डॉक्टर.. असे आणि तसे!
‘लोकप्रभा’चा ‘आरोग्य विशेषांक’ आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मार्गदर्शक, उपयुक्त वाटला. एखादा वाचकोपयोगी जिव्हाळय़ाचा विषय निवडून त्याबाबतची सर्वागीण माहिती रंजक पद्धतीने वाचकांना पुरवण्याची ‘लोकप्रभा’ची परंपरा प्रशंसनीय आहे. उपरोक्त विशेषांकातदेखील विविध आजार टाळून आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने बहुमोल माहिती देण्यात आली आहे. ‘जीवनशैली बदला, पण गाईचे दूध, पृथ्वीवरील अमृत’, ‘तुम्हीच होऊ नका तुमचे डॉक्टर’, हे लेख त्या दृष्टीने खास उल्लेखनीय आहेत. गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी या आजारांमुळे बेजार व्यक्तींना विशेषांकातील तत्संबंधी बहुमोल माहितीमुळे मोठाच दिलासा मिळेल. अपत्यहीनतेमुळे भोगावे लागणारे सामाजिक गौणत्व दूर होण्यासाठी मोलाची माहितीही विशेषांकात उपलब्ध आहे. पोट, डोळे, कान, दात यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या सुरक्षिततेसाठीही मोलाचे मार्गदर्शन विशेषांकात करण्यात आले आहे. ‘आरोग्याच्या वाटेवरचे आधार’ हा लेख तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांच्या माहितीसाठीची सरकारी रुग्णालयांची यादी ‘रेडी रेकनर’सारखी अत्यंत उपयोगी ठरणारी आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरील माहितीबरोबरच आरोग्यरक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून डॉक्टरांच्या रुग्णांबरोबरच्या वागणुकीबद्दल एखादा लेखही विशेषांकात अंतर्भूत करता आला असता तर बरे झाले असते. मी वांद्रय़ाला स्थायिक झाल्यापासून व दवाखान्याच्या स्थापनेपासून एक डॉक्टर आमचे फॅमिली डॉक्टर होते. एकदा पत्नीस एकाएकी फार अस्वस्थ वाटू लागल्याने माझा पुतण्या तिला घेऊन त्यांच्या दवाखान्यात पोहोचला. तेव्हा दवाखान्याची वेळ संपली आहे. तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा, असे त्यांनी त्यांना बेमुर्वतखोरपणे फर्मावले. त्यामुळे नाइलाजास्तव त्या दोघांना दुसऱ्या डॉक्टरकडे जावे लागले. अर्थात त्या माणुसकीहीन डॉक्टरकडे जाणे आम्ही कायमचे बंद करून दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ लागलो. आमचा त्यांच्याबद्दलचा अनुभव चांगलाच आहे.
वरीलप्रमाणेच एक दुसराही अजब अनुभव नमूद करण्यासारखा आहे. महागडय़ा अॅलोपॅथिक औषधोपचारांनीही पत्नीस म्हणावा तसा गुण येईना म्हणून तेव्हा एका प्रसिद्ध वैद्याकडे मी तिला घेऊन गेलो. तपासणीदरम्यान त्या वैद्यांनी तिला तिचे वय विचारले. तिने ८१ वे वर्ष चालू आहे, असे उत्तर दिल्यानंतर, ‘म्हणजे भिंतीवर फोटो लावण्याचे वय असताना तुम्ही आणखी किती वर्षे जगू इच्छिता, असा प्रश्न वैद्यराजांनी पत्नीला विचारला. या प्रश्नाने सुन्न होऊन त्यांनी दिले ते औषध घेऊन व त्याचे पैसे देऊन आम्ही घरी परतलो व पुन्हा त्या वैद्यांचे तोंड पाहिले नाही.
