lp50‘डेथ सर्टिफिकेट्सची कॉपी दिलीत ना? महिन्यानंतर तुम्हाला रेग्युलर रक्कम मिळेल.’ किंवा नॉमिनेशन बदलायचे असल्यास तो कॉलम भरा किंवा तत्सम बाबी. प्रत्येक ठिकाणाहून नवनव्या सूचना गेले दोन महिने झाले ऐकत आले. त्या बाबींच्या पूर्तता करण्याकरता घालावे लागणारे हेलपाटे, कॉपीज, हे आणा, ते आणा यामुळे बेजार झाले. 

मी स्वत: रिटायर्ड. साठी केव्हाच उलटून गेलेली. त्यामुळे कायद्याचे पालन करताना मन केव्हाच घट्ट केले! करावे लागले. किती म्हणून सांगू? ज्या ठिकाणी दोघांची नावे होती, त्यातले एक नाव कायमचे गळले.. त्यामुळे तो ‘कढ’ जिरवताना आलेले हुंदके, सार्वजनिक ठिकाणी.. त्याचे प्रदर्शन हो.. इतरांच्या दृष्टीने ‘प्रदर्शन’च! भावनिक नातं कोण समजून घेणार? अश्रू पुसून समोरच्या खिडकीतल्या इवल्याशा काचेच्या वर्तुळातून हवे ते उत्तर, प्रश्न यांची जुगलबंदी.. अपरिहार्य!
‘योगी! स्वत:ला सावर.. सावरावे लागणारच! त्यात तू धीराची.. एकटेपणानं तोंड द्यावे लागते. सांभाळ स्वत:ला, मदत लागली तर सांग’ मैत्रिणीचं शाब्दिक सांत्वन!
वठून गेलेल्या झाडाप्रमाणे अवस्था. केविलवाणी हुरहुर. जणू कायमचं आंधळेपण, पांगळं.. घायाळ मन, दृष्टीवर झापडं आलेली.. तरी नियतीनं मारलेला घाव.. किती.. भयाण.. आक्रोश.. निसटून गेलेली साथ.. कसं निभावू या जगात!..
उदासवाणे दिवस.. भ्रमिष्ट अवस्था.. त्याच्या जाण्यानं रितं. रितं. केलं!.. माझा आकांत, आक्रोश. प्यावा लागतो. गुदमरते. गुदमरून जीव जातोय. मी भोगते. त्या वेदना हेच प्रारब्ध!
कारण दिवाळी.. लाखो तारे आकाशात. पण माझा तारा.. आढळत नव्हता. लोकांच्या घरी हजारो पणत्यांचा उजेड.. नाना रंगी फटाके, कपडे, आतषबाजी! फटाक्यांचे विविध आवाज. अंधाराला उजळून टाकलं असताना माझं हृदय मात्र चुपचाप रडत राहिलं. कुण्णा कुण्णाचं माझ्या रडण्याकडे लक्ष नव्हतं. घरात इकडे तिकडे फेऱ्या घालून दमले.
तेरा दिवसांपूर्वी माझ्या साथीदारानं इहलोकीची यात्रा संपवली. त्याची ‘तेरवी’ करणं नशिबी आले. आजूबाजूला दिवाळीची जय्यत तयारी. फराळ, खरेदी, कपडय़ाची चंगळ, संमिश्र वासांनी आसमंत दरवळून टाकलेला.
जून-जुलै हॉस्पिटलच्या इकडून तिकडे केलेल्या वाऱ्या. ह्य़ा टेस्ट.. त्या टेस्ट! जीव मेटाकुटीला आलेला. पैशांची ओढाताण, लागणारा पैसा उभा करायचा, वाहन आणायचे, मग डॉक्टर.. हॉस्पिटल.. झिजून झिजून गोरेपान शरीर सुकत चालले. गंभीर आजार म्हणावा तसा होता आणि नव्हता. वयपरत्वे शरीराची झीज, खाणं-पिण्यावरची वासना उडत चाललेली! नुसती औषधं, गोळय़ा वेळच्या वेळी घेऊन भागत नसते! पोटात अन्नपदार्थ रिचवावे लागतात. ते पचनी पडायला. का.कु. करणे, नुसत्या तरल पदार्थावर ‘जीव’ जगवायचा! ही कुठली चाहूल. हसून.. खेळून. दिमाखात, आनंद. रोजचे मरण मरणारा तो ‘आनंद!’ नव्हे. माझा ‘वसंत’ त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणारा.. ‘आनंद’चा हा ‘हिरो’ नव्हता का?
