lp13रोजच्या दगदगीतून थोडं लांब जाऊन चार घटका निवांत घालवण्यासाठी सेकंड होम असावं हे अनेकांचं स्वप्नं असतं. त्यातूनच शहरालगतच्या जमिनींचे दर वाढत जाऊन नवंच अर्थकारण उभं राहिलं आहे. नेमकं काय आहे, सेकंड होमचं वास्तव?

वीकेण्ड होम अर्थात सुट्टी घालविण्यासाठीचे दुसरे घर. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून चार घटका शांतता लाभावी, चार दिवस निवांत जावेत आणि नव्या जोमाने परत रोजच्या कामाला लागावे; युरोपात अगदी लोकप्रिय असणारी ही संकल्पना. आपल्याकडे पूर्वी काही प्रमाणात राजेरजवाडय़ांबाबत ऐकायला मिळते; पण तरीही भारतासारख्या कृषिप्रधान आणि खेडय़ांचा देश असणाऱ्या देशासाठी काहीसा श्रीमंती चोचले वाटणाराच हा प्रकार आजवर तसा चार हात लांबच होता; पण आज हीच सुट्टीतल्या घराची- सेकंड होमची संकल्पना थेट मध्यमवर्गापर्यंत येऊन पोहोचली आहे. गेल्या १५ वर्षांत या सेकंड होमच्या पसाऱ्यात सर्वच स्तरांतील लोकांचा समावेश झाला आहे; पण नेमका हा बदल झाला तरी कसा आणि आज सेकंड होमचा विस्तार कसा आणि कोठे आहे हे जाणून घेणे रंजक आहे.
मुळात आपल्याकडे असे काही सुट्टीसाठी वेगळे घर असावे अशी संकल्पना फारशी अस्तित्वातच नव्हती. परिस्थितीच अशी असायची की, अनेकांचे पहिलेच घर शेतात असायचे किंवा पहिले गावात अथवा शहरात आणि दुसरे शेतात. इंग्रज आमदानीत गोऱ्या साहेबाला आपला उन्हाळा मानवायचा नाही. मग आपल्याच देशातली थंड हवेची ठिकाणे त्याने शोधली आणि तेथे त्यांचे सेकंड होम अस्तित्वात आले. माथेरान, डलहौसी, डेहराडून, सिक्कीम ही त्याचीच काही उदाहरणे. गोऱ्या साहेबाच्या प्रकृतीला मानवणारी ही ठिकाणे नंतरच्या काळात पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध झाली; पण त्यानंतर आपल्या देशात अशा प्रकारच्या दुसऱ्या घराची गरज असते, ही संकल्पना बरीच रुजली, ती मुख्यत: उच्चभ्रूंमध्ये, म्हणजेच ज्यांच्या पहिल्या दोन-तीन घरांची गरज भागली आहे त्यांच्यामध्ये.
मुंबईचा विचार केल्यास मुंबईपासून साधारण दोन-तीन तासांच्या अंतरावरील लोणावळा, कर्जत, नेरळ या ठिकाणांना प्राधान्य लाभले. त्यातही लोणावळा हे सर्वात आघाडीवर होते, तर मुंबईच्या जवळ असून लांब असणाऱ्या मढ आयलंडलादेखील अनेकांनी बंगले बांधले. अनेक सिनेकलाकार, उद्योगपतींच्या सुट्टीतल्या बंगल्यांनी लोणावळ्याला वलय प्राप्त करून दिले. आचार्य अत्रेंचादेखील खंडाळ्यात बंगला होता आणि लिखाणासाठी त्यांचे ते आवडते ठिकाण असे. सेकंड होमची संकल्पना बऱ्यापैकी रुजत होती, पण त्याचे स्वरूप हे वैयक्तिक होते. कोणाच्या तरी ओळखीने दोन-चार एकराची जागा घ्यायची आणि त्यावर मनाजोगा बंगला बांधून देखभालीस माणूस ठेवायचा. असे अनेक बंगले आजदेखील लोणावळा आणि कर्जत परिसरांत दिसतात. म्हणजेच ज्यांच्याकडे पहिल्या घराची प्राथमिक गरज भागली आहे आणि सुट्टीतल्या घरासाठी अतिरिक्त पैसे आहेत त्यांनी सेकंड होमकडे मोर्चा वळविला.
