वीस-बावीस वर्षांपूर्वी मी नारळी पौर्णिमेसाठी नारळ, गूळ, वेलची वगैरे साहित्य खरेदी करून परळच्या नाक्यावर टॅक्सी केली. रात्रीचा आठचा सुमार होता. आंबेकरनगर, परळ व्हिलेज येथे, म्हणजे आमच्या वसाहतीत उतरलो. टॅक्सी भुर्रकन निघून गेली आणि माझ्या लक्षात आले, माझ्या हातात सामानाची पिशवी आहे, पण बाहेर जाताना नेलेली अमेरिकन फोल्डिंग बॅग टॅक्सीतच राहिली. त्या बॅगमध्ये ब्लॉकच्या चाव्या होत्या. शिवाय एअर इंडियाचे कन्सेशन कार्ड, दोन गोल्डन बॉलपेन्स, माझे व्हिजिटिंग कार्ड आणि अंदाजे चारशे रु. आणि काही सुटे पैसे होते.
जड अंत:करणाने घरी आलो. घरात कुणालाही बॅग विसरल्याचे सांगितले नाही; देव्हाऱ्यात निरंजन आणि उदबत्ती लावून गणेशरायांना बॅग विसरल्याचे सांगितले. माझ्या आयुष्यात असे विसरल्याची ही पहिलीच घटना होती.
तासाभराने फोन खणखणला. मी रिसिव्हर उचलला. माझगाव पोस्ट ऑफिसजवळून एक हिंदी भाषिक गृहस्थांचा तो फोन होता. ते म्हणाले, ‘‘तुमची बॅग आमच्या ड्रायव्हरने माझ्याकडे दिली आहे. तुम्ही येथे येऊन ती घेऊन जा.’’ माझ्या व्हिजिटिंग कार्डावरून त्यांना नाव व फोन नंबर समजला होता.
रात्री ९.४५ ला मी माझा मुलगा तेथे पोहोचलो. ते गृहस्थ म्हणाले, ‘‘माझ्या ड्रायव्हरने तुमची टॅक्सीत विसरलेली बॅग माझ्याकडे आणून दिली आहे. पहा तुमच्या सर्व वस्तू वगैरे त्यात आहेत का?’’ पैशापासून सर्व वस्तू होत्या. म्हणून मी म्हणालो, ‘‘तुमच्या ड्रायव्हरला हे शंभर रु. बक्षीस द्या.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आम्ही अशीच माणसे कामावर ठेवतो की, जी प्रामाणिक आहेत.’’ त्यांच्याभोवती आणखी तीन-चार व्यक्ती होत्या. त्यावर माझा मुलगा प्रदीप म्हणाला, ‘‘असं करा, निदान आमच्यातर्फे तुम्हा सर्वाना चहा मागवा!’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘भाईसाब! तुम हमारे मेहमान है। सामने मेरा दूध का दुकान है। आप दूध पिके जाईए।’’ आम्हाला त्यांच्या वागणुकीचे आणि आदरातिथ्याचे कौतुक वाटले. आम्ही त्यांच्या दूध घेण्याच्या आग्रहास बळी न पडता पुन:पुन्हा त्यांचे आभार मानले आणि हसऱ्या चेहऱ्याने घरी परतलो.