वर्षअखेरीस प्रकाशित झालेला भविष्य विशेषांक हा खूपच मार्गदर्शक आहे. भविष्य शास्त्र आहे की थोतांड यावर अनेक वाद झाले आहेत आणि होत राहतील, पण त्याचा उपयोग मार्गदर्शक म्हणून करण्यास काहीच   lp13हरकत नाही, असे मला वाटते. आपण अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी कोणाचे ना कोणाचे तरी मार्गदर्शन घेतोच. तसेच भविष्याकडे पाहायला हरकत नाही. पण असेच होणार आहे म्हणून असेल हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीने भाग्योदय होईल म्हणून त्यावर अवलंबून राहू नये. आयुष्यातील कठीण प्रसंगांचा अंदाज आधीच आला तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर योग्य तो उपाय काढणे ज्योतिषाच्या आधारे शक्य होऊ शकते. आपल्या अंकातील मूलांक आणि विवाह या विषयाकडे त्याचदृष्टीने पाहावे लागेल. आयुष्यातील या महत्त्वाच्या निर्णयप्रसंगी ज्योतिष कामी येते. पण केवळ त्यात सांगितले आहे म्हणून एखादी घटना होईल, असा विचार करण्याऐवजी नेमक्या काय अडचणी असतील, त्या दूर करण्यासाठी काय करावे लागेल (वैदिक, धार्मिक अथवा तांत्रिक विधी सोडून) हे आपल्याला ज्योतिष शास्त्र सांगू शकते. त्यादृष्टीने या विषयाकडे पाहावे लागेल. आणि हे काम आपल्या अनेक लेखातून झाले आहे. असो. त्याच जोडीने ज्योतिष शास्त्र की थोतांड या विषयावर चर्चात्मक लेखदेखील वाचायला आवडतील.
-अनिल पाटील, औरंगाबाद.

गेमचेदेखील व्यसन लागू शकते…
कॅण्डी क्रश का खेळतात.. व्यसन. आपल्या समाजात व्यसन म्हटलं की ते पान, सिगारेट, तंबाखू, दारू याच गोष्टी समोर येतात. अॅडिक्ट म्हटलं की तो ड्रग अॅडिक्टच असतो अशी आपली समजूत आहे. पण गेमचंदेखील व्यसन असू शकतं आणि त्याच्या पुरता आहारी जाणे हे इतर व्यसनांइतकेच घातकी असते हे आपल्याला अजून कळले नाही. इतर व्यसनांची सुरुवात जशी चव तर घेऊन पाहू या पद्धतीने होते, तसेच lp15गेमच्या बाबतीत देखील आहे. विरंगुळा, चालना, मरगळ घालविण्यासाठी उपाय, करमणूक अशा लेबलांखाली गेम्सच्या विळख्यात अडकायला होतं. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर मुंबईतल्या लोकल प्रवासाचं घेता येईल. स्मार्ट फोन्सच्या आधीच्या जमान्यात लोकलमध्ये वाचन करणारे दिसायचे, गप्पा मारणारे दिसायचे पण आज काल जो तो स्मार्टफोनला चिकटलेला असतो. शेजारी काय सुरू आहे याचंदेखील भान राहणार नाही इतकं तुटलेपण या गेम्सनी दिल आहे. अर्थातच याची परिणती व्यसनाधीनतेत झाली नाही तर नवलच. गेम्स खेळण्याच्या आहारी जाणे, हेदेखील घातकी व्यसन आहे हे सर्वाना कळेल तो सुदिन.
अंकिता माळी, नांदेड.

देखणा आणि समर्पक विवाह विशेषांक
‘लग्नसराई’ विशेष हा अंक अतिशय देखणा आणि वर्तमान लग्नसोहळ्यांचे योग्य वर्णन करणारा आहे. सध्या सामान्य जीवन फक्त फिल्मी नाही तर टीव्ही सीरियलमयही झाले आहे, त्यामुळे स्वत:चे लग्नही तसेच lp14व्हावे, असे लग्नाळू मुलामुलींना वाटत असते आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने तशा सेवा पुरविणारे दिसतात. पण त्याबरोबरीने महत्त्वाचे असणारे विवाहपूर्व समुपदेशन मात्र दुर्लक्षित राहते हे खटकते. हल्ली लग्नाचे वय मुलामुलींचे वाढले आहे आणि त्यामुळे त्यांची अनेक बाबतीत मते /दृष्टिकोन पक्के झालेले असतात, जे दोघांच्या संवादात अडथळे निर्माण करू शकतात. पूर्वग्रहदूषित मनाने सुरू केलेला संसार हेलकावे खाऊ शकतो, त्यामुळे जितक्या काटेकोरपणे पत्रिका जुळविल्या जातात तितक्याच सजगतेने लग्नाआधीचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते, जे दोघांची पुढील वैवाहिक जीवनासाठी मानसिक, भावनिक तयारी करते. त्यामुळे फिल्मी लग्नसोहळ्यांसाठी जीव टाकणाऱ्यांनी विवाहपूर्व समुपदेशनाकडे नक्कीच गांभीर्याने पाहावे.
‘समृद्ध मुंबईसाठी..!’ हा मथितार्थ वर्तमान मुंबई शहराच्या समस्या आणि त्यावरील उपयांचे विशेषत: मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र उच्चाधिकार समितीची गरज विशद करणारे आहे. गेल्या दोन दशकात मुंबईच्या बकालपणात प्रचंड भर पडली आहे पण राज्य सरकार आणि मनपा या दोघांनीही त्याकडे साफ दुर्लक्ष केले. संपूर्ण मुंबई ही बिल्डरमाफियाला दत्तक दिल्यागत राज्यकर्त्यांचा आविर्भाव होता/आहे. आज राज्यात सत्ताबदल झाला आहे तेव्हा आता तरी मुंबई आणि मुंबईकर दोघांनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी स्वतंत्र उच्चाधिकार समिती ज्यात केंद्राचा सहभाग असेल, जर उपयुक्त ठरणार असेल तर ती गठित करावी आणि मध्यम वर्गाची मुंबई मध्यम वर्गाला परत गवसावी.
– माया हेमंत भाटकर,
चारकोप गाव, मुंबई, ई-मेलवरून

