वाचक प्रतिसाद : इंदूर येथील प्राचीन दत्तमंदिर

‘लोकप्रभा’ दत्त विशेषांक वाचला. खूपच आवडला. त्याअनुषंगाने वाचकांसाठी अजून दत्तमाहिती पाठवीत आहे.

‘लोकप्रभा’ दत्त विशेषांक वाचला. खूपच आवडला. त्याअनुषंगाने वाचकांसाठी अजून दत्तमाहिती पाठवीत आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंबे स्वामी अर्थात थोरले स्वामी महाराज) यांचे दोन शिष्य ज्यांना स्वत: स्वामींनी गुरुमंत्र दिला होता त्यापैकी वामनराव गुळवणी महाराज (पुणे) आणि श्री नाना महाराज तराणेकर (इंदूर) होत. वामनराव गुळवणी यांच्यानंतर डॉ. केशवराव जोशी महाराज यांनी वामनराव गुळवणी यांचे उर्वरित कार्य ते असताना पूर्ण केले. यांच्या संपूर्ण कार्यावर ‘केशव पासष्टी’ नावाचा ओवीबद्ध चरित्र मी लिहिले आहे. 

दत्त मंदिरांची आपण सुंदर माहिती दिली आहे. असेच एक प्राचीन दत्त मंदिर इंदूर येथे आहे. इंदुरात (तेव्हा मालवा रियासत होती) सुभेदार मल्हारराव होळकरांनी राज्य स्थापण्यापूर्वी दत्त मंदिर अस्तित्वात असल्याच्या उल्लेख मिळतो. त्यावेळी कान्ह (वर्तमान नाव खाण नदी) नावाची नदी होती. जिच्या परिसरात अवतीभोवती विपुल वृक्षसंपदा ज्यात वड, पिंपळ आणि औदुंबर आदींचे घनदाट जंगल होते. तेव्हा सरस्वती आणि चंद्रभागा या नदींच्या संगमावर दत्तात्रयांचे मंदिर असल्याचा उल्लेख मराठेशाहीच्या मोडी भाषेत असणाऱ्या बखरीत मिळतो. याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी साधना केली आणि जवळच असणाऱ्या जागेवर खेडापती मारुतीची स्थापना केली. आग्रा येथे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेब यांच्या नजरकैदेत होते तेव्हा तेथून सुटल्यावर ते व संभाजी महाराज याज समवेत काही काळ या मंदिर परिसरात संन्यासी वेशात राहिले होते. याचा उल्लेख सज्जनगडावरील प्रमुख सुरेश बुवा रामदासी यांनीसुद्धा केला आहे. दत्त मंदिर येथील शांत वातावरणात कधी काळी शिखांचे गुरूनानक देव यांनी ‘उदासी यात्रेत’ असताना संत सहवास केला होता. शंकराचार्य आपल्या आखाडय़ासह संन्याशांबरोबर नाशिक (त्र्यंबकेश्वर) येथून उज्जन सिंहस्थसाठी ओंकारेश्वर होत क्षिप्रा येथे जात होते. ज्यावेळी दत्त आखाडा यात सम्मितील असणाऱ्या नागा साधूंच्या आगमनाच्या वेळी येथे असलेल्या खुल्या चौकोनावर त्यांनीच दत्त मूर्तीची काष्ठ प्रतिमा स्थापना केली असावी. कालांतराने मंदिराचे वर्तमान स्वरूप निर्मित झाले असावे आणि तद्नंतर पाषाण प्रतिमा स्थापित झाली असावी.
या मंदिराचे अजून एक वैशिष्ठय़ म्हणजे, गाणगापूर येथे जर धार्मिक विधी विधान करताना जर काही ऊहापोह किंवा तिथी मतांतर झाले, काही असमंजस झाला तर इंदूर येथील तिथीस अंतिम मानले जाते. गुरुवार आणि दत्त पौर्णिमेला येथे भाविकांची अमाप गर्दी असते.
सुरेश कुलकर्णी, इंदूर, ई-मेलवरून

नेत्यांची झाडूझडती
‘झाडूझडती’ हा २८ नोव्हेंबरच्या अंकातील विनायक परब यांनी लिहिलेला मथितार्थ म्हणजे ढोंगी राजकीय नेत्यांची कानउघडणीच आहे. पंतप्रधान मोदींनी मनापासून ‘स्वच्छ भारत’ हा नारा दिला. कदाचित हे पहिलेच पंतप्रधान आहेत, ज्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. ‘चॅरिटी बिगिनस् फ्रॉम होम’ ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखविली आहे. परंतु काही स्वार्थी व प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या राजकीय मंडळींनी या मोहिमेचा गैरफायदा घेऊन स्वत:चं हसं आणि बदनामी करून घेतली आहे. या लेखातील छायाचित्रात स्पष्टपणे दिसते की स्वच्छ जागेवरच झाडू मारण्याचे नाटक हे राजकारणी करत आहेत.
सिंगापूरला फाइन सिटी म्हटले आहे. हे सर्वार्थाने खरे आहे. मी नुकताच तेथे जाऊन आलो. तेथील स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी आहे. सिंगापूरच्या विमानतळावरील प्रसाधनगृहात गेल्यावर आजवर इतके स्वच्छ प्रसाधनगृह असू शकते हे प्रथमच जाणवले. महत्त्वाचे म्हणजे तेथेच हे प्रसाधनगृह कसे वाटले याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी एक यांत्रिक सुविधा बसवली आहे. एक्सलंट, व्हेरी गुड, पुअर आणि बॅड असे चार पर्याय देण्यात आले आहेत. आपसूकच माझा हात एक्सलंट या बटनावर गेला. याबाबतीत अजूनतरी आपला देश खूपच मागे आहे याची जाणीव मात्र तीव्रतेने झाली.
याच अंकातील मराठी मालिकांच्या प्रोमोसंदर्भातील लेख वाचनीय आहे. या सीरियलवाल्यांना एकच नम्र विनंती की त्यांनी कमर्शिअल ब्रेक कमी करावेत आणि हनुमानाच्या शेपटीपेक्षाही लांबणारी मालिका करणे टाळावे.
भा. ल. हेडाऊ, नागपूर.