टर्निग पाइंट
नेमके हे लोण मध्यमवर्गापर्यंत केव्हा पोहोचले? तर ते जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर, असे सॉफ्टकॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी सांगतात. त्यांच्या मते १९९१ नंतर जागतिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या, आयटी बूममुळे देशाबाहेर जाणाऱ्या मध्यमवर्गाची संख्यादेखील वाढली, स्पर्धेच्या युगात पगाराचा आकडा पाच-सहा आकडे ओलांडू लागला आणि अतिरिक्त उत्पन्नाचा ओघ वाढत गेला. त्याचा पहिला दृश्य परिणाम होता तो म्हणजे ज्यांचे गावाकडचे घर होते त्यांनी त्याच ठिकाणी नवे घर बांधले; पण एक मोठा वर्ग असादेखील होता, की ज्यांनी शहरातच जन्म घेतला आहे, गावची नाळ फारशी जुळलेलीच नाही अथवा अस्तित्वात नाही, त्यांना कामाच्या धबडग्यातून विसाव्याचे क्षण घालविण्यासाठी अशा घरांची गरज भासू लागली.
१९९३ साली सेकंड होमच्या व्यवसायात पदार्पण केलेले डी. एस. कुलकर्णी सांगतात की, स्वत:चाच एक छोटा का असेना बंगला असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पुढे अंगण असावं, अंगणात फुलांची झाडं असावीत, मागे छोटी बाग असावी असं त्याचं स्वरूप असतं. त्या स्वप्नाला पूरक अशी ही त्या वेळची परिस्थिती होती. अतिरिक्त उत्पन्नाने त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होऊ शकत होती, पण या क्षेत्राला रिअल इस्टेटच्या क्षेत्राप्रमाणे संघटित स्वरूप आलेलं नव्हतं. मुंबई-पुण्याशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि आल्हाददायक हवा या घटकामुळे लोणावळ्याला सर्वानीच प्राथमिकता दिली. ज्यांना लोणावळा शक्य नव्हतं त्यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी असणाऱ्या बदलापूर, नेरळ आणि कर्जतकडे मोर्चा वळविला. तर समुद्राचं आकर्षण असणाऱ्यांनी पनवेल, पेण, अलिबागकडे धाव घेतली. पण सेकंड होम बांधताना त्यांना मदत करणारा तेथे कोणीच नव्हता. रिअल इस्टेट क्षेत्राप्रमाणे कोणत्या विकासकाचं कार्यालय नव्हतं की अन्य कोणी मार्गदर्शक नव्हता. जे काही करायचे ते स्वत: मालकालाच करावं लागत असे. केवळ जागा घेऊन काम भागत नसायचं, तर त्या ठिकाणापर्यंत रस्ता, पाणी आणि वीज या तीन मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, शेत जमिनीची बिगरशेती करणे, सुरक्षा पाहणे असे अनेक प्रश्न असायचे. हे सर्व प्रश्न सोडविणाऱ्या व्यवस्थेची गरज हा नेमका सेकंड होमच्या व्यवसायाचा टर्निग पॉइंट होता.
डी.एस. कुलकर्णी सांगतात की २००५ च्या या क्षेत्राला खरा जोर आला तो बँकांनी सेकंड होमसाठी जागा आणि बांधकामासाठी कर्ज द्यायला सुरुवात केल्यानंतर. केवळ पैसे असणारेच नाहीत तर ज्यांना कर्ज काढणं शक्य होतं त्यांचादेखील सेकंड होमकडे कल वाढू लागला. बँकांच्या गरजेनुसार कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य झाले. त्यानंतर मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक आणि मुंबई-गोवा ह्य़ा पट्टय़ांमध्ये सेकंड होमचा बोलबाला वाढला. आणि त्यातूनच केवळ एखादं सेकंड होम असणं यापलीकडे जाऊन पन्नास-शंभर एकरांत अनेकांची सेकंड होम्स असणाऱ्या प्रकल्पांची चलती सुरू झाली.