एकटाच जायचा. शेवटी चक्कर येत, झोक जायला लागला त्या वेळी तयार झालेला. ‘नको, मी जाईन एकटा’ हाच हेका! कुठचा रोग नव्हता, मग शेवटी पाठीत पाणी झाल्याचे निदान. ते काढण्याकरता हॉस्पिटल, तिथला मुक्काम! पाणी तर निघाले. अंगावर सुजेचा मागमूस नाही. औषधपाण्याने. सतत भूक लागायची. वेळी, अवेळी, रात्री-बेरात्री! सप्टेंबर महिना उजाडला. हळूहळू गुंगीचं प्रमाण वाढलं. खाणं नकोसं झालं. ‘तू खा, तू जेऊन घे’ मला नको. हाताला धरून, स्टुलावर आंघोळ. चहा नाश्ता. शेवटी उरले ते स्पंजिंग. चहाबाज नव्हता. कुठं अर्धा कप दूध, लिंबूपाणी, टोमॅटो सूप. सर्व घेईनासा झाला. नकारघंटा! मी खचत चालले!
उठवून बसवले तरी, मी झोपतो म्हणून अंथरुणावर लवंडून जायचं. सतत डोळे बंद. त्यांची भूक संपत चालली. मला मात्र गोळय़ा. डायबिटीस. त्वचाविकार. म्हटलं तर पथ्यपाणी. जीव गलबलायचा त्याच्याशिवाय. घशाखाली घास उतरायचा नाही. डोळय़ांतले अश्रू न दिसू देता धीर देऊन दोन घास गिळताना कासावीस होत होते. हे खा. ते पी. आग्रह करून दमायची. ‘तुला, सांगितले ना नको म्हणून.. का, मागे लागतेस.’ रागाचा पारा चढायचा. इच्छा झाली तर बाहेरून जे हवं ते आणून द्यायची. शेवटी इच्छा मेली. ऑक्टोबर उजाडला.. डोळे बंद पापण्याआडून. क्वचित घरंगळणारे अश्रू टिपायची. ‘काय होतेय. डॉ. ना बोलावू! कुणाला बोलवायचे. त्रास होतोय?’ प्रश्नांची सरबत्ती.
आजवरच्या ‘हिरो स्टाइल’. सर्वाशी हसूनखेळून. अमाप शिक्षणाचा तोरा, चेहऱ्यावरचे तेज लोपत चालले. घरात इंजिनीअर असल्याचे प्रत्यंतर! मोडकी वस्तू धडकी व्हायची. ‘मी. आहे.. म्हणून गमजा. पैसे द्यावे लागतील तेव्हा कळेल’ हे ठरलेलं..
हळूहळू आवाज अस्पष्ट, घोगरट. बोललेलं मला समजेना. तेव्हा चिडलेला! त्यामुळे ताणतणाव! दिवसा नीज नाही की रात्री झोप नाही. या चक्रात माझं संतुलन! प्रकृतीवर होणारा परिणाम! गुंगीत असल्यामुळे बाहेरून काही आणण्याकरता जावे लागले की घरात एकटा माणूस!. काही विपरीत घडले, पडला बिडला तर. चिंता. सगळं जागेवर सुरू झाल्यामुळे. पंधरा दिवसांत. घरच्या बाईवर भिस्त अखेर.. शीण येऊ लागला. शरीरानं, मनाने थकले.
