रिअल इस्टेट विशेष : ठाणे : मेट्रोमुळे नवी झळाळी

गृहनिर्माण क्षेत्रात अवतरलेल्या तथाकथित मंदीची झुळूक ठाण्यापर्यंत पोहोचेल आणि येथील घरांचे दर धाडकन खाली कोसळतील, अशा स्वप्नरंजनात राहणाऱ्या ग्राहकांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने…

lp13गृहनिर्माण क्षेत्रात अवतरलेल्या तथाकथित मंदीची झुळूक ठाण्यापर्यंत पोहोचेल आणि येथील घरांचे दर धाडकन खाली कोसळतील, अशा स्वप्नरंजनात राहणाऱ्या ग्राहकांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भ्रमनिरास होत आला आहे. नव्याने विकसित होत असलेल्या कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा ते बदलापूर परिसरातही फारसे वेगळे चित्र नाही. बाजारात फारसा उठाव नाही, अशी ओरड या पट्टय़ातील विकासकांकडून सातत्याने केली जात असते. उठाव नाही तरीही घरांचे दर काही उतरत नाहीत, असा ग्राहकांचा अनुभव आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा यांसारख्या परिसरात सुमारे एक हजारांहून अधिक घरे विक्रीअभावी पडून असल्याची धक्कादायक कबुली मध्यंतरी या भागातील विकासक संघटनेने दिली होती. घरांची विक्री होत नाही, तरीही दर उतरत का नाहीत, याचे उत्तर देण्यास कुणीही पुढे येण्यास तयार नाही. या सगळ्या पट्टय़ात एक ते दोन खोल्यांच्या सदनिकेला सर्वाधिक मागणी असल्याचे आढळून आले आहे. म्हणजे वन-बीएचके प्रकारात मोडणाऱ्या घरांना टिटवाळा, अंबरनाथ पट्टय़ात सर्वाधिक मागणी आहे. असे असतानाही राज्य सरकारकडून विशेष नागरी वसाहतींचे परवाने पदरात पाडून मोठी घरे उभारण्याकडे अजूनही बिल्डरांचा कल दिसतो आहे. जमिनींचे गगनाला भिडलेले भाव आणि त्यावर उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या किमतींचे गणित काढले तर ‘स्वस्त घरे’ ही संकल्पना केव्हाच मोडीत निघाली आहे. या सगळ्या व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर काळ्या पैशाची गुंतवणूक होते, ही चर्चा काही नवी नाही. ठाणे आणि कल्याण पट्टय़ातील बडय़ा गृहप्रकल्पांमध्ये स्थानिक पुढाऱ्यांचे असलेले हितसंबंध यापूर्वीही उघड झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात घरांचे भाव कमी होतील ही शक्यता म्हणजे केवळ फुकाची बडबड ठरण्याची चिन्हे अधिक आहेत. 

मध्यंतरी ठाणे परिसरातील बिल्डरांनी एकत्र येऊन मालमत्ता प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनात मुंबई, ठाण्यातील मोठय़ा बिल्डरांनी आपल्या गृहप्रकल्पांमधील घरे विक्रीसाठी ठेवली होती. मुंबईसारख्या मोठय़ा नगराला पर्याय म्हणून नवी मुंबईचा झपाटय़ाने झालेला विकास नजरेत भरणारा असला तरी आजही ठाण्यात घर असणे हे अनेकांसाठी प्रतिष्ठेचे ठरते. नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, रोडपाली, नवीन पनवेल यांसारख्या सुनियोजित उपनगरांच्या तुलनेत ठाण्याचे घोडबंदर नियोजनाच्या आघाडीवर फारच विस्कळीत. या सगळ्या पट्टय़ासाठी एकमेव रेल्वे स्थानक आणि ते म्हणजे मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचा असा ज्याचा उल्लेख होतो ते ठाणे स्थानक. दळणवळणाच्या फारशा सुविधा नाहीत, खासगी विकासकांनी सुरू केलेली बेकायदा बस वाहतूक ही या भागातील रहिवाशांच्या दळणवळणाची प्रमुख व्यवस्था. तरीही घोडबंदर म्हणजे श्रीमंत वस्तीचे ठाणे असे चित्र रंगविण्यात येथील बिल्डरांना वर्षांनुवर्षे यश मिळाले आहे. अर्थात येथे घर घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. घोडबंदर मार्गावरून बोरिवली, कांदिवली, गोरेगावसारखी उपनगरे तुलनेने जवळ आली आहेत. याशिवाय पवईसारखा व्यावसायिक पट्टाही फारसा लांब नाही. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये बडय़ा कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करणाऱ्या नोकरदाराला मुंबईच्या तुलनेने फारच ‘स्वस्त’ वाटणारे घोडबंदर कधीही जवळचे वाटावे असे. एकंदर येथील बांधकाम क्षेत्रासाठी हे सगळे चित्र सकारात्मक वाटत असले तरी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी घरांची विक्री रोडावल्याचे येथील रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ दबक्या आवाजात का होईना मान्य करतात. तरीही या ठिकाणी लोढा, रुस्तमजी, हिरानंदानी, दोस्ती, कल्पतरू यांसारख्या बडय़ा विकासकांच्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या दरांचा आलेख गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनातही चढाच राहिला.
