‘फुटबॉल शूटबॉल हाय रब्बा’ असे शीर्षक असलेला फुटबॉल विशेषांक वाचला. भरपूर माहिती आणि तीही अगदी फुटबॉल वर्ल्ड कप सुरू व्हायच्या तोंडावर, त्यामुळे हातात पडल्या पडल्या हा अंक वाचून काढला. मजा आली. फक्त एकच जाणवलं की, खेळ हा महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर समाजही महत्त्वाचा असतो. त्यामुळे फुटबॉल वर्ल्ड कपच्या निमित्ताने ब्राझिली समाजात काय चाललं आहे, फुटबॉल अतिशय प्रिय असतानाही हा समाज खर्चाच्या मुद्दय़ावर विरोध कसा नोंदवतो आहे, ही सामाजिक परिस्थितीही मांडली जायला हवी होती. बाकी क्रिकेटपेक्षाही अत्यंत वेगवान आणि थरारक फुटबॉलच्या अंकाबद्दल आभार.
संजीव पडघे, ठाणे

त्यांनाही पत्र लिहिले का?
मकरंद दीक्षित यांनी ‘राज ठाकरे यांना लिहिलेले खुले पत्र’ बरेचसे एकतर्फी तसेच राज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अन्याय करणारे असून त्यात फक्त बिनबुडाची टीका आहे.
१) त्यांनी लिहिले आहे कीमराठी पाटय़ा लागल्या पण मराठी खूप छोटे आणि कोपऱ्यात लिहिलेले असते, काही ठिकाणी ते आहे पण काही ठिकाणी नावे फक्त मराठीमध्येही झालेली आहेत. पाटय़ा मराठीत झाल्या याचे श्रेय ते राज व मनसे यांना अजिबात देत नाहीत, पण अक्षरे छोटय़ा अक्षरात आहेत याचा दोष देत आहेत. मुळात हा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी पालिकेने करणे अपेक्षित आहे. पालिकेलाही त्यांनी तसे एक पत्र नक्की लिहावे किंवा लिहिले असेलच.
२) ते लिहितात की राज यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. पण टीव्हीवर एखादी बातमी आली म्हणून काय सर्व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असे होत नाही. मुळात एकासुद्धा कार्यकर्त्यांला त्रास होता कामा नये, पण मोठे आंदोलन होते हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यातील एक- दोन जणांना जामीन उशिरा मिळाला असेल म्हणून काय सर्वाना वाऱ्यावर सोडले असे होत नाही. बाकी ९९८ जणांना सोडवले हे ते लक्षात घेत नाहीत.
३) त्यांनी टोल आंदोलनाविषयी धरसोड केली असे म्हटले आहे. मुळात त्यांनी पूर्ण अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल की प्रथम तोडफोड झाली, नंतर जवळजवळ एक हजार कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील टोल नाक्यावर १५ दिवस बसून किती गाडय़ा जातात, किती टोल वसूल होतो, हे आकडेवारीनिशी सरकारला कळवले. त्यानंतर परत एक-दोन वेळा उग्र आणि शांत अशा पद्धतीचे आंदोलन केले. जवळपास ६५ टोल नाके बंद झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पत्रकारांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्रांनी नवीन टोल धोरण आचारसंहितेच्या अगोदर येणार आणि छोटय़ा किमतीचे २२ टोल बंद होणार, असे आश्वासन दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र नक्कीच लिहिले असेल की त्यांनी हे का केले? मनसे न्यायालयामध्ये गेली तर तेथे सतत तारखा मिळत आहेत, त्याचाही दोष ते मनसेला देतात. आंदोलन धरसोड पद्धतीचे आहे असे म्हणणो हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
४) त्यांनी नाशिकबद्दल लिहिले आहे की नाशिकमध्ये पाणी येतच नाही आणि जिकडेतिकडे कचराच कचरा आहे. मुळात बुडीत निघालेली पालिका मनसेने कर्ज फेडून वाचवली आणि आता जवळजवळ ५००-६०० करोडोंची कामे होत आहेत त्याविषयी त्यांनी अवाक्षरदेखील लिहिलेले नाही.
टीका केली पाहिजे, तो तुमचा हक्क आहे पण बिनबुडाची आणि एकतर्फी टीका का करता? बाकीचे लोक काय करीत आहेत तेसुद्धा लिहा. ठाणे महानगरपालिकेमध्ये मागील २ वर्षे राडे, मारामारी याशिवाय काहीच होत नाही. त्याबद्दल त्यांनी कुणाला पत्र लिहिले आहे का?
संतोष पाळंदे (ई-मेलवरून)

राजकीय पक्ष सिंहावलोकन करतील का?
‘पहिले आव्हान पराभूत मानसिकतेचं’ ही कव्हर स्टोरी वाचली. लोकसभा निवडणुकीतील पानिपत हे या राजकीय पक्षांनी स्वत:च्याच कर्माने ओढवून घेतलेले आहे. याची त्यांना कदाचित जाणीव झाली असेल, पण गेल्या आठवडय़ातील विधानसभेतील घडामोडी पाहता सध्याचे सरकार फार काही गांभीर्याने वागत आहे असे वाटत नाही. आधीच्या चुका सुधारायच्या नादात, भरकटलेल्या अवस्थेतील हे सरकार आणखीनच गोंधळ घालून ठेवत आहे. खरे तर त्यांनी सिंहावलोकन करण्याची गरज आहे, म्हणजे मगच त्यांच्या लक्षात येईल की, लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन धोरण, ठोस कामाने काय होते ते. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न.
सुनील जगताप, नाशिक.

