कलात्मकता आणि तंत्रज्ञानाची छान सांगड

तद्दन तमाशापट, मग पाटीलकीचे अत्याचार, गरीब मुलगा- श्रीमंत मुलगी प्रेमप्रकरण आणि पुढे फार्सिकल देहबोलीतून हशा उत्पन्न करणारे मराठी चित्रपट बाळबोध ठरू लागले तेव्हा जरा नैराश्यपूर्ण वातावरण निर्माण झालं खरं, पण आजच्या तरुणाईनं कलात्मकता, विषयांचं वैविध्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालत मराठी चित्रपटाला प्रौढही प्रगल्भ केलं, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. विशेष म्हणजे या प्रौढ सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक नवीन तरुण मंडळी आहेत आणि त्यात सहज अभिनयानं प्राण ओतणारे बालकलाकारही आहेत. या दृष्टीनं ‘तरुणाई करतेय सिनेमाचा मेकओव्हर!’ ही ‘लोकप्रभा’ (१० एप्रिल) मधील कव्हरस्टोरी अगदी समयोचित वाटली. नावाजलेल्या चित्रपटातल्या यथोचित छायाचित्रांनी लेख सुशोभित आणि परिपूर्ण झाल्यासारखा वाटला.
राष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळवणारे चित्रपट बघण्याची उत्कंठा नक्कीच आहे. कारण यातून केवळ मनोरंजन नाही तर मुलांचं भावविश्व, जे ‘श्वास’पासूनच्या मराठी सिनेमांतून केंद्रस्थानी आणलं गेलं आणि त्याच्या अनुषंगानं ते जपताना होणारी मोठय़ांची कसरत यातून दिला जाणारा जात-पात, धर्म यांच्या पलीकडचा माणुसकीचा संदेश फार मोलाचा आहे. ‘फँड्री’सारखे सिनेमे त्या दृष्टीनं मनाची घालमेल वाढवणारे वाटतात. नवीन चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजत आहेत, पण यापूर्वी पाहिलेल्यांपैकी ‘श्वास’, ‘पक पक पकाक्’, ‘आम्ही असू लाडके’, ‘सलाम’, ‘बालक-पालक’, ‘शाळा’ हे चित्रपट काही वेळा संवादाविनाही बरंच सांगून जाणारे होते. ‘श्वास’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ यांनी मात्र बालकलाकारांकडून काम करवून घेण्याचा आदर्श तरुण, संयमी दिग्दर्शकांना घालून दिला हे मात्र नक्की.
‘वळू’, ‘देऊळ’ यांसारखे चित्रपट त्यातल्या दिग्गज कलाकारांमुळे आणि उपहासात्मक शैलीत केलेल्या विषयाच्या हाताळणीमुळे बॉक्स ऑफिसवर पाय रोवून उभे राहिले. मानसिक वा शारीरिक आजारामुळे अगतिक झालेल्या भूमिकांतून अंगावर येणारे काही मराठी सिनेमेही येऊन गेले. ‘रात्र-आरंभ’ हा दिलीप प्रभावळकरांच्या अप्रतिम अभिनयानं नटलेला, तसेच त्यांचाच ‘चौकट राजा’, नंतर ‘डोंबिवली फास्ट’ हा संदीप कुलकर्णीचा, ‘अनुमती’ हा विक्रम गोखलेंचा हे चित्रपट वेगळ्या धाटणीचेच होते.
व्यक्तिरेखांवर आधारित ‘बालगंधर्व’, ‘डॉ.प्रकाश बाबा आमटे, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हे सिनेमेही डॉक्युमेंटरीसारखे न वाटता आजच्या तरुणाईलाही ते पाहून प्रेरणा घ्यावीशी वाटणारे झाले.
तरुण निर्माता-दिग्दर्शक निर्माण केलेली आणि आपल्याला भावलेली चित्रभाषा मार्केटिंगद्वारे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवत आहेत. त्यात कलाकारही भाग घेत आहेत. अभिव्यक्ती आणि व्यावसायिक गणित यांचा समतोल राखणं हे आजच्या मराठी चित्रपटांच्या यशाचं बलस्थान आहे हेही लेखातून, रवी जाधव, परेश मोकाशी, नागराज मंजुळे या दिग्दर्शकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून, प्रांजळपणे विशद झालं आहे हे महत्त्वाचं. त्यामुळेच तर काही पूर्वी येऊन गेलेल्या चित्रपटांचे, प्रथमच सिक्वेल येऊ लागलेत, उदा. ‘झपाटलेला’ (तोही त्रिमिती तंत्रात), ‘अगंबाई अरेच्चा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ यांसारखे, तर काही नजीकच्या भूतकाळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचेही, उदा. ‘टाइमपास.’
प्रश्न हाच आहे की उत्साहाच्या भरात पहिल्या भागातली विषय व पटकथा बांधणी पुढल्या भागात थोडी जरी विसविशीत झाली आणि भूमिका व कलाकार यांची जुळणी विजोड झाली तर प्रेक्षकांच्या पसंतीला ते उतरण्याची शक्यता कमी होईल. हिंदीतल्या काही सिक्वेल आणि रिमेक्सचा अनुभव वाईटच होता. पण यातून एक गोष्ट चांगली आहे की मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्यात आर्थिक समीकरणं सोडवण्याची आणि त्यातले धोके सहन करण्याची ऐपत आली आहे, जी मराठी चित्रपटसृष्टीला पुढे पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्रीय पुरस्कारांत बाजी मारण्यासाठी उमेद वाढवत राहणार आहे.
दरवर्षी सुवर्णकमळासाठी नामांकन होवो आणि ते मिळो, ऑस्करसाठीही नामांकन होत राहो आणि जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची दखल घेतली जावो हीच सदिच्छा. ‘लोकप्रभा’तूनही नवीन मराठी सिनेमांचं स्वागत आणि निर्माते-दिग्दर्शक आणि अर्थातच गुणी कलाकार यांचं कौतुक वाचायला मिळत राहो. – श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.