त्यामागे नेमकी कारणं काय होती; तर तुम्हाला जागा शोधायची नाही की कागदपत्रं जमा करायची नाहीत, ना सरकारी कार्यालयात खेटे घालायचे. या साऱ्या प्रक्रिया करताना सुमारे २६ प्रकारचे शासकीय कागदपत्रांचे सोपस्कार एकहाती पूर्ण करुन देणारी व्यवस्था आता तयार झाली. सोयीनुसार प्रकल्प निवडायचा, आवडीनुसार बंगल्याचं डिझाइन निवडायचं आणि सेकंड होमचा ताबा घ्यायचा. अर्थातच त्यासाठी चार पैसे अधिक मोजावे लागणार असले तरी ते द्यायची लोकांची तयारी होती. या सर्व कारणांमुळे सेकंड होम नावाचं एक मार्केट फर्स्ट होमच्या जोडीनेच वाढू लागलं.
एकदा त्याला मार्केटचं स्वरूप प्राप्त झालं की अनायासेच बाजारपेठेचे नियम लागू होत जातात. स्पर्धा वाढते, किंमत वाढते, सेवा वाढतात. तसंच या बाजारपेठेचंदेखील आहे. एखाद्या ठिकाणाचं मूल्य वाढलं की किंमतदेखील वाढत जाते. सेकंड होमचा बाजार तेजीत आला तसे नेरळसारख्या ठिकाणी बंगल्याऐवजी अपार्टमेंट्सच्याही सुविधा वाढू लागल्या. लोणावळ्यात बंगल्यांच्या किंमतीची कोटीच्या कोटी उड्डाणे होऊ लागली. स्वत: जागा घेऊन सेकंड होम बांधणाऱ्यांचं प्रमाण कमी होत गेलं आणि सगळेच प्रकल्पांकडे वळू लागले. तर दुसरीकडे अशा प्रकल्पात केवळ घर बांधण्यापेक्षा त्यामध्ये विरंगुळ्यासाठी सोयीसुविधा देण्याकडे कल वाढत गेला. जिम, क्लब हाउस, स्विमिंग पूल, साहसी खेळाच्या सुविधा, अशा एक ना दोन अनेक सुविधा देण्यात येऊ लागल्या आणि सेकंड होमला एक रिक्रेएशन सेंटरचा दर्जा मिळू लागला.
निगा आणि सुरक्षा ते सेकंड होम रिसॉर्ट
सेकंड होम घेण्याची आर्थिक क्षमता आहे, पण आपण काही वरचेवर तेथे जाऊ शकत नाही अशीच अनेकांची स्थिती आहे. मग त्या वास्तूची निगा आणि सुरक्षा हा मोठा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला. परिणामी सेकंड होम विकासकांनीच एक वेगळी शक्कल लढवली, ती म्हणजे कॉर्पस् म्हणून सुरुवातीलाच एकरकमी लाख-दोन लाख रुपये जमा करायचे. त्यातूनच वास्तूची, जागेची निगा आणि सुरक्षा पुरवायची. ही शक्कल चांगलीच लागू पडल्याचे दिसून येते. त्यामुळेच गेल्या पाच-दहा वर्षांतील सर्वच प्रकल्पांमध्ये ही सुविधा अध्याहृत झाली आहे. प्रकल्पाच्या आवाक्यानुसार सुरक्षेच्या कमीअधिक घटकांचा समावेश असतो. इगतपुरी येथील व्यंकटेश नगरीचे अविनाश गोठी सांगतात की त्यांच्या सेकंड होम प्रकल्पात नियमित सुरक्षा रक्षक तर आहेतच, पण त्याचबरोबर पेट्रोलिंग सीसीटीव्ही अशा सुविधादेखील आहे. थोडक्यात काय तर एका मोठय़ा काळजीतून घरमालकाची मुक्तता झाली.
पण त्याचबरोबर आणखीन एका प्रश्नाने डोके वर काढले ते म्हणजे घराचा वापर न होणे. अनेकांना सेकंड होमकडे जाण्यासाठी फारसा वेळच नसतो. मग अशा वेळी घर पडूनच राहणार अशी अनेकांची भावना असते. अशांसाठी आणि केवळ गुंतवणूक म्हणून सेकंड होमकडे पाहणाऱ्यांसाठी परताव्याची सुविधा म्हणून आणखीन एका वेगळी शक्कल लढविण्यात आली, ती म्हणजे सेकंड होमचा वापर रिसॉर्टसारखा करणे. अनेक प्रकल्पांत घरमालकांच्या संमतीने सेकंड होम भाडय़ाने दिली जाऊ लागली. गुहागर परिसरात मँगो व्हिलेज साकारणारे समीर काळे सांगतात की, सेकंड होम परिसरात पर्यटन स्थळ असेल तर सेकंड होममधील रिसॉर्टला चांगली मागणी असते. पण त्यासाठी प्रकल्पाची रचना, सुविधा, अशा अनेक सेवांचा दर्जा टिकवावा लागतो. त्यामुळे हीच संकल्पना डोक्यात ठेवून त्यांनी प्रकल्पाची आखणी केली होती. आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे ते नमूद करतात.
