‘दान : नि:स्वार्थ आविष्कार’ हा ‘मथितार्थ’ आणि ‘देण्यातला आनंद’ ही ‘कव्हरस्टोरी’ दोन्हीही अप्रतिम आणि स्फूर्ती देणारे आहेत. आजचे युग हे मी, माझे कुटुंब, माझी करिअर याभोवती धावणारे बनले आहे. प्रत्येक कृतीतून स्वत:चा फायदा कसा होईल याचाच विचार बहुतेक सर्व लोक करताना दिसतात. बाजूच्या माणसाचा विचार दूरदूपर्यंत कुणाच्या मनाला शिवत नाही. तिथे दुसऱ्याची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे कुणाला सुचणे लांबची गोष्ट आहे. त्यामुळेच या लेखातील प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास पात्र आहेतच, पण अनुकरणीयसुद्धा आहेत.
आज आपल्या समाजात इतका मोठा वर्ग काही ना काही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, पण समाजसेवा करण्यासाठी पैसा लागतो, किमान उच्च पद लागते त्यामुळे तो आपला प्रांत नाही असे सामान्य माणसाला वाटत असते. त्यामुळे अनेक वेळा इच्छा असूनही काही न करणाऱ्यांची संख्या खूप मोठी सापडेल. अशा सर्वाना या लेखामधून मार्ग सापडावा त्याच वेळी समाजात फक्त घेणेच माहीत असलेली संख्याही मोठी आहे. अशा लोकांना विनंती करावीशी वाटते की कधी तरी गरजवंतासाठी मदत करा/ दान करा आणि देण्यातला निर्भेळ आनंद जाणून घ्या. संपूर्ण समाजाने एकमेकांना मदत केली तर देशाची प्रगती वेगात होईल.
‘जीवनगाणे आनंदाचं’ ही विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे यांची मुलाखत त्यांची गंभीर आणि विचारी बाजू सामोरी आणणारी आहे. त्यांची सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळाला सहजपणे सांगण्याची पद्धत जशी आवडली तसेच त्यांच्या पालकांचा आणि भावंडांचा त्यांच्या पर्यायाने त्यांच्या कलेवरील विश्वासाला सलाम!
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई

अजरामर गीतरामायण
हीरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असलेल्या गीतरामायणावरील ४ एप्रिलच्या ‘लोकप्रभा’मधले सर्वच लेख आवडले.
गीतरामायण हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. साठ वर्षे होऊनही गीत रामायणातील काव्य आणि संगीताची गोडी अवीट राहिलेली आहे. ग. दि. माडगूळकर, बाबूजी ऊर्फ सुधीर फडके आणि त्यांचे सहकारी यांच्या उत्तुंग प्रतिभेचाच तो एक आविष्कार आहे.
बाबूजी हे प्रखर देशभक्त होते. अन्यायाविरुद्ध ते सतत लढा देत असत. १९७५ साली देशात आणीबाणीविरोधात आंदोलन केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात डांबण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी बाबूजींनी अनेक गावागावांमध्ये जाऊन गीतरामायणाचे कार्यक्रम केले. असाच एक गीतरामायणाचा कार्यक्रम कल्याणच्या नगरमंदिर सभागृहात आयोजित केला असल्याचा निरोप सकाळी मिळाला. ते १९७६ साल असावे. गीतरामायणाचा आनंद घेण्यासाठी नगरमंदिरात श्रोत्यांनी तुडुंब गर्दी केली होती. प्रत्येकी एक रुपया देणगी घेण्यात आली. सुधीर फडके यांनी त्यांच्या दोन सहवादकांबरोबर रात्री १० वाजता गीतरामायण गाण्यास सुरुवात केली आणि पुढे तीन तास मध्यरात्रीपर्यंत समरसून गायन केले. जमलेल्या निधीची सर्व रक्कम जशीच्या तशी संयोजकांच्या हाती सुपूर्द केली. बाबूजींच्या समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. हा अनुभव अविस्मरणीय होता.
अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

आनंदाचं जीवनगाणं भावलं ..