‘सिनेमांचा मेकओव्हर’ प्रेक्षकांसाठी कधी?
‘लोकप्रभा’च्या १० एप्रिलच्या अंकातील ‘तरुणाई करतेय सिनेमांचा मेकओव्हर’ हा लेख वाचला. माहितीपूर्ण लेख आहे. त्यात मांडलेला तरुणाईचा मुद्दाही पटला. मराठी सिनेमांमध्ये अलीकडे बरीच तरुण नाव दिसू लागले आहेत. त्यांचे नवनवीन आणि तरुण दृष्टिकोन घेऊन ही मंडळी चांगली कलाकृती करीत आहेत. त्यांची विविध प्रयोग करण्याची धडपड, जिद्द स्तुत्यच आहे. तसंच त्यांनी मांडलेल्या विषयांनाही दाद द्यावीशी वाटते. काही सिनेमांचा आम्ही प्रेक्षकांनी आनंद घेतला. पण, काही सिनेमे अजूनही आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तीन सिनेमे बघण्यापासून प्रेक्षक आजही वंचित आहे. यामागे व्यावसायिक गणितं, नियोजन या गोष्टी नक्कीच असतील. पण, त्यात सुधारणा करून सिनेमाकर्त्यांनी योग्य तो बदल करायला हवा. हे सांगण्याचा हेतू एवढाच की, विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविण्यात आलेल्या सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना उशिरा घेता येतो. असे दर्जेदार मराठी सिनेमे बघण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतो. त्यामुळे तरुणाईचे विविध आव्हानात्मक प्रयोगांना लवकरात लवकर व्यासपीठ द्यावं जेणेकरून त्यांचा सामान्य प्रेक्षकांनाही आनंद घेता येईल. त्यामुळे सिनेमांचा हा मेकओव्हर प्रेक्षकांनाही बघता येईल.
हेमंत देशमुख, अंधेरी

स्फूर्तिदायी अंक
‘लोकप्रभा’चा २७ मार्च हा वर्धापन दिन विशेष अंक खूप आवडला. यातले ‘देण्यातला आनंद’, ‘देण्याऱ्यांचे नेटवर्क’, ‘पुढाकार समूहाचा’ आणि ‘रॉकिंग बॅण्ड्स’ हे सगळेच विभाग चांगले झाले होते. विषयांमध्ये असलेल्या वैविध्याचं कौतुक. दानाचं महत्त्वं, विशिष्ट काम पूर्णत्वास नेण्याची चिकाटी, जिद्द या गोष्टी या विभागांमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक माणसाबाबतच्या लेखात जाणवल्या. विशिष्ट गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणं मोठी गोष्टी. जिद्दीने पाठपुरावा करणाऱ्या आणि दानाची वृत्ती असणाऱ्यांची यशोगाथा असलेला ‘लोकप्रभा’चा वर्धापनदिन विशेष अंक वाचनीय झाला आहे. ‘लोकप्रभा’ नेहमीच तरुणाईच्या वैविध्यपूर्ण गोष्टींची दखल घेत असतं. या अंकातही बॅण्ड्सबाबतची माहिती वाचून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तरुण पिढीबद्दल अनेकदा वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. पण, ‘रॉकिंग बॅण्ड्स’ या विभागामुळे मराठी तरुणांची वेगळी बाजू बघायला मिळाली. शास्त्रीय, सुगम, पाश्चिमात्य असे विविध प्रकारांमध्ये प्रयोग करीत संगीत जपण्याचा त्यांचा प्रयत्न या विभागातील लेखांमधून दिसून आला. त्यामुळे त्यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली. अशा प्रकारे वर्धापन दिन विशेष हा अंक स्फूर्तिदायी ठरला आहे.
सविता महाडिक, नाशिक.

