lp09आरोग्य विशेषांक उपयुक्त
‘लोकप्रभा’चा आरोग्य विशेषांक सर्वार्थाने उपयोगी आहे. ‘जीवनशैली बदला आजार टाळा’ हा सुहास जोशी यांचा लेख पुष्कळ काही शिकवून गेला. ‘प्रश्न पोटाचा’ या लेखातून डॉ. उज्ज्वला दळवी यांनी चक्क पोटावरूनच हात फिरवला. ‘सरकारी तरीही सर्वोत्तम’ या लेखांद्वारे संदीप आचार्य यांनी जे चित्र उभे केले आहे, त्याबद्दल तेथील डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीला शतश: नमन. कारण ज्याप्रमाणे आपल्या देशातल्या अनेक प्रांतांत, खेडेगावांत, तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयांची अवस्था पाहिली तर असे वाटते की, नको रे बाबा तो सरकारी दवाखाना, त्यापेक्षा मरण बरे. त्या तुलनेत या लेखातील रुग्णालयांचे कौतुकच वाटते. 

‘डोळ्यांची काळजी’ या लेखात डॉ. राजेश पवार यांनी सर्व ऋतूंतील डोळ्यांच्या काळजीबद्दल माहितीमुळे जागरूकता वाढली. ‘तुम्हीच होऊ नका तुमचे डॉक्टर’ या चैताली जोशी यांच्या लेखामुळे अनेक गैरसमज दूर होतील असे वाटते.
विशेषांकाच्या निमित्ताने नेत्रदान, देहदान रक्तदानाबद्दल अधिक माहिती दिली असती तर खूप फायदा झाला असता. आपल्या देशात एक कोटी जनता अंधत्वाची शिकार आहे, त्यातील ११ लाख लोकांची कॉर्निया खराब आहे अशी संशोधन संस्थाची माहिती आहे; पण नेत्रदान, देहदान आणि रक्तदान या विषयांसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत. मृत्यूनंतर नेमक्या किती काळपर्यंत नेत्रदान, देहदान करावे लागते? त्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया काही आहे का? अशा अनेक शंका असल्यामुळे इच्छा असूनदेखील हे सत्कर्म अनेकांना करता येत नाही. आपण जर त्या संदर्भात माहिती दिली असती तर गैरसमज दूर झाले असते.
संध्या रामकृष्ण बायवार, बानापुरा, मध्य प्रदेश.

आरोग्य विशेषांक भावला
‘लोकप्रभा’चा आरोग्य विशेषांक म्हणजे आरोग्यदायी व निरोगी जीवनासाठी मेजवानीच होय. विशेषत: महिला मंडळींसाठी हा अंक अत्यंत लाभदायी, उपयुक्त व मार्गदर्शक आहे. प्रत्येक महिलेने अंक घेऊन त्यातील प्रत्येक लेख वाचून सक्षम, सदृढ, निकोप, निरोगी राहण्यासाठी कृती अंगीकारावी अशी अपेक्षा आहे.
आरोग्याच्या वाटेवरचे आधार देऊन ‘लोकप्रभा’ने जो आधार दिला तो अभिनंदनीय आहे. ‘तुम्हीच होऊ नका, तुमचे डॉक्टर’ हा लेख प्रत्येकाला अत्यंत मार्गदर्शक आहे याबाबत दुमत नाही. तिन्ही ऋतूंत डोळय़ांची काळजी कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त व लाभदायी आहे. प्रत्येकाने हा अंक संग्रही ठेवून यातील माहिती वाचून त्याप्रमाणे काळजी घेतली तर जीवनमान उंचावून व आरोग्य उत्तम ठेवून सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडता येऊ शकतात एवढे निश्चित.
धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर जि. औरंगाबाद.

lp10माणूस महत्त्वाचा की प्राणी?
‘वाघ वाढले, पण सांभाळणार कसे?’ ही कव्हरस्टोरी वाचली. मी गेली कित्येक वर्षे पाहतोय, राजकारणी लोक जे काही बोलतात त्याच्यावरून असा अर्थ निघतो की, ‘वाघांचे रक्षण फार महत्त्वाचे; आदिवासी, म्हातारी माणसे, लहान मुले यांना बिबटय़ाने मारले तरी काही हरकत नाही. असे होणारच. आपल्याला पर्यावरण सांभाळले पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे.’
मला हे कळत नाही की, त्यांना त्याचे काहीच कसे वाटत नाही का? काही वर्षांपूर्वी रहेजा विहार, पवईमध्ये एका ३-४ वर्षांच्या मुलाला बिबटय़ाने मारले. ती आठवण आणि गोरेगाव/ बोरिवलीमधील बिबटय़ाने केलेल्या हत्या आम्ही पवईकर विसरू शकत नाही.
आमच्या दृष्टीने वाघांना-बिबटय़ांना अवास्तव महत्त्व दिले जात आहे आणि आदिवासी, म्हातारी माणसे, लहान मुले यांना काहीच महत्त्व दिले जात नाही.
जर एखाद्या मानवाला पशूने मुंबईमध्ये मारून टाकले तर त्या भागाच्या आमदार आणि खासदाराला राजीनामा देण्यास सांगावे. असे झाले तरच मुंबईसारख्या शहरात गरीब माणसाचा हिंस्र प्राण्यांपासून बचाव होईल. नाही तर, प्राण्यांनी माणसाला मारले तर मी काय करणार, असाच राजकारण्यांचा दृष्टिकोन राहील. हे थांबायला हवे.
मोती सागर (ई-मेलवरून)

वाचनीय अंक
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. ६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘अ‘सामान्य’ लक्ष्मणरेखा’ हा आरकेंवरील आदरांजली लेख खूप आवडला. याच अंकातील अमित सामंत यांचा ‘एडीसनचे घर’ हा सचित्र लेख वाचून मन भारावून गेलं. एडीसनबद्दलची माहीत नसलेली भरपूर माहिती वाचायला मिळाली, त्याबद्दल ‘लोकप्रभा’ला धन्यवाद. डॉ. अविनाश वैद्य यांची ‘कर्नाटकाची शोधयात्रा’ खूप आवडली. संपूर्ण ‘लोकप्रभा’च वाचनीय आहे. अंकातील कोडे सोडविताना माझ्यासारख्या ज्येष्ठांचा वेळ मजेत जातो. महत्त्वाचे म्हणजे ‘लोकप्रभा’ने वाचकांना लिहिते केले आहे. आपणास शुभेच्छा!
उषा प. रेणके, अंधेरी, मुंबई.