एखादा प्रसिद्ध अभिनेता, त्यातही त्याच्यावर विनोदी अभिनेता असा शिक्का बसला असेल तर मग त्याकडे सर्व रसिकांचा पाहण्याचा एक टिपिकल दृष्टिकोन असतो. कधी कधी त्याला थिल्लर ठरवले जाते. मकरंद अनासपुरे यांची मुलाखत वाचल्यावर मात्र त्यांचे एक वेगळेच रूप समोर आले. लहानपणीचे नाटकांतील काम, वक्तृत्व स्पर्धामधील वावर, तरुणपणी त्यांनी केलेला संघर्ष, मुंबईतील सुरुवातीचे दिवस आणि मग सुपरस्टार पदाकडे झालेला प्रवास अगदी सहजपणे या मुलाखतीमुळे सर्वसामान्य वाचकांना कळू शकला. मुख्य म्हणजे इतके टक्केटोणपे खाल्ल्यावरदेखील जीवनाकडे आनंदाने, सकारात्मक पद्धतीने पाहण्याची त्यांची दृष्टी खूप काही सांगून जाते.
आजवरच्या प्रवासाकडे पाहताना त्यांच्या बोलण्यात कोठेही कडवटपणा जाणवत नाही. उलट त्यांनी मांडलेली देवाची संकल्पना एकदम वेगळीच आहे. आयुष्यात एका ठराविक ठिकाणी भेटणारे लोक तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात हे मकरंद यांच्या उदाहरणावरून लक्षात येतं. स्वत:ला मनापासून आवडतं त्याच क्षेत्रात काम करायला मिळालं तर कसं सोनं होतं हे जाणवलं. बऱ्याच वेळा सिनेकलाकारांच्या मुलाखतीत त्यांच्या चित्रपटांवर कामावर खूप भर दिलेला असतो. पण मकरंदच्या या मुलाखतीत त्यांची जीवनविषयक दृष्टी प्रथमच दिसून आली. त्यामुळे चित्रपटविषयक वाचायची फारशी आवड नसणाऱ्या माझ्यासारख्यांनादेखील ही मुलाखत मनापासून आवडली. मकरंदच्या आनंदाच्या जीवनगाण्याच्या प्रवासाला शुभेच्छा.
किरण भोसले, औरंगाबाद.

आत्मचिंतन करायला भाग पाडणारा लेख
२८ फेब्रुवारीचा ‘लोकप्रभा’चा संपूर्ण अंक वाचला. यावेळीच्या अंकातील वेगवेगळ्या विषयांचे वैविध्य असल्यामुळे संपूर्ण अंक वाचनीय होता. त्यातील विनायक परब यांचे मथितार्थ व हृषीकेश जोशी यांचा ‘निष्ठा- व्यक्तिगत आणि सामाजिक’ हे दोनही लेख विशेष आवडले. ‘गुंडे’चा असंसदीय प्रोमो!’ या लेखात ‘त्या’ अत्यंत संतापजनक घटनेचा अगदी नेमक्या शब्दात समाचार घेतला आहे. या सगळ्या लांछनास्पद प्रकाराला काँग्रेस जबाबदार आहे हा निष्कर्ष अत्यंत योग्य आहे. हे सगळे इतके व्यथित करणारे चित्र आहे की, आता या लाज सोडलेल्या आणि ‘गुंडे’चा प्रोमो दाखवणाऱ्या ‘झिरोंना’ पुन्हा लोकशाहीची थट्टा करण्याची संधी मिळणार नाही यासाठी देशाच्या मतदाराने सतर्क व्हायला हवे.
‘निष्ठा- व्यक्तिगत आणि सामाजिक’ या लेखात निष्ठेचा चहूबाजूने घेतलेला आढावा, जोशी हे अभिनेते असून त्यांच्यातील व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा आहे. अनेक वर्षे एखाद्या राजकीय पक्षात राहणारा नेता अचानक पक्ष सोडतो तेव्हा त्याची निष्ठा खरेच पक्षाप्रती होती की नव्हती? आजच्या राजकारण्यांना न आवडणारी ही वस्तुस्थिती नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यातही स्वत:शिवाय आपण इतरांच्या निष्ठेबद्दल खल करताना आपली व्यक्तिगत निष्ठा कुठे वाहत असते याकडे आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो हा मुद्दा जास्त पटला. म्हणजे सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे असे आपण नेहमीच ओरडतो, पण त्यावेळी आपणही नियमाबाहेर वागतो आणि मग याच भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो. मूल्यांवरची ‘निष्ठा’ उडाली की भ्रष्टाचाराला सुरुवात होते. हेच आजचे चित्र आहे.
