रिअल इस्टेट विशेष : नाशिक – गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेली ओळख टिकवून ठेवतानाच नाशिक शहर आता देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक झाले आहे. अत्याधुनिक सुविधांसह…

lp13दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेली ओळख टिकवून ठेवतानाच नाशिक शहर आता देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक झाले आहे. अत्याधुनिक सुविधांसह पारंपरिकतेची नाळ न सोडणाऱ्या या शहराने मागील दशकापासून आश्चर्यजनक रीतीने कात टाकली आहे. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाण्यासह इतर बडय़ा शहरांतील नागरिकांना नाशिकमध्ये आपले एक तरी घर असावे असे वाटू लागले आहे. अर्थात असे वाटण्यामागील कारणे अनेक आहेत.

१९८२ मध्ये नाशिक महापालिकेची स्थापना झाली, त्या वेळी चार लाख असलेली लोकसंख्या आज १८ लाखांपेक्षा पुढे गेली आहे. हे द्योतक आहे पसरणाऱ्या नाशिकचे. मर्यादित असे म्हणजे सुमारे अडीचशे चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असलेल्या या शहराचा झपाटय़ाने होणारा विकास कित्येकांना काम मिळवून देणारा ठरला आहे. अगदी मध्यवर्ती भागापासून अवघ्या दहा किलोमीटरच्या परिघात शहराच्या कोणत्याही भागात सहजपणे पोहोचता येण्याइतपत सुलभता येथे मिळते. भविष्यातील गुंतवणुकीसाठी एक सुंदर शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाऊ लागले आहे. महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-नाशिक अंतर अवघ्या दोन ते अडीच तासांत कापता येणे, नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात होणे, संभाव्य नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, नाशिक विमानतळाचे उद्घाटन, नाशिक-वापी महामार्ग करण्यास मंजुरी अशा प्रकारे सर्व बाजूंनी नाशिक शहर हे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून इतर बडय़ा शहरांबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांशीही जोडणारे शहर झाले आहे. त्यातच अंबड, सातपूर, सिन्नर, गोंदे, इगतपुरी, दिंडोरी येथील औद्योगिक वसाहती, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये असलेले नाशिकचे स्थान, सिन्नर येथील सुमारे एक हजार क्षेत्रावरील विशेष आर्थिक क्षेत्र, या सर्वामुळे भविष्यातील नाशिकच्या प्रगतीचा वेग घेता येऊ शकेल. नैसर्गिकदृष्टय़ा वर्षभर असणारे आल्हाददायक वातावरण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, वणी, सापुतारा यांसारखी पर्यटनदृष्टय़ा आकर्षित करणारी ठिकाणे, द्राक्षनगरीबरोबरच वाइन व्हॅली म्हणून झालेला उदय, अंजनेरीजवळ निर्माण होणारे साहसी क्रीडा प्रकारांचे केंद्र, गंगापूर धरणाजवळ होत असलेले अ‍ॅम्युझमेंट पार्क, जल सफरीसाठी बोट क्लब असे सर्व काही नाशिक परिसरात निर्माण होत असल्याने गुंतवणूकदार नाशिककडे आकर्षित होत आहेत. परिणामी दिवसेंदिवस जागा आणि घरांच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
नाशिकलगत गृहसंकुलांचा विस्तार
सद्य:स्थितीत नाशिक शहरात नवीन गृहप्रकल्पांना सामावून घेण्यासाठी अत्यंत कमी जागा शिल्लक असल्याने बडे गृहप्रकल्प हे शहरालगतच्या गंगापूर, गिरणारे, म्हसरूळ, आडगाव, पाथर्डी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या ठिकाणी साकारताना दिसत आहेत. अगदी दोनशे ते चारशे सदनिकांचा समावेश असणाऱ्या टाऊनशिप्सपर्यंत त्यांचे स्वरूप विस्तारले आहे. त्यामुळे शहराजवळील असा कोणताच भाग बाकी नाही की त्या भागात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचा पाया खोदला गेलेला नाही. गंगापूररोड आणि कॉलेजरोड या परिसरात घर घेणे सर्वाधिक कठीण झाले आहे. साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फुटापासून पुढे या ठिकाणी घरांचे दर सुरू होतात. अर्थात चुंचाळे, श्रमिकनगर यांसारख्या कामगार वस्तीच्या भागात हेच दर २२०० रुपये स्क्वेअर फुटापासून सुरू होतात. परंतु गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने विचार करणाऱ्यांपुढे शहरांबाहेरील गृह संकुलांचाही पर्याय आता उपलब्ध आहे. शिक्षणाच्या सुविधा, मनोरंजनाची साधने, असे सर्व काही नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने मुंबई, पुण्याचे अनेक जण नाशिकमध्ये घर आणि जागेत गुंतवणूक करू लागले आहेत.
