160114-lkp२०१४ संपता संपताच ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच महेंद्रसिंग धोणीच्या निवृत्तीची बीसीसीआयकडून घोषणा झाली अन् क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. काहीशी बुचकळ्यात टाकणाऱ्या या घटनेवर दि. १६ जानेवारीच्या अंकात कव्हरस्टोरी देऊन आपण सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींच्या भावनांना जणू वाट करून दिली. प्रशांत केणी व प्रसाद लाड या दोघांनीही माहीचा उदय, कारकीर्द व संन्यास (निवृत्तीचा निर्णय) याविषयी सर्व बाबींवर माहिती देऊन विषय उलगडला आहे. या वर्षांचा काळ हा संघबांधणीचा असेल हे शास्त्रींचे मत पटणारे आहे. परदेशी कसोटीतील अपयश हेच मुख्य कारण अचानक घेतलेल्या निवृत्तीमागे असले तरी स्वदेशात ऑस्ट्रेलियासह सर्व बलाढय़ देशांना नमविणे धोणी नसल्याने आपल्या संघाला यापुढे सहज, सोपे नाही. त्यांच्या कसोटीतील उपयुक्त खेळ्यांविषयी वा निर्णयांविषयी, यष्टीरक्षणाविषयीही काही माहिती लेखासोबत असती तर चांगले झाले असते. विराटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अनिल ह. पालये, बदलापूर.

उदासीनतेस शिक्षणपद्धती जबाबदार
डॉ. अनिकेत सुळे यांचा ‘झटकून टाका उदासीनता’ हा लेख वाचला. अतिशय समर्पक लेख आहे. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश अजूनही अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विळख्यात अडकला आहे. विज्ञानप्रसाराची जेवढी जबाबदारी संशोधन संस्थांची आहे तेवढीच प्रसार माध्यमांचीही आहे. टीआयएफआरसारखी संस्था ‘पब्लिक आऊटरीच’, ‘चाय अ‍ॅण्ड व्हाय’ (chai & why) कार्यक्रमांद्वारे ही जबाबदारी पेलत आहे. डॉ. सुळे यांनी म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिकांशी चर्चा, लघुपट, याद्वारे प्रसार माध्यमे या बाबतीत मोलाचे सहकार्य करू शकतात. शाळेतून सादर केल्या जाणाऱ्या विज्ञान प्रकल्पांचा दर्जा बराचसा सुमार असतो. मी स्वत: एका सायन्स एक्झिबिशनमध्ये जज म्हणून गेले होते; तेव्हा त्यातले बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प दखलपात्र असल्याचे आढळले. याला शिक्षकही बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहेत, असे मला वाटते. मुलांना ज्ञानार्थी न बनवता फक्त परीक्षार्थी बनवणारी आपली शिक्षण पद्धतीही जबाबदार आहे. येत्या काही वर्षांत हे चित्र बदलेल, अशी आशा बाळगू या.
lp13– भाग्यश्री चाळके,
(टीआयएफआर) ई-मेलवरून

लोकमान्यांचा आणि भावेंचा वेगळा पैलू
भारतीय असंतोषाचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या जीवनावरील ‘लोकमान्य’ हा चित्रपट २ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आणि कौतुकही झाले. ही प्रतिक्रिया ‘लोकमान्य’ चित्रपटावर नाही. प्रतिक्रिया आहे ती सुबोध भावे यांच्या लोकप्रभातील लेखावर.
‘मला दिसलेले रोमँटिक लोकमान्य’ या लेखातून सुबोध भावे यांनी जगलेली भूमिका आमच्यासमोर आली. रोमँटिक आणि लोकमान्य हे दोन्ही शब्द बाजूबाजूला मांडणेही ही निव्वळ अशक्य. पण भावेंची ही कल्पनाच त्यांनी केलेल्या अभ्यासाची साक्ष देते. मुळातच रोमँटिसिझम हा फक्त स्वच्छंदतेपुरता किंवा प्रेमापुरता मर्यादित नाही. हे एक झपाटलेपण आहे. मग ते प्रेयसीसाठी असो वा देशासाठी. टिळकांच्या मनात स्वराज्यासाठी असणारे झपाटलेपणच भावे यांना जाणवले. डोळे नाजूक आहेत ही भावे यांना मिळालेली प्रतिक्रिया ही सत्य होती. पण आपल्यातील या दोषावर (‘लोकमान्य’बाबतच हा दोष विचारात घ्यावा लागतो) मात करण्यासाठी ते पुरेसे यशस्वी ठरले. भावे हे नुसते एक उत्तम अभिनेते नाहीत. त्यांच्यात एक कविमनाचा माणूस आणि एक उत्तम लेखक दडलेला आहे हेही जाणवते.
– मृदुला राजवाडे, ई-मेलवरून

