lp07कुंपणच शेत खातं
‘असला भ्रष्ट, तरी जय महाराष्ट्र!’ ही दिनेश गुणे यांची कव्हरस्टोरी (३ जुलै) वाचली व कुंपणच शेत खात आहे ही म्हण आठवली.
देशात कोणताही पक्ष आता सत्तेवर आला तरी त्याला भ्रष्टाचारात आकंठ बुडवण्याचे सामथ्र्य भांडवलदारांमध्ये आहे. त्यामुळे याने भ्रष्टाचार केला, त्याने भ्रष्टाचार केला, विश्वास कुणावर ठेवावा नि कुणावर ठेवू नये हे न कळण्यासारखी परिस्थिती आहे. धूर्त लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र येऊन जनतेला लुबाडण्यासाठी केलेला कट म्हणजे लोकशाही.
मानवी मूल्यांचा ऱ्हास, नैतिक अनैतिकतेचे सैल झालेले बंध, फोफावलेला व्यक्तिवाद, ढासळलेला कुटुंब व समाज व्यवस्था, सर्वच क्षेत्रांमध्ये झालेले अध:पतन हे चिरीमिरी, लाचलुचपत, घोटाळे, भ्रष्टाचाराचे कारण आहे.
सर्वसामान्य माणूस सध्या वैतागलेला आहे, अशा सामान्य माणसाला कितीही मोठा भ्रष्टाचार झाला तरी फरक पडत नाही, चीड येत नाही. भ्रष्टाचार हा चिरीमिरीपासून घोटाळ्यापर्यंत समाजमनात एवढा मुरत, झिरपत चालला आहे की समजा! भ्रष्टाचाराचा या घडीला पूर्ण बीमोड झाला तर काय होईल? मुळासकट उपटण्याचे ठरले तर काय परिणाम होईल याचा नुसता विचार, साधी कल्पना जरी केली तरी गंभीर वाटते. बघा..
१) सर्वसामान्य माणसांची अनधिकृत घरे पाडली जातील. २) सर्व झोपडय़ा पाडून गरीब कुटुंबे उघडय़ावर पडतील. ३) महानगरपालिका/ सरकारी कर्मचारी यांना कमी उत्पन्नात महागाईला तोंड द्यावे लागले. ४) रस्ते चांगले झाल्यामुळे, दुरुस्तीचे काम नाही, त्यामुळे कंत्राटदारांचे नुकसान होऊन मजूर बेकार राहतील. ५) शिक्षण पद्धत सुधारल्यावर कोचिंग क्लासेस बंद होतील. शिक्षक बेकार होतील. ६) रेशनिंग व्यवस्था सुधारल्यामुळे धान्य व्यापारांचे नुकसान होईल. ७) वाहतूक अधिकारी कायद्याने वागल्यावर, अपघात कमी होऊन लोकसंख्या वाढेल. ८) मंत्र्यांची खातेवाटपावरून भांडणे होणार नाहीत. ९) बऱ्याच जणांचे नंबर दोनचे उत्पन्न बंद होऊन मॉल, हॉटेल, क्लब यांवर त्याचा परिणाम होईल. ११) सगळेच कायद्याने वागले तर पोलिसांना काम उरणार नाही, पोलीस भरती थांबेल. बदली करणे, रजेवर पाठवणे, न्यायालयीन चौकशी करणे, सीबीआय चौकशी, चौकशी कमिशन नेमणे, राजीनामा घेणे, फाइल गहाळ करणे वगैरे दिरंगाईने भ्रष्टाचाराला कोमात टाकून जाग आल्यावर त्याला नियमित करणे, जनता विसरल्यावर पुन्हा कामावर रुजू करून घेणे.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर

सर्वसामान्यांनी मरेपर्यंत करीत रहा फक्त कष्ट
‘लोकप्रभा’च्या तीन जुलैच्या अंकाचे शीर्षक वाचून पुढील ओळी सुचतात. ‘असाल भ्रष्ट, तरी जय महाराष्ट्र’ आणि ‘सर्वसामान्यांनी मरेपर्यंत करीत रहा फक्त कष्ट’ दादरमधील फूल बाजारात एकेकाळी फूल विकून गुजराण करणाऱ्याने शिवसेनेत जाऊन राजकारणाची पायरी चढली. मग राष्ट्रप्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या राष्ट्रप्रेमाच्या संपत्तीचे बळ पाहून डोळे पांढरे होतात. यांनी घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे, मालमत्ता पाहून प्रश्न पडतो की हे सारं येतं कोठून? याला कायद्याचा काहीच अटकाव नाही का?
देशाच्या पारंपरिक न्यायव्यवस्थेप्रमाणे सर्व सोपस्कार यथासांग होतील. मग अटक, दंड, जामीन व सुटका हे सर्व न्यायव्यवस्थेच्या कक्षेप्रमाणे होईल. शिक्षाही होईल. पण तरी प्रश्न उरतो या सर्व संपत्ती, मालमत्तेचे काय होते? ही सर्व मालमत्ता देशातील जनतेची आहे. तेव्हा ही सर्व संपत्ती देशाच्या तिजोरीत परत यायला हवी. हाच कायदा व्हायला हवा. दिवसरात्र काबाडकष्ट करून ही लाखो लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना भुजबळ, कृपाशंकर यांसारख्या बकासुरांना कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. का ही लुटालूट अशीच चालू राहणार?
अनिल प्रल्हाद पाठक, विरार.

lp09व्यवस्थाच बदलायला हवी
इतका विचारप्रवर्तक लेख लिहून शिक्षणातील दुरवस्था समोर आणल्याबद्दल रेश्मा शिवडेकरांचे मनापासून अभिनंदन. शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी त्यांनी उदाहरणे देऊन दाखवून दिल्या आहेत. नुसती सदिच्छा असणे पुरत नाही. ती सदिच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी निश्चयाची आणि अथक श्रमांचीही गरज असते. त्यातही नक्की काय ध्येयधोरण आहे याबद्दल समज-गैरसमज इतके आहेत की, त्या धोरणाच्या दिशेने वाटचाल होऊ शकलेली नाही.
इतर सर्व गोष्टींप्रमाणे शिक्षण हे व्रत न राहता व्यवसाय झाला आहे. सरकारी शाळा आणि त्यातील कर्मचाऱ्यांना मुले घडविण्यात काही स्वारस्य नाही. खासगी संस्थांना फक्त पैसा हेच ध्येय असते. त्यात परीक्षा घ्यायच्या किंवा नाही या गोंधळात मुले दहावीपर्यंत पोहोचली तरी ती खरंच किती शिकली आहेत किंवा नाही हे बघण्याची कुणालाही गरज वाटत नाही. हा कच्चा माल कॉलेजेस, विद्यापीठात पोहोचतो. तेथे त्यांच्याकडे आणखीनच दुर्लक्ष होते. डिग्री मिळवूनसुद्धा ही मुले नोकरी मिळवण्यास सक्षम नसतात. कारण त्या प्रकारचे कोणतेही कौशल्य त्यांच्याकडे नसते. या परिस्थितीतही रेणू दांडेकरांसारखे आदर्श आहेत. पण अपवादात्मक. एकंदर व्यवस्थाच बदलायला हवी. लेखाचे शीर्षक’ व्यवस्थाच नापास’ सार्थ आहे.
सुरेश देवळालकर, हैदराबाद.