तर मुरबाड परिसरातील इको प्रॉपर्टीज्चे अमजद खान सांगतात की, ज्यांना घर भाडय़ाने द्यायचे आहे अशा घरमालकांशी आम्ही थेट करारच केला आहे. घरमालकास हव्या असणाऱ्या दिवशी त्याचे घर त्याच्यासाठी उपलब्ध असते आणि इतर वेळी भाडय़ाने देण्यामुळे करारानुसार दरमहा घरमालकास ठराविक रक्कमदेखील मिळते. अर्थात रिसॉर्टप्रमाणे सेकंड होम सर्वासाठी उपलब्ध झाले तर तेथे येणाऱ्या त्रयस्थ पर्यटकांचा त्रास ज्यांनी प्रकल्पातील घरे भाडय़ाने दिलेली नाहीत अशा घरमालकांना होऊ शकतो. त्यासाठी मात्र रिसॉर्टसाठी काटेकोर चाळणीच लावावी लागते, असे अमजद खान नमूद करतात.
निगा, सुरक्षा आणि रिसॉर्ट व्यवस्था या सेकंड होममधील या बदलाचा तेथे सुट्टी घालविण्यासाठी येणाऱ्या सेकंड होम धारकांनादेखील
फायदा मिळतो. कारण सुट्टीसाठी आल्यावर जर या सुविधा नसतील तर साफसफाई, जेवणखाण या व्यवस्था करण्यातच वेळ गेला असता. या सुविधांमुळे त्यांना आपली सुट्टी विनात्रास घालविता येत आहे.
अपार्टमेंट म्हणजे सेकंड होम?
सेकंड होम म्हणजे बंगला अशीच ओळख असताना गेल्या दहा वर्षांत काही ठिकाणी सेकंड होम अपार्टमेंटचा ट्रेण्ड वाढला आहे. स्वतंत्र बंगला घेणे शक्य नाही मात्र सेकंड होम डेस्टिनेशनवर अपार्टमेंटमध्ये दहा ते पंधरा लाखांची सदनिका घेणे शक्य असणाऱ्या अनेकांना या सेकंड होम अपार्टमेंटनी आकर्षित केले आहे. ही ठिकाणे काही वेळा गावातच असतात तर काही बंगला प्रकल्पांमध्येदेखील. अर्थातच रेल्वेने दोन तासांत पोहोचण्याच्या अंतरावर असल्यामुळे अशा अपार्टमेंटना मध्यमवर्गाची पसंती मिळत असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. यामध्ये नेरळ, तळेगाव, इगतपुरी, मुरबाडसारख्या ठिकाणांना अधिक पसंती आहे. बंगला प्रकल्पातील अपार्टमेंटना निगा, सुरक्षा याबरोबरच इतर सर्व सुविधांचादेखील लाभ होत असतो. तरीदेखील ही अपार्टमेंट तयार होण्यापूर्वी विकली जात नाहीत, मात्र बांधून तयार झाली की लगेचच विक्री झाल्याचे अमजदखान सांगतात. त्याचबरोबर हरीद्वार, गुर वायर अशा धार्मिक स्थळांवरदेखील मोठय़ा प्रमाणात सेकंड होम अपार्टमेंटची चलती दिसून येते. तर दुसरीकडे शहराच्या विस्तारांमुळेदेखील सेकंड होम डेस्टिनेशनवरील अपार्टमेंटकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्याची मानसिकता वाढल्याचे डीएसके सांगतात. नेरळ हे त्याबाबत अगदी समर्पक उदाहरण आहे. मात्र भविष्यात जेव्हा नेरळसारखे ठिकाण मुख्य मार्गाशी जोडले जाईल तेव्हा या अपार्टमेंटमधील घरांकडे पहिले घर म्हणून पाहिले जाण्याची शक्यता ते वर्तवितात.