सामाजिक आणि राजकीय निष्ठा यावर अत्यंत सुंदर लिहिताना कौटुंबिक वा व्यक्तिगत निष्ठेसंबंधी त्यांनी मांडलेले विचार आजच्या कौटुंबिक समस्यांचा नेमका वेध घेणारे आहेत. लेखाच्या शेवटी याच देशात स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थापोटी निष्ठा पायदळी तुडवणारे आहेत तसे निष्ठा वाहणारी अनेक आदरणीय व्यक्तिमत्त्वेदेखील आहेत. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात निष्ठेने काम करण्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांची ही उदाहरणे निष्ठेने जगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. आपण नेहमीच म्हणतो माझे माझ्या देशावर प्रेम आहे; पण आपली निष्ठा जर क्षणाक्षणाला डळमळीत होत असेल तर आपले देशप्रेम बेगडीच म्हणायला हवे. यासाठी शेवटचे वाक्य खूप सुंदर आहे- ‘‘आदर्श प्रेमाच्या अवस्थेला पोहोचण्यासाठी मला सुरुवातीला निष्ठेची कास धरणे अनिवार्य आहे.’’ हा लेख वाचून मी स्वत:लाच जरा तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक निष्ठा मी कुठे वाहतो आहे, हे आत्मचिंतन करायला या लेखाने भाग पाडले. थँक्स हृषी! थँक्स लोकप्रभा!!!
तुषार देसले, झोडगे ता. मालेगाव (नाशिक)

मुलींनी धडा घ्यावा
२१ मार्चच्या लोकप्रभात इस्थर हत्याप्रकरणी संपूर्ण हकीगत वाचनात आली आणि प्रत्येक तरुण मुलीने ती वाचली पाहिजे. इस्थर प्रकरण काय किंवा दिल्लीतील निर्भया प्रकरण काय, यातून मुलींनी काही धडा घेतला पाहिजे. दिल्लीत पण निर्भया व तिचा मित्र कोणती बस आहे याची खातरजमा न करता चढले व भयंकर प्रकार घडला. या प्रकारात एका अनोळखी माणसाबरोबर इस्थर मोटार सायकलवर गेलीच कशी, हा गूढ प्रश्न आहेच. माझी मुलगी मुंबईत नोकरी करते, तिला माझी सक्त ताकीद आहे की रात्री-पहाटे कुठल्याही रिक्षात बसताना त्या रिक्षाचा नंबर घ्यायचा व आम्हाला एस.एम.एस. करायचा. पहाटे गाडी पोहोचत असेल तर सकाळ होईपर्यंत स्टेशनात बसायचे. सध्या कुठल्याही, हो अगदी कुठल्याही, अनोळखी इसमावर विश्वास ठेवायचा नाही. पोलिसांनी पण सुरुवातीला तक्रार घेताना जी टोलवाटोलवी केली ती कितपत योग्य आहे, याचाही विचार झाला पाहिजे. तरी या केसमध्ये नंतर पोलिसांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहेच. आजकाल संकटकाळात मोबाइलवर बटन दाबून पोलीस स्टेशनशी व नातेवाईक अथवा मित्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो, असे आधुनिक अॅप्स आले आहेत. त्यांची माहिती वृत्तपत्रातून येत आहे. ते प्रत्येक तरुणीने डाऊनलोड करून घेतले पाहिजे व हातातला मोबाइल व्यवस्थित रिचार्ज करण्याची काळजी घेतली गेली पाहिजे.
– डॉ. अनिल. पी. सोहोनी, दोंडाईचा (धुळे)