lp07शेतीवर आक्रमण हे राज्यकर्त्यांचे अपयश
‘लोकप्रभा’ १२ जूनच्या अंकातील हर्षद कशाळकर यांचा ‘शेती की औद्योगिकीकरण?’ हा लेख आवडला. एका दुर्लक्षित प्रश्नाचा अभ्यासपूर्ण वेध घेतल्याबद्दल अभिनंदन आणि आभार!
रायगड जिल्ह्य़ात ‘विकास’ या गोंडस नावाखाली येणारे प्रकल्प अभ्यासल्यास, रायगडचे भौगोलिक स्थानमाहात्म्य हेच खरे आकर्षण या विकासकांना (?) असल्याचे दिसून येईल. मुंबईला खेटून असणे, समुद्रकिनारा, पाण्याची उपलब्धता, मनुष्यबळ पुरवठा या सर्व बाबी उद्योगांना पोषकच आहेत. मात्र उद्य्ोगधंद्यांना पायघडय़ा घालताना, या परिसरातील मूळ व्यवसायांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे का? असा प्रश्न पडतो. उदाहरणादाखल रायगडमधील मीठ उत्पादकांबद्दल सांगता येईल. पारंपरिक पद्धतीने मीठ तयार करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून खुल्या बाजारात मीठ विक्रीस शासनाने बंदी केली आहे. या उत्पादकांनी त्यांचे मीठ शासनाने ठरवलेल्या कंपन्यांना विकले पाहिजे, असा प्रयत्न चालू आहे. या र्निबधांमुळे आधीच अडचणीत असलेला पारंपरिक मीठ उद्योग आता अखेरच्या घटका मोजत आहे.
भातशेती, मासेमारी आणि मीठ उत्पादन अशी ओळख असलेला रायगडचा सागरी परिसर आता यार्ड, गोडाऊन, सी.एफ.एस. यांनी गजबजून गेला आहे. इथल्या जनतेलाही विकास हवाच आहे. पण तो विकास मूळ व्यवसायांना नवी संजीवनी देऊन करता येईलच की! शेतीतून फारसं काही हाती लागत नसल्याने भूमालक प्रलोभनांना भुलून आपली जमीन विकून टाकायला तयार आहेतच. पण ही वेळ त्या शेतकऱ्यावर येणं हे राज्यकर्त्यांचेदेखील अपयश नाही का? शेतजमीन नापीक होईपर्यंत दुर्लक्ष करायचे आणि तसे झाल्यानंतर तेथे ‘विकासाचे’ गाडे चालवायचे हेच धोरण सध्या शासनाने स्वीकारलेले दिसते. ज्या वेळी एखाद्या शेतजमिनीवर उद्योगाची निर्मिती होते, त्या वेळेस रोजगार निर्माण झाल्याचा दावा केला जातो. काही प्रमाणात ते सत्यही आहे. परंतु शेतीला पूरक आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर उद्योगांची साखळी उद्ध्वस्त होते हे कळण्याइतके आपण अज्ञानी आहोत की अतिज्ञानी आहोत हेच समजणे कठीण आहे.
‘लोकप्रभा’ने आमच्या आयुष्याशी निगडित अशा विषयावर चर्चा केल्याबद्दल खूप खूप आभार!
तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण).

