lp09अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा

‘लोकप्रभा’च्या १३ मार्चच्या अंकात विनायक परब, अजय वािळबे आणि जयंत गोखले या तिघांचेही लेख अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा करणारे होते. सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प अशी हाकाटी करताना केवळ थेट करदर आणि सवलतींत अनुकूल बदल न केल्याची नाराजीच दिसते हे अगदी खरं आहे. पण आपल्याकडील ‘प्रोग्रेसिव्ह’ कररचनेत जितक्या जास्त सवलती तितका अधिक उत्पन्न गटातल्या पगारदारांना फायदा हे मान्य केलं पाहिजे आणि आधीच उत्पन्नाची विषमता असलेल्या आपल्या देशात व्यक्तिगत सवलती वाढवण्याऐवजी उद्योगांना त्या देऊ करणे हे सरकारला गरजेचं वाटत असेल तर त्यात गर काय? हाच मुद्दा तीनही लेखात योग्य प्रकारे विशद केला गेलेला दिसला. फक्त सेवाकरातल्या वाढीविषयी लेखांमध्ये जास्त चर्चा आढळली नाही. मध्यंतरी एका आíथक वर्षी (बहुधा तीन वर्षांआधी) सेवा कर, अबकारी कर आणि आयात कर समसमान म्हणजे दहा टक्के होते. त्याआधी आणि नंतरही ते खालीवर होते. आता सेवाकर १४ टक्के केला खरा पण ज्यांना अधिभार भरावा लागतो अशांना त्यात दोन टक्के वाढीव अधिभार द्यावा लागल्यानं तो १६ टक्के झाल्यासारखाच आहे. १ एप्रिल २०१६ पासून येऊ घातलेल्या गुड्स अ‍ॅण्ड सíव्हस टॅक्सची (जी.एस्.टी.) ही नांदीच वाटते. त्यातही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शिवाय आंतरराज्य व्यवहारांवरचा कर असे तिढे असणारच आहेत. त्याबद्दल आत्ता कुणीच बोलू शकत नाही. कारण मुळात केंद्र सरकारला राज्यसभेतल्या बहुमताअभावी जी.एस.टी. आणण्याचा बेत संमत करून घेण्याची अवघड कसरत करावी लागणार आहे.
सेवा कर आणि अबकारी कर वाढवताना (त्यांच्या अंमलबजावणीच्या तारखा जाहीर करेपर्यंत संभ्रमावस्थाच) ‘एज्युकेशन सेस’ त्यातच समाविष्ट केला गेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत साठलेल्या अशा सेसच्या रकमांचा लाभ नवीन तरतुदींप्रमाणे आणि करदरानुसार कर भरताना घेता येईल का हाही एक तिढाच शिल्लक आहे.
एकंदर उद्योगांना करदरात हळूहळू सवलत देतानाच एका बाजूनं कररचना क्लिष्ट होईल की काय, अशी भीतीही वाटू लागते. भारतात गुंतवणूक करणाऱ्या बहुतेक परराष्ट्रीय व्यावसायिकांना आपल्या कररचनेचतल्या संदिग्धतेचं आणि करवसुली ‘करामतीं’चंच मुख्य भय असतं हे वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे परकीय गुंतवणुकीला चालना देणाऱ्या सवलतींचा अगदी भडिमार केला तरी ती किती वाढेल हा प्रश्न कालातीत राहण्याची शक्यताच जास्त. आपण आपलं ‘चांगभलं’ म्हणून परिस्थितीला सामोरं जायला ‘लोकप्रभा’तल्या लेखांनी बळ दिलं हे नक्की.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे, ईमेलवरून

अर्थसाक्षर करणारे विश्लेषण!
५ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या ‘लोकप्रभा’तील मुखपृष्ठ कथा २०१५ च्या सादर झालेल्या अर्थसंकल्पाविषयीची असल्याने उत्सुकतेने वाचली. संपादकीय, अजय वाळिंबे व जयंत गोखले या अर्थतज्ज्ञद्वयीने अर्थमंत्री जेटली यांच्या अर्थसंकल्पाबाबत अतिशय सूक्ष्मतेने सर्व पैलू एकाच वेळी ध्यानात घेऊन, तत्कालीन व दूरगामी परिणामांच्या दृष्टीने कसा आहे याचे फारच चिकित्सक पण सुबोध सरळ उलगडा करून दाखविला याबद्दल आभार. विविध अपेक्षा गगनाला भिडलेल्या असताना थेट फायदे दृष्टिपथांत न दिसल्याने असंख्यांनी एकाकी टीकेची झोड उडवली असताना, देशाचा अरुणोदय होणारा हा संकल्प आहे. असे वाचन संपवून खाली ठेवताना मत बनले. भरकटलेली अर्थव्यवस्था पुन्हा पदावर आणण्याच्या दृष्टीने पावले उचललेली आहेत. भविष्याचा वेध घेऊन आश्वासक ठरू शकणारा वास्तवदर्शी असा हा अर्थसंकल्प आहे. दीर्घकालीन विकासास साहाय्यभूत ठरणारा हा संकल्प अंमलबजावणीत १००% उतरला तर ‘अच्छे दिन’ दूर नाहीत.
– अनिल ह. पालये, कुळगांव, बदलापूर

