lp13जाहिरात क्षेत्र तसं मोठं. त्यात भर पडतेय सेकंड होम्सच्या जाहिरातींची. या जाहिराती आकर्षक दिसण्यासाठी कलाकारांच्या लोकप्रियतेचा प्रकर्षांने वापर होताना दिसतोय. यातून बिल्डर्स आणि कलाकार अशा दोघांनाही मोठय़ा प्रमाणावर फायदा होतोय.

‘घर’ या संकल्पनेला प्रत्येकाच्या हृदयात वेगळी जागा असते. यात केवळ चार भिंती नाही तर घरपण असणाऱ्या घरासाठी ती जागा असते. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी एक. निवारा, सदन, गृह असं काहीही म्हणा; पण जिथे आसरा आणि प्रेम मिळतं ते ‘घर’च. असं आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढत्या महागाईमुळे जागेला सोन्याचे भाव आलेत असंही म्हटलं जातंय. त्यामुळे हक्काचं घर घेण्यासाठी अनेकांना वर्षांनुर्वष थांबावंही लागतंय. पण एकदा का हे घर झालं की, ते सजवायचं कसं, आकर्षक कसं दिसेल, वेगळं काय करू शकतो, नीटनेटकं कसं राहील असे सगळे विचार डोक्यात जागा घेतात. ठरवल्याप्रमाणे घर घेऊन, सजवून झालं की ते नीटनेटकं कसं ठेवता येईल याकडे सगळ्यांचा कल असतो. यात सरावल्यानंतर बदल हवा म्हणून कुठेतरी जावंसं, फिरून यावंसं वाटतं. मग सुरू होते ती कुठे जायचं, काय करायचं, कमी वेळात हॉटेलचं बुकिंग होईल का अशी प्रश्नावली. अशा वेळी मनात एक विचार चमकून जातो; तो म्हणजे सेकंड होमचा. सेकंड होम.. तुमचं हक्काचं. तुमचंच दुसरं घर. मराठी लोकांमध्ये सेकंड होमची ही संकल्पना फारशी रुजलेली नव्हती. अलीकडे याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. याचं कारण सेकंड होमचे नवनवे आकर्षक प्रोजेक्ट्स आणि त्याच्या जाहिराती. कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात लोकप्रिय कलाकारांना घेऊन केलीत तर त्याचा निश्चितच फायदा होतो. हाच विचार सेकंड होमच्या काही कन्स्ट्रक्शन कंपनीने आचरणात आणला आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सना ‘चेहरा’ मिळवून दिला. अनेक सेकंड होमच्या जाहिरातींमध्ये कलाकार मंडळी दिसू लागली आहेत. या जाहिरातींचा दर्जा चांगला असून पर्यायाने याचा फायदा सेकंड होम घेणाऱ्या मराठी माणसांना होतो असं दिसून येतं.