यासंबंधातच दुसऱ्या एका डॉक्टरबाबतचा अनुभव नमूद करण्यासारखा आहे. अनेक वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त मी नागपूरला असताना माझी तान्ही मुलगी उच्चतम तापामुळे गंभीर आजारी झाली व ती बेशुद्धावस्थेत गेली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने हात टेकल्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार नागपूरचे ख्यातकीर्त डॉक्टर पटवर्धन यांना आम्ही व्हिजिटसाठी बोलावले. त्याप्रमाणे ते आले व त्यांनी मुलीवर औषधोपचार करण्यास सुरुवात केली. सुमारे महिनाभर आम्ही न बोलावतादेखील ते आमच्या घरी येऊन मुलीवर उपचार करीत होते. मुलगी पूर्ण बरी झाल्यावर त्यांनी उपचार थांबवले. त्यानंतर त्यांचे बिल देण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात जाऊन ‘बिल किती झाले’ असे मी त्यांना विचारले तेव्हा ‘बिल शून्य’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे थक्क होऊन सुमारे महिनाभर तुम्ही आमच्या घरी येऊन मुलीवर यशस्वी उपचार केले असताना ‘बिल शून्य’ असे तुम्ही कसे म्हणता, असे मी म्हटल्यानंतर ते म्हणाले, ‘तुमच्या मुलीची केस मी एक ‘चॅलेंज’ म्हणून स्वीकारली होती. त्यामुळे तुम्ही न बोलावताही तुमच्या घरी येऊन तुमच्या मुलीवर मी उपचार करीत होतो म्हणून बिल काहीही नाही.’ त्यावर निरुत्तर होऊन ‘तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही’ एवढेच मी त्यांना म्हणू शकलो.
सध्या वरील मुलीने वयाची साठी ओलांडली असून ती आपल्या संसारात व्यवस्थित रमली आहे. दुर्दैव असे की बऱ्याच कालावधीनंतर त्या डॉक्टरांच्या पोटात काही रोग उद्भवल्यामुळे त्यांना मुंबईतील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेथील उपचारांचा उपयोग न होता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटनेस ‘दैवदुर्विलास’ असेच म्हणावे लागते.
वसंत वामन इनामदार, वांद्रे (पूर्व), मुंबई.

सरकारी रुग्णालयांचे काम कौतुकास्पद
‘लोकप्रभा’चा आरोग्य विशेषांक हा खऱ्या अर्थाने वाचकांना आरोग्यदायी वाटावा असाच आहे. निरनिराळे आजार, तब्येतीच्या रोजच्या व लहानसहान तक्रारी, शरीराची निगा, व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याचे महत्त्व, दवाखान्यांचे संपर्क अशी भरपूर माहीत असलेला आणि अत्यंत वाचनीय अंक आहे.
खास नमूद करण्यासारखे म्हणजे ‘सरकारी तरी सर्वोत्तम’ हा संदीप आचार्याचा लेख मला खूप आनंद देऊन गेला. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या स्वत:च्या देखरेखीखाली कार्यरत असलेली ५-७ रुग्णालये आणि तिथे काम करणारी रुग्णांची मनापासून सेवा करणारी डॉक्टर मंडळी, तसेच सर्वच रोगांवर होणारे उपचार व शस्त्रक्रिया तेसुद्धा कित्येक लाख रुग्णांवर, खरोखरच अशी रुग्णालये संपूर्ण भारतात कमीच असतील. हे सर्व प्रचंड पण कौतुकास्पद आहे. या रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर्स यांना स्पेशल सलाम.
विशेष म्हणजे सरकारी यंत्रणा व राजकीय नेते तसेच प्रसिद्धीमाध्यमांचे दुर्लक्ष बघून वाईट वाटते. संदीप आचार्यानी सर्वच बाबी, माहिती विस्तृतपणे व निर्भयपणे मांडल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
प्राजक्ता कासले यांनी पॉलिएटिव्ह केअर म्हणजे काय, त्याची आवश्यकता, त्या दृष्टीने काम करणाऱ्या संस्थांची यादी अशी उपयुक्त माहिती दिली. एकंदरीत हा आरोग्य विशेषांक प्रत्येकांनीच वाचावा आणि आरोग्यासंबंधित सर्वच माहितीचा लाभ घ्यावा असा उपयुक्त आहे.