विस्तार आणि मर्यादा
गेल्या पंधरा वर्षांत नेरळ, कर्जत, अलिबाग, लोणावळा या पलीकडे सेकंड होमचे मार्केट विस्तारत जाऊन पुणे परिसर, पाली, मुरबाड, शहापूर, इगतपुरी, दापोली, गुहागर, शिरवळ, भोर अशा अनेक ठिकाणी विस्तारले आहे. अर्थातच त्यामागे मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील आर्थिक सुबत्ता हा घटक कारणीभूत आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये येणाऱ्या आणि भरपूर पैसा कमावणाऱ्यांसाठी सेकंड होम ही गरज बनत गेली आहे. अतिरिक्त पैसा आणि स्वत:च्या आनंदासाठी व गुंतवणूक म्हणून तो खर्च करण्याची मानसिकता हे घटक त्यामागे कारणीभूत आहेत. मुंबईकरांसाठी गेल्या काही वर्षांत मुरबाड आणि इगतपुरी ही दोन महत्त्वाची केंद्रे विकसित होत आहेत. नयनरम्य असा निसर्ग, सह्य़ाद्रीची रांगडी साथ असल्यामुळे सध्या या भागात शंभराहून अधिक प्रकल्प कार्यरत आहेत. मुरबाडच्या प्रकल्पांबद्दल अमजद खान सांगतात की, मुरबाडची भौगोलिक नैसर्गिक रचना आम्हाला लाभदायक ठरली आहे. मुंबई-पुण्याच्या नजीक असण्यामुळे लोणावळा खूपच महाग होत गेले आहे. परिणामी मुरबाड आणि इगतपुरीला चांगली मागणी आहे. २५ लाखांपासून दीड कोटींपर्यंतचे बंगले आता मुरबाड प्रकल्पात सुरू आहेत. तर इगतपुरी हे हिल स्टेशन थेट लोणावळ्याला पर्याय म्हणूनच विस्तारत असल्याचे अविनाश गोठी नमूद करतात. सध्या येथे ५५-६० लाखांत दोन हजार चौरस फुटांचा बंगला येथे उपलब्ध असून कॉपरेरेट क्षेत्रातील अनेक व्यक्तींकडून सध्या इगतपुरीला प्राधान्य मिळत आहे.
मात्र हेच प्रमाण महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात दिसत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या शहरांच्या आर्थिक विकासावरील मर्यादा. तसेच शहरांजवळच्या गावात प्लॉट पाडून बिगरशेती जमिनी विकण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. नागपूर, औरंगाबादसारख्या काही शहरांजवळ अशा प्रकारे उच्चभ्रूंची सेकंड होम आहेत, पण मुंबई-पुणे-नाशिक परिसरातील प्रकल्पांची रेलचेल येथे नाही. किंबहुना असे प्रकल्प हे या शहरांची गरज नसल्याचे अनेक विकासक नमूद करतात. मात्र नागपूरसारख्या ठिकाणी मिहानसारख्या प्रकल्पांमुळे कदाचित भविष्यात अशी गरज वाढू शकते असे डीएसके नमूद करतात.
गेल्या काही वर्षांत कोकणातदेखील सेकंड होमने चांगलेच मूळ धरले आहे. पण कोकणात जाणे तुलनेने अधिक वेळ खर्च करणारे तर आहे. कोकणात स्वत:ची जागा असणाऱ्यांनी गावाकडचे घर बांधले आहे. तर कोकणातील पर्यटनाच्या भरपूर संधींमुळे सेकंड होम ते रिसॉर्ट या संकल्पनेला भरपूर वाव असल्याचे समीर काळे सांगतात. त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात करताना हाच मुद्दा डोक्यात असल्यामुळे ३० ते ९० लाखांपर्यंत किंमत असणाऱ्या बंगल्यांनादेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर धनंजय रानडे हे दापोलीजवळ नव्या प्रकल्पाची रचना करतानाच भविष्यात त्याला रिसॉर्टचे रूप देण्याची संकल्पना मांडत आहेत. थोडक्यात काय तर कोकणातील सेकंड होम हे सध्या तरी गुंतवणुकीशीच निगडित आहे.