डीएसके सॉफ्टकॉर्नर हे सेकंड होमच्या अनेक प्रोजेक्ट्सपैकी एक महत्त्वाचं मानलं जातं. कंपनीला असलेली परंपरा, वारसा यामुळे त्यांची विश्वासार्हता लोकांच्या मनात आहे. या प्रोजेक्टचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी गेली दहा वर्षे या प्रोजेक्टच्या जाहिराती करताना दिसत आहेत. ‘भटकंती’ या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये मिलिंद गुणाजीची प्रतिमा प्रभावी ठरली. व्यक्तिमत्त्व, सादरीकरण, वेगवेगळ्या ठिकाणाविषयीचे ज्ञान या सगळ्यामुळे कार्यक्रम खुलून जायचा. यामुळेच डीएसके सॉफ्टकॉर्नर या प्रोजेक्टच्या जाहिरातीसाठी त्यांना विचारलं गेलं. सॉफ्टकॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी सांगतात की, ‘इतर प्रॉडक्टच्या जाहिराती करताना जो विचार असतो तोच सॉफ्टकॉर्नरच्या सेकंड होमच्या जाहिरातींसाठी होता. जाहिराती करताना फायदा-तोटय़ाचा इथेही विचार होतो. कलाकारांची लोकप्रियता, त्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार, समाजातील त्यांची प्रतिमा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कलाकारांना जाहिरातीसाठी विचारलं जातं. मिलिंद गुणाजी यांची ‘भटकंती’ या कार्यक्रमामुळे लोकप्रियता तुफान झाली आहे. तसंच त्याचं व्यक्तिमत्त्व सेकंड होमच्या जाहिरातींना शोभून दिसेल असं आम्हाला वाटलं. विशिष्ट प्रोजेक्टला कलाकारांमुळे चेहरा मिळतो; जो निश्चितच फायदेशीर ठरतो.’ कलाकार ठरावीक जाहिरातींमध्ये दिसतात म्हणजे त्यांना ते प्रॉडक्ट काही प्रमाणात मोबदला म्हणून मिळत असेल असा प्रेक्षकांचा सर्वसाधारण समज असतो. पण हा समज चुकीचा असल्याचं कुलकर्णी सांगतात. ‘इतर प्रोजेक्ट्सबद्दल मला माहिती नाही, पण आमच्या प्रोजेक्टची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना त्याच किंवा इतर प्रोजेक्टमधली घरं देण्याचा आमचा नियम नाही किंवा तसा व्यवहारही होत नाही. तसंच कलाकारांच्या अवाजवी मागण्या आणि त्यातून येणारे वाईट अनुभव याचाही मी साक्षीदार नाही. मिलिंद आणि आमच्यात खूप वर्षांपासूनचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आमच्यात समजूतदारपणा आहे’, असं कुलकर्णी म्हणाले. कोणतीही जाहिरात करताना कलाकाराने त्या प्रॉडक्टविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं तसंच त्या प्रोजेक्टला सादर करण्याची महत्त्वाची जबाबदारी कलाकार पार पाडत असतात. त्यामुळे कलाकारांनी त्याबाबतही जागरूक असायला हवं, असं कुलकर्णी पुढे नमूद करतात.
गेली दहा र्वष सॉफ्टकॉर्नरचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणारे मिलिंद गुणाजी सांगतात की, ‘सॉफ्टकॉर्नरची मोठी परंपरा आहे. या परंपरेतला मीही एक भाग आहे याचा आनंद आहेच. या प्रोजेक्टची जाहिरात करण्यामागचं कारण म्हणजे कुलकर्णी हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्यातला व्यवहार नंतरचा भाग आहे. त्याआधी आमची मैत्री आहे. चांगला माणूस म्हणूनही मी त्यांच्याकडे बघतो. या संबंधांमुळेच मी त्यांच्या जाहिरातींमध्येच काम करण्याचं ठरवलं. जाहिरात करताना माझ्यावरही मोठी जबाबदारी असते. ‘भटकंती’ आणि इतर काही सिनेमांमुळे माझ्या तयार झालेल्या प्रतिमेला कुठेही धक्का न लावता प्रेक्षकांचा माझ्यावरचा विश्वास खोटा न ठरवण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर असते. लोकांना चांगलं तेच दाखवण्याचा त्यांचा माझ्यावरचा विश्वासही मला खरा ठरवायचा असतो. त्यामुळे जबाबदारी खूप असते. या जाहिरातींचा मला फायदाही तितकाच होतो. प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं.’ वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असणाऱ्या मिलिंद यांचं डोंगरपायथ्याशी घर असण्याचं स्वप्नं होतं. खंडाळ्याला त्यांचं स्वत:चं घर असून दुसरं घर महाबळेश्वरला तयार होत आहे. त्यांचं सेकंड होम डोंगरपायथ्याशी असलं तरी ते या प्रोजेक्टमधलं नसल्याचं ते सांगतात.