धाराशिवकरांच्या कार्याची ओळख
५ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातील ‘ध्येयवेडा अवलिया’ हा अभियंता मुकुंद धाराशिवकर यांच्या कार्याचा लेख वाचून धाराशिवकर यांच्या कार्याची ओळख झाली. भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या त्यांनी उभारलेल्या स्मारकाबद्दलची माहिती वाचून प्रत्येक अभियंत्याला ते बघावे असे वाटत आहे. धाराशिवकर यांचे लेख आम्ही ‘जलसंवाद’ मासिकात नेहमीच वाचतो. या माहितीबद्दल लेखिका सुलभा आरोसकर यांना धन्यवाद.
– वि. म. मराठे, संस्थापक, अध्यक्ष निवृत्त अभियंता मंडळ, सांगली. (ई-मेलवरून)

पूर्णसत्यी ‘अर्धविराम’ ते संभ्रमित ‘हॅपी एिण्डग’
‘फँड्री ते एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटांसंबंधीच्या विश्लेषणात्मक लेखात (लोकप्रभा, ५ डिसेंबर २०१४) उल्लेखल्याप्रमाणे ‘फँड्री’चा शेवट हा ‘अर्धविरामच’ आहे आणि जोपर्यंत जातिभेदाराधित समाजातील विषमता नष्ट होत नाही तोपर्यंत तो अर्धविरामच राहणार आहे. आणि म्हणूनच चित्रपटाचा शेवट याच त्वेषपूर्ण रागापोटी फेकलेला दगड प्रेक्षकांवर म्हणजेच प्रतीकात्मकरीत्या समाजव्यवस्थेवरच आघात करतो. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटात एलिझाबेथ सायकल विकली न जावी यासाठीचा मुलांचा आटापिटा मनोरंजन करता करता हेलावून टाकत शेवट ‘हॅपी एिण्डग’वाला असला तरी हा शेवट घटनांच्या घाईगर्दीत गुरफटल्यासारखा वाटतो. मध्यंतरापूर्वी मुलांकडील बांगडय़ा विकत घ्यायला आलेला गूढ ग्राहक, त्याच वेळी चार-पाच बायकांच्या संशयित लुडबुडी, त्या गोंधळात प्रेक्षकांना न समजलेले संवाद, २० रुपये देऊनही बांगडय़ा विसरणे, शेवटाला पुन्हा तोच गूढ ग्राहक वेळीच तीन हजार रुपयांचा बॉक्स गायब आणि त्यावरून शोधाशोधीचे एकादशीयण. नंतर त्या गूढ ग्राहकांनी उपरती (?) होऊन बांगडीवाल्या घाऊक व्यापाऱ्यांकडे बॉक्स सुपूर्द केल्यावर ज्ञानेशच्या घरी जाऊन कुणी, कुणामार्फत, काय सांगून किती पैसे दिले नि सायकल सोडवली यांचा एकंदरीत संदर्भ न लागून प्रसंग गोंधळातच पार पडतो. या सर्व प्रसंगांत शेवट थोडासा गुंडाळल्यासारखा होऊन प्रेक्षकांपुढे संभ्रमित प्रश्नचिन्ह राहते.
किरण प्र. चौधरी, वसई. (ई-मेलवरून)

श्रीपाद श्रीवल्लभांचा उल्लेख राहिला
‘लोकप्रभा’चा १२ डिसेंबरचा दत्तविशेषांक वाचला. या अंकात कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा दत्त प्रभूंचा प्रथम अवतार होय. त्यांचा जन्म पीठापुरम – आंध्र प्रदेश येथे १३२० साली झाला. पीठापुरम हे दत्तांचे तीर्थक्षेत्र आहे. ही माहिती आढळून आली नाही. ‘लोकप्रभा’चा प्रत्येक अंक नेहमीच वाचनीय असतो.
रा. द. बर्वे, ठाणे.

महाराष्ट्रात ‘टोलमाफी’ होणार का?
महाराष्ट्रासोबतच सत्तेत आलेल्या हरयाणाच्या मनोहरलाल खट्टर या भाजप सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे जे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी करून दाखवले आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करून दाखवणार का, हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करणे केंद्राच्या अखत्यारीत येते. महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे जी कृपा हरयाणासाठी दाखवण्यात आली तशी कृपा महाराष्ट्रावर होणार का? मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात काही पावले उचलणार का?
संगीता जांभळे, मीरा रोड (ई-मेलवरून)

२४ नोव्हेंबरच्या अंकातील सोनाली नवांगुळ यांचा ‘वेगळं’ या सदरातील ‘ऑस्कर रिवाच्या शोकांतिकेच्या निमित्तानं’ हा लेख फारच भावला. ऑस्करची बाजू समजून घ्यायची नाही, पण लेखिकेने मांडलेल्या अपंग असुरक्षितता या मुद्दय़ावर चर्चा करणे आवडेल.
– एम. बी. खोरगडे, नागपूर.

१४ नोव्हेंबरच्या अंकातला भारतीय सैन्याला खलनायक ठरवणारा ‘हैदर’ हा लेख वाचला. या लेखात मांडलेली मते मला पटली.
अंजली जोशी (ई-मेलवरून)

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Readers response

Next Story
कथा : देणगी
फोटो गॅलरी