lp10राष्ट्रपित्याचे खलनायकीकरण योग्य नाही…
‘गांधी नावाचा गुन्हेगार’ हा रवी आमले यांचा ‘टाचणी आणि टोचणी’ या सदरातील लेख (लोकप्रभा, ६ फेब्रुवारी) वाचला. त्यात मी भर घालू इच्छितो. १२ जानेवारी, १९४८च्या दुपारी गांधीजींनी आपला उपोषणाचा बेत जाहीर केला, तेव्हा ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ एवढेच कारण नमूद करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी गांधीजी माऊंटबॅटन यांना भेटायला गेले असताना, माऊंटबॅटन यांनीच हा ५५ कोटींचा विषय गांधीजींशी बोलताना काढला. माऊंटबॅटन याबद्दल म्हणतात, ‘‘मीच ५५ कोटींचा मुद्दा गांधीजींना सांगितला. तोपर्यंत त्यांनी या विषयाबद्दल काही ऐकलेदेखील नव्हते.’’ (Mountbatten and Partition of India- लॅरी कॉलिन्स व डॉमिनिक लॅपिए, पृ. ५०). तसेच, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णय १५ जानेवारी, १९४८च्या संध्याकाळी झाला, तरीही गांधीजींनी आपले उपोषण सोडले नाही. याचाच अर्थ असा की, जरी पाकिस्तानला त्यांचा ५५ कोटींचा हिस्सा द्यावा असा गांधीजींचा आग्रह होता, तरी या कारणासाठी त्यांनी उपोषण सुरू केले नव्हते. ‘The Men who killed Gandhi’ या ग्रंथात(पृ. ४१) मनोहर माळगावकर लिहितात की, १२ जानेवारी, १९४८च्या संध्याकाळी गोडसे-आपटे द्वयीने आपल्या वृत्तपत्राच्या टेलिप्रिंटरवर (रेडिओवर नव्हे) गांधीजींच्या उपोषणाची बातमी वाचली, तेव्हाच त्यांनी गांधी हत्येचा निर्णय घेतला. अर्थातच यावेळी त्यांना गांधीजी व माऊंटबॅटन यांच्यात काय बोलणे झाले, ते त्यांना कळणे शक्य नव्हते. पुढे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ जानेवारीच्या सकाळी नथुराम गोडसे यांनी आपल्या दोन विमा पॉलिसींचे नामांकन गोपाळ गोडसे व आपटे यांच्या पत्नींच्या नावे करण्याबद्दल पत्रे लिहिली. १४ जानेवारीला डेक्कन एक्स्प्रेसने गोडसे-आपटे मुंबईला आले व १५ जानेवारीला त्यांनी १७ जानेवारीच्या मुंबई-दिल्ली विमानप्रवासाची तिकिटे विकत घेतली. म्हणजेच ५५ कोटींची घोषणा व्हायच्या अगोदरच गांधी हत्येची योजना कार्यान्वित झाली होती. ६ एप्रिल २००२ च्या ‘दि हिंदू’मधील Patel Vs. Gandhi या लेखात राजमोहन गांधी लिहितात- ‘‘The Hindu militants’ rewritten history explains the assassination as having been triggered by Gandhi’s stand over the Rs. 55 crores, but the conspiracy predated that stand. Linking the deed to the Rs. 55 crores was part of an attempt to sell the assassination to the Indian public.’’
आता ५५ कोटींच्या मूळ मुद्दय़ाविषयी थोडेसे. वरवर पाहता येथे गांधीजींचा दुराग्रह दिसतो. पण खोलवर विचार केला, तर त्यात थोडेफार तरी तथ्य आहे, हे कळेल. पाकिस्तान सरकारचे चेक्स परत जात होते. पैशाअभावी सरकारी कारभार ठप्प होणार अशी लक्षणे दिसत होती. काश्मीर प्रश्न युनोकडे गेला होता. तो बाजूला पडून, भारत सरकारच्या आडमुठेपणामुळे पाकिस्तान या नवनिर्मित राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात आले असे चित्र दिसले असते. भारताने पैसे द्यायचे नाकारले असते, तर ते अमेरिकेसारख्या महासत्तेला काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कारण ठरले असते. अर्थात पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत या गांधीजींच्या आग्रहाचे हे समर्थन नाही. पण इतिहासाला अनेक बाजू असतात. कोणत्याही ऐतिहासिक घटनेचे एकांगी वर्णन करून आपल्याच राष्ट्रपित्याचे खलनायकीकरण करणे योग्य नाही. 
– प्रमोद पाटील, नाशिक, ई-मेलवरून.