नातेवाइकांची भेटायला ‘रीघ’. थोडंसं बोलला तर ठीक!. नाहीतर. खुणेनं. सतत समोर राहा, जाऊ नको.. इतके-तिकडे झाले की घोगऱ्या आवाजाने हाक मारणे सुरू! घरातले आवश्यक तर करायला पाहिजे! साधं आंघोळ, पूजा करते. तो चलबिचल. अखेर एक तारखेला अकरा वाजता. मला खायचे नाही, मला कंबरेतून वाकता येत नाही, आडवे कर. शेजाऱ्यांच्या मदतीनं झोपवले. त्याआधी स्वत: करायला. उठायला. गेला नि ‘धपकन्’ दिवाणावरून खाली. अस्ताव्यस्त पडल्यावर माझी तारांबळ, घाबरगुंडी. अशीच मदत घेऊन झोपवले. झालं.. तेच आडवेपण. अखेपर्यंत. शब्दांत सांगणे कठीण!
तरल पदार्थ देऊ केले. चमचाभर जाते न जाते तोच ‘नको’.. त्याआधी चार दिवस असंबद्ध बडबड! कोणाकोणाची नावे. कंपनीतले कामगार, त्यांवर डाफरलेले स्वर! नातेवाइकांचे. आगा ना पीछा, समजेना, दुर्लक्ष केले की ‘माझी बडबड वायफळ वाटते.’ वगैरे. सगळे जण, त्यांची भावंडं. त्यांच्या लेकी, सुना.. नातवंडं भेटले. सर्वाचेच धीर खचले. अखंड अश्रुपात सुरू!
सर्वाना आशीर्वादाकरिता उठलेला हात. माझ्याकडं बघून हिला त्रास होतो. माझं करावं लागतं. कसं होईल, कोण बघणार हिच्याकडं!’ ही चिंता..
‘काही काळजी करू नका. आम्ही आहोत.’ एवढं आश्वासन, बाकी शून्य!.. ते शून्य मला भयावह वाटू लागलं.
‘लौकरात लौकर इथले विकून टाकू. तुला तुझ्या भावाकडं सुपूर्द केले की मला हायसे वाटेल. तिथं काही होवो.’ सर्व सांभाळून ठेव. कुणी तुझा गैरफायदा घेतील! विश्वास ठेवू नकोस. माझ्या माघारी तुझं कसं! तू अशी आजारी. धडपडत असते. ती धडपड सध्या थांबली. वगैरे.
‘गप्प बसा होऽ पुरे. आराम करा.’ माझी दटावणी नि डोळय़ांतले अश्रू न दिसू देता. बोलणे कष्टप्रद.. ‘आता जास्त त्रास देणार नाही. लौकरच मी जाणार’ वर हे बोलणं, ज्यामुळे मनावर ओरखडा पडायचा. करता. करता. रात्री-बेरात्री तो दिवा बंद कर, टी.व्ही. बंद कर. तू वाचू नको’ वगैरे. सगळं बंद असताना.
तीन-चार दिवस बोलणे बंद. जवळ गेल्याशिवाय शब्द कळेना. बोलायचंय बरंच काही, पण बोलू शकत नव्हते.. तगमग. जवळ जावे तर स्वत: कमरेपासून हलून मला बसण्याकरता जागा करून द्यावी. हातात हात घेतले की क्वचित हसून तो हात घट्ट धरावा. मानेनं ‘जाऊ नको’चा इशारा.
अखेर संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितले. जे परिचयाचे होते.. ‘आजचा दिवस. किंवा उद्या. पुढचं सांगू शकत नाही’. त्या वेळी सर्वासमोर हमसाहमशी रडले. सर्वजण निघून गेले. त्या संध्याकाळपासून सुचेना. सर्व थंडावले. मी आसपास- मनाची घालमेल- काय करावे कळेना! कणाकणानं तिळतिळ तुटणारा जीव.. थरकाप होई! तास, मिनिटे. घटका. पळे. संपेना. ११-१०-२०१४- संकष्टी चतुर्थी!
रात्री बारानंतर खुर्ची त्यांच्यासमोर घेऊन बसले. झोपेच्या अधीन व्हायला गेलेली! पाणी चमच्याने. घरंगळले. आम्हीच ‘चारधाम’वरून आणलेली गंगा. जवळ तो इवलासा तांब्या. गडू! चहाचे दोन चमचे टाकले. जिभेनं चाटल्यासारखे केलं. घशात न जाता बाहेर पडले. रुमालने पुसले.