lp10वक्तृत्व स्पर्धा- एक स्तुत्य उपक्रम
‘वक्तृत्व शैलीचा दिमाखदार सोहळा’ हा चैताली जोशींचा लेख वाचला. ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ हा ‘लोकसत्ता’चा कार्यक्रम नवीन पिढीच्या सुप्त गुणांना वाव देणारा व मननीय वाटला. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण तसेच चुरशीच्या वातावरणात आपले उद्दिष्ट पूर्ण करणे हे एक आव्हानच नवीन पिढीला पेलावे लागते. त्यामुळे नवीन पिढीकरता वक्तृत्व स्पर्धेसारखे उपक्रमाचे आयोजन करणे याबद्दल दैनिक लोकसत्ता अभिनंदनास पात्र आहे यात शंकाच नाही.
सगळीकडे सध्या नेतेगिरी व मतप्रदर्शन यांना ऊत आला आहे. याला कारण म्हणजे राजकीय घडामोडी व खुर्ची मिळविण्यासाठीची धडपड. आणि यासाठी उत्तम संभाषण किंवा भाषण कला ज्यांचेकडे असेल तो निश्चितच बाजी मारून जातो. लोकांवर छाप मारतो. त्यांची मने जिंकतो आणि आपला कार्यभाग साधतो. पण या प्रकारात प्रामाणिक व देशप्रेमी वक्ता असेल तर ते देशहिताच्या व जनहिताच्या दृष्टीने चांगलेच आहे. पण ढोंगी व स्वार्थी राजकीय नेते त्यांच्याकडे असलेल्या वक्तृत्व कलेचा फायदा स्वत:साठीच करून घेतात.
‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाद्वारे मात्र तरुण नव्या जोमाचे व मुळातच चांगला विचार असलेल्यांना यात संधी मिळाली. देशाला आज प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. वक्तृत्व, कर्तुत्व, आणि नेतृत्व यांची योग्य सांगड जमली तर विचारायलाच नको. याचे म्हणजे या त्रिवेणी संगमाचे, ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या संभाषण कलेची अशी काही छाप लोकांवर पडली की ते सहजपणे पंतप्रधान होऊ शकले. अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, अटलबिहारी वाजपेई ही मंडळी भाषण कलेत निपुण आहेत. असो.
लोकसत्तेने अशा उपक्रमाद्वारे चांगले नेतेच नव्हे, तर नवीन विचारांचे नेतृत्व पुढे आणावे.
भाऊराव हेडाऊ, नागपूर

‘अशाच’ विचारवंतांची गरज
अत्यंत सुसंस्कृत, प्रखर तेजबुद्धिमान, प्रखर देशभक्तीने भारलेल्या नथुराम गोडसेनामक ‘ब्राह्मणास’ दुसऱ्या ‘स्वदेशी देशभक्ताचे’ (की देशद्रोह्यचे) विचार संपविण्यासाठी त्यांची हत्या करावी लागली. (अर्थात विचार संपला नाही, हे या देशाचे दुर्दैव.)
अफझल गुरू काय किंवा अजमल कसाब काय, त्यांनी स्वदेशवासीयांच्या हत्या केल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी तुलना कोण कशाला करील? ‘गांधी हत्या’ करणाऱ्याचा दर्जा निश्चित वरचा! हे सर्व नव्याने ‘प्रकाश’ टाकून निदर्शनास आणल्याबद्दल ‘गोडसेभक्त प्रकाश जोशीं’चे आभार. आज आपल्या समाजाला अशाच विचारवंतांची गरज आहे, ज्याने समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागी होऊन, इतिहासाचा नव्याने अभ्यास सुरू होईल. अन् गांधीजींचे पुतळे उद्ध्वस्त करून त्या जागी गोडसेंचे पुतळे उभे करणारा तालिबानी समाज सहज निर्माण होईल. खरं तर सर रिचर्ड अटेनबरोने निर्माण केलेल्या ‘गांधी’ चित्रपटाच्या वरचढ, ‘गोडसे’ चित्रपट निर्माण होण्याची आजच्या समाजाची खरी गरज आहे.. अन आजच्या राजकीय वातावरणांत ते सहज शक्यदेखील आहे. (दहा लाखाच्या एका कोटातून चार साडेचार कोटी सहज उभे राहातात!) तेव्हा प्रकाश जोशीसर (की सर प्रकाश जोशी?) कामाला लागा. सुरुवातीला विरोध होईल, पण नंतर सुरळीत चालेल.. नाटक नाही का चाललं? आपला समाज ‘विचारांना’ वाव देण्याएवढा उदार निश्चित आहे!
– सुमन जोशी, चेंबूर