261214-lkpकिती हा विरोधाभास?
नशीब ‘विक्रांत’चे आणि ‘कटी सार्क’चे हा लेख (लोकप्रभा २६ -१२-२०१४ ) वाचताच अनाहूतपणे एकच उद्गार मुखी येत होता किती हा विरोधाभास.. ओघाने दोन देशांच्या आपापल्या देशातील वैभवशाली गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन अधोरेखित झाला. विक्रांतबाबत ती भंगारात काढली तर जास्त कमावता येईल, ही मानसिकताच प्रकर्षांने जाणवली. याच विक्रांतऐवजी जात, धर्माशी निगडित एखादे स्मारक असते तर त्याचे जतन करण्यासाठी सर्वपक्षीय चढाओढ लागून प्रत्येकाने आपापली राजकीय पोळी भाजून घेतली असती. शिवाय ज्या हेरिटेज समितीने केंद्र-राज्य सरकार व पुरातत्व खात्याबरोबर समन्वय साधत विक्रांतला वाचवायला हवे होते, त्यांनी जणू हातच झटकले. विक्रांतला शिवरायांच्या प्रस्तावित सागरी स्मारकाचा एक भाग बनवून या जहाजात कटी सार्कप्रमाणे जुन्या-नव्याचा मेळ घालणारा कल्पक कायापालट घडवला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या होणाऱ्या शानदार भव्य स्मारकात भरच पडली असती. पण विक्रांत म्हणण्यापेक्षा सद्य व पुढील पिढीला विक्रांतच्या गौरवशाली, ऐतिहासिक शौर्याचे, वास्तूचे मोल यापासून करंटे केले आहे. जणू एक स्फूर्तिवस्तूच नष्ट केली आहे.
– किरण प्र. चौधरी, वसई

191214-lkpविवाह विधींच महत्त्व काय?
‘विवाह विषया’चा अंक आवडला. सध्या विवाहांमध्ये सुरू असणाऱ्या काही गोष्टींकडे वाचकांचे लक्ष वेधावेसे वाटते.
आजकाल ज्या दिवशी लग्नाचा मुहूर्त ठरला असतो, त्याचे आदल्या दिवशी स्वागत समारंभ ठेवतात. त्या वेळी दोघे जण शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर असतात. लग्न झालेले ते जोडपे म्हणून सर्वाचे स्वागत करतात हे विसंगत वाटते.
दुसरा प्रश्न आणि उदाहरण. एका परिचितांच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त सकाळी ७.१५ ला होता. तो त्यांना काहीही करून साधायचा होता. त्यांनी थोडय़ा नातेवाईकांच्या उपस्थितीत मंगलाष्टके म्हणून लग्न लावले. नंतर ११.३० वाजता नवरदेवास परत आत घेतले आणि परत मंगलाष्टके म्हणून लग्न परत लावले. असे का? तर म्हणे साडेसात वाजता लग्नाला आलेली मित्रमंडळी जेवणास परत येणार नाहीत, म्हणून त्यांना पत्रिका वाटतानाच मुहूर्त ११.३० चा लिहिला होता. ७.३० ते ११.३० दरम्यान होम वगैरे उरकून घेतला व मंगळसूत्र घालण्याचा विधीदेखील. तर दुसऱ्यांदा हार घालताना तिच्या गळ्यात मंगळसूत्र पण घालण्याचा विधी झाला तर दुसऱ्यांदा हार घालताना तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. हे सारे काही पटत नाही. मुहूर्ताचे प्रयोजन काय व विधींना महत्त्व ते काय उरते?
– मधुकर नारायण देशपांडे, नागपूर.