भाऊराव ल. हेडाऊ, नागपूर.

सर्वागसुंदर संग्राह्य़
दि. २३ जानेवारी २०१५ चा लोकप्रभाचा अंक हाती येताच आनंद झाला व त्याच्या वाचनाने तर हा आनंद द्विगुणीत झाला. सर्वच विषयांना स्पर्श करणारा व अंतर्मुख करणारा, विविध विषयांची माहिती देणारा, खाण्याच्या विविध पदार्थापासून जगाच्या सफरीवर नेऊन पर्यटनाचा आनंद, निसर्गात रमण्याचे महत्त्व सांगणारा, जीवनातले अनुभव कथन करणारा तर नाटक-सिनेमातून करमणूक व ज्ञान मिळवा, इतिहास ऐका, पहा असे ज्ञानामृत देणारा हा वैविध्याने नटलेला अंक खरोखरच वाचनीय व संग्राह्य़ आहे यात शंका नाही.
‘जब तोप मुकाबिल हो..’ हा विनायक परब यांचा संपादकीय लेख कुणाही सुजाण वाचकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ताकद काय असते ते सांगतो. कोणीही कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी जगाच्या पाठीवरचे सर्वच संपादक नमणार नाहीत, उलट जे दुसऱ्याचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांनाच माघार घ्यावी लागेल अशी खात्री पटवून देणारा लेख आहे. व्यंगचित्राच्या कमीत कमी रेषा संपूर्ण बातमी सांगू शकतात व याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचा कुणी हात धरू शकला नाही हेही वास्तव व्यक्त केले आहे. अच्छे दिन’ आहेत कुठे, असा प्रश्न लेखक करताहेत, पण मुळात सत्तेवर येऊन नरेंद्र मोदींना आठच महिने होत आहेत. त्यांच्या कामाच्या दिशा स्पष्ट आहेत. अजून थांबूया, वाट पाहूया. काहीतरी चांगलेच होईल.
राजकारण, समाजकारण, विरंगुळा, खाद्यसंस्कृती, पर्यटनाचे अनुभव सांगणारा हा अंक उत्तम जमला आहे. आपणा सर्वाचे अभिनंदन व शुभेच्छा!
नीळकंठ नामजोशी, पालघर.

‘लोकमान्य’ उपाधी दिली कोणी..
दि. २३ जानेवारी २०१५ चा ‘लोकप्रभा’ वाचला. सर्व लेख वाचनीय आहेत. सुबोध भावे यांचा पहिला व आताचा लेख अप्रतिम आहे. सुहास जोशी यांचा लोकमान्यांविषयीचा लेख मननीय आहे. त्यांचे काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. परंतु दोन तासांत लोकमान्यांचा जीवनपट उलगडणे शक्य नाही असे वाटते व हे ओम राऊत यांनी सांगितले. असो. मला फक्त एक माहिती हवी आहे की, बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ ही उपाधी केव्हा व कोणी दिली? ही बाब सिनेमात किंवा या लेखात कोठेच आढळत नाही.
उपेंद्र सरपोतदार, वडोदरा.