भविष्याचा ‘नवा’ अर्थ’
६ फेब्रुवारीच्या अंकातील सुहास सावंत यांचे भविष्य विशेषांक कशासाठी? हे पत्र अगदी योग्य वाटले. विज्ञानाला, विज्ञानातील प्रगतीला आणि नवनवीन विचारांना महत्त्व देणाऱ्या आपल्या लोकप्रभाने हे का करावे असे मलाही वाटतच होते. पण आपल्या लोकांचे मन दुखविणे हे आपल्या स्वभावात बसत नाही ना? पण लोकांच्या भावना दुखाविल्या जातात म्हणून अंधश्रद्धांना मान्यता देणे हेही योग्य नव्हे, ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच ‘लोकप्रभा’सारख्या अंकाकडून समाजसुधारणा, समाजप्रबोधन अशा अपेक्षा आहेत.
भविष्य म्हणजे पत्रिका, अमक्या स्थानी गुरू म्हणजे शुभ अमक्या स्थानी शनि म्हणून त्याचे भविष्य संकटात! असले विचार आणि त्यावर विश्वास हे या विज्ञाननिष्ट युगात शोभते का? भविष्यात काय घडणार हे, पुढे काय होणार हे कोणाला कळते का? हा साधा विचार आहे.
भविष्यात यशस्वी होण्यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शन करणे याला खरे, भविष्य घडविणे म्हणतात. या दृष्टीने ‘करिअरच्या वाटा’ दाखविणारा अंक अगदी योग्य वाटला. मुलांना भविष्यात, येणाऱ्या काळात काय करावे, यासाठी मार्गदर्शन करणे हे खरे भविष्याचा विचार करणारे वाटते.
तेव्हा येथून पुढील काळात भविष्यावर बोलायचे झाल्यास या अर्थाने बोलले जावे. भविष्य हा शब्द भविष्यात मुलांनी काय करावे, काय न करावे आणि आपले भविष्य घडवावे याअर्थी वापरला जावा. असे मला वाटते.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्यालाही काही करायचे आहे असा विचार केला तर हे नक्कीच पटेल.
– नलिनी दर्शने

lp11वाचनीय अंक
१३ फेब्रुवारीचा व्याघ्र व्यवस्थापन व जंगलांचा दुर्मीळ अनुभव कथन करणारा अंक वाचनीय तर आहेच, पण गेल्या ५० वर्षांत माणसाने प्राण्यांवर- वनांवर किती अन्याय केला आहे हेही अधोरेखित करणारा आहे. व्याघ्र प्रकल्प बाळसेदार व्हायचे असतील तर वाघांची राखीव क्षेत्रे फक्त वाघांसाठीच असायला हवी व त्यांच्या अस्तित्वासाठी इतरही आवश्यक त्या सर्व गोष्टींकडे अभ्यासू वृत्तीने वाढ केली गेली पाहिजे. शिकारी होणार नाहीत व वाघांचे खाद्य (इतर प्राणी) माणसे खाणार नाहीत यासाठी प्राणिमित्रांवरच ही जबाबदारी द्यायला हवी. या पाश्र्वभूमीवर डॉ. महेश संझगिरी यांचा लेख कुणालाही मानसच्या सफरीवर जावे असे पटवून देणारा आहे.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे थोरपण, विद्वत्ता, संसदपटू म्हणून इंग्रजी राज्यात प्राप्त केलेले मोठेपण व राष्ट्रहित हाच एकमेव विचार विवेक आचार्य यांनी उलगडून दाखवला आहे. नामदार गोखले यांची पुण्यतिथी मुद्दाम साजरी केली जावी, त्यांच्या कार्याचे स्मरण केले जावे. गोखले यांचे थोरपण सांगणारी उत्तम व्याख्याने व्हावीत व हे सारे मुख्यत्वे आजच्या खासदार व आमदारांसाठी प्रामुख्याने व्हावेस म्हणजे निदान काही टक्के तरी सुधारणा होईल! एकंदरीत नेहमीप्रमाणेच १३ फेब्रुवारीचा अंक वाचनीय व संग्राह्य असा असून यातील वैविध्यपूर्ण लेख स्मरणात रहातील असेच आहेत.
– नीळकंठ नामजोशी, पालघर

लेख आवडला
१३ मार्चच्या ‘लोकप्रभा’तील खरटमल यांचा लेख आवडला. आम्हीही पूर्वी अशाच ट्रिप करायचो त्याची आठवण आली. ट्रॅव्हल कंपनीबरोबर खूप धावपळ असते. मनासारखे करता येत नाही. आता सोय चांगली असली तरी त्यांना प्रेक्षणीय स्थळे उरकायची असतात. त्यामुळे दगदग होतेच. थोडे कष्ट आणि धाडस केले तर मनासारखी ट्रिप करता येते. त्या त्या ठिकाणी तिथले जेवण न घेता पंजाब, केरळ किंवा युरोप-अमेरिकेत वरण-भात-पुरणपोळी दिली यातच लोक खूश असतात. असो. खरटमल यांच्या लेखाने सहलीचे नियोजन करायला प्रोत्साहन मिळाले.
मेधा जोशी, ईमेलवरून