01vbटोमॅटो पेपर रस्सम

साहित्य :
१ चमचा तेल
१/४ चमचा हिंग
२-३ चिमटी हळद
४-५ कढीपत्ता पानं
२-३ चमचे कोथिंबीर
१ लहान टोमॅटो, बारीक चिरून
३-४ लसूण पाकळ्या ठेचून
२ ते ३ चमचे चिंचेचा कोळ
lp27२ चमचे शिजलेलं तुरीचं वरण
चवीपुरतं मीठ
रस्सम मसाला पावडर
१ चमचा धणे
१/२ चमचा काळीमिरी
१/२ चमचा जिरं
२-३ सुक्या लाल मिरच्या

कृती :
१) आधी रस्सम मसाला पावडर बनवून घ्यावी. त्यासाठी धणे, जिरं, मिरी आणि लाल मिरच्या वेगवेगळं कोरडंच भाजावं. अगदी हलकं भाजावं.
२) मसाले गार झाले की त्यांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी.
३) पातेल्यात तेल गरम करावं. त्यात हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता घालून परतावं. १ चमचा रस्सम पावडर घालावी. मंद आचेवर १५-२० सेकंद परतावी.
४) चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईस्तोवर परतावं. नंतर २ कप गरम पाणी घालावं. वरण आणि चवीनुसार चिंचेचा कोळ घालावा. मीठ घालावं. मंद आचेवर उकळी काढावी. रस्सम एकदम पातळ असावं. चव पाहून गरजेनुसार रस्सम पावडर, मीठ किंवा चिंचेचा कोळ घालावा.
हे रस्सम गरमच प्यावं किंवा भातावरसुद्धा घेता येतं.

lp29डाळ वडा

साहित्य :
१ कप चणा डाळ
५ ते ६ हिरव्या मिरच्या
८ ते १० लसूण पाकळ्या
१ इंच आलं
१० ते १५ कढीपत्ता पानं
१/४ चमचा हळद
१ चमचा जिरं
१ चमचा तीळ
१/२ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
तळण्यासाठी तेल
चवीपुरतं मीठ

कृती :
१) चणा डाळ धुऊन घ्यावी. नंतर २ ते ३ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावं. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरंचसं पाणी निघून जाईल.
२) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आलं-लसूण, कढीपत्ता आणि थोडंसं मीठ घालून अर्धवट बारीक करावं. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावं. तसंच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जिरं घालून मिक्स करावं.
४) कढईत तेल गरम करावं. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावा.
टीप :
वडय़ाच्या मिश्रणात १ कांदा बारीक चिरून घातल्यास जरा वेगळा पण छान स्वाद येतो.

lp28कोकोनट राईस

साहित्य :
१ वाटी तांदूळ
१ वाटी खवलेला ताजा नारळ
२ ते ३ चमचे तेल
१/२ वाटी शेंगदाणे
दीड चमचा उडीद डाळ
१ चमचा चणा डाळ
१/४ चमचा मोहरी
१/४ चमचा हिंग
७-८ कढीपत्ता पानं
३-४ लाल सुक्या मिरच्या
१/२ चमचा किसलेलं आलं
चवीपुरतं मीठ

कृती :
१) भात मोकळा शिजवून घ्यावा. शिजवताना भातात मीठ घालावं. भात शिजला की ताटात मोकळा करून ठेवावा. कोमट झाला की ओलं खोबरं घालून मिक्स करावं. आवडीनुसार खोबरं कमी-जास्त करावं.
२) तेल कढल्यात गरम करावं. आच मध्यम ठेवावी. आधी शेंगदाणे घालावे. खमंग तळून बाजूला काढावं. अशाच प्रकारे चणा डाळ आणि उडीद डाळ तळावी. हे सर्व भातावर घालावं.
३) उरलेल्या तेलात फोडणी करावी. मोहोरी, हिंग, कढीपत्ता, किसलेलं आलं आणि लाल मिरच्या घालाव्यात. ही फोडणी भातावर घालावी.
४) हलक्या हाताने भातात मिक्स करावं. तयार भात थोडा गरम करायचा असल्यास मायक्रोवेव्हमध्ये गरम करावा किंवा जाड कढईत मंद आचेवर झाकण ठेवून ३-४ मिनिटं गरम करावा.
टीप :
१) हा भात कोणत्याही रस्सा भाजीबरोबर चांगला लागतो.
वैदेही भावे response.lokprabha@expressindia.com