रोजच्या गर्दीपासून दूर, एकटेपणा, समुद्रकिनारा, वाऱ्याचा आवाज, वेळेचं बंधन नाही, शून्य विचारातलं स्थिर मन आणि हातात कॉफीचा कप.. परफेक्ट सेकंड होम. सेकंड होमची संकल्पना अशीच काहीशी असावी. थोडक्यात, रोजच्या जीवनातून बदल हवा असल्यास सेकंड होम हाच एक उत्तम पर्याय असू शकतो. अभिनेता उमेश कामत यानेही त्याची सेकंड होमविषयीची संकल्पना सांगितली. तो म्हणाला, ‘प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते. बंगला असण्याची. माझ्या मते सेकंड होम शहरापासून लांब असावं. जिथे शांतता असेल. ते आरामदायी असेल. जिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्याच दैनंदिन जीवनातला बदल जाणवेल. स्वत:साठी वेळ, स्पेस मिळेल; या सगळ्या गरजा जे पूर्ण करील ते सेकंड होम.’ नातू परांजपे या ग्रुपच्या जाहिरातींमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट ही लोकप्रिय जोडी दिसते. या जाहिरातीबाबत उमेश सांगतो की, ‘कुठलीही जाहिरात स्वीकारताना किंवा कुठल्याही प्रॉडक्टचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होताना त्यांची विश्वासार्हता किती आहे, याबाबत आम्ही दोघं विचार करतो. तसेच तिथले लोक माणूस म्हणून कसे आहेत हेही बघणं आमच्यासाठी महत्त्वाचं वाटतं. पुढे जाहिरात स्वीकारल्यानंतर विशिष्ट प्रॉडक्ट अधिकाधिक आकर्षकपणे लोकांसमोर कसे सादर करता येईल, याकडे आमचा कल असतो. कारण आमच्याकडे बघून इच्छुक लोक त्या त्या प्रॉडक्टचा विचार करणार असतात. त्यामुळे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असताना जबाबदारीचंही भान ठेवावं लागतं.’ कलाकारांना जाहिरातीत घेऊन विशिष्ट प्रॉडक्टचा सर्वागांनी फायदा होतोच. पण कलाकारांचाही यामध्ये फायदा होत असतो, हे कलाकार स्पष्टपणे सांगतात. ‘आम्ही सतत काम करीत असतो असं नाही. निवडक काम करीत असल्यामुळे ठरावीक काळासाठी आम्ही प्रेक्षकांसमोर येतो. त्यामुळे अशा जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संपर्क येतो’, तो सांगतो. नातू परांजपेचे समीर नातू याबाबत सांगतात, ‘कलाकार हा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हिरो असतो. ‘तो हे करू शकतो तर आपणही करूया’ अशी प्रेक्षकांची मानसिकता असते. तसंच कोणत्याही ब्रॅण्डपेक्षा लोक कलाकारांना जास्त ओळखतात. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना घेऊन जाहिरात केली तर आमच्या ब्रॅण्डला प्रसिद्धी मिळते आणि कलाकारांनाही त्याचा फायदाच होतो. एकमेकांना धरून हा व्यवहार सुरू असतो.’
एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल तर त्याचं ‘दिसणं’ हे आवश्यक असतंच. म्हणूनच जाहिरात क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिसण्याला कलाकारांच्या असण्याची जोड मिळाली. म्हणूनच अलीकडच्या काळात अनेक सेलेब्रिटी वेगवेगळ्या प्रॉडक्टचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर, एण्डॉर्समेंट करताना दिसतात. याला सेकंड होम अपवाद कसा ठरेल. या क्षेत्रात जाहिरातीसाठी कलाकारांचं असणं गेल्या काही वर्षांत वाढलं आहे. पूर्वी जाहिरात केल्यानंतर कलाकार ‘सेलेब्रिटी’ व्हायचे. आता ‘सेलेब्रिटी’ झाले म्हणून ते कलाकार जाहिरातींमध्ये दिसतात. अर्थात याचा फायदा दोन्ही बाजूंना होत असतो. बिल्डर्सना त्यांचा प्रोजेक्ट उत्तम प्रकारे लोकांसमोर सादर करता येतं, तर कलाकारांनाही त्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहता येतं. हे साटंलोटं दिवसेंदिवस वाढतानाच दिसणार आहे, पण काही वेळा कलाकाराची लोकप्रियता एखाद्या मालिका किंवा सिनेमापुरती मर्यादित असते. अशा वेळी कसोटी लागते ती कन्स्ट्रक्शन कंपनींची. पण कलाकाराची लोकप्रियता कमी झाल्याचा फटका आजवर कोणत्याही कंपनीला बसलेला नसल्याचं ते सांगतात. कलाकाराचं जाहिरातींमध्ये असणं हे बिल्डर्ससाठी फायदेशीर असतं हे आता सिद्ध झालंच आहे. lp15आर्थिकदृष्टय़ा त्यांच्या व्यवसायात २० ते ३० टक्क्यांचा फायदा होतो. नातू परांजपेचे समीर सांगतात, ‘उमेश कामत आणि प्रिया बापट या कलाकारांनी आमच्या प्रोजेक्टची जाहिरात केल्यानंतर आम्हाला २५ ते ३० टक्के फायदा झाला आहे.’
कलाकार लोकप्रिय झाले की त्यांची मागणी वाढते. सुपारी प्रकरण, इव्हेंट्समध्ये दिसणं असे प्रकार वाढायला लागतात. तसंच जाहिरातींसाठीही त्यांची मागणी वाढते. कलाकारांनाही त्यांच्या लोकप्रियतेचा आणि मागणीचा अंदाज असतो. त्यामुळे काही कलाकार जाहिरातींसाठी अवाजवी मागण्या करतात. त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्या पूर्णही केल्या जातात. तर काही वेळा याच्या उलट घडतं. कलाकार लोकप्रिय असला तरी अवाजवी मागणी न करता त्याच्या कामाचा योग्य मोबदला तो मागतो. तसं त्याला कबूलही केलं जातं. पण कालांतराने त्या पूर्ण मात्र केल्या जात नाहीत. ‘सुरुवातीला आपल्याला या क्षेत्राविषयीची पुरेशी माहिती नसते. अशा वेळी मोबदला, मागणी याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे व्यवहारामध्ये गोंधळ होऊन संबंध खराब होतात. एका कन्स्ट्रक्शनच्या कंपनीसाठी जाहिरात केली होती. आधी कबूल करूनही कंपनीकडून शब्द पाळला नव्हता. त्या वेळी अनेक गैरसमज झाले होते. यापुढे अशा जाहिरातींमध्ये काम करायचं नाही अशा निष्कर्षांप्रत आम्ही आलो होतो’, असं एका कलाकाराने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितलं. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये केवळ कलाकारच अवाजवी मागण्या करत नाहीत तर बिल्डर्सकडूनही अशा चुकीच्या गोष्टी घडत असतात.
शिरवळ येथील स्टार सिटी यांच्या जाहिरातीमध्ये तेजस्विनी पंडित हिने काम केलं आहे. ती सांगते, ‘मैत्रीखातर मी काही घरांच्या जाहिराती केल्या होत्या. अर्थात त्यात व्यवहार होताच. पण, मैत्री आधी होती. मैत्री होती म्हणूनच त्यांच्या बजेटसह इतर काही महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या प्रकारे जमून आल्या होत्या. अशा जाहिराती करण्यामध्ये आम्हा कलाकारांचाही फायदा असतोच. अनेक दिवस त्या प्रॉडक्टच्या होर्डिग्जवर राहता येते. आर्थिक व्यवहारही त्यात महत्त्वाचा असतो. आपल्यामुळे लोकांना चांगल्या प्रोजेक्टविषयी माहिती मिळते हे सुखावणारं आहे. अशा अनेक जाहिराती केल्यामुळे ‘कुठे चांगली जागा आहे’ असे सल्ले माझ्याकडे मागतात पण, माझ्याकडे असलेली माहिती मी त्यांना देते.’ रत्नागिरीच्या ब्रह्मगिरी रिसॉर्टच्या सेकंड होमच्या जाहिरातीत सुबोध भावे दिसतो. याबाबत ब्रह्मगिरीचे अजय गोडबोले यांनी सांगतात, ‘आमच्या प्रोजेक्टसाठी सुबोधला घेण्यामागची तीन कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्यातली मैत्री. दुसरं, जाहिरातीसाठी आम्हाला एक खरं कुटुंब हवं होतं, जे आम्हाला सुबोधच्या कुटुंबात दिसलं. म्हणून सुबोधचं संपूर्ण कुटुंब आमच्या जाहिरातींमध्ये दिसेल. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सुबोधची समाजात असलेली प्रतिमा. या तिन्ही गोष्टींमुळे सुबोध आमच्या जाहिरातीसाठी योग्य असल्याचं आम्हाला जाणवलं. ‘फेस व्हॅल्यू’मुळे त्याला जाहिरातीत घेतलंय असं नाही. एका सर्वसाधारण कुटुंबाने जाहिरातीत दिसावं जेणेकरून लोकांना ते त्यांच्या जवळचं वाटेल. हीच भावना अनेकांमध्ये रुजली. लोकांना बरं-वाईट कळतं. त्यामुळे ते कलाकारामुळे प्रभावित झाले तरी प्रोजेक्टबाबतही अत्यंत जागरूक असतात. सुबोधच्या लोकप्रियतेचा आम्हाला निश्चितच फायदा झाला. लोकांकडून येणाऱ्या प्रतिसादातही वाढ झाली आहे. तसंच आमच्या प्रोजेक्टचा दर्जाही उंचावला.’ तर ही जाहिरात स्वीकारण्याचं कारण सुबोध सांगतो, ‘ब्रह्मगिरीच्या जाहिरातीसाठी मला विचारल्यावर त्यांच्या प्रोजेक्टचा हेतू काय याचा मी विचार केला. कोकणातून मराठी माणूस हद्दपार होतोय. त्याला परत कोकणात स्थिरावण्याचा त्या प्रोजेक्टचा उद्देश होता. त्यांची मराठी माणसाविषयीची कळकळ माझ्या लक्षात आली. मला त्यांचा हेतू पटला आणि मी ही जाहिरात स्वीकारली. जाहिराती करण्यामागे आर्थिक मुद्दा तर असतोच. शिवाय यानिमित्ताने अनेक लोकांशी भेटीगाठी होतात, ओळख वाढते. संवाद होतो. इंडस्ट्रीकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजतं. या सगळ्याचा पुढचं काम करताना फायदा होतो. या दरम्यान एखाद्या सिनेमा किंवा मालिकेचं मार्केटिंगही करता येतं. त्यामुळे हे दोन्ही बाजूंनी आहे.’ एखाद्या सिनेमाच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास जितक्या गांभीर्याने सुबोध करतो, तितक्यात गांभीर्याने अशा जाहिरातींचाही विचार तो करतो. ‘जोवर माझा विशिष्ट प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्टवर विश्वास बसत नाही तोवर मी ते काम करीत नाही. एकदा त्याची जाहिरात स्वीकारली की मात्र त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असते. लोक मला बघून त्या प्रोजेक्टविषयी माहिती घेत असतात. त्यामुळे आपण उत्तम सादरीकरण करायलाच हवं, असं मला वाटतं. एक कलाकार म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी असते,’ असं सुबोध सांगतो.
एकुणात, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर, कलाकारांची एण्डॉर्समेंट्स या गोष्टी मराठी कलाकारांच्या बाबतीतही आता मोठय़ा प्रमाणावर दिसून येताहेत. त्यातही सेकंड होमसारख्या संकल्पना लोकांसमोर सादर करण्याची जबाबदारी महत्त्वाची. हा व्यवहार असला तरी दोन्ही बाजूंना याचा फायदाच होतोय. हे साटंलोटं खऱ्याअर्थाने फायदेशीर ठरतंय.
चैताली जोशी