अनवधान खटकले
‘लोकप्रभा’च्या ३ एप्रिलच्या अंकात ‘छोटा पडदा’ ह्य सदरात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ह्य सुंदर मालिकेबद्दल चैताली जोशी ह्यंनी खूपच छान लेख लिहिला आहे. पण खटकली गोष्ट एकच की ज्या संवादांची त्यांनी स्तुती केलेय ते लेखक आशिष पाथरे यांनी लिहिलेले आहेत. पटकथेत पण त्यांचा सहभाग असूनही त्यांचा उल्लेख कदाचित अनावधानाने राहिला असेल. या मागच्याच अंकात ‘मिक्ता’ या दुबईत रंगलेल्या पुरस्कार सोहळ्याचं इंत्यभूत वर्णन करताना त्या या पुरस्कार सोहोळ्याच्या लेखकाचंच नाव अनावधानाने विसरल्या होत्या. दुर्दैवाने तो लेखक मीच होतो. लेखकांना निदान आपण तरी असे अनुल्लेखाने मारू नका!
राजेश चंद्रकांत देशपांडे

वर्धापनदिन विशेषांक आवडला
‘आधी केलेचि पाहिजे’ हा मंत्र देणारा २७ मार्चचा ‘लोकप्रभा’चा वर्धापनदिन विशेषांक खूप आवडला. प्रत्येकाने वाचावा आणि संग्रही ठेवावा असा हा अंक आहे. यातील व्यक्तींचा कार्यपरिचय वाचताना कर्तुत्व, दातृत्व, जिद्द, चिकाटी आणि परोपकारी वृत्ती अशा अनेक मनोहारी गुणांचं दर्शन घडलं. असे आदर्श लोकांपुढे ठेवण्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. असा वैशिष्टय़पूर्ण आणि समाजोपयोगी कामांसाठी लोकांना प्रवृत्त करणारा हा अंक अभिनव आणि अभिनंदनीय आहे.
स्नेहप्रभा पिटकर, मुंबई.

वेगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स
‘पृथ्वीचे तापणारे हवामान, सत्य किती, तथ्य किती’ ही ‘लोकप्रभा’ची कव्हरस्टोरी वाचली आणि लक्षात आले की सगळे काही आपण समजत असतो तसे नसते. मधल्या काळात हवामानबदलाच्या संदर्भात घाबरवून सोडणाऱ्या बातम्या यायच्या आणि या सगळ्या परिस्थितीला आपणच म्हणजे तिसऱ्या जगातले लोक कसे कारणीभूत आहोत हे आपल्यावर लादले जायचे. पण मुळात विकसित देशांनी एकोणिसाव्या शतकात करून ठेवलेल्या उद्योगांचे काय? आणि ज्या काळात औद्योगिकीकरण नव्हते त्या काळातही हवामानबदलाच्या, त्याचा पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर परिणाम होण्याच्या घटना घडलेल्या आहेत हे वाचल्यावर लक्षात आले की प्रपोगंडा तयार करून लोकांना घाबरवून सोडणे हाही एक प्रकारचा इंटेलिजन्सच आहे. अमानवी, अतिमानवी असे काहीही जगात नसते आणि तरीही ते आहे हे गृहीत धरून हॉरर सिनेमे काढणे हा जसा इंटेलिजन्स आहे, तसाच कमी माहिती असलेल्यांना एकाच बाजूची जास्त तरीही अपुरी माहिती देऊन घाबरवणे हा प्रकारही आहे असे म्हणता येईल.
-गणेश गुरव, सोलापूर.