मेट्रोच्या नावाने चांगभलं
नियोजनाच्या आघाडीवर नवी मुंबईशी स्पर्धा करणे जवळपास दुरापास्त होऊ लागल्याने येथील विकासकांनी आता मेट्रोच्या नावाने चांगभलं करून घेण्यास सुरुवात केली आहे. यंदा भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या निमित्ताने मेट्रोच्या निमित्ताने अवतरलेली ही गृह महागाई सर्वाच्या डोळ्यात भरणारी ठरली. राज्य सरकारने ठाण्यात मेट्रो सुरू करण्याची घोषणा नुकतीच केल्याने बिल्डरांचे आयतेच फावले आहे. मेट्रोच्या नियोजित मार्गालगत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमधील घरांच्या दरात त्यामुळे प्रतिचौरस फुटास ३०० ते ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती नगरनियोजन क्षेत्रातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाणे, भिवंडीतील बडय़ा विकासकांनी एकत्र येऊन भरविलेले मालमत्ता प्रदर्शन बाळकूम येथील हायलॅण्ड पार्क येथे भरले होते. सुमारे ६० पेक्षा अधिक विकासक, कर्जपुरवठा करणाऱ्या बडय़ा वित्तीय संस्था आणि ५०० पेक्षा अधिक मोठे गृहप्रकल्प असा मोठा थाटमाट या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना अनुभवता आला. रिअल इस्टेट क्षेत्रात फारशी तेजी नाही हे तुणतुणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐकू येत आहे. तरीही यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात मोठय़ा बिल्डरांच्या गृह प्रकल्पांमधील घरांचे दर चढेच राहिले. अवाच्या सव्वा दराने विकत घेतलेल्या जमिनींवर उभी राहिलेली घरे स्वस्त विकणार तरी कशी असा बिल्डरांचा साधासरळ सवाल आहे. विशेष म्हणजे, महागडय़ा घरांना मागणी नसतानाही ती विक्रीशिवाय रोखून धरण्याची ताकद यापैकी अनेकांमध्ये आहे. अर्थातच मोठय़ा प्रमाणावर असलेले राजकीय लागेबांधे आणि त्या माध्यमातून आलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर हे सगळे गणित अवलंबून असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. राज्य सरकारने वडाळा-घाटकोपर-ठाणे मार्गावर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्याचा पुरेपूर परिणाम ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसून येत आहे. मुंबईतून येणारी मेट्रो तीनहात नाकामार्गे घोडबंदरच्या ओवळा भागापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोमार्गालगत उभ्या राहत असलेल्या मालमत्तांमधील घरांचे दर आतापासूनच ३०० ते ५०० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ राजेश जाधव यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकाही प्रकल्पात दरकपात झाल्याचे चित्र नाही. गृहनिर्माण क्षेत्राचा सध्याचा बाजार लक्षात घेता हे दर वास्तवदर्शी आहेत का, याचा अभ्यास आता बिल्डरांनीच करावा, असे मतही जाधव यांनी मांडले. दरम्यान, ठाणे शहराचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेता इतर शहरांच्या तुलनेत येथील रियल इस्टेट क्षेत्रात मंदी नाही, असा एमसीएचआय, ठाणेचे प्रमुख मुकेश परमार यांनी केला. ठाण्यात कधीही मंदी नव्हती आणि आजही नाही, असा दावा परमार यांनी केला आहे. उलट मेट्रोच्या घोषणेमुळे येथील बाजार अधिक तेजीत येईल. नवी मुंबई विमानतळाच्या घोषणेमुळे त्या परिसरातील बांधकाम क्षेत्राला वेगळी झळाळी मिळाली होती. मेट्रोमुळे ठाण्याचे तेच होईल, असा दावा परमार यांनी केला.