इतिहासाचा अभ्यास करा..
६ फेब्रुवारीच्या ‘लोकप्रभा’मध्ये रवी आमले यांचा ‘गांधी नावाचा गुन्हेगार’ हा लेख वाचला, भाषेवरून लेखकाच्या मनात काय आहे हे कळणे कठीण नाही. ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर या दिवशी नथुराम गोडसेंना शिव्या घालणे ही सर्वच राजकीय पक्षांची व राजकीय नेत्यांची राजकीय गरज होऊन बसली आहे. त्याचबरोबर गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावाने गळे काढणे हीदेखील राजकीय गरज बनली आहे. त्याशिवाय त्यांची देशभक्ती सिद्ध होत नसावी. जणू काही गोडसे म्हणजे अफझल गुरू, अजमल कसाब, दाऊद इब्राहिम यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा होता. गांधीजी, सावरकर, वासुदेव बळवंत फडके, टिळक यांच्याइतकीच गोडसेंची देशभक्ती प्रखर होती. त्याच्या मनगटात ताकद होती, बुद्धीचे तेज प्रखर होते. अत्यंत सुसंस्कृत असा माणूस होता. पण हे कबूल करून आपले राजकीय मरण कोण ओढवून घेणार? त्यापेक्षा गोडसेला शिव्या घालणे सोपे आहे. ‘‘गावागावांत चौकाचौकांत गोडसेंचे पुतळे उभारले पाहिजेत’’ हे आपलेच शब्द विसरणे ही छगन भुजबळाचंी राजकीय गरज होती. त्यातून गोडसे कट्टर ब्राह्मण. तेव्हा समस्त ब्राह्मण समाजाला शिव्या घालणे हीदेखील राजकीय गरज होऊन बसली. गोडसेंना शिव्या घालण्याआधी इतिहासाचा अभ्यास करा, तो नीट समजून घ्या. स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवा.
– प्रकाश जोशी, विले पार्ले.

lp12फॅमिली डॉक्टरांचा अभाव
आरोग्य विशेषांकातील चैताली जोशी यांचा आम्हाला सावधान करणारा लेख वाचला. लेखातील सर्व मुद्दे बरोबर आहेत. त्याच अनुषंगाने एक छोटीशी अडचण सांगू इछितो. पूर्वी फॅमिली डॉक्टर असत. साध्या दुखण्यांवर औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे जाणे सोपे होते. ते घरीही येत असत. आता स्पेशालिस्टसचे दिवस आहेत. त्यांची क्लिनिक्स क्वचितच जवळ असतात. जाण्या-येण्यात आणि तेथे थांबावं लागते हे सर्व धरले तर खूपच वेळ जातो. हॉस्पिटल्सचेही असेच. याशिवाय निरनिराळ्या टेस्टच्या चक्रात सापडण्याची भीती असतेच. म्हणून जुन्या अनुभवावरून स्वत:च ठरवून उपचार- हे बरोबर नाही हे माहीत असूनही- केला जातो. एक दोन दिवसांत गुण आल्यास नंतर हीच प्रक्रिया सुरू राहते.
सुरेश देवळालकर, हैदराबाद, ई-मेलवरून.

विज्ञानमेव जयते.
दि. १६ जानेवारीच्या अंकातील संपादकीय आवडले. आज हा वैज्ञानिक दृष्टिकोन कमी होत चालला आहे. पुन्हा नव्याने तो रुजविणे काळाची गरज आहे. याचे समर्थ प्रतिपादन ‘विज्ञानमेव जयते’ या शीर्षकाखाली आपण समर्थपणे केले आहे. त्याबद्दल अभिनंदन!
जिकडे-तिकडे पुरातन विचारांचे मढे उकरण्याचे काम काही राजकारणी, धर्मवादी लोक करीत आहेत. सामान्य माणूस यामुळे भरकटल्यासारखा होतो आहे. आज जीवन-मरणाचे अन्य प्रश्न उग्र रूप धारण करीत असतानाच नको त्या प्रश्नाचे चर्वित चर्वण सुरू आहे. ही बाब लोकशाहीला मारक व हिंसेला पूरक ठरत आहे. धार्मिकतेपेक्षा धर्माधतेकडे झुकणारी मानसिकता भयावह आहे.
‘आत्महत्या व मानवी हक्क’ हा लेखसुद्धा चांगला होता. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यावर प्रकाश टाकला आहे. या विषयावर अधिक संशोधन होत असल्यास व झाले असल्यास त्याबाबतची माहिती वरचेवर प्रसिद्ध करावी.
विविध पुस्तकांचा परिचय आपण करून देता याबद्दल निश्चितच धन्यवादास पात्र आहात. नियतीने घातलेले हुमान आवडले. संघर्षांची जिद्द कायम ठेवणाऱ्या अशा कहाण्या वेगळीच उभारी देतात. सर्वानाच आवडाव्यात अशा या वास्तव जीवनातल्या कहाण्या आहेत. ‘आमिष’ जमातीबद्दलची माहिती आवडली. मर्यादित गरजांमध्ये व आधुनिकतेचा वेडय़ासारखा वापर न करता कसं जगता येऊ शकतं हे समजावून घेणं खरं तर खूप थ्रिलिंग आहे.
चंद्रकांत नंदाने, यवतमाळ.