संग्राह्य़ अंक
‘लोकप्रभा’चा ‘आरोग्य विशेष’ अंक नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर, वाचनीय आणि संग्रही बाळगावा असा आहे. ‘सरकारी तरी सर्वोत्तम’ हा लेख मुंबईतील नागरिकांच्या भावना व्यक्त करणारा आहे. सध्याची महागलेली वैद्यकीय व्यवस्था बघता सामान्य माणसाला सरकारी रुग्णालय हाच पर्याय उपलब्ध असतो आणि तिथल्या प्रचंड पसाऱ्यातही रुग्ण भलाचंगा होऊन बाहेर पडतोय त्याबद्दल तिथल्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचारीवर्गाचे करावे तितके कौतुक कमीच आहे; पण असे असूनही सरकारी पातळीवरून जास्त सरकारी रुग्णालये बांधण्याची कृती न होता जुनी लहान रुग्णालये खासगी लोकांना दुरुस्त करायला देऊन त्यांनाच चालवायला देण्याचा चंग बांधणे अयोग्य आहे; पण सामान्य माणसाच्या गरजा राज्यकर्त्यांना कधीच महत्त्वाच्या वाटत नाहीत हेच खरे!
‘जगणे सुंदर, मरणे सुंदर’ हा लेख एक वेगळाच दृष्टिकोन समोर आणणारा आहे. मोठी व्याधी झाली की ती व्यक्ती विव्हळ होतेच, पण तिची शुश्रूषा करणारे दु:खी तर असतातच, पण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकून जातात. कारण त्यांना आजारी व्यक्तीसमोर सतत त्याला सर्वार्थाने बरे वाटावे असे वागायचे बंधन असते. अशा वेळी ही पॉलिएटिव्ह केअर हे एक वरदानच आहे. यासाठी सामाजिक ऋण मानणाऱ्या व्यक्तींना सहभाग घेऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करता येईल.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई.

आरोग्य विशेषांक सुंदर
‘लोकप्रभा’चा ३० जानेवारी २०१५ चा आरोग्य विशेषांक खूप आवडला. ‘जीवनशैली बदला, आजार टाळा’ हा सुहास जोशींचा लेख, ‘प्रश्न पोटाचा’ हा डॉ. उज्ज्वला दळवी यांचा लेख आणि सर्वात जास्त म्हणजे संदीप आचार्य यांचा ‘सरकारी तरी सर्वोत्तम’ हा लेख मनाला स्पर्श करून गेला. खरेच मुंबईतील मनपा रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांना माझा मानाचा मुजरा व त्रिवार सलाम! तसेच अंकाच्या शेवटी वैद्यकीय मदत करणाऱ्या संस्थांची यादी खूपच उपयोगी आहे. ‘लोकप्रभा’चे सर्वच अंक सुंदर असतात. पुढेही असेच सुंदर विषय सुंदररीत्या प्रकाशित कराल, हीच आशा.
अश्विन बी. गंजीवार, पांढरकवडा, जि. यवतमाळ.

देवाचा शोध
‘लोकप्रभा’च्या ‘वाचक प्रतिसाद’मधील अंजली देसाईंचे पत्र वाचले आणि त्यांचे विज्ञान आणि देव याबद्दलचे मत कळले.
विज्ञानामुळे माणसाला देवदुर्लभ गोष्टी प्राप्त झाल्या आहेत हे खरे आहे, परंतु ज्या गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत त्यांची किंमत त्या जेव्हा मिळत नाही तेव्हाच कळते. जर सूर्य, चंद्र उगवले नाहीत, ऊन/पाऊस वेळेवर झाले नाही, जमिनीतून धान्य उगवले नाही, तर काय होईल? ही तर देवाचीच कृपा आहे. मानवी शरीर म्हणजे एक प्लांट आहे ज्यात हृदय नावाच्या कॉम्प्रेसरने रक्ताभिसरण होते. माणूसघाणेपणा न करणारी व समोरच्या मुंगीबरोबर बोलूनच पुढे जाणारी जी मुंगी आहे तिच्या शरीरातसुद्ध हृदय आहे. तेवढा छोटा मिनी कॉम्प्रेसर जगातील कोणताही वैज्ञानिक तयार करू शकणार नाही. तेव्हा ज्याने आपल्याला सर्वार्थाने जीवन दिले, भरभरून दिले, त्याला थोडेसे अर्पण करून कृतज्ञता दाखविणे हेच माणसाच्या हाती आहे, ती अंधश्रद्धा नाही; परंतु या भूतलावर देवाने एजंट नेमले नसल्यामुळे कोणाही माणसाला साधू/बुवा/संत मानून त्याच्या दर्शनार्थ चार तास घालविण्यापेक्षा देवळात जाऊन दोन मिनिटे घालवली तरी शांती मिळू शकेल.
-विजय शा. वगळ, डोंबिवली.