lp07संग्राह्य़ पर्यटन विशेषांक
‘लोकप्रभा’ने आपल्या लौकिकाला जागत संग्राह्य़ आणि सुंदर असा पर्यटन विशेषांक प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. आपला पर्यटन विशेषांक हा कायमच काही तरी नावीन्य घेऊन येत असतो. खरे तर संग्रहालय म्हणजे केवळ शालेय सहलीत पाहण्याचा एक ठिकाण अशीच आपल्याकडे संभावना करण्यात येते. बहुतांश वेळा होते असे की केवळ रूक्ष अशा संग्रहालयाच्या भाषेत संग्रहालय समजून दिली जातात. मग सनसनावळ्या आणि केवळ अमक्याचं शिल्प आणि अमक्याचं चित्र अमक्या काळातलं अशी त्यांची भाषा असते. ते सर्व टाळून आपण संग्रहालयांना एक वेगळाच आयाम दिला आहे. किंबहुना त्याचमुळे एखाद्या अरसिकालादेखील ही संग्रहालय पाहावी अशी वाटतील. आपण ज्या प्रकारे संग्रहालय दाखवली ती पाहता आता आपण एक संग्रहालय विशेषांक काढायलादेखील हरकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भावी पिढय़ांना एक समृद्ध वारशाची चांगली ओळख होईल. 

हाच मुद्दा वारसा पर्यटन स्थळांबाबत. आपले पर्यटन याच स्थळांभोवती फिरत असते. पण आपण आपल्या अंकातून कलापरंपरेची वारसास्थळे दाखवून असेही पर्यटन असू शकते याची एक वेगळी दिशा दिली आहे.
– अजित कदम, कोल्हापूर</strong>

lp09वेध विश्वचषकाचा
विश्वचषकाची चाहूल लागताच ‘लोकप्रभा’ त्याबाबत काय करणार याची उत्सुकता होतीच. आणि नेहमीप्रमाणे आपण एक वेगळी दिशा दाखविणारा अंक प्रकाशित करून त्यावर शिक्कामोर्तब केले. आपण मांडलेली विक्रमचषकाची संकल्पना आता प्रत्यक्षातदेखील उतरत आहे. गेलचे विक्रमी शतक, डिव्हिलियर्सचे विक्रमी अर्धशतक पाहता विश्वचषक विक्रमचषक होणार हे निश्चित. फक्त एकच शल्य वाटते की आता क्रिकेट हा खेळच केवळ विक्रमांकरिता गाजणार की काय, अशी शंका निर्माण होत आहे. असो. आपण अतिशय माहितीपूर्ण अंक प्रसिद्ध केला आहे पण एक उणीव सांगावीशी वाटते. गेल्या काही वर्षांत क्रिकेट हा केवळ खेळ राहिला नसून त्यामागे मोठे अर्थकारण दिसून येते. प्रत्यक्ष मैदानात होणारी लाखो कोटींची उलाढाल तर आहेच पण त्या अनुषंगाने जाहिराती, कार्यक्रमाचे प्रसारण हक्क, अनेक उत्पादने या सर्वाचीच एक भली मोठी अशी बाजारपेठ जगभरात तयार झाली आहे. ही बाजारपेठ या अंकाच्या निमित्ताने आपण उलगडून दाखवायला हवी होती. असो, पुढच्या विश्वचषकाच्या वेळी त्यावर भाष्य करा.
– किरण पाटील, अहमदनगर</strong>

lp08वाघ आणि माणूस
वाघांची संख्या वाढली, असे पर्यावरणमंत्र्यांनी जाहीर केल्या केल्या देशभरातून त्यावर विविध अंगांनी चर्चा झडल्या. कोणाला ती समाधानकारक वाटली, कोणाला कमी. सरकारने तर स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. पण मूळ मुद्दा या सर्वामध्ये बाजूलाच पडला आहे, असे दिसते. कारण आजही आपल्या देशातील एक मोठा वर्ग आहे, ज्यांना वाघ वाढले म्हणजे काय फायदे होतात आणि कमी झाले म्हणजे नुकसान काय होते याबद्दल प्रचंड अज्ञान आहे. आज वाघांच्या संरक्षण-संवर्धनासाठी अनेक व्यवस्था कार्यरत आहेत पण या सर्वसामान्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी फारसे कोणी काही करीत नाही. आणि जे काही केले जाते तो केवळ दिखाऊपणा असतो. हे सांगायचे कारण असे वाघांची संख्या कमी झाली त्याला निसर्गापेक्षा माणूसच कारणीभूत आहे. ‘वाघ आणि माणूस’ हा संघर्ष अनादी काळापासून सुरू आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक माणसाला वाघांच्या किंबहुना पर्यावरणाविषयीच्या प्रश्नांची जाणीव होणार नाही, तोपर्यंत कितीही उपाय केले तरी ते कमीच पडतील.
– विलास खोत, गारगोटी