सेकंड होमचा बोलबाला असला तरी यामध्ये काही गोष्टींची उणीव हमखास आहे. सध्या या मार्केटमध्ये काहीशी शिथिलता असली तरी जमिनीला चांगलीच मागणी असल्याचे सर्वच ठिकाणचे विकासक प्रामुख्याने सांगतात. इगतपुरीत एकरी एक कोटीचा भाव सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा कल हा सध्या जमीन घेऊन ठेवू मग पुढे काय करायचे ते पाहू असा दिसून येतो. अर्थातच अनेक प्रकल्पातील जमिनी विकल्या जातात पण त्यावर बंगला उभा राहत नाही. बंगला बाधणाऱ्यांचे आणि न बांधणाऱ्यांचे प्रमाण हे ४०:६० असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अर्थात जमिनीला कायमच भाव मिळणार असल्याचे सर्वच विकासकांचे मत आहे. कदाचित बांधलेला बंगल्याच्या पुनर्विक्रीला फारशी किंमत येणार नाही, पण जमिनीला हमखास किंमत असेल अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून केली जाते.
सेकंड होमचा बोलबाला असला तरी सेकंड होमचे मार्केट हे अजूनही फर्स्ट होम मार्केटच्या तुलनेत तसे कमीच आहे. मोठय़ा शहरातील एखाद् एकरात जे काही टॉवर्स बांधले जातील त्यांची किंमत ही एक एकरातील सेकंड होमच्या वीसपट असते. कारण शहरातील वाढ ही उभी (व्हर्टिकल) आहे तर सेकंड होमची वाढ ही आडवी (हॉरिझोंटल) आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी जागेचे व्यवहार प्रचंड तेजीत असले, तरीदेखील एकूण रिअल इस्टेटच्या बाजारपेठेत सेकंड होमचा वाटा पाच टक्केच आहे.
आज सेकंड होमची बाजारपेठ काहीशी मंद आणि स्थिर अशी असली तरी, डी. एस. कुलकर्णीच्या मते जमिनीतील गुंतवणुकीकडे तुम्हाला दीर्घकालिक फायदा म्हणूनच पाहावं लागेल. एखादी गोष्ट मुरल्यावर जसा त्याचा दर्जा आणि मूल्य वाढते तसे सेकंड होमचे आहे. आज जागा अथवा बंगला घेतला आणि एक-दोन वर्षांत विकून टाकून, मालामाल झालात असे होणार नाही.

बंगला ते टेंटेड होम
सेकंड होमची क्रेझ वाढू लागली तसतसे त्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोगदेखील केले जाऊ लागले. स्टुडिओ अपार्टमेंट, अपार्टमेंट हे त्यातूनच तयार झालेले स्वस्तातले पर्याय आहेत. सेकंड होम प्रकल्पांच्या विकासकांनी कल्पकता दाखवत लॅण्डस्केप आर्किटेक्टला भरपूर वाव देत प्रत्येकाच्या आवडीनुसार बंगल्यांची रचना करण्याची सुविधा दिली. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी लागणारे व्यावसायिक आज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. घरासमोर सलग लॉन, कंपाऊंड वॉल नसणे, मागील बाजूस खासगी लॉन, समोरचा प्रशस्त रस्ता अशा युरोपियन पद्धतीने बांधलेल्या बंगल्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे इको प्रॉपर्टीचे अमजद खान सांगतात. तर व्यंकटेश नगरीचे अविनाश गोठी टेंटेड बंगल्यांनादेखील मागणी असल्याचे नमूद करतात.

सेकंड होम सकारात्मक – नकारात्मक
सेकंड होमची हौस भागविणारे आणि त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे अनेक जण असले तरी त्यातील काही त्रुटींकडेदेखील लक्ष वेधतात. पर्यटनाचे अनेक पर्याय विकसित होत असताना आणि ते आर्थिकदृष्टय़ा फायदेशीरदेखील असताना एकाच एक जागी जाऊन वीकेण्डला राहावे असे अनेकांना वाटत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता मुलांच्या करमणुकीसाठी तेथे काय असेल याचा विचारदेखील अनेक जण सेकंड होम घेताना करतात. अर्थातच त्यामुळेच गेल्या काही वर्षांत अनेक सेकंड होम प्रकल्पांमध्ये जिम, बोटिंग, विविध खेळ, साहसी खेळ, अशा सुविधांचा मारा होताना दिसून येतो. पण त्यातदेखील नावीन्य राहिले नाही तर एक प्रकारचा तोचतोचपणा येऊ शकतो. गुंतवणूकच करायची असेल तर मग शहराच्या विस्ताराचा विचार करून एखादी सदनिका का घेऊ नये अशीदेखील अनेकांची मानसिकता वाढीस लागलेली आहे. डोंबिवली, पनवेल, विरार परिसरातील अनेक सदनिकांच्या मागणीत अशा गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय आहे. अशा फ्लॅटस्ना भविष्यात मागणीदेखील भरपूर येण्याची शक्यता असते.