lp08अरविंदनाथांचा उल्लेख
आशुतोष बापट यांचा वरंधा घळीबद्दलचा लेख वाचला. त्यांनी दिलेल्या या माहितीबद्दल आभार. एक त्रयस्थ भूमिका त्यांनी मांडली खरी, पण या जागेचा शोध घेऊन ती खरी रामदासांची शिवथर घळ आहे हे व सर्वप्रथम संपूर्ण जगासमोर पुराव्यानिशी आणणाऱ्या अरविंदनाथ महाराज यांचा उल्लेख करायला हवा होता. अरविंदनाथ महाराजांबद्दल स्थानिकांनी शंभर टक्के माहिती दिली असती. शिवाय समर्थाचे वास्तव्य रामदास पठारला झाल्या कारणाने छत्रपती शिवाजी महराजांनी रामनगर पेठ वसवण्यास परवानगी देऊन बारा वर्ष कर न घेण्याचे पत्र आणि कल्याण स्वामी यांचे पत्र याचाही उल्लेख करायला हवा होता.
– महेश कदम, इमेलवरून

हरिणगाथा पुस्तकरूपात यावी
दि. १९ जूनच्या अंकातील अमृता करकरे यांच्या लेखामुळे शेखर राजेशिर्के यांच्याकडे हरिणांबद्दल सांगण्यासारखे खूप आहे हे जाणवले. त्यांनी यावर एखादे पुस्तक लिहावे. जळगाव जिल्ह्य़ातील पाल येथे असलेले डिअर ब्रीडिंग सेंटर मी १९८४ साली पाहिले होते. त्यावेळी ते पाहण्यासारखे होते. पुन्हा २००० साली पाहिले तेव्हा त्याची रया गेलेले होती. आता कदाचित बंदच झाले असेल. निसर्गरक्षणाच्या कामावरील खर्च आपल्याकडे अनाठायी वाटतो ही खेदाची गोष्ट आहे.
दिगंबर गाडगीळ, नाशिक.

आसावरी बापट आणि खडीवाले वैद्य यांच्या ‘कौटिल्य आणि शिवराय’ आणि ‘औषधाविना उपचार’ या दोन्ही लेखमाला माहितीपूर्ण आणि समृद्ध करणाऱ्या आहेत. मी इतर अनेक मासिके वाचतो, पण हे लेख जपून ठेवण्यासारखेच आहेत. सामूहिक भल्यासाठी त्यांनी अशा लेखमाला कायम लिहाव्यात.
– धवल रामतीर्थकर, ई-मेलवरून.

गेली तीन वर्षे ‘लोकप्रभा’मध्ये येणारी मेघदूत लेखमाला आवर्जून वाचतो. सर्वच लेख खूपच चांगले आहेत. ही सर्व माहिती पुस्तकरूपात प्रसिद्ध केली तर उत्तम होईल.
– वासुदेव केळकर, ई-मेलवरून.

‘काही चुकलं नाही, हेच चुकलं’ हा लेख खूप आवडला. शरद कोर्डे यांनी मांडलेले कथानक हे वास्तववादी आहे. अगदी खरेय की, प्रत्येक माणसात एक बालक दडलेले असते आणि त्या बालकाला गोंजारायचे असते.
– स्वाती पाचपांडे, नाशिक, ई-मेलवरून.

‘नक्षलग्रस्त प्रदेशातून सायकलिंग’ हा धनंजय मदन यांचा लेख अप्रतिम आहे.
– अमीत मोने, ई-मेलवरून.

‘ब्रेक-अप नंतरचे प्रेम’ हा प्राची साटम यांचा लेख खूप आवडला
वृषाली बिवरे,ई-मेलवरून.

पावसाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन
‘८८ टक्के पाऊस पुरेसा’ हे मुखपृष्ठावरील शीर्षक वाचून एक वेगळाच आनंद झाला. आणि समाधानाने मन प्रफुल्लित झाले. डॉ. माधवन यांनी अतिशय योग्य पद्धतीने मान्सून समजावून सांगितला आहे. मान्सून हा भारताचा अविभाज्य घटक आहे याचा खुलासा, मान्सूनचे आगमन कसे होत, त्यासाठी पूरक गोष्टी कोणत्या याचे ज्ञान या मुलाखतीमुळे झाले. पावसाकडे नुसते पाऊस म्हणून न पाहण्याचा अनमोल दृष्टिकोन या संवादातून मिळाला.
-विवेक उराडे, नातेपुते, जि. सोलापूर.