‘लोकप्रभा’तून दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या कथा मी मनापासून वाचते. कथालेखक फारसे माहितीतले नसतात. बहुधा ‘लोकप्रभा’चे वाचकच त्या कथा पाठवीत असावेत. साध्या-सोप्या भाषेतल्या मानवी जीवनाचे विविध कंगोरे टिपणाऱ्या या कथा मला फार आवडतात. ‘लोकप्रभा’ने सदर संपताना अशा कथांचे एक पुस्तक काढावे.,अशी सूचना करावीशी वाटते.
– सुरभी पाटील, कोरेगाव, सातारा

‘लोकप्रभा’ने या वर्षी रेसिपींचे सदर सुरू केले आहे. त्यातल्या रेसिपींचे फोटो बघताना तोंडाला पाणी सुटते. पण त्या काही करून बघाव्याशा वाटत नाहीत. पण त्याचबरोबर वाचक शेफ ही संकल्पना प्रत्यक्षात आणून वाचकांनी पाठवलेल्या रेसिपी प्रसिद्ध करण्याची कल्पना मात्र अप्रतिम आहे. ‘लोकप्रभा’ने वाचक लेखक सदर सुरू करून वाचकांमधल्या लेखकांना प्रोत्साहन दिले. वाचकांच्या कथांचे सदर सुरू करून वाचकांमधल्या कथालेखकांना व्यासपीठ दिले आणि आता वाचकांमधल्या सुगरण आणि बल्लवांना ग्लॅमर दिले आहे.
– दिनेश पतंगे, सोलापूर

स्मरण अवजारांचे
६ फेब्रुवारीच्या अंकातील मधुसूदन फाटक यांचा विस्मृतीत चाललेली शेती अवजारे हा लेख वाचला. एका चांगल्या विषयाला आपण जागा दिलीत त्याबद्दल धन्यवाद! कालौघात काही घटक कमी होणार हे नक्कीच पण ते विस्मृतीत जाण्यापूर्वी त्याचे दस्तऐवजीकरण होणेदेखील गरजेचे आहे. आपण छोटासा लेख प्रकाशित केला असला तरी या विषयावर विस्तृत निबंधच यायला हवा. अन्यथा यापुढे या अवजारांचे अस्तित्व केवळ संग्रहालयापुरतेच मर्यादित राहील.
– प्रशांत चौगुले, अमरावती</strong>

‘लोकप्रभा’मधून गेली दोन वर्षे नियमितपणे कविता प्रसिद्ध होत होत्या. या वर्षी मात्र कवितांना अजिबात स्थान देण्यात आलेले नाही याचे मला वैषम्य वाटले. ‘लोकप्रभा’ने पुन्हा कविता सुरू कराव्यात.
– आरती देवगिरीकर, नांदेड

‘लोकप्रभा’मधून सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका, त्यातही मराठी मालिकांना बऱ्यापैकी स्थान दिले जाते. पण जागतिक तसंच हॉलीवूड सिनेमांच्या पातळीवर काय चालले हे अजिबात समजत नाही. असे एखादे सदर असावे हे ऑस्करवरचे लेख वाचल्यावर प्रकर्षांने जाणवले. या मुद्दय़ांची नोंद घ्यावी ही विनंती
– माधव बाग, उमरगा

मराठी सिनेमाच्या सद्य:स्थितीचे विश्लेषण
गेल्या काही वर्षांत दर आठवडय़ाला दोन-तीनच्या संख्येने मराठी चित्रपटांचे रतीब घातले जातात. मराठी सिनेमा दर्जेदार असतो, तो बदलला आहे, हिंदीतील निर्मातेदेखील त्यासाठी पुढे येत आहेत वगैरे चर्चा हल्ली हमखास ऐकायला येते. पण त्यामानाने आपणास असे चांगले सिनेमे पाहायला मिळत नाही. या सद्य:स्थितीचे अगदी यथार्थ विश्लेषण दिलीप ठाकूर यांनी केले आहे. मुद्दा असा आहे की अशा प्रकारे केवळ पैसे आहेत, अनुदान आहे म्हणून भारंभार चित्रपट तयार करणे कमी करायला हवे. अन्यथा काही काळानंतर मराठी चित्रपट म्हणजे निव्वळ टाइमपास, अशी भावना तयार होईल आणि वाढत्या प्रेक्षकवर्गाला फटका बसू शकेल.
– अनिकेत जोशी, पुणे