lp13एकेकाळी गिरणगाव किंवा एक मोठे खेडेगाव म्हणून हिणवल्या गेलेल्या सोलापुरात वस्त्रोद्योग लयास गेल्यानंतर तितकेसे नवे पर्यायी उद्योग प्रकल्प उभारले गेले नाहीत. ब्रॅण्डनेम असलेल्या ‘सोलापुरी चादरी’ची जागा टेरी-टर्किश टॉवेल्सने घेतली खरी; परंतु त्याचवेळी वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, अभियांत्रिकी तथा वैद्यकीय शिक्षणाचे जाळे, ग्रामीण भागात उजनी धरणामुळे उसाचे क्षेत्र व त्यातून साखर कारखानदारी, द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन या माध्यमातून का होईना, सोलापूरचे अर्थकारण वाढत चालले आहे. मुळातच सोलापूर हे मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आदी महानगरांना रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाच्या रूपाने जोडणारे महत्त्वाचे केंद्र आहे. नजीकच्या काळात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्गाचा आणखी विकास होणार आहे. एनटीपीसीमार्फत औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प, सिमेंट प्रकल्पही उभारले जात आहेत. त्यामुळे अर्थातच येथे गृहप्रकल्पांना वाव मिळू लागला आहे. बदलत्या जीवनमानामुळे गल्ली संस्कृती हळूहळू कमी होऊन कामगारांच्या चाळीतून रो-हाऊसेस-वाडय़ांतून अपार्टमेंट, टुमदार बंगले असा गृहप्रवास झपाटय़ाने होऊ लागला आहे. सामान्य कामगारांपासून ते धनाढय़ांपर्यंत गृहप्रकल्प उभारले जात आहेत. १८३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात असून शहर हद्दवाढ भागात लोकवस्ती वाढली आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्य़ात पंधरापेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. येथून शिक्षण घेतलेले तरुण पूरक रोजगाराअभावी पुण्यात स्थलांतरित होत असले तरी त्यांनी आपल्या गावाकडे पूर्णत: पाठ फिरविली नाही. त्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने उच्चशिक्षित तंत्रज्ञ पुणे, बंगळुरू किंवा परदेशात गेले तरी त्यांचे कुटुंबीय बहुतांशाने सोलापुरातच वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथे गृहप्रकल्पांना आपसूकच वाव मिळतोय. दहा वर्षांपूर्वीची स्थिती आता राहिली नाही. त्यात लक्षणीय बदल होतोय. १०-१५ वर्षांपूर्वी जेथे कापड किंवा सूतगिरण्या होत्या, त्या ठिकाणी आता एकापेक्षा एक भव्य गृहप्रकल्प उभे राहताना दिसून येतात. जुळे सोलापूरसह होटगी रोड, विजापूर रोड या भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती झाल्यानंतर आता शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुनी कापड गिरणी, लक्ष्मी-विष्णू कापड गिरणी, जामश्री कापड गिरणी आदी बंद उद्योगांच्या जागा गृहप्रकल्पांनी व्यापत चालल्या आहेत. याच भागातील पूर्वीच्या गवताची राने आता आकाराने संकुचित होऊन तेथेही गृहप्रकल्प दिमाखाने उभे राहात आहेत. अक्कलकोट रस्त्यावरील सोलापूर व यशवंत सहकारी सूतगिरण्यांच्या जागांवरही गृहप्रकल्प उभारले जात आहेत. हैदराबाद रस्त्यावर शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर थेट बोरामणी, तांदुळवाडी, मुस्तीपर्यंत शेतजमिनी नष्ट होऊन तेथे मोठय़ा प्रमाणात निवासी भूखंड उपलब्ध होऊ लागले आहेत. विशेषत: बोरामणीजवळ होऊ घातलेल्या कॉर्गो विमानतळामुळे त्या भागातील अकृषक जमिनीला सोन्याचा भाग येऊ लागला आहे. इकडे पुणे व बार्शी रस्त्यावर कोंडी, केगाव, खेड, मार्डी, भोगाव या भागातही भूखंडाच्या माध्यमातून गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे.