सेकंड होम घेताय?
सेकंड होम घेताना खालील बाबींची काळजी घ्यायला डी. एस कुलकर्णी आणि वकील वाय. एस. दुडुस्कर सांगतात.

१. जमीन बिगरशेती आहे का, सातबाऱ्यावर प्रत्येक प्लॉटची वेगळी नोंद आहे का हे तपासावे.
२. प्री-लाँच ऑफरमध्ये शक्यतो पैसे गुंतवू नये. अशा ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता बाकी असते, भविष्यात होणाऱ्या घटकांवर अनेक बाबी अवलंबून असतात.
३. बिगरशेती मान्यतेची कागदपत्रे, मालकी हक्काची कागदपत्रे आणि प्रकल्पाची मंजूरीची कागदपत्रे वकिलामार्फत तपासावी.
४. प्रकल्पात अनेक सुविधा देण्याचे कबूल केले असते, अशा सर्व सुविधा या कराराचा भाग असल्या पाहिजेत. अन्यथा नंतर मग अनेक कारणांस्तव पैसे मागितले जातात.
५. सेकंड होमची निगा आणि सुरक्षा या दोन महत्त्वाच्या बाबींची आधीच खातरजमा करावी, त्याबद्दल घेण्यात आलेल्या कापर्स फंडाची करारात योग्य नोंद असावी.
६. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांचा पाहणी प्रत्यक्ष जागेवरच जाऊन करून घ्यावी.
७. गुंतवणूक म्हणून जर सेकंड होमकडे पाहत असाल तर त्या परिसरात भविष्यात काय सुधारणा होणार आहेत याचा अंदाज घेणे श्रेयस्कर ठरेल.
८. विकासकाचे ट्रॅक रेकॉर्ड माहीत असावे.
९. बंगला बांधताना जे आपल्याला शहरात मिळणार नाही त्यांचा प्रामुख्याने विचार व्हावा. उदा.गच्ची, वऱ्हांडा, बाग इ.
१०. सेकंड होम घेताना आपण तेथे किती वेळा जाऊ शकणार आहोत याचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक आहे.
११. सेकंड होम खरेदी करण्यापूर्वी गरज भासल्यास प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर नोटीस देऊन त्यावर हरकती मागवाव्यात.
१२. संबधित निबंधकाकडून जागेच्या सर्व खरेदी विक्री व्यवहाराची खातरजमा करावी.

सेकंड होम..
प्रकल्पातले आणि स्वत: बांधलेले..
स्वत:च स्वत:चे सेकंड होम बांधणे ही जरी पूर्वापार पद्धत असली तरी आताच्या काळात वेळ कमी आणि सेवा मिळविण्यासाठी चार पैसे अधिक मोजण्याची तयारी असल्यामुळे प्रकल्पात पैसा टाकून सेकंड होम बांधण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. पण स्वत: सेकंड होम बांधायचे तर त्यासाठी मुळात आवड असावी लागते, म्हणजे मग आपोआपच कमिटमेंट येते आणि सेकंड होमचे स्वप्न पूर्ण होते. असे स्वत:चे सेकंड होम स्वत: बांधणारे प्रसाद निकते सांगतात. स्वत:चे असे घर बांधताना मात्र अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे दोन वर्षे तरी सातत्याने वैयक्तिक स्तरावर लक्ष घालावे लागते आणि नंतरदेखील त्याच्या देखभालीसाठी वेळ काढावा लागतो हे ते आवजूर्न सांगतात. स्वत:ची जागा घेण्यामुळे गर्दीत राहण्यापेक्षा मोठी जागा तर मिळतेच पण आर्थिक फायदा खूप होतो. निकते सांगतात की प्रकल्पात घरापेक्षा एकतृतीयांश खर्चात स्वत: घर बांधू शकतो. मात्र हे सारे करताना त्यासाठी तुम्हाला सातत्याने योग्य मार्गदर्शक किंवा तुम्हाला स्वत:लाच त्याची सारी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा छोटय़ा-मोठय़ा गोष्टीतदेखील फसवणूक होऊ शकते.
सुहास जोशी