अन्नसंस्कार एक परिपूर्ण लेख
‘अन्नसंस्काराचं महत्त्व’ हा डॉ. अविनाश सुपे यांचा लेख वाचल्यावर कोकणातील माजघरातल्या जेवणासाठी बसलेल्या पंगतीची आठवण झाली. चार कोपऱ्यांवर पितळय़ाच्या गोल नक्षीदार चकत्या असलेले प्रशस्त पाट, पुढे मोठाली केळीची पाने, भोवती काढलेली सुबक रांगोळी, मधे मधे ठेवलेली उदबत्तीची घरे व पद्धतशीरपणे डावीकडचे, उजवीकडचे पदार्थ, मधोमध पांढरीशुभ्र भाताची मूद व त्यावर पिवळेरंजन वरण. हे बघून कोणाला भूक लागणार नाही. पहिला वरणभात मग पोळी किंवा पक्वान्न मग शेवटी थोडासा पाचक ताकभात असे क्रमवार जेवण असायचे.
६२ वर्षांपूर्वी माझी मुंज झाली तेव्हा माझ्या आजोबांनी मला जेवायच्या अगोदर चित्रावती कशा घालायच्या ते शिकवलेले आठवते. ताटा भोवती पाणी फिरवताना ‘‘सत्यंत्वर्तेन परषिअचामि’’ असा मंत्र म्हणून पानाच्या उजव्या बाजूला १) ॐभूस्वाहा २) ॐभूर्भवस्वाहा ३) ॐसूव: स्वाहा ४) ॐभूर्भूव: सूव: स्वाहा असे म्हणत भाताचे छोटेसे घास चित्रावती म्हणून रांगेने उभे मांडायचे. या मागे कारण असे की पानाभोवती पाणी फिरवल्याने व चित्रावती घातल्याने किडे मुंग्या पानात येऊ नये. जेवणाची पंगत पाटावरून खुर्चीवर व नंतर उभ्याने बुफे (स्वेच्छा भोजन) सुरू झाल्यावर पोटातल्या अग्नीची पूजा/प्रार्थना बंद झाल्या. गुडघे दुखीमुळे पाटावरच्या पंगती बंद झाल्या.
हल्ली पोटापाण्याची सोय (नोकरी-धंदा) करण्याच्या टेन्शनमुळे स्वत:च्या पोटाकडे दुर्लक्ष होते. नवीन म्हण अशी आहे, ‘पेट सलामत तो डिशेस् पचास’. आपल्या शरीराला ‘मुख’ आणि ‘गुद’ असे प्रमुख दरवाजे आहेत, त्यावर कडक पहारा असेल तर काय बिशाद आहे रोग शरीरात घुसेल. या सृष्टीमध्ये सकस आहारासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ औषध नाही. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. दानात दान अन्नदान असे म्हणतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून कुठचाही पदार्थ उष्ण किंवा थंड मानू नये. फक्त त्याचे अति सेवन हे घातक असते. म्हणून भोजन करताना कोणी कोणाला आग्रह करून अन्नाची नासाडी करू नये. म्हणून लेखाच्या शेवटी म्हटले आहे, ‘अन्नदाता सुखी भव:’
श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई

विज्ञानाबद्दल उत्साह हवा
विज्ञान विशेषांकातील परखड लेखाबद्दल डॉ. अनिकेत सुळे यांचे अभिनंदन. नुकत्याच भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये आपण आपले हसे करून घेतले आहे. एकाच वेळी दोन काय अनेक टोप्या घालणे आपल्याला सहज जमते. त्यामुळे आपण मंगळावर जातो पण जाताना मुहूर्त काढतो. नेत्यांबद्दल तर काही लिहायलाच नको. शालेय शिक्षणाची दुरवस्था अनेकदा चव्हाटय़ावर येऊनही तीत काही फरक पडत नाही. नेहरूंच्या काळात आणि नंतर अस्तित्वात आलेल्या भारतीय संशोधन संस्था लाल फितीत बांधल्या गेलेल्या आहेत. विज्ञानाबद्दल उदासीनता नको, उत्साह हवा ते वातावरण निर्माण होणे ही निकडीची गरज आहे. नवीन सरकारकडून ही अपेक्षा पुरी होणे कठीणच दिसते आहे. तरुण पिढीने मनावर घेतले तरच होईल
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response
First published on: 13-02-2015 at 01:01 IST