सोलापुरात सध्या सुमारे किमान २०० बांधकाम व्यावसायिकांमार्फत गृह उद्योगांना चालना मिळत असून यात क्रेडाईसारख्या अग्रगण्य संघटनाही पुढे येत आहेत. क्रेडाई सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष असलेले नंदकुमार मुंदडा (माहेश्वरी डेव्हलपर्स) यांना गेल्या २४ वर्षांचा गृहप्रकल्प उभारणीचा अनुभव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १०-१५ वर्षांत सोलापूरचा आकार बदलत चालला आहे. त्यांनी यापूर्वी होटगी रस्त्यावर मजरेवाडीत उभारलेल्या नवोदय नगरात (रो-हाऊसेस) सुरुवातीला पाच लाखांत घर उपलब्ध होत असे. आता हेच घर २५ ते ३० लाखांपर्यंत मिळू लागले आहे. जामश्री कापड गिरणीजवळ १२ एकर क्षेत्रात मुंदडा यांनी ‘सनसिटी’ नावाची टाऊनशिप शहरात सर्वप्रथम उभारली आहे. लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या जागेत आपटे कुटुंबीयांनी ‘इंद्रधनू’ गृह उद्योग यशस्वीरीत्या हाती घेतला आहे. येत्या दोन वर्षांत या भागाचा संपूर्णत: कायापालट होणे शक्य आहे. सनसिटी व इंद्रधनूपाठोपाठ सोनी सिटी, अक्षत फार्मस् या नव्या गृह प्रकल्पांमुळे एकेकाळच्या कामगार वस्ती भागाची खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मीपेठ’ झाली आहे. गुंतवणूक म्हणून शहरालगत खुले भूखंड खरेदी होत असताना दुसरीकडे स्वत:साठी निवासाची गरज म्हणून सदनिका खरेदीकडे मध्यमवर्गीयांचा ओढा वाढला आहे. इतकेच नव्हे तर स्वतंत्र बंगल्यांना पर्याय ठरू पाहणाऱ्या दोन हजार चौरस फुटाच्या भव्य सदनिकांचेही आकर्षण वाढत आहे. स्वतंत्र बंगल्यांची सुरक्षितता, देखभालीची डोकेदुखी टाळण्यासाठी तीन ते चार बीएचके आकाराच्या मोठय़ा सदनिका अधिक सुलभ वाटतात. नंदकुमार मुंदडा यांनी यात प्रथमच प्रयोग हाती घेत ‘नाथ क्राऊन’ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. स्थानिक परिसरानुसार घरांच्या बांधकामांचे दर साधारणत: २२०० रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंत आहेत. सद्यस्थितीत २५ लाखांपासून ते ८० लाखांपर्यंत सदनिका खरेदी करता येते. या गृह प्रकल्प उद्योगात अलीकडे अमेरिकनस्थित सीबीआरई कंपनीनेही सोलापुरात पाऊल ठेवले आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी शहरात गांधी नगर-सिव्हिल लाइन्स भागात सीबीआरई कंपनीच्या सहभागातून प्रथमच आलिशान गृह प्रकल्प हाती घेतला आहे. सोलापूरच्या गृहप्रकल्प क्षेत्रात तो प्रमुख मानबिंदू ठरावा.
सोलापुरात रोजगार उपलब्ध करून देणारे नवे उद्योग प्रकल्प उभारले गेले नाहीत. परंतु शासकीय-निमशासकीय नोकर, बँक कर्मचारी, व्यापारी, व्यावसायिक, बागायतदार शेतकरी यांच्या माध्यमातून सोलापूरचे अर्थकारण चालते. उजनी धरणामुळे जिल्ह्य़ात उसाचे क्षेत्र प्रचंड वाढले आहे. एकीकडे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर परिसरात दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढले असून त्याद्वारे राज्यात सर्वाधिक ३० साखर कारखाने कार्यरत आहेत. यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत सुमारे तब्बल पावणेदोन कोटी मेट्रिक टनापर्यंत उसाचे गाळप झाले आहे. प्रतिटन किमान १५०० रुपयांचा दर गृहीत धरला तरी त्यातील अर्थकारणाचा ‘अर्थ’ लक्षात येतो. दुसरीकडे द्राक्ष, डाळिंबासारख्या फळबागांची शेतीही वाढते आहे. हे एकंदरीत अर्थकारण गृह प्रकल्पांना लाभदायक ठरले आहे.

कॉ. परुळेकर घरकुल प्रकल्प
सोलापूर हे मूळ कामगारांचे शहर आहे. ही ओळख जपण्यासाठी ‘सिटू’चे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे कॉ. गोदूताई परुळेकर यांच्या स्मरणार्थ तब्बल १० हजार महिला विडी कामगारांसाठी घरकुलांचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० हजाराचे अनुदान आणि लाभार्थी कामगाराचे २० हजार याप्रमाणे अवघ्या ६० हजार रुपयांत महिला विडी कामगाराला घरकुल उपलब्ध झाले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता अल्पसंख्याक महिला कामगारांसाठी २२ हजार घरकुलांच्या प्रकल्पासाठीही आडम मास्तर हे प्रयत्नशील आहेत. दहा वर्षांपूर्वी कॉ. गोदूताई परुळेकर विडी कामगार घरकुल उभारल्यानंतर त्याचा हस्तांतरण सोहळा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पार पडला होता. केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामगार परिषदेत भारतात कामगारांसाठी विकास कशा प्रकारे केला जातो, याचा नमुना म्हणून सोलापूरच्या कॉ. गोदूताई परुळेकर विडी कामगार घरकुल प्रकल्पाचा आराखडा सादर केला होता, हे येथे उल्लेखनीय.

कायद्याचा अडसर.
सोलापुरात एकीकडे गृह उद्योगांना चालना मिळत असताना दुसरीकडे त्यास कायदे अडसर ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात आदिलशाहीकालीन भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा ताबा केंद्राच्या पुरातत्त्व वास्तू सर्वेक्षण विभागाकडे आहे. पुरातत्त्व वास्तुसंरक्षण कायद्यानुसार किल्ल्याच्या तटभिंतीपासून १०० मीटर व पुढे २०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कायद्याने मनाई आहे. त्याचा फटका अनेक मिळकतदारांना बसला आहे. सद्यस्थितीत या कायद्याचा अडसर सुमारे ३८ मिळकतदारांच्या बांधकामांना ठरला आहे. त्याच वेळी राजकीय वशिलेबाजीतून किल्ल्याला खेटून डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाची उभारणी केली जाते आणि इतर मिळकतदारांना बांधकामे करण्यास कायद्याने मनाई होते. केवळ नवीन बांधकामेच नव्हे तर आहेत त्या वास्तुमध्ये दुरुस्ती अथवा डागडुजीदेखील करता येत नाही. भुईकोट किल्ल्याप्रमाणे सोलापूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातही बांधकामांना अशीच अडचण येते. कारागृहापासून ५०० चौरस मीटर परिसरात कोणत्याही मिळकतदारांना बांधकामे करता येत नाहीत. ही अडचण सोडविण्यासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा चालविला आहे.
एजाज हुसेन मुजावर