सुसंवादच गरजेचा
‘सासूची बाजूही समजून घ्या’ या ६ फेब्रुवारीच्या अंकातील लेखाबद्दल लेखिका राधा मराठे आणि ‘लोकप्रभा’चे अभिनंदन. एक व्यावसायिक वकील म्हणून विवाहविषयक प्रकरणे हाताळताना प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे आत्ताची पिढी ही जास्त आत्मकेंद्रित होत चालली आहे. संसार हा कुटुंबीयांच्या समन्वयातून चालवायचा असतो, या गोष्टीचे भान कुठेतरी हरवत चालले आहे. कुटुंबातील नाती टिकवण्यासाठी समंजसपणा असणे जरुरीचे असते, याचा आजच्या तरुण-तरुणींना विसर पडतो का काय अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. लहानसहान कारणांवरून देखील घटस्फोट घेण्याच्या प्रमाणातील वाढ न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या घटस्फोटांच्या प्रकरणांच्या संख्येवरून लक्षात येते. या प्रतिक्रियेचा हेतू नव्या पिढीवर टीका करण्याचा नसून सुसंवाद वाढत चाललेल्या अभावाचा विचार या पिढीने करण्याची आवश्यकता आहे.
अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण.

lp11अच्छे दिन.. सुंदर लेख
दि. २३ जानेवारीचा अंक वाचला. कव्हर स्टोरीचे चित्र आणि विषय अतिशय योग्य आहेत. अच्छे दिन आहेत कुठे या लेखातून सध्याच्या सरकारच्या कारभाराचे योग्य मापन केले आहे. तेलाचे ढासळते भाव व आर्थिक तूट यांचा संदर्भ चांगला साधला आहे. सरकारच्या आर्थिक स्थितीचे बरोबर वर्णन केले आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासने देणे व त्यावेळच्या सरकारवर चौफेर टीका करणे सोपे असते. पण प्रत्यक्ष सत्ता आली असता आश्वासने पुरी करणे हे किती अवघड असते हे आत्ताच्या सरकारला कळेल तो सुदिन. गेल्या आठ-नऊ महिन्यांचा केंद्राचा कारभार पाहाता अच्छे दिन बहुत दूर है हा निष्कर्ष सामान्य जनतेस काढावा लागेल.
– वि. श्री. काशीकर, डोंबिवली.

अच्छे दिन कुठे आहेत?
‘अच्छे दिन आहेत कुठे?’ हा लेख वाचला, पण अनेक क्षेत्रांत अच्छे दिन सुरू झाले आहेत, असे मला वाटते. उदा. गॅसचे अनुदान वजा करून किंमत फक्त ४५० आहे. संक्रांतीपुरतेच गूळ, शेंगदाणे, मूगडाळ, हरभराडाळ वगैरे महाग झाले होते, कारण व्यापाऱ्यांची सणासुदीला कृत्रिम टंचाई करून भाव वाढवायची नफेखोर वृत्ती! पण आता हे सर्व १०० ते ३०० रुपये क्विंटलने स्वस्त झाले आहे. भाजीपाला-फळे स्वस्त होत आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव उतरले आहेत. हे सर्व ठीक आहे, पण अच्छे दिन खरोखर येण्यासाठी अत्यंत कठोर कायदे करून शारीरिक शिक्षा सुरू केल्या पाहिजेत. सतत वेगवेगवळे गुन्हे घडत आहेत. सामूहिक बलात्कार, महिलेची, लहान मुलाची क्रूर हत्या, खेडेगावात दरोडा घालून घरातील वृद्ध व्यक्तींस बेदम मारहाण करून लुटणे, खंडणीसाठी अपहरण करून ठार करणे असे गुन्हे सतत घडत आहेत. उदा. पिंपरी-चिंचवडमधील तरुणीची आत्महत्या, बडोदा बँकेवर दरोडा व ९६ लाखांची लूट, लातूरजवळ साखरा येथे तरुण-तरुणीस मारहाण. लातूरच्या दोघा भावांनी पुण्यात येऊन घातलेले २८ दरोडे.
अशा प्रकारच्या गुन्ह्यंत ताबडतोब कोर्ट मार्शल पद्धतीने सुनावणी घेऊन शिक्षा करणे, फटके मारणे, हात-पाय तोडणे आणि भयंकर गुन्ह्यत फायरिंग स्क्वाड अशा शिक्षा केल्या तरच गुन्हे थांबतील आणि अच्छे दिन येतील. नागरिकांस भयमुक्त जीवन जगता येईल.
सध्याचे कायदे आणि ‘मानवतावादी न्यायसंस्था’ यामुळे कितीही मोठा गुन्हा असेल तरी त्याचा निकाल लागून अंमलबजावणी होण्यास १० ते १५ वर्षे लागतात. असेच जर चालू राहिले तर नागरिकच गुन्हेगारास तात्काळ शिक्षा करतील. तशी उदाहरणे घडत आहेत.
घनश्याम कवी.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे देशाचे पितामह महात्मा गांधी यांचे गुरू होते, ही माहिती विवेक आचार्य यांच्या लेखात आलेली नाही. नव्या पिढीसाठी हे फार महत्त्वाचे आहे तेव्हा ही बाब सर्वसामान्यांच्या नजरेत भरेल अशी हवी होती.
– सुनील वैद्य, ई-मेलवरून.