टन.. टन.. टन..

देव : कोण आहे ?
मी : मी आहे.
देव : काय हवं आहे?
मी : खरंच मी मागीन ते देशील?
देव : जर शक्य असेल तर देईन.
मी : खरं म्हणजे मला आज काहीच नको आहे. हो, जमलं तर मला तुझ्याकडून एका गोष्टीचा खुलासा हवा होता.
देव : विचार
मी : देवा, मला एक सांग की आस्तिक म्हणजे काय? आणि नास्तिक म्हणजे काय?
देव : अगदी सोपे आहे आस्तिक म्हणजे जो माझे अस्तित्व मानतो तो, आणि मी जगात नाही अशी ज्याची ठाम समजूत आहे तो नास्तिक .
मी : बरं, तुझ्या दरबारी दोघांना सारखाच न्याय आहे का?
देव : का रे बाबा, तू असे का विचारतो आहे?
मी : ते काही नाही मला उत्तर हवं.
देव : प्रत्येक जण माझ्याकडून आपल्या कर्माप्रमाणे फळ घेतो. पण तुला हे आठवायचे कारण काय?
मी : ते काही नाही, मला आज मनासारखे उत्तर मिळाल्याशिवाय मी आज येथून जाणारच नाही. मला सांग देवा मी नेहमी तुझ्याकडे काही ना काही मागतो. बरेचदा तू देतोसदेखील. जेव्हा मिळत नाही तेव्हा नंतर मिळेल अशी माझी समजूत असते.
देव : ते सर्व ठीक आहे, पण तुला हे सर्व प्रश्न का पडले.
मी : देवा मी लहान असल्यापासून मला चांगले आठवते. मी शाळेत होतो तेव्हा परीक्षेच्या आधी मी थोडा बहुत अभ्यास करीत असे. चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी खूप प्रार्थना करी. बरेचदा मनासारखे मार्क्स मिळत. मग मी खूश होत असे. पण मला हेदेखील आठवते की जी मुले तुला अजिबात मानत नव्हती, त्यांना पण चांगले यश दिलेस मग हे कसे काय? आता मला असे सांग की तुला नमस्कार केला काय आणि नाही केला काय तू तर सारखाच न्याय करतोस.
देव : याचा इथे काय संबंध?
मी : देवा, मी पुढे मोठा झालो. नोकरी मिळाली, लग्न झाले मनासारखी सुंदर बायको मिळाली, नंतर मुले झाली.
देव : बरं, मग सर्व चांगले झाले, हे तू स्वत:च सांगतो आहेस.
मी : निश्चित माझी तक्रार खरी पुढे आहे. हे तू मला दिले कारण मी तुला मागत होतो आणि त्या करता पूजा करत होतो. त्यामुळेच मला मिळाले असा माझा समज होता.
देव : मग त्यामध्ये चुकीचं काय?
मी : तसं नाही, मला हे सांग जे तुला साधा नमस्कार पण करत नाहीत, तुझ्याकडे काही मागत नाहीत त्यांना तू का बरं देतोस ?
देव : उदाहरणार्थ?
मी : आता बघ मी अशाही लोकांना ओळखतो जे तुला मानतच नाहीत. एखादी गोष्ट मिळाली तर नशिबाने नाही, माझ्या ताकदीने मिळवली असे सांगतात तेव्हा मला त्रास होतो. मला त्याच्या नशिबावर किंवा ताकदीवर काही बोलायचं नाही.
देव : आता बघ प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
मी : अगदी खरं आहे. माझे म्हणणे असे की तू त्यांना शिक्षा का नाही करीत ?
देव : कसं आहे जो तो आपल्या वाटय़ाचे सुख दु:ख भोगतो.
मी : देवा मला अजून एक सांग की आम्हाला लहानपणी असेही सांगितलं होते की आपण जसं वागू त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल. जसे आपण गरजवंताला मदत केली तर देव तुम्हाला अडचण आली तर नक्की मदत करतो. निदान त्यामुळे तरी माणूस चांगले वागेल असा आमचा समज असतो.
देव : ठीक आहे ना मग?
मी : काही वेळा असेही म्हणतात एखाद्याचे काही वाईट झाले तर नक्कीच यांनी मागच्या जन्मी काही तरी पाप केलं असेल त्याची तो फळ भोगतो आहे. तर हे खरं आहे का? मला जर विचारले तर मी म्हणेल की मागच्या जन्मीची शिक्षा या जन्मात देणं योग्य नाही. तुला काय वाटते ?
देव : खरं म्हणजे हे सर्व समज आहेत. माणूस जसे या जन्मी वागतो तसेच फळ मिळवतो. तुम्ही लोक खूप वेळा स्वार्थी वागतात. जेव्हा तुम्ही अडचणीत असतात किंवा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा मंदिरात चकरा मारता. आणि तुमचे काम होते तसे तुम्ही पाठ फिरवता. आपले काम व्हावे यासाठी तुम्ही लोक नवस बोलता. आणि काम झाले की फेडता. पण बरेचदा काही लोक नवस विसरून पण जातात. पूजा करताना तुम्ही हार, फुलं वाहतात. नारळ, पेढे वगैरेचा नैवेद्य दाखवतात. तेव्हा नैवेद्य दाखवणारे तुम्हीच आणि खाणार पण तुम्हीच. अरे मी कधी प्रसाद खाल्ला आहे का? देवळात वाहिलेला नारळ, खण व इतर साहित्य पुन्हा त्याच दुकानात जाते तेव्हा त्याला काय म्हणायचे, मला याचा खूप त्रास होतो. हल्ली तुम्ही लोकांनी मोठय़ामोठय़ा देवळाची जणू स्पर्धा केली आहे. लाखो करोडो रुपयांचा सोन्याचा हार, मुकुट, छत्र यांची स्पर्धा असते. नको आहे मला हे सर्व. त्यापेक्षा गरीब लोकांना अन्न वाटा, मला हवं आहे तुमचे प्रेम, नि:स्वार्थी भाव.. तेच सर्व नाहीसे होत चालले आहे. बंद करा हा पैशाचा व्यापार, उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही जी रोषणाई करता, मोठमोठे आवाज करता ते सर्व मला असह्य़ होते. काही लोकांची नजर तर आमचे दागिने पळवण्यापर्यंत गेली आहेत, तर काही लोक मला चक्क पळवून नेतात. काय म्हणावे या सर्व प्रकाराला? सध्या दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दांडीया, प्रत्येक सणात तुमचे नेते आणि पुढाऱ्यांनी शिरकाव करून सणांचे पावित्र्यच घालवले आहे. तुम्हाला त्यामध्येच रस आहे. पण खरं सांगू त्या काळात मी तेथे नसतोच.
टन..टन..टन..
मी एकदम बाहेर येतो.
मला अजून खूप काही सांगायचे असते, विचारायचे असते पण तो देव कुठे गेला? तो मला काही केल्या दिसत नाही. समोरच्या देव्हाऱ्यातील ती मोहक मूर्ती मला बोलवीत होती. पण आता ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती, मला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देवाने दिली होती. मला सारखे वाटत होते की मला त्याने आशीर्वाद दिला आणि तथास्तु म्हणून निरोप दिला. हा सगळा भास होता की सत्य?
रवींद्र ताम्हणे, नाशिक – response.lokprabha@expressindia.com