अशा संकुलांमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही ही संकल्पना रुजू लागल्याने अनेकांचा ओढा या संकुलांमध्ये घर घेण्याकडे आहे. जिम्नॅशियमपासून स्विमिंग पूलपर्यंत, मंदिरापासून ध्यानापर्यंत असे सबकुछ अशा संकुलांमध्ये मिळत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अशा संकुलांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात येत असल्याने नोकरदारांकडून त्यांना प्राधान्य मिळत आहे. विशेष म्हणजे घरासाठी गुंतवणूक करताना बहुतांश जण आपआपल्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील घरांना प्राधान्य देताना दिसतात. उदा. धुळे, जळगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा या भागातील मंडळी पंचवटीत महामार्गालगतच्या घरांमध्ये तर, मुंबई, पुण्याकडील मंडळींची संख्या पाथर्डी, इंदिरानगर या भागात अधिक गुंतवणूक करताना दिसतात.
बाहेरील व्यावसायिक आकर्षित
नाशिककडे गुतंवणुकीस असणारा वाव लक्षात घेऊन नाशिकबाहेरील अमित एंटरप्रायझेस, मैत्रेय ग्रुप, एकता, व्हिस्टाकोर, परांजपे, डीएसके असे बडे बांधकाम व्यावसायिक नाशिककडे आकर्षित झाले आहेत. या सर्व व्यावसायिकांचे प्रकल्प नाशिकशेजारील उपनगरांमध्ये सुरू केले आहेत. अशा बडय़ा व्यावसायिकांमुळे नाशिकमध्ये आता आरामदायी अशी घरे २५ लाखांपासून दोन कोटींपर्यंत उपलब्ध झाली आहेत. आलिशान फ्लॅटपासून व्हिलाज्पर्यंत हे बांधकाम असल्याने आरामदायी राहणीमानाची आवड असणाऱ्यांसाठी ही सोय झाली आहे. याशिवाय स्थानिक प्रथितयश गृहनिर्माण व्यावसायिकांचे प्रकल्प आहेतच.
किंमतवाढ चिंताजनक
डिसेंबर २०१३ पर्यंत नाशिकमधील घरांच्या किमतींमध्ये फारशी वाढ झालेली नव्हती. परंतु मागील वर्षी रेडीरेकनरच्या दरात ४० टक्के वाढ झाल्याने घरांच्या किमतीही त्या तुलनेत वाढल्या. त्याचा फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचे म्हणजेच ‘क्रेडाई’चे नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी नाशिकमध्ये गृह प्रकल्पांची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु बांधकाम व्यावसायिकांसाठी सरकारचे धोरण योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. रेडीरेकनरच्या दरात होणारी वाढ, यंदाच्या अर्थसंकल्पात सेवाकरात झालेली वाढ या सर्वाचा परिणाम घरांच्या किमती वाढण्यात होतो. बांधकाम व्यावसायिकाने कमीतकमी फायदा घेण्याचे ठरविले तरी त्याची झळ ग्राहकांनाच बसते. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील की काय, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण यांनीही रेडीरेकनरचे दर कमी करण्याची गरज व्यक्त केली. सुमारे दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये तयार सदनिकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर होती. परंतु आता ती बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना हा दिलासाच म्हणावा लागेल. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अलीकडेच आयोजित ‘शेल्टर’ प्रदर्शनातून सुमारे दोनशे सदनिका तसेच जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. कमी उत्पन्न गटासाठीही १८ ते २५ लाखांदरम्यान नाशिकमध्ये घर मिळू शकते, असेही चव्हाण यांनी नमूद केले. ज्या सदनिका बांधून तयार आहेत, त्यांच्या किमतींमध्येही भविष्यात वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नाशिकमधील घरांच्या किमती मुंबई, पुण्याच्या ग्राहकांना निश्चितच परवडणाऱ्या आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. परंतु स्थानिक नाशिककरांसाठी मात्र घरांच्या वाढणाऱ्या किमती आवाक्याबाहेरच्या वाटू लागल्या आहेत. ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारवर्ग असलेल्या या शहरात सरासरी १५ ते २५ हजार रुपयांपर्यंतची प्रतिमाह प्राप्ती होणाऱ्यांना २५ लाखांपर्यंतचे घर घेणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळेच मुंबई, पुणेकरांसाठी सुलभ आणि नाशिककरांसाठी दुर्लभ अशी नाशिकच्या गुंतवणुकीची सद्य:स्थिती म्हणावी लागेल.

मुंबई, पुणेकरांचीही पसंती
मुंबई, पुणे या शहरांचा विस्तार होण्यास आता पुरेसा वाव नाही. त्यातच या दोन महानगरांमध्ये नोकरदार, कंपनी कामगार किंवा इतर व्यावसायिकांना महिन्यास होणारी आर्थिक प्राप्ती (त्या ठिकाणी घर किंवा जमिनींच्या किमती गगनाला भिडल्यामुळे) पुरेशी नसली तरी त्या प्राप्तीत नाशिकमध्ये त्यांना सहजपणे घर किंवा जमीन घेता येऊ शकते. त्यामुळेच नाशिक हे ‘सेकंड होम’ संस्कृतीलाही पोषक ठरू लागले आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच उंचच उंच इमारती नाशिकमध्ये उभ्या राहू लागल्या आहेत.
अविनाश पाटील

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Real estate special