रस्त्यावर कुत्र्यांचे भुंकणे, केकाटणे. सामूहिकरीत्या. मध्येच एखादे भयाण भेसूर रडू लागले. आसमंत दणाणून गेले. जीव उडून जातो की काय? ‘घर घर’ कमी कमी होत गेली. यमाने चारही बाजूने पाश टाकायला सुरुवात केली. जागता पहारा, विकट हास्य कानांत. कानाचे पडदे फाटून जातील. रात्री अचाट शक्तींचा संचार वाढतो ते खरं वाटू लागलं. एकविसाव्या शतकातली सावित्री बनून सत्यवानाचे ‘प्राण’ वाचवायला थिटी पडू लागले. त्या आवाजात हा कमी कमी होणारा आवाज. म्हणता म्हणता ‘गंगाजल’ घशात न जाता खाली घरंगळले. हातात घेतलेला हात. बोटांत बोटं गुंतलेली. ती पकड घट्ट घट्ट होत गेली. बघता बघता ‘प्राणपंछी’ मुकेपणानं अनेक यातना भोगून उडून गेला. माझ्यासमोर हुलकावणी देऊन गेला.
हंबरडा फोडावासा वाटला. पण आवाज फुटेना. ओक्साबोक्सी, छातीवर पडून रडून घेतले. हाताची जुडी करून बोटात बोटं गुंफली. आताच झोप लागलेली. निस्तेज काया. नीटनेटका. स्वच्छ, भांगसुद्धा न विस्कटलेला.. नेहमीसारखा. झोपेतून उठला तरी वाटणार नाही असा! टीपटॉप राहायची सवय घरादाराला वेठीला. मला. lp51तैनातीत राहावंच लागायचं! सुहास बघ रे!’ म्हणताच ताडकन उठला. हाताची नाडी बघितली. समाधानाकरिता. ‘ताई! ते गेले. तू धीर सोडू नको. मी एकटा अपरिचित ठिकाणी. कुठं पुरा पडणार! सावर स्वत:ला! आत्तापर्यंत तू केलेस! ऊठ!’ म्हणून मला दूर केले.
‘मी एकटी पडले रेऽऽ घरात होता तो आधार केवढा मोठ्ठा! त्यांच्याशिवाय मी कशी राहू!’ केविलवाणे शब्द गळय़ांत. हुंदक्याने ठाण मांडले.
सर्वाना फोन केले. थोडय़ाच वेळांत सर्व आले. हे घडणारच होतं. माझं काय? सांत्वन कुणी आणि कसे करणार? ऊठ. सर्वजण येतील, स्वत: तयार राहा म्हणून तिथून उठवले.
जाणारा कुडी सोडून गेला. नश्वर देहाची किंमत शून्य! त्याला अखेरच्या ठिकाणावर पोहोचण्याची घाई! कालपर्यंत होता त्याचा ‘देह’ संवाद साधरणारा. ‘नश्वर’ झाला.
घरातून बाहेर काढताना घराचा ‘स्लॅब’ कोसळेल असा माझा आक्रोश. आकांत, मोठमोठय़ाने रडणार होते का? बिल्डिंगच्या आवारात त्यांचे मरणोत्तर सोपस्कार सुरू! लांबून कुणाची वाट पाहायची नव्हती. हार-तुरे-फुले, शाली, तुळशीहार घालताना होणारी थरथर. पुन्हा दिसणार नाही. डोळय़ांत किती साठवणार?. जनसागर. कुणी दिसेना. दिसत होता माझा प्रियकर. नवरा, जो मला सोडून गेला. पुन्हा दर्शन घडणार नव्हतं!
‘मला, एकटं टाकलं रंऽ!’ म्हणून रडं थांबेना. सर्वानी दर्शन घेतले. त्या क्षणी वाटले. मला पण घेऊन जा. तुझ्याबरोबर!. नाही, तसं घडलं नाही! ‘अ‍ॅम्बुलन्स’पर्यंत सोबत!. पुढं भुर्रकन निघून गेला. कधीही न परत येण्याकरता! नेहमीसारखा ‘बाय’ न करता.
त्यानंतर ‘दिवाण’ ओकाबोका. अस्तित्व संपले. सगळी आवराआवर. ‘आंघोळ कोण घालणार!’ म्हणताच ताडकन् उत्तरले.