lp09अपेक्षा निर्माण केल्या, म्हणूनच असमाधानाचे जनक
असमाधानाचे जनक! ५ जूनच्या अंकाचे मुखपृष्ठ बोलके आहे. वस्तुनिष्ठ आणि अप्रतिम अशी मुखपृष्ठ कथा आवडली. राजकारणी कावेबाज असतात, मतदार भोळा-भाबडा असला तरी सुज्ञ आहे. फसवणाऱ्यास धडा शिकवितो. सन २०१४ ला हे घडले आहे.
कॉँग्रेसचे सरकार कर्मामुळे मातीत गेलं, भ्रष्टाचार हे एक कारण होतं. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अत्यंत प्रामाणिक होते. परंतु स्वयंप्रकाशी नव्हते, नेतेही नव्हते. लोकसभा सदस्यही नव्हते. लाखो, कोटीचे घोटाळे थांबवू शकले नाहीत.
कॉँग्रेस अध्यक्षा गांधी घटनाबाह्य़ सत्ताकेंद्र होते, प्रामाणिक पंतप्रधानांचा देशाला उपयोग झाला नाही. आधीच सरकार गेलं म्हणून भ्रष्टाचार थांबला नाही उलट भ्रष्टाचार वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसारी नाहीत, म्हणून योगीही नाहीत, संन्याशीही नाहीत.
देशाच्या पैशावर परदेशात अधिक रमतात, लाखो रुपयांचा सूट घालतात, झाडूगिरी करतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी फकीर होते, पंचा नेसून परदेशात गेले. सत्याचा आग्रह धरला, मरेपर्यंत सत्य सोडले नाही, जगावर प्रभाव टाकला तो कोणतीही सत्ता कधीही हाती नसताना. मोदींनी पंतप्रधानपद मोठे करावे, गांधीगिरी करू नये. निवडणुकीतील भाषणे आठवावीत, आश्वासने पाळावीत, कृती करावी.
आधीच्या सरकारपेक्षा वेगळे करून दाखवावे. भ्रष्टाचार तरी बंद करावा. परदेशातील सहली बंद कराव्यात, देशातली गरिबी पाहावी. देशात १९ कोटी लोक उपाशी झोपतात आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर अब्जावधी रुपये उधळतात याची लाज वाटली पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे फसव्या घोषणा देऊन मोदींनीच अपेक्षा निर्माण केल्या. पहिल्या वर्षांत तरी अच्छे दिन आले नाहीत. चांगले दिवस देशाला आहे नाहीत. भ्रष्टाचाराला आलेत, भाजपला आलेत, संघपरिवाराला आले. आपण या विषयाला हात घातलात त्याबद्दल ‘लोकप्रभा’चे अभिनंदन.
आर. के. मुधोळकर, नांदेड.

दि. १२ जूनच्या अंकातील ‘पुरुषांवरील बलात्कार’ हा विजय पाष्टे यांचा लेख वाचला. एका वेगळ्या अंगाने विचार करणारे लेखन वाचून छान वाटले.
– पांडुरंग रुमणे, ई-मेलवरून

‘पुरुषांवरील बलात्कार’ ही विजय पाष्टे यांची चर्चा आवडली.
अनिल पाठारे.

दि. १२ जूनच्या अंकातील संजयंत सहस्रबुद्धे यांचा ‘कधी सुधारणार रेल्वेचा कारभार?’ हा लेख अतिशय सुरेख असा आहे. लेखकाचा तपशीलवार आणि सखोल अभ्यास पाहून थक्क झालो. असे लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ‘लोकप्रभा’ला धन्यवाद.
– हर्षद गजानन आपटे, रत्नागिरी.
ई-मेलवरून

अभ्यासपूर्ण लेख
दि. ५ जूनच्या अंकातील ‘हत्ती पकड मोहीम’ हा मिलिंद पाटील यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. अनेक वेळा काही घटनांबद्दल आपणास खूप कमी माहिती असते. केवळ बातम्यांमधून कळणारी माहीतच असते. हत्ती पकड अभियानावर सविस्तर आणि सखोल माहितीचा अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
सुदीप पाटील, रत्नागिरी

lp08रुचकर विशेषांकास थोडा उशीर झाला…
रुचकर विशेषांकाचं अत्यंत आकर्षक असं मुखपृष्ठ पाहताच तोंडाला पाणी सुटलं. वैदेही भावे यांच्या उन्हाळी रेसिपीज्, वैद्य खडीवाले यांचा मोलाचा सल्ला यामुळे हा अंक संग्राह्य़ झाला आहे. पण एक उणीव राहून गेली. आपला अंक उन्हाळ्याच्या सुरुवातीस यायला हवा होता. जेणेकरून त्यातील जास्तीत जास्त रेसिपीजचा अनुभव घेता आला असता.
अनिकेत दातार, सांगली.