स्वस्त घरांसाठी शीळ, भिवंडी
घोडबंदर मार्गावरील घरांचे दर अद्यापही चढेच असताना स्वस्त घरांसाठी सध्या मुंब््रयाच्या पलीकडे शीळ आणि ठाणेपल्याड भिवंडी बाजाराकडे पाहिले जात आहे. भिवंडीत गेल्या काही वर्षांत मोठय़ा संख्येने गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पांची विक्री फारशी वेगाने होत नसल्याचे पाहून येथील बिल्डरांनी भिवंडीचा उल्लेख ‘नवे ठाणे’ असा करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या पट्टय़ातील घरांच्या विक्रीची जाहिरात अशाच पद्धतीने केली जात आहे. घोडबंदर, बाळकुम, माजिवडा, वसंत विहार यांसारख्या भागांत नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांतील घरांचे दर प्रतिचौरस फूट दहा हजारांपेक्षा जास्त आहेत. घोडबंदर भागातील सूरज पार्क परिसराच्या अलीकडे उभ्या राहणाऱ्या बहुतांश गृहप्रकल्पांमधील घरांचे दर प्रतिचौरस फुटाला अकरा ते बारा हजारांच्या घरात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच मार्गावर काही बडय़ा बिल्डरांनी उभ्या केलेल्या ‘विशेष नागरी वसाहती’मधील घरांचे दर नऊ ते साडेनऊ हजार रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे स्वस्त आणि किफायतशीर घरांच्या शोधात असाल तर ग्राहकांपुढे शीळ, भिवंडीशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेतील शहर विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शीळ परिसरात मुंबईतील एका मोठय़ा बिल्डरची विशेष नागरी वसाहत उभी राहिली आहे. या बिल्डरच्या दबावामुळे का असे ना या सगळ्या पट्टय़ांत सुविधांचे जाळे विणण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील मुख्य रस्त्यालगत सेवा रस्त्यांचा प्रस्ताव मध्यंतरी ठाणे महापालिकेने पुढे आणला. या मोठय़ा बिल्डरचा आग्रह त्यासाठी कारणीभूत ठरल्याची उघड चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.
शीळ-डायघर पट्टय़ात एका मोठय़ा बिल्डरने मोठा गाजावाजा करीत गृह प्रकल्पाची बांधणी सुरूकेली आहे. मात्र, मुंब््रयाचा ‘शिक्का’ बसल्याने येथील घरांची विक्री मंदावल्याचे म्हटले जाते. असे असले तरी येथील घरांच्या किमती अजूनही प्रतिचौरस फुटाला पाच हजारांच्या घरात आहेत. म्हणजे, ५०० चौरस फुटांचे घर विकत घ्यायचे असले तर या भागात वेगवेगळे चार्जेस धरून ३५ लाखांच्या आसपास खर्ची पडतात. या भागाचा चेहरामोहरा लक्षात घेता हे दर निश्चितच चढे आहेत.
लहान घरांना सर्वाधिक मागणी
मध्यंतरी कल्याणातही बिल्डरांचे मालमत्ता प्रदर्शन भरले होते. त्याला ठाणे, रायगड, मुंबई, नाशिकमधून साडेपाच हजाराहून अधिक कुटुंबांनी भेट दिली. कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबई, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, नाशिक, देवळाली परिसरात राहणारे अनेक नागरिक मुंबई परिसरात नोकरी, व्यवसाय करतात. या परिसरातील रहिवाशांचा कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे घर घेण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या साडेपाच हजार कुटुंबीयांपैकी ७५ टक्के रहिवाशांनी ४०० ते ७५० चौरस फुटांच्या घरासंबंधी विचारणा केल्याची माहिती पुढे येत आहे. उर्वरित १५ टक्के नागरिकांची तीन ते चार बीएचके सदनिकेची म्हणजे एक हजार ते दीड हजार चौ. फूट, काहींची बंगला आणि स्टुडिओसाठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे कल्याण, अंबरनाथ या पट्टय़ात लहान घरांना मोठी मागणी आहे. अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहापूर या पट्टय़ात ‘सेकंड होम’ ही संकल्पना मध्यंतरी भलतीच तेजीत होती. गेल्या काही महिन्यांपासून ही नवी संकल्पना काहीशी ओसरू लागली आहे. या भागात लहान घरांना मोठी मागणी असली तरी २५ ते ३० लाख रुपये खर्चून ‘सेकंड होम’ची गुंतवणूक करण्याकडे सध्या कमी कल दिसू लागला आहे, अशी माहिती या भागातील एका तज्ज्ञाने दिली. ठाणेपल्याड घरांच्या विक्रीवर या मानसिकतेचा प्रतिकूल परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.

घरांचे दर (रुपये/चौ. फूट)
तीन हात नाका परिसर – १३ ते १५ हजार
घोडबंदर, बाळकुम,
माजिवडा, लोकपुरम – १० ते १२ हजार
सूरज पार्क – ९ हजार ते ९५००
जयेश सामंत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Real estate special