार आई दुनिया वो ही रौनक दिल की वो ही तन्हाई’ हे नितांतसुंदर गाणं दिलं होतं. ते आजही विस्मृतीत गेलेलं नाही.
याशिवाय पन्नासच्या दशकात अत्रेंनी ‘पासबान’ व ‘शोहरत’ (१९५७) ‘चंग़ेज़्ाख़ान’, जाने-बहार’, ‘बेग़ुनाह’ (१९५८), ‘सलमा’ व गुलफ़ाम (१९६०) यासारखे चित्रपट संगीतबद्ध केले.
रशीद अत्रे यांचा १९५० ते १९६० या दशकातला कलाप्रवास जितका दमदार होता, त्याहून अधिक ६०च्या दशकातली कारकीर्द प्रभावी व नेत्रदीपक होती. रशीद अत्रे यांची साठच्या दशकातली लोकप्रिय गाणी कोणती? त्यांचं जन्मस्थान कुठलं? शिवाय अत्रे या आडनावामागची पाश्र्वभूमी, भारतीय सिनेमाशी त्यांचे असलेले ऋणानुबंध, गाजलेल्या गाण्यांचा परामर्श. इ. गोष्टींचा सविस्तर ऊहापोह पुढच्या लेखात. तोवर अलविदा!