आधार गरजेचाच
‘लोकप्रभा’ ५ जूनच्या अंकातील डॉ. जान्हवी केदारे यांचा ‘दुभंगलेली मने सांधताना’ हा लेख वाचला. आज माझे वय ६७ वर्षे असून आयुष्याची संध्याकाळ अगदी मजेत, आनंदात सर्व कुटुंबासह घालवीत आहे. मी ३७ वर्षांचा असताना एकामागोमाग तीन वेळा झालेले बायकोचे अबॉर्शन, आर्थिक संकट यामुळे मी खिन्न झालो होतो. फक्त माझे मित्र पळसकर यांचाच काय तो आधार. अचानक चित्रविचित्र विचार येऊ लागले. कोणी तरी पाठलाग करीत आहे. मला पाहून हसत आहे. मी ऑफिसला आल्यानंतर घरी कोणी तरी येत आहे. नाही नाही ते खोटे विचार येऊ लागले. आणि ते खरेच आहेत, असे वाटू लागले. वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत रिपोर्ट जाऊ लागले. माझी चौकशी होऊ लागली. दैवयोगाने त्याच वेळेस देवाप्रमाणे डॉ. विजय चिले भेटले व त्यांनी माझी जबाबदारी घेतली आणि एका महिन्यात मी पूर्ण बरा झालो. पुढे सहा महिने औषधे चालू होती; परंतु माझ्यामुळे बायकोला खूप त्रास सहन करावा लागला. तरीही तिने पूर्ण आधार आणि साथ दिल्यानेच हे दिवस आले आहेत. योग्य औषधे, योग्य डॉक्टर आणि योग्य आधार मिळाल्यास रोगी पूर्ण बरा होतो हे समजावे म्हणून हा पत्रप्रपंच.
विनायक बाळकृष्ण भिंगे, अंबरनाथ.

गिर्यारोहकांच्या मदतीला सलाम…
नेपाळच्या भूकंपानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांनी केलेली मदत याचे वर्णन करणारे ५ जूनच्या अंकातील दोन्ही लेख अत्यंत समर्पक असे होते. प्रत्यक्ष भूकंप पाहिल्यानंतर नेपाळमधून बाहेर पडेपर्यंतचा प्रवास हा एकूणच नेमक्या हाहाकाराचे स्वरूप मांडणारा होता. तर गिर्यारोहकांच्या तत्पर मदतीमुळे त्यांच्या सामाजिक कामाचा एक चांगला पैलू जगासमोर आला. केवळ डोंगर न चढता गिरिजनांप्रति त्यांनी केलेली मदत ही कौतुकास्पद म्हणावी लागेल.
सुचित्रा भोसले, उस्मानाबाद.

निसर्गाकडून शिका
दि. १ मेच्या ‘लोकप्रभा’तील ‘वाचक-लेखक’ सदरातील प्रशांत निकम यांचे ‘मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा’ हे सद्य:स्थितीवरील उपहासात्मक लिखाण छान आहे. गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात व एकूणच जीवनपद्धतीत आमूलाग्र फरक होताना दिसत आहे. एकूणच सर्व दृष्टिकोन पार ढवळून निघाला आहे. कधी काळी दीड-दोनशे वर्षांपूर्वी मेकॉलोने त्यांचे राज्यशकट सुरळीत चालण्यासाठी बारीक बारीक पुर्जे निर्मिणारी शिक्षणपद्धती रूढ केली. त्यातून तयार झालेले बाबू लोक महिन्याला नियमित तटपुंजा का होईना पगार घेणारे समाधानी लोक तयार होऊ लागले. मग दोन्ही महायुद्धांनी व विज्ञान-तंत्रज्ञानातील क्रांतीने सर्व मूल्येच बदलून टाकण्याचा घाट घातला. आज रोजगाराची नवनवीन क्षेत्रे खुणावत आहेत. शिक्षणसम्राटांनी नवनवीन रेसची मैदाने उघडली. त्यात आघाडीवर येण्यासाठी तोंडाला फेस येईपर्यंत धावणारी मुले-मुली दाखल होऊ लागली. चवीला थोडे सांस्कृतिक जीवन, थोडे संस्कारवर्ग, थोडी क्रीडांगणे मदत करू लागली. पुढे काय, नेमके ध्येय काय, या रेसचा शेवट काय, कोणालाही माहिती नाही. फक्त पळा, पळत राहा एवढाच परवलीचा शब्द आहे. एक बेफिकिरी, उथळ-सवंगपणा वाढत चालला. खाण्यापिण्याच्या सवयीतील बदलाने इस्पितळे, डॉक्टरांचे व्यवसाय फुगत चालले. निसर्ग केवढा मोठा शिक्षक आहे, त्याचे सन्निध राहा, लहानसहान घटनांतील आनंद शोधा, मैत्रीपूर्ण जीवनरस शोधा, तृप्तता मिळेल..!!
श्यामसुंदर गंधे, पुणे.

lp10१२ जूनच्या अंकातील दीप्ती वारंगे यांची ‘अबोल प्रेम’ ही कथा छान होती. खूप आवडली.
परेश चिकणकर, ई-मेलवरून.