आपण सारेच विभूतिपूजक
हृषीकेश जोशी यांचा ‘देव आणि माणूस’ हा लेख आवडला. लेखकाने बरोबर वर्मावर बोट ठेवले आहे. आजकाल सगळीकडे केवळ अभिनिवेश दिसून येतो. अगदी नव्या पिढीचं माध्यम असणाऱ्या सोशल मिडियावर तर अशा अभिनिवेशी पोस्टनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज अथवा अन्य lp16एखाद्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे छायाचित्र पोस्ट करायचे आणि हजार तरी लाइक्स मिळायलाच हव्यात असा धमकीवजा गर्भित इशारा द्यायचा हे अगदी कॉमन झाले आहे. वाहनाच्या मागे बघतोस काय मुजरा कर असे संदेश असणारे स्टिकर्स तर हल्ली सर्रास दिसतात. अनेक वेळा ही वाहने तद्दन गावगुंडांचीदेखील असतात. पण हेच गावगुंड लोकोत्तर पुरुषांचे दैवतीकरण करून सर्वसामान्यांनाच लुबाडतात. तर दुसरीकडे आपले समस्त राजकीय नेते तर उठता-बसता ठरावीक नावांची लड उलगडत असतात. जयंत्या, पुण्यतिथ्यांना नमस्काराचे नाटक आणि अशा विषयांवर लिहिणाऱ्याचे साग्रसंगीत कौतुक सोहळे. होतं काय की ना लोकांना हे महापुरुष नीट कळतात ना त्यांचे दैवतीकरण करणाऱ्यांचा दांभिकपणा. – संजय चव्हाण, कोल्हापूर.

नव्या सदरांची उत्सुकता आणि जुने संपल्याची हुरहुर
डिसेंबर महिन्यातील शेवटच्या अंकात अनेक सदरांखाली समाप्त लिहिलेले वाचले आणि आपसूकच नव्या सदरांची उत्सुकता आणि जुने संपल्याची हुरहुर लागून राहिली. मागील वर्षांत डॉ. उज्ज्वला दळवी, हृषीकेश जोशी, डॉ. लता काटदरे, वैद्य खडीवाले अशांनी आम्हाला भरपूर वैचारिक खाद्य पुरवले. काशीनाथ जोशी आणि प्रशांत दांडेकर इंग्रजी मराठी भाषेचे विभ्रम मांडले. फॅशन, तरुणाई, भटकंती सर्वच विषयांवर वेगळा विचार देणारे लेखन वाचायला मिळाले. त्यामुळेच ते संपणार याची हुरहुर लागली, पण लोकप्रभा त्यांच्या परंपरेनुसार येणाऱ्या वर्षांत आणखीन दर्जेदार लेखन देणार याची खात्री असल्यामुळे नव्यांची उत्सुकतादेखील लागली आहे.
सुचित्रा भोसले, सोलापूर.

फेडररची ‘फोटीशॉपी दुनिया’ आवडली
‘लोकप्रभा’च्या २६ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली फेडररची ‘फोटोशॉपी दुनिया’ आवडली. स्वत:चे मार्केटिंग कसे नेमके आणि क्रिएटीव्ह पद्धतीने करावे याचे हे उत्तम उदाहरण. महत्त्वाचे म्हणजे हे सारे करताना त्याने सामान्य चाहत्यांचा सहभाग आपसूकच मिळवला. आपल्याकडील सेलिब्रिटी केवळ जमा झालेल्या गर्दीच्या हुल्लडबाजीवर टिमकी वाजवताना दिसतात. त्या तुलनेने हे काहीतरी वेगळे होते.
अजित कांबळे, अहमदनगर.

अंधश्रद्धेला चालना देणारा अंक
‘लोकप्रभा’ अनेक नावीन्यपूर्ण विषयांवर विशेषांक काढत असते. अर्थातच त्यातून इतर माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळतात. असे असताना केवळ सवंग लोकप्रियता आणि खप डोळ्यासमोर ठेवून अंधश्रद्धेला चालना देणारा भविष्य विशेषांक प्रकाशित करावा हे योग्य नाही. आपल्या परंपरेत हे बसत नाही. कृपया पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल.
– सुरेश पाटील, सांगली.

सामाजिक विषयांचादेखील विचार व्हावा..
‘लोकप्रभा’ नियमित आवडीने वाचतो. दत्तात्रेय विशेषांक आवडला. आपण सर्वच विषय कुशलतेने हाताळता. अशाच प्रकारे काही सामाजिक विषयांवरदेखील प्रकाश टाकावा अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने नदी जोडणी प्रकल्प, भारत-चीन संबधांचे अनेकविध पदर, भारताची परराष्ट्र नीती, क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागाचे योगदान अशा विषयांवरील लिखाण वाचायला आवडेल.
– मनोज ह. खरे, घाटकोपर (पूर्व), मुंबई .