‘माझी मी करेन!’ माझं सौभाग्य कुणी ओरबाडू नये ही माफक इच्छा! एकविसाव्या शतकातली रिटायर्ड, पुरोगामी विचाराची. समाजात राहायची, चालीरीती पाळायच्या! त्याला मर्यादा! आपल्यापुरतं उलटे सुलटे करतातच ना? आज माझ्यावर ही ‘वेळ’. उद्या आणखी एखादी.. ते कुणी थांबवू शकते का? नाही ना?
‘मणी-मंगळसूत्र’ गेले. कुंकू तर लहानपणापासून कपाळावर असतं! त्यानंतर ‘हे करायचे नाही, ते करायचे नाही.’ न संपणारी यादी! हेतुपुरस्सरपणे फेरफार होणारच! मागच्या शतकासारखं ‘वाळीत’ टाकले जात नसले तरी सण-समारंभ, हळदी-कुंकू, आमंत्रण नाकारणाऱ्या, सौभाग्यवती मिरवतात ते तिचं खच्चीकरण करण्याकरता! अशा ‘मस्तवाल’ बाईंवर ही वेळ येणार नाही, असं समजणाऱ्या. किती खोटं!
आजच्या काळात स्वरक्षणाकरता मंगळसूत्राचे गळय़ाभोवती आवरण, मगरमिठी जणू! तिचं काढून या अफाट जगात तिला लोटून दु:खावर डागण्या देत राहायचे.. ही कुठली रीत! अशा स्त्रियांना सांत्वनाची फुंकर घालून तिला उभे राहायला मदत करायची. विकृत मनाच्या माणसांची तिच्याकडं बघण्याची नजर.. एकटी ‘स्त्री’ सार्वजनिक मालमत्ता असते असे वाटणारे कमी का आहेत? पूर्वी विवाहितेकडं नजर लावण्याचे कमी ‘धाडस’ करायचे. आत्ता सर्रास. चिमुरडी ते म्हातारी मनानं तिचं ‘वस्त्रहरण’ करणे हा पुरुषार्थ समजणारे अधिक! पूर्णत: सबला होणारच नाही ती ‘स्त्री!’
जग पुढं गेलं. पण प्रत्यक्षात असा प्रसंग जिच्यावर आला तिच्यावर चालीरीती लादल्या जातात. सगळय़ा बंड करू शकत नाहीत. समाजात राहायचे ते नियम पाळतातच ना? नवरा गेला, आता तिनं असं राहावं. तसं राहावं. हा हट्ट का? तिचं तिला ठरवू द्या. आज पुष्कळसे सुधारले! अजूनही स्थित्यंतर घडायचे आहे. स्वरक्षणाकरिता काळय़ा मण्यांचे महत्त्व किती ते कळते. तेच ओरबाडून घ्यायचे!
स्वत: मनानं घट्ट होत राहिले. पाचशे मैलांचा प्रवास ‘रीती’चा! आईवडील नसलेल्या माहेरी केला. नेहमी सोडायला. न्यायला येणारा. खिडकीतून भिरभिरत्या नजरेनं त्याला प्लॅटफॉर्म पाहत होते. कुठं दिसेना. पर्समध्ये त्याचा फोटो, गळय़ात स्वरक्षणाकरता मंगळसूत्र.. नकली मणी मला आधाराचे वाटले. दोघांनी सोबत केली. भावांना पाहताच एकाकी पडलेली.. हा शब्द आठवेना. शब्दांत हरवणारी मी मुक्त झाले. थोडय़ा दिवसांनी भीषण परिस्थितीला तोंड देताना धीर येत राहील. त्या वेळी त्या काळ्या मण्यांची सोबत नक्कीच. ‘सुळकन्’ घरंगळेल.. त्याची सवय व्हायला वेळ लागणार! अश्रू माझेच आहेत. वेळी-अवेळी घरंगळतात. आठवणी ‘बेचैन’ करतात. जीव सोडेपर्यंत त्यांचं अस्तित्व माझ्याजवळ राहणारं. शरीरानं नसेल, मनानं माझ्याच जवळ आहे हे कटू सत्य पचवावे लागणार! भोगले ते भयाण होतंच ना?
योगिनी चाचड