वाचकांतले लेखक
प्रत्येकालाच काहीतरी सांगायचे असते. प्रत्येकालाच व्यक्त व्हायचे असते. कोणी केवळ बडबड करतो, कोणी चार ओळी खरडतो. पण त्या चार ओळींना प्रकाशित होण्यासाठी माध्यम गरजेचे असते. ‘लोकप्रभा’ने वाचकांची ही गरज नेमकी हेरली आहे. त्यामुळेच गेल्या एक दीड वर्षांत सुरू असलेले वाचक लेखक, ब्लॉगर्स कट्टा, ट्रॅव्हलॉग, कथा ही सदरं वाचताना वेगळाच आनंद होतो. वाचकांच्या विचारांना थारा देण्यापेक्षा त्यांच्या माथी स्वत:चे विचार थोपण्याच्या सध्याच्या माध्यम व्यवसायाच्या जमान्यात लोकप्रभाने खास वाचकांसाठीच जागा देणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यातून आपली बांधीलकी तर दिसतेच लोकाभिमुखकता जाणवते.
-माधवी पंडित, डोंबिवली.

२ जानेवारीच्या भविष्य विशेषांकातील ‘नेणिवेच्या प्रांतात’ हा लेख आवडला. नेणिवेविषयी अधिक माहिती देणारा लेख प्रकाशित करावा. ह्य़ा विषयांवरील पुस्तकांची (मराठी-इंग्रजी) माहिती दिल्याचा फायदा होईल.
– रा. द. बर्वे, ठाणे.

अचूक कव्हर फोटो
१६ जानेवारीच्या अंकाची ‘कॅप्टन कूल ते कॅप्टन हॉट’ ही कव्हर स्टोरी आवडली. सगळ्यात जास्त आवडला तो अंकाचा कव्हर फोटो. धोनीची पाठ आणि विराट कोहलीचा हसमुख चेहरा या विरोधभासाचा अचूक वापर कव्हर स्टोरीसाठी केला आहे.
स्नेहा सराफ, नाशिक

lp15अजूनही काही नवीन हवं होतं
दत्त जयंती विशेषांक बरा आहे. वृद्ध माणसांना त्यांना त्यांच्या पूर्वीच्या काही श्रीदत्तसंबंधी आठवणी होत असणार. तथापि आजचा तरुण (२०-२२ वर्षे) मध्यमवयीन महिलामंडळी यांना याचं कौतुक वाटत नाही. कारण अजूनही या लोकांचे काही मूलभूत प्रश्न आहेत.
जयंती म्हणजे काय? दत्त जन्म काही ठिकाणी सकाळी (पहाटे), काही ठिकाणी दुपारी १२ वाजता, काही ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता हे अशा तीन तीन जन्मवेळा का? सदरच्या अंकात जे लेख आहेत त्यांत माहिती भरपूर आहे. पण ज्ञान.. त्याबद्दल उत्सुकता, विशेष जाणीव होणे याचा अभाव दिसतो. माहिती वर्णन एवढेच महत्त्वाचे धरू नये. निरनिराळ्या गावांतील दत्तभक्तांना वेगवेगळ्या विचारांवर लेखन करण्यास सांगून, त्यांना विशेष प्रसिद्धी द्यावी. अन्यथा एकच मुद्दा तोच तोच पाहावयास मिळतो. विशेष अंकात ‘काही तरी विशेष असतेच’ असे माझे मत.. तसा अंक ठीक. मी गेली ५० वर्षे दत्तोपासना करीत आहे. मला अजूनही काही नवीन वाचावयास मिळावे, ही माझी तहान-भूक आहे.
– प्रा. डी. एस सबनीस, नेरुळ (पूर्व), नवी मुंबई.

वाचकानुनयी तत्परता
नलिनी दर्शने यांच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यावर त्यांचा खुलासा वाचला, पण मूळ लेख वाचला गेला नव्हता. तो कुठे मिळेल असे विचारल्यावर कोणत्या अंकात मिळेल ते आणि अंक ऑनलाइन सापडत नाही असे लिहिल्यावर लेखाची नेमकी लिंक ‘लोकप्रभा टीम’ने इतकी तत्परतेने पाठवलीकी लेखाबद्दलची उत्सुकता मनात ताजी असतांनाच तो वाचायला मिळाला.वाचक महत्त्वाचा हे बोलतात खूप जण, पण व्यवहारात फारसं कुणी पाळत नाहीत. पण ‘लोकप्रभा टीम’ने हा जो (चांगल्या अर्थाने) आश्चर्याचा धक्का दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! ४० वर्षांच्या लोकप्रिय यशस्वी वाटचालीचे मर्म कळले.पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
राधा मराठे, ई-मेलवरुन