सोन्याच्या प्रेमाची दुसरी बाजू
९ मेच्या ‘लोकप्रभा’मधील ‘सोन्याला मुलामा ब्रॅण्िंडगचा’ व ‘सोन्यासाठी झुंबड’ हे दोन्ही लेख वाचले. प्रत्येक सोनाराच्या नवनवीन शाखा उघडत आहेत. त्यावरून सोन्याला किती प्रचंड मागणी आहे हे कळते. सोने कितीही महाग झाले, तरी बायकांचा सोन्याचा हव्यास काही कमी होत नाही.
..पण आजकाल उच्च-शिक्षण घेऊन नवरा-बायको उच्च पदावर असतात. दोघांनाही गलेलठ्ठ पगार असतात. त्यांना सोन्यात पसा का गुंतवावा वाटतो? सोन्याविषयी बायकांना वाटणारे प्रेम हेच कारण असू शकेल. त्यातही परत स्पर्धा! एकीने नवीन डिझाइनचा दागिना/ मंगळसूत्र केले की दुसरी करणारच! शिवाय दूरदर्शनवरील मालिकांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे दागिने बघितल्यामुळे माझ्याकडेही असे असावे, अशी सुप्त इच्छा प्रत्यक्षात येते, पण ते सर्व दागिने बँकेची धन बनतात व लॉकरमध्ये आरामात राहतात. त्यातच बायकांना धन्यता वाटते. असो.
रोज मंगळसूत्र हिसकावण्याच्या बातम्या असतात. काही वेळेस सोनाराचे दुकानच लुटून नेतात. म्हणजे महाग सोनं हे चोराला पण आकर्षण ठरते. काही वेळेस जिवाला धोका असतो. जिवापेक्षा सोनं महत्त्वाचे आहे का?
नवविवाहितेला किंवा तरुण मुलींना सोन्याची आवड असते. सणासमारंभात किंवा लग्न- कार्याला जाताना नटून-थटून जावे, असे वाटणे साहजिकच आहे. त्यासाठी एक सोन्याचा ‘सेट’ केला जातो. दर वेळेस तोच ‘सेट’ घालायला आवडत नाही, पण त्यालाही मोत्यांच्या दागिन्यांचा पर्याय आहे. मोत्यांचे कितीही ‘सेट्स’ ठेवले, तरी हरकत नाही, म्हणजे प्रत्येक समारंभाला वेगवेगळे दागिने घालता येतीत. शिवाय मोठ्ठा फायदा म्हणजे जिवाला धोका नाही.
काही बुरसटलेल्या बायका सोने घेण्याची ऐपत नसावी, असा आडून टोमणा मारतात. पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. त्यापेक्षा ‘फिक्स डिपॉजिट’मध्ये पसे गुंतवा, दुसरे मोठे घर घ्या, पण सोन्याचा हव्यास नको. आपल्याला आत्मविश्वास असला की झाले! कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
श्रीमंत आई-वडिलांना आपल्या लाडक्या लेकीस द्यावेसे वाटते, तर द्यावे, पण पशाच्या रूपात! अक्षय्य तृतीयेला सोने घेण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा संसाराला लागेल अशा वस्तू (वॉिशग मशिन, फूड प्रोसेसर, अ.उ. वगरे!) खरेदी केल्या तर त्या अक्षय्य आपल्याकडे राहणार आहेत.
मुलांकडून शपथ घेवतात की ‘मी हुंडा घेणार नाही.’ तद्वतच मुलींकडून शपथ घ्यावी की ‘मी सोन्याच्या दागिन्यांचा हट्ट करणार नाही.’ माफक अगदी जरुरीपुरते (एखादा सेटच) दागिने द्यावेत/घ्यावेत.
-रेखा केळकर .

शब्दांची ताकद समजली
गुलजार विशेषांकातील अमृता सुभाष यांचा लेख वाचला. त्या खूपच छान लिहितात. त्यांना एक सांगावेसे वाटते की, तुम्हाला टूंटा (भूत) परत भेटला तर आवर्जून सांगा. गुलजारांना भरीस पाडा की, त्यांनी बलात्कारपीडित अभागी व्यक्तीबद्दल असे काही हृदयद्रावक लिहावे की, अंत:करणाला वेदना होऊन विकृतीवर थोडा जरी ताबा मिळवता आला तरी अनंत उपकार होतील. त्यांच्या शब्दांत मोठी ताकद आहे. जेव्हा मी काही लिहितो तेव्हा सारखे वाटते की, मी कोणाची नक्कल वा चोरी तर करीत नाही ना. कुठे तरी वाचलेले असते जे आपसूक प्रतिबिंबित होते. हेच आमचे अपयश; पण तुमचे तसे नाही. म्हणून हा आग्रह. तुम्हा कलाकारांना आम्ही गंधर्व समजतो. अंकातील इतर लेखकांचेसुद्धा (रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, अनिरुद्ध भातखंडे, अरुणा अंतरकर, मधुमती कित्तूर) लेख आनंद देऊन गेले.
सतीश कुलकर्णी, माहीम, मुंबई (ई-मेलवरून)

वैद्य प. य. वैद्य खडीवाले यांची ३० मेच्या अंकातील ऋतुचर्या वाचली. लेख खूपच माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. ओट्स, मुसळी यांच्याऐवजी मराठी घरगुती पदार्थ देऊन जर आहाररचना मांडली तर सर्वाना खूप फायदेशीर होईल.
– गणेश शिंदे (ई-मेलवरून)