रिअल इस्टेट विशेष : वीकेण्ड होम्सचे माहेरघर

मुंबईपासून दोन ते अडीच तासांच्या अंतरावर छोटेसे पण हक्काचे घर असावे असा ट्रेंड अलीकडच्या काळात रूढ व्हायला लागला आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि अतिच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये हा…

lp13मुंबईपासून दोन ते अडीच तासांच्या अंतरावर छोटेसे पण हक्काचे घर असावे असा ट्रेंड अलीकडच्या काळात रूढ व्हायला लागला आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि अतिच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये हा ट्रेण्ड पाहायला मिळतो आहे. यातूनच वीकेण्ड होम, सेकंड होम आणि फार्म हाऊससारख्या संकल्पना जन्माला आल्या आहेत. मुंबईपासून शंभर किलोमीटरच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच अलिबाग आणि कर्जत परिसरात या संकल्पनांवर आधारित अनेक गृहनिर्माण प्रकल्प येऊ लागले आहेत. मुंबईकरांच्या वीकेण्ड होम अथवा सेकंड होम संकल्पनेला डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पांची उभारणी केली जाते आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या मुंबईकरांना आठवडय़ाचा शेवट हा निवांत आणि शहरापासून दूर व्हावा, असे नेहमीच वाटत आले. त्यातून वीकेण्ड सहलींची संकल्पना रूढ झाली. पण हॉटेलमध्ये राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च त्यांना जाचक वाटू लागला. ‘गरज ही शोधाची जननी’ असते म्हणतात. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा शहरापासून दूर एखादी हक्काची जागा असावी, अशी गरज त्यांना वाटू लागली आणि यातून वीकेण्ड होम्स अर्थात सेकंड होमची कल्पना जन्माला आली.
मुंबईपासून दोन ते अडीच तासांच्या अंतरावरील जागांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता अलिबाग आणि कर्जत ही दोन सेकंड होम्स डेस्टिनेशन जन्माला आली. डोंगरकुशीत वसलेले आणि सिंचनाची मुबलक साधने उपलब्ध असल्याने कर्जत हे ‘फार्म हाऊस सिटी’ म्हणून नावारूपास आले. तर शांत-सुंदर समुद्रकिनारा लाभलेले आणि मुंबईतून सहज पोहोचणे शक्य असणारे अलिबाग हे वीकेण्ड होम्सचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. २००४-२००५ नंतर अचानकपणे ही दोन्ही शहरे रिअल इस्टेट व्यवसायाची प्रमुख केंद्रे बनली. शहरालगतच्या जागा खरेदी-विक्रींना वेग आला आणि एकामागून एक वीकेण्ड होम्सचे प्रकल्प सुरू झाले. मुंबई-पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी ही संधी ओळखली. मग त्यांनीही या परिसरात जागा खरेदी करून गृहनिर्माण प्रकल्प सुरू केले.
बांधकाम व्यवसायातील अनेक नामांकित कंपन्या आज अलिबाग आणि कर्जत परिसरात दाखल झाल्या आहेत. मुंबईकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन वीकेण्ड होम्स अथवा सेकंड होम विकसित केले जात आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांतील रिअल इस्टेट व्यवसायाला अचानक सुगीचे दिवस आले आहेत. अलिबाग तालुक्यात डॅफोडिल्स, दिशा डायरेक्ट, मार्क वेंचर्स, समिरा, इंद्रप्रस्थ, तनया कन्स्ट्रक्शन यांसारख्या कंपन्यांचे गृहनिर्माण प्रकल्प सध्या जोमाने सुरू आहेत. अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा, तळवली, सहाणगोटी नागांव ही गावे वीकेण्ड होम्स प्रोजेक्ट्सची केंद्रबिंदू ठरत आहेत.
मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, आणि उच्च उत्पन्न वर्ग यांना डोळ्यांसमोर ठेवून प्रकल्पांची उभारणी केली जाते आहे. स्टुडिओ होम्स, वन बीएचके आणि टू बीएचके सदनिका सोबतच, सर्व सुविधांनी सुसज्ज बंगल्यांचा यात समावेश आहे. मुंबई आणि नवी मुंबई यांच्यानंतर आता तिसरी मुंबई म्हणून अलिबाग, पेण, उरण या तालुक्यांकडे पाहिले जाते आहे. या परिसराचा मुंबई महानगर रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (एमएमआरडीए) क्षेत्रांत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही या घरांकडे पाहिले जाते आहे.
त्यामुळे अलिबाग तालुक्यातील मालमत्तांच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. २००४-२००५ मध्ये सुमारे ८५० रुपये प्रति स्क्वेअर फूट असा बांधकामाचा दर आज साडेचार ते सहा हजार रुपये प्रति स्क्वेअर फूटवर पोहोचला आहे. जागांच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात मांडवा ते अलिबाग हा परिसर तर मुंबईतील नरिमन पाइंट आणि मलबार हिल यांसारखा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. देशातील गर्भश्रीमंत आणि बडय़ा उद्योजकांनी आपल्या सेकंड होमसाठी या परिसराची निवड केली आहे. टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, सायरस मिस्त्री, लिकर किंग विजय मल्या, उद्योगपती अशोक मित्तल, बिर्ला उद्योगसमूहाचे यशवर्धन बिर्ला क्रिकेटपटू रवी शास्त्री, अभिनेत्री जूही चावला आदी दिग्गजांनीही आपले आलिशान फार्म हाऊसही या परिसरात विकसित केले आहेत. आज मांडवा परिसरात ३० ते ४० लाख रुपये प्रति गुंठा असा दर जमिनीसाठी आकारला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
अलिबागमधील गुंतवणुकीसाठी या सर्व जमेच्या बाजू आहे. मात्र तरीदेखील गेल्या दीड वर्षांपासून बांधकाम व्यवसायाला जागतिक मंदीचा फटका बसला. त्यामुळे गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले असून निधीअभावी अनेक प्रकल्प अडचणीत आले. जागेचे व्यवहारही ठप्प झाले. पण ही परिस्थिती लवकरच बदलेल, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांना वाटतो आहे. जागतिक मंदीबरोबरच गुंतवणूकदार न येण्याला आणखी काही घटक कारणीभूत ठरत आहेत. जोवर रस्ते, वीज, पाणी, गटार इ. व्यवस्थांचा या परिसरात विकास होणार नाही तोवर बांधकाम व्यवसायाला गती मिळणार नाही. एमएमआरडीए झोनमध्ये ग्रामीण भागात आजही ग्राऊं ड प्लस टू बांधकामाला परवानगी दिली जाते. हे बंधन शिथिल होणे गरजेचे आहे. यामुळे कमी जागेत जादा आणि हवेशीर घरांची उभारणी करणे शक्य होईल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक शेखर वागळे यांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलिबाग परिसरात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे ६०टक्के लोक हे मराठी आहेत. तर उर्वरित ४० टक्के लोक हे स्थानिक आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांकडून अलिबागमध्ये सेकण्ड होम घेण्याला अधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात स्टुडिओ अपार्टमेंट या संकल्पनेतून उभ्या राहणाऱ्या घरांनाही चांगली मागणी आहे. अत्यंत किफायतशीर दरात हे अपार्टमेंट उपलब्ध होत असल्यानेही मध्यमवर्गीय गुंतवणूकदार या प्रकाराच्या घरांची मागणी करीत आहेत.
तर कर्जत हे एक ‘फार्म हाऊस सिटी’ म्हणून नावारूपास आले आहे. आज कर्जत शहरालगतच्या परिसरात दोन हजारांहून अधिक फार्महाऊस तयार झाले आहेत.
हर्षद कशाळकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Real